Monday, October 27, 2014

अजिंठा

वेरूळ बघून थकलो भागलेलो मी माझ्या दोस्ताला बोललो आता अजिंठ्याला कॅब करून जाणार, तर तो म्हणाला तुला तुझ्या कंपनीने माजवून ठेवलंय. दर १५ मिनिटाला लाल डब्बाय, जळगाव, भूसावळला जाणाऱ्या गाडीत बस आणि अजिंठा लेण्यांना उतर. इतक्या दिवस नाही का प्रवास केला बसने. मी बायकोच्या तोंडाकडे बघितले आणि चला बसनेच जाऊ म्हटले. बस किती वाजता आहे हे बघण्या अगोदर औरंगाबादच्या बस स्ट्याड समोर नाष्टा केला. म्हणजे निवांत खाता येते नाहीतर बस येईल कि काय अशी नेहमी भीती असते मनात. महान बटाटे वडा आणि बटाटे रस्सा भाजी मिक्स जी पुण्या मुंबईला मिळत नाही त्याने तृप्त झालो दोन प्लेट घेतल्या. एकदा ती चव तिथे चाखून बघाच.



लक्ष्मिपुजनाचा दिवस,  आपल्यासारखंच शहरात जगायला आलेल्या लोकांची सणासुदीला स्वतःच्या माणसात जाण्यासाठीची गर्दी. त्यात काही गोरे आणि पिवळे लोकपण होते. काखेत लेकरं, पिशव्या, फटाके, केरसुण्या घेऊन वाट बघणारे बायका पुरुष आणि बर्मुडा, पाठीवर श्याक, गोगल, गोल टोपी, आदिदासचे बुट घातलेले पर्यटक अशी रंगीबेरंगी गर्दी. बस आली आणि एका सेकंदात सगळ्या सीटवर रुमाल टोप्या, पिशव्या आणि किरसुन्या सुद्धा. गोऱ्या लोकांना याचे काही वाटले नाही पण सगळ्यात अगोदर बस मध्ये चढलेला आणि एकही सीट खाली नाही बघून आश्चर्य चकित झालेला तो मुंबईकर पाहून मला दया आली. आपण अगोदरच रुमाल टाकल्यामुळे निश्चिंत होतो. पण तो मुंबईकर एका गावकऱ्या बरोबर भांडू लागला आणि आमच्या मुंबईत असे नसते लोक कसे शिस्त पाळतात वैगेरे सगळ्या बस मधील लोकांना उभे राहुल प्रवचन देऊ लागला. एकजण म्हणाला "आरे बाबा कश्याला आला मुंबई सोडून जा कि तिकडंच, इथं, हितल्या सारखं राहायचं" हे ऐकून सगळी येष्टी हसली आणि त्याची सुंदर, बॉयकटवाली बायको म्हणाली, गपरे कश्याला नादि लागतोस" 

औरंगाबाद ते अजिंठा १२० किलोमिटर अंतर. सुरुवातीला सर्वसामान्य मराठी प्रदेश वाटला पण शहर सोडले आणि मी महाराष्ट्रातून नसून अमेरिकेतून तर प्रवास करत नाही ना असा भास होऊ लागला. अपवाद फक्त रस्त्यात बस खड्ड्यात आदळून बसणाऱ्या हादर्यांचा. कुठेच ज्वारी हे पिक दिसत नव्हतेच, खरीप असेल तर तूर किंवा कापूस पण कुठे दिसत नव्हता, नजर जाइल तिकडे फक्त मका आणि मकाच. हे फक्त अमेरिकेतच घडू शकते असा माझा भ्रम तुटला. पिक पध्दतीतील हा बदल आश्चर्यकारक आहे. आजून काही दिवसांनी ज्वारीची भाकरी हि वस्तू आपण जुन्या काळी चपाती किंवा पुरण पोळी कशी सणासुदीला खायचो तशी सणासुदीला खाऊ आणि गव्हाची चपाती,  माक्केकी रोटी आणि सरसोदा साद हेच आपले पण अन्न होईल कि अशी शंका आली. भाकरी फक्त सिंहगडावर लेकरांना फिरवायला घेऊन गेल्यावर, " See