Sunday, January 26, 2014

२६ जानेवारी

विसेक वर्षापूर्वी, उद्या २६ जानेवारी म्हणता आदल्या दिवशी शाळेला दुपारून सुट्टी मिळायची. कपडे धुवायला आणि इस्त्री करायला असावी बहुतेक. कारण अपवाद वगळता सगळ्या लेकराकडे एकच खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा. मग त्या दिवशी आम्ही सगळे दोस्त कुणाच्या तरी एकाच्या घरी जमायचो आणि पितळंच्या तांब्यात कोळसा टाकून आमची इस्त्री चालू व्हायची. तास दोन तास झटून झाल्यावर हा खेळ बंद व्हायचा कुणाच्या तरी सदऱ्यावर कोळसा पडल्यावर. तो बिचारा बारकं तोंड करून जायचा आणि आईचं धपकं खायचा. त्या धपक्याच्या आवाजानं आम्ही गपचीप लेपाटं अंगावर घेवून झोपायचं सोंग करायचो. तेवढ्यात आई म्हणायची "झोपंय मुडद्या कायतरी जी न्हाय तीच उदेग करून बसतंय, येवूदि ह्यांना तुला सांगते कसं असतं ती " संध्याकाळी वडील आल्यावर बहुतेक परटाकडून इस्त्री करून आणत असतील कारण दुसर्या दिवशी सदरा आम्ही ज्या अवस्थेत सोडलेला असायचा त्यापेक्ष्या भलताच चांगला दिसायचा.

खाकी चड्डीत कधी न्हायतीच पांढरा सदरा खवुन प्रमुख पाव्हणे, सरपंच, पाटील, भावी सरपंच आणि मुख्याध्यापक यांची भाषणे संपायची वाट बघायची. दोनचार तास उन्हात बसायचा त्रास व्हायचा, पण वैताग नाही यायचा कारण शाळेला सुट्टी आणि भाषणे संपल्यावर मिळणारी दोन बिस्किटे आणि दोन लेमन गोळ्या. एकदा कार्यक्रमाचे अध्यक्श्य शेवटचे वाक्य म्हणाले "आज २६ जानेवारीच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपुन सगळी हाव नाहीतर काय खरं नव्हतं, गांधीजी, पंडित नेहरू, सुभाष चंद्रबोस ह्यांची आठवण काढून मी माजे चार शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र!" कि आम्ही पोरं ओळीत उभे राहून गोळ्या बिस्किटाची परात आमच्या पर्यंत कधी येतीय त्याची वाट बघत बसायचो. शेवटच्या भाषणा नंतर मिळणाऱ्या दोन बिस्किटाची आणि लेमन गोळ्याची चव आज सहजच आणि नेहमीच उपलब्ध असणाऱ्या "हर्सिस " ला कधीच मिळणार नाही.

पांढरा सदरा आणि खाकी चड्डी शाळेच्या गणवेशातून हद्दपार करणाऱ्यांचा जाहीर निषेध निषेध निषेध!

Thursday, January 2, 2014

ध्येय (Goal)

किती जण आयुष्यात ध्येय ठेवून ते गाठण्याच्या दृष्टीने सकारात्मक नियोजनबद्ध प्रयत्न करतात हा खरच संशोधनाचा विषय आहे. पण जे लोक यशस्वी असतात ते याच मार्गाने यशस्वी झालेले असतात याविषय मी जरा सुद्धा साशंक नाही. यश म्हणजे एखादे पद मिळवणे, एखादी परीक्ष्य पास होणे किंवा खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवून पहिल्या दोन तीन सामन्यात चमकणे नसते. यश म्हणजे प्रदीर्घ काल केलेल्या तपस्येचे रुपन्तार तात्कालिक सफलतेत होणे आणि मिळालेली यश टिकवून नवीन शिखरे पादाक्रांत करण्याचा सदैव प्रयत्न करणे म्हणजे यश. एखादे शिखर पादाक्रांत केले हे यश नसून तिथे तुम्ही किती काळ टिकून राहिला यावर यशाचे मापदंड ठरतात. 

आयुष्यात ध्येयच नसेल तर आपली अवस्था अश्या फुटबॉल पटुसारखि होईल कि जो गोल पोस्ट शिवाय फुटबॉल खेळत आहे. बॉल कुठे मारावा तेच समजत नाही. अपय आयुष्याची अवस्था अश्या भरकाटणाऱ्या बॉल प्रमाणे होवू द्यायची नसेल तर अगोदर गोल पोस्ट ठरवा. 

जशी एखादी बोट लंडनहून निघताना तिला माहित असते कि न्यूयॉर्कला जायचे आहे त्याप्रमाणे कप्तान ठरवतो, चालू कुठुन करायचे आणि कसे पोचायचे. अर्थात एकदा ध्येय ठरविले कि सगळे आपोआप होते असे नाही. अनेक अडथळ्याची शर्यत पास करूनच इप्सित ध्येय गाठता येत असते. उदा. बोटीला समोर एखाद्या वादळाचा अंदाज येत असेल किंवा दिसत असेल तर थोडासा रस्ता बदलने किंवा चार पावले मागे घेणे ह्यात पण शहाणपणाच असतो. किंबहुना त्याशिवाय कुणीही इप्सित गाठू शकलेले नाही. 

एकदा इप्सित ठरविले कि त्याला गाठण्यासाठी आपण तीन गोष्टीचे व्यवस्थापन कसे करता आणि त्यावर कंट्रोल कसे करता त्यावर अवलंबून आहे कि आपण ते इप्सित सध्या करू शकणार कि नाही. 

१. शक्ती (energy management)
२. वेळ (Time management)
3. भावना (emotion management )

या तिन्ही गोष्टींच्या व्यवस्थापला सारखेच महत्व आहे पण मी भावनावर आवर ठेवणे याला थोडं जास्त महत्व देईल. या नवीन वर्षी तुम्ही सगळे लोक उपरोक्त तिन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवून आपले इप्सित गाठू शकाल अशी अपेक्श्या करतो आणि आपल्याला शुबेछ्या देतो.