Sunday, March 6, 2016

वासोटा ट्रेक अविस्मरणीय अनुभव



वा$$सोटा वासो$$टा$$, वा$$सो$$टा वा$$$$$ सो$$$ टा$$$ वासोटा! तुम्ही कसंपण म्हणा, मी जेवढ्या वेळा नाव ऐकलंय तेवढ्या वेळा माझ्या नववीच्या वर्गात गेलोय.

लोंग लोंग यागो मी नववीच्या वगैरे वर्गात शिकत असताना, गुरुजी म्हणाले “आणि मग सेनापती बापट हातातला सोटा उगारत असत वैगैरे वैगैरे..........” आणि आमच्या वर्गात फकस्त नर मंडळीत हशा पिकला. आता आमचा गुरुजी पण तिथलाच असल्याने त्याला जनता जनार्धन का हसत आहेत ते सांगायची गरज नव्हती. अशा वेळी मुलींनी नेहमीप्रमाणे आपली मान खाली घालून कंपासात, पुस्तकाच्या आतील पानात काय सापडते का ते शोधण्याचे नाटक करण्याची ड्यूटी इमाने इतबारे निभावली. हि साधी गोष्ट नसते, आपल्याला पण आवडलेली गोष्ट,”नाही बाय आवडली, किती घाणेरडी आहेत मुलं” असं नाटक करायला हजारो वर्षाच्या परंपरांचं ओझं लागतं.  

तर असो. पण असे अगदी दुर्मिळ हसण्याचे प्रसंग वगळता ती शाळा म्हणजे बंदिखानाच असतो. मग आम्ही अशा दुर्मिळ प्रसंगांना लांबवण्याचा प्रयत्न करत असू. तर माझे हसू काय थांबत नाही हे बघून गुरुजींनी विचारालेच, “काय झालं गोडग्या, लय खाजवाय लागलं काय?” मी आपलं गप बसायचं सोडून, “नाय पण ते गुरुजी सोट्याचा अर्थ काय हो? “ असा प्रश्न अगदी तोंडावर युधीष्टाराचे भाव आणून विचारला. आणि गुरुजींनी मघापासून बळेच आणलेला सहिष्णुतेचा आव सोडून मला येवून पाठीत दोन रपकं अगदी करक भरेस्तोवर लावलं. मी कण्हत कण्हत होतो तोवर समोर जाऊन गुरुजींनी सांगितले,

“तर मुलानो सोटा म्हणजे काठी, सेनापती बापट हातात सोटा ठेवत असत म्हणजे काठी ठेवत असत” आता कुणाची हसायची हिम्मत झाली नाही पण त्यावेळी शुध्द पुणेरी भाषेत काठीला सोटा म्हणतात हे समजले.




तर ह्या वासोट्याने मला तो सोटा आठवत असे. गेली अनेक वर्ष पुण्यात आल्या पासून हे वासोटा पुराण ऐकायचो. वासोट्याचे नाव काढले कि पुण्यात राहणारी काही मुले जिथे जाऊन न येता कुणाच्या तरी ब्लॉग वर वाचून समजलेली माहित न थकता अगदी रंगवून सांगत. म्हणजे तिथे वाघ आहेत, जळू आहेत, ते लय डेंजर आहे, तिथे माणूस वैगेरे आसपास नसतो, वासोटा केला कि महाराष्ट्रातील कुठल्याही ट्रेकसाठी तुम्ही तयार असता वैगेरे वैगेरे.

ते काही का असेना पण वासोटा केला कि माणूस महाराष्ट्रातील कोणत्याही ट्रेकला तयार होतो यावर या अनुभवाने शिक्का मोर्तब केले.

एके दिवशी मी किल्लेदारी ग्रुपवर सहज टाकले, कि चला वासोट्याला जाऊ. आता मी करमेना गेलं कि सहज कायपण बोलतो, पण हे लोक सहज बोललेलं पण लयच मनावर घेतात. आणि सगळे घोड्यावर बसून तयार झाले आणि मग मला नको कसं म्हणायचं हाच प्रश्न पडला.
पहाटे उठून मोशी, भोसरी, आकुर्डी, डांगे चौक, रांडे कॉलेज, आणि स्वारगेट इथली मंडळी उचलून सकाळी सातारा मार्गे बामणोलीला पोचलो तर तिथं आदल्याच दिवशी येऊन पीएचडी बंड्याने सगळी व्यवस्था करून ठेवली होती. तिथं जाऊन बोटी साठी घासाघीस वैगेरे करून झाली आणि गाईडची गरज नसताना तीन बोटींचे तीन गाईड आमच्या बोकांडी मारले. तीन ग्रामीण लोकांना रोजगार मिळाला हीच एक जमेची गोष्ट सोडली तर हा एक ब्ल्याकमेलिंगचाच प्रकार वाटला. तीन बोटींनी दीड तास कोयना ब्याक वाटर मधून प्रवास करून येते ते वासोटा गाव. त्या तीन किलीमिटर मध्ये इंजिनचा आवाज सोडला तर सगळे काही छानच वाटते.



डोंगरांनी वेढलेल्या त्या भरगच्च नदीतून प्रवास करताना वो मांझी रे हे गाणे गायची माझी इच्छा त्या बोटीच्या इंजिनाच्या आवाजात कुठल्या कुठं विरून गेली पण तसल्या आवाजात पण त्या गाईडने दाखवलेला एक उंच डोंगर आणि त्या डोंगरवरील लग्नाची वरात कायम लक्षात राहील.

दूरवरच्या एका डोंगरावर घोड्यावर बसलेला नवरदेव, पुढे ब्यांड बाजा, मागे छत्र्या घेऊन हातातल्या टोपल्यातून नवरदेवाच्या अंगावर भात टाकणाऱ्या करवल्या आणि उत्साही वर्हाडी मंडळी. असे तोंतोतंत चित्र दिसत होते. निसर्गाने एवढे छान आकार निर्माण करणे शक्य आहे का ह्या प्रश्नात न पडता गाईडने सांगितलेला गोष्टीवर मी विश्वास ठेवला.

असेच फारफार वर्षापूर्वी ह्या डोंगराच्या पायथ्याच्या गावातून एक वरात पलीकडच्या गावात चालली होती. रात्री सुद्धा वाजत गाजत जात असताना ती वरात नेमकि त्या डोंगरावर असलेल्या डोंगरोबाच्या पाया पडायला विसरली आणि पुढे तशीच जात राहिली. त वारातीली एक म्हाताऱ्या बाबाला ते समजले तो सगळ्यांना विनवू लागला तसे नका करू राजेहो, आपला डोंगरोबा हाय तो त्याच्या पायाला वोलांडून नका  जाऊ, आरं डोंगर हायेत म्हणून आपुन हाय, आणि डोंगरोबा हायेत म्हणून डोंगर हायेत, डोंग्रोबाला वोलांडून गेलात तर लय वाईट वंगाळ होऊन जाईल राजेहो ......अशी बेंबीच्या देठापासून आणि काळजाच्या कप्प्यातून येणाऱ्या विनंतीला आनंदात भेभान होऊन नाचनाऱ्या वरातीने दुर्लक्ष केले आणि तसेच पुढे गेले. तो म्हातारा बाबा एकटाच जाऊन डोंगरोबाकडे माही मागू लागला,’ पोरंसोरं हायेत देवा, माफ करा देवा, पाप पदरात घ्या देवा, मी हायेकी तुमचं कमी जास्त करायला देवा राजा, माफ करा” आणि त्या म्हाताऱ्याच्या तिथंच दगड झाला आणि पुढे चालत, नाचत, आनंदात पुढे सरकत असलेल्या वरातीचा पण नवरा नवरी सहित आणि वर्हाडी मंडळी सहित दगडात रुपांतर झाले. त्या दोन गावांना शाप मिळाला आहे, इथून पुढे तिथून जी वरात जाईल तिचे त्या दगडात रुपनातर होईल आणि पहिल्या ज्या वरातीचे दगडात रुपांतर झाले होते त्यांचे पुन्हा माणसात रुपांतर होऊन त्यांना जिंदगी मिळेल. तेव्हपासून तिथून पुढे अनेक वरती गेल्या पण आता तिथे दगडात अडकून बसलेली जी वरात आहे ती कोणत्या काळातील आहे ती कुणीही सांगू शकत नाही. नंतर काही वर्षांनी तिथून वरात जाणे बंद झाले. ती शेवटची वरात आता दुसरी कोणतीतरी वरात येईल आणि आपली डोंगरोबाच्या शापातून मुक्तता करेल अशी वाट बघत आहे. आता दुसरी जाणारी वरात त्या पहिल्या वरातीची शापातून मुक्तता करीन कि दुसऱ्याच अजून एका शापात ढकलेल हे कुणालाच माहित नाही. कारण आता त्यांची मुक्तता झाली तर त लोकांची वये वाढलेली असतील का ती तरुणच असतील, शेकडो वर्षा नंतर त्यांच्या पिढ्या येऊन गेल्या नंतर त्यांना जिंदगीकढून कसल्या अपेक्षा असतील? ते वाग्दत्त वर आणि वधू जे मिलनाच्या वोढीने आसुसलेले असतील त्यांना आता मानवी शरीरे मिळाल्यावर त्यांच्या मनात आता मिलनाची तीच वोढ असेल कि आता सगळं संपून त्या वोढीने पराभव स्वीकारला असेल, कि पराभवाच्या पुढे जाऊन मनात वैराग्याचे भाव आले असतील?  काहीका असेना तिथून आता वरात जाने बंद आहे तेच चांगले.


















मला ती वरात आणि तो डोंग्रोबा जवळ जाऊन बघायचा आहे. पौर्णिमेच्या चांदरत्री तिथं जाऊन डोंग्रोबाला आपण विनंती करायची आहे कि यांना शापातून मुक्त करा. बघू आपल्या अगांतून विनंतीला डोंग्रोबा मान देतो का. दिलाच तर पुढे जाऊन त्या वरातीतील दगडांची माणसे होतानाचे साक्षीदार बनायचे आहे. त्या चांदण्या रात्री पुन्हा तो वरातीचा आणि ब्यांडचा खेळ चालू होईल का, जसे पूर्वी काहीच झाले नाही ह्या अविर्भावात ?

उप्स त्या वारात्तीतून बोटीत यायला मला जरा उशीरच झाला. दीड तासाच्या ह्या प्रवासातून आणि त्या मध्यरात्री दगडात रुपांतर झालेल्या अनेक वराती मधून आम्ही शेवटी वासोटा ह्या गावी पोचलो. कमी झालेल्या पाण्यातून चालत डोंगराच्या पायथ्याशी फोरेस्ट ऑफिस आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात जसा असतो तसंच  इथे पण एक लोकांच्या गोड बोलण्यासाठी, विनंतीसाठी आसूसलेला आणि मी सरकारी अधिकारी आहे आणि इथेच माझाच नियम चालतो हे सांगणारा एक वाचमन, कम फोरेस्ट ऑफिसर कम मेजर होता. त्याने अजून जास्त माज दाखवला असता तर आमच्यातील काही लोकांनी अजून थोड्या वेळाने त्याला ब्रिगेडियर करून टाकले असते.

तर तो म्हणू लागला वरती जेवण वगैरे घेऊन जायचे नाही, लोक कचरा करतात आणि आम्हाला स्वछ  करावा लागतो. आम्ही विनवू लागलो, “साहेब बारकी लेकरं बाळ आहेत हो, जेवण वरती नाही घेऊन गेलो तर त्यांना दम नाही निघणार पण मोठ्यांना पण ते शक्य नाही. पण ती त्याची जागा होतो , तोच तिथला मालक आहे हे त्याला दाखवायचे होते, ते आम्ही कबुल केले, त्याला पाहिजे तेवढा भाव दिला, त्याचा “साहेबाचा” राज्याभिषेक केला आणि त्याने आम्हाला पुढे सोडून उपकृत केले.
वासोटा किती मोठा आहे, किती चालायचे आहे आणि किती चढायचे आहे ते खालून कळत नाही. किलोमीटरभर चालत गेलो, जंगलात किल्ल्याच्या पायथ्याशी मस्त वोढा आहे आणि त्यातून ह्या उन्हाळ्यात सुद्धा झिरपत झिरपत पाणी येत होते. दोनेक किलोमीटर भर चालून लगेच दमलेलो आम्ही ते थंड पाणी मनसोक्त पिलो आणि तोंडावर, पायावर मारून घेऊन वाटर थेरपी करून घेतली.
सह्याद्रीच्या जंगलातील शीतहरित जंगल पाहायचे असल्यास ह्या जागेला तोड नाही. शंभर वर्ष जूनी वाटावीत अशी वृक्षे, पंधरा, वीस मीटर उंचच उंच झाडे आणि दुपारीच पडलेला अंधार आणि सावली. ह्या जंगलाने आमचे दुपारच्या उनातील चालणे सुसह्य केले. आता बहुतेक आलेच असे वाटत असताना किल्ल्याची खरी चढण अजून चालूच व्हायची आहे असे समजायचे. तेव्हा आपण कुठे पोचायला चालत नाही आहोत आणि आपल्याला फक्त चालत राहायचे आहे असे समजत चालले तर बरे वाटते.

त्या फोरेस्ट ओफिसरची कडक भूमिका असेल किंवा किल्ला दूर असेल पण चढताना कुठेही पाण्याच्या बाटल्या, प्ल्यास्तिक ब्याग आढळत नाहीत ह्याचे समाधान वाटत राहिले. जेंव्हा दोन तासांच्या चढाई नंतर तुम्ही वरती चढून पाचीमेकडील बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगर रांगा पाहता आणि पूर्वेकडे सातारा जिल्ह्यातील डोंगररांगा पाहता तेव्हा तुम्हाला पहाटे उठून दोन तोसा बोटिंग करून आणि तीन तास चढून आल्याचे समाधान वाटते. तिथून दिसणारे निसर्गाचे सुंदर रोद्र रूप पाहण्यासाठी येवढा तर घेतलाच पाहिजे. नाहीतर ओफिसातील कामे जशी दुरार्याकडून करून घेता तसेच इथे पण दुसऱ्या कुणाला तरी पाठवून त्याच्या अनुभवावर भागवले तर माझ्या बापाचं काहीच जाणार नाही.
गडावर तीन वगवेगळ्या टोकावरून दिसणाऱ्या वेगवेगळ्या दृश्यामध्ये तुम्हाला स्वतःला विसरून घालवण्याची ताकत आहे पण हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही दिले झाकून एखाद्या कड्यावर पडले आहात आणि खालून दऱ्या खोऱ्यातून येणाऱ्या आणि जंगलातून येणाऱ्या आवाजात स्वताला झोकून दिले आहे. हे माझा फोटू काढरे, ये माझा सेल्फी घेउदेरे, ये चला लवकर घरी अंधार व्हायच्या आट निघायला हवं ह्यात अडकले असाल तर त्या जंगलाच्या आणि निसर्गाच्या अद्भूततेत हरवून जाण्याच्या मानवी ताकतीची कल्पना तुम्हाला येणार नाही.

सोबत काही फोटोग्राफ दिले आहेत ते सिद्ध करतील कि अशी दृशे मी आयुष्यात पहिल्यांदाच पहिली आहेत. पावसाळ्यातील ह्या डोंगर रंगांचे रौद्र रुपाची कल्पना करू शकत नाही म्हणून तर हा किल्ला १५ आक्टोबर पर्यंत बंद असतो आणि पौ पूर्ण बंद झाल्या नंतरच चालू होतो.


त्या कड्यावर एक दिवस आणि एक रात्र खूप कमी लोकांच्या म्हणजेच एखाद्या किंवा दोघांच्याच सानिध्यात घालवायची इच्छा आहे. एकट्याने घालवायला सुद्धा आवडले असते पण ते बोलणे सोपे आहे याची जाणीव आहे मला. 




5 comments: