Tuesday, August 6, 2013

झोटिंग

भर दुपारचं  लाही लाही करणाऱ्या  उनात फाट्यावर टंग कन घंटी वाजली अन कनडक्टर म्हणाला, ये$$$$ उतर पोरा$$$$$ आलं तुझं गाव. आतून कधीकाळी पोपटी रंगाचा आणि आता पानाच्या थुंकीने तांबड्या रंगासारखा दिसणारा दरवाजा उघडुन, खांदयावरची  पिशवी सांभाळत उतरलो.  मागून खाट्ट आवाजानंतर "हं राईट " अस्या  कनडक्टरच्या ईश्याऱ्याबरोबर  त्या फाट्यावरच्या अंगावर येणाऱ्या शांततेला उभं आडवं चिरत एसटी निघून गेली. मागे उरली ती गावच्या विरुद्ध दिशेला असलेली उंच पाण्याची टाकी, फाट्यावर कधीतरी निज्यामाच्या काळापासून जमिनीत रोवून ठेवलेला रांजण ज्यावर पंजा, चरखा आणि बैलगाडीची चुन्याने काढलेलि  चित्रे,   रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाकड्या तिकड्या वाढलेल्या आणि बुडावर तपकिरी आणि पांढरा रंग मिरवणाऱ्या बाभळी आणि  प्रचंड उडालेल्या धुळीतून विस्तीर्ण काळ्या रानात रस्त्याच्या दुतर्फा वाटसरुंची वाट बघत शांत पडलेल्या पायवाटा. यातील काही वाटा गावाकडे जाणाऱ्या आणि काही वाटा रानातच दूरपर्यंत जावून नंतर छोट्या छोट्या होत हरवत जाणाऱ्या.

ह्या रानातच हरवणाऱ्या वाटांचं मला नेहमीच कौतुक वाटायचं आणि भीती पण.  चुकून गावाकडे जायची वाट सोडुन एखादी रानातील वाट पकडली तर.  बापरे ! ह्या रानातल्या बाभळीवर आणि लिंबाच्या झाडावर भुतं राहतात हे मला लहानपणीपासून माहित आहे. कुणी एका धर्मु आण्णाने धोतराने फास लावून घेतलेलं झाड, एखाद्या बाईने सासुरवासाला कंटाळून बाभळीच्या झाडाला घेतलेली फाशी तर एखाद्या बाळातिन बाईला तिच्या सासरच्या रानातच सौन्दडिच्या झाडाखाली जाळलं होतं याची लहानपणीच मिळालेली पक्की माहिती. हि रानात राहणारी झाडे म्हणजे भुताची घरे आहेत. होय तेच ते लांब दिसणारे जुने चिंचेचं झाड, त्या चिंचेवर राहणाऱ्या झोटिंग  बाबाला वश करण्यासाठी गावातील एक बाई दर अमुशेला आणि पूर्णिमेला नागड्या अंगाने पुजायला जायची आन एकशे आठ  फेऱ्या मारायची. एके दिवशी गावात बोबाटा झाला अन सगळे गाव त्या दिशेने पळाले. त्यात त्या बाईचा नवरा आणि सात वर्षाचा पोरगा पण होता. आपल्या आईच्या अंगावर कापडं  का नाहीतीरं बा असं पोरानं विचारायच्या आतच  काळी जादू करणाऱ्या बाइला सगळा गाव दगडं मारू लागला. पण पहिला दगड त्याच्या बानंच मारला होता. त्या दगडांच्या आणि लोकांच्या किंचाळण्याच्या आवाजात "माज्या आईला मारू नका वो$$$$$$$$$$ हा त्या चिमुरड्याच आवाज रानातच विरून गेला" सहा महिन्यानं त्या पोराचा बाप पण येड लागून मेला. त्या पोराला पण येड लागलं व्हतं म्हणे पण त्याच्या आजीनं झोटिंग बाबाला नवस बोलून थोडं तरी निट करून घेतलं. तोच भांबडा आण्णा. तो गावात कुणाला पण  दगड मारू शकतो, त्याला झोटिंग बाबाचा आणि त्याच्या आईचा आशीर्वादय . त्याला जर कुणी मारले तर तो चिंचेच्या झाडाखाली जावून आपल्या आईला आणि झोटिंग बाबाला सांगतो अन मग त्या मारणाऱ्या माणसाला पण येड लागतं. गावात गेल्यावर त्याच्या पासून लांबच राहायला पाहिजे.

ह्या भुतांच्या आणि अनेक नागांनी आपली लांबी, लांबच लांब वाढवून संपूर्ण रानात पायवाटांच्या रुपाने  पसरवलेल्या जाळ्यात अडकून पडण्याच्या भीतीवर गावाकडं जाण्याच्या तगमगिने मात केली. फाट्यावर चालू होवून अनेक दिशेला जाणाऱ्या गुंतागुंतीच्या अनेक पायावाटापैकी एक पायवाट धरून सरासरा चालत आणि गाणं म्हणत निघालो. चालताना फक्त लांब दिसणाऱ्या चिंचेकड बघायचं नाही हे ठरवल्यामुळं तिकडं जास्तच लक्ष्य जात व्हतं. एकदा आज्जीनं सांगितला व्हतं कि "झोटिंग" बारक्या पोरांना काहीच करीत नसतं पण आता मी थोडा  मोठा झाल्यासारखा वाटत होतो. त्यामुळं जास्तच भीती वाटुन चालण्याचा वेग वाढू लागला. एकदा सरोवर ओलांडल्यावर झोटिंगचा इलाका संपतो म्हणून जो जोरात लक्ष्मिआयचं नाव घेवून पळालो तो सरोवर म्हणण्याच्या लायकीचा नसणारा छोटासा कोरडी वाळू असलेला ओढा ओलांडूनच मागे वळुन बघितले. तोंडाला आलेला घाम पिशवीनं पुसला थोडा सुस्कारा टाकत पाउलं अजून झपा झप पडायला लागली. थोडं पुढं गेल्यावर परसात दोघंजन कडब्याची गंज लावताना दिसली आणि जीवात जीव आला.  गावातली भरमू अन्नाची माडी पण दिसत होति. वोलांडली कि आपलच घर.

आजी उंबऱ्यातच शेंगा फोडत बसली होती.  मला बघितलं कि उठुन उभारली, जवळ घेवून मुका घेतला आणि गालावरून हात फिरवून स्वताच्या डोक्यावर कडकडा बोटं मोडली आणि चुलतीला म्हणाली
"आगय बसलीस काय फ़त्काल मांडून उठ कि पाणी आन, दिसत नाही काय का पोरगं एकटाच आलाय फाट्यावरून? "
माझ्या अंगावरून पाणी ववाळुन वट्यावर टाकलं अन हाताला धरून ये बस म्हणणार तेवढ्यात आजीचा मोठा आवाज आला, "पोरगं तापानं फ़न्फन तय गं $$$$ एकटंच आलाय फाट्यावरून, मिरची, किर्सुनी आणि सूप घेवून ये गं, दिस्ट काडू दि गं $$$$ पोराची. " "ई मेलं, ह्याज्या बापाला कळत न्हाय म्हणून आईला कळूनी का, एकटंच पोराला लावलय, पोरगं फाट्यावरून येतं करतं" , "आई लक्ष्मी आई$$ निट करगं पोराला, तुझंच लेकरू हाय! जीवाला मेलं सुखच न्हाय एक सून चांगली भेटली न्हाय, सगळ्या उंडग्या मेल्या! हिला काय काळजी आमच्या वंशाच्या दिव्याची", "वली वली काय न्हाय काय न्हाय आता जातुय बघ ताप पळुन"
तेवढ्यात पण मी आजीला विचारलंच " आये नदीला पाणी हाय का गं पवायला"
आजी, "झोपय मुडद्या काय पण पोरगं बापावरच गेलंय"










No comments:

Post a Comment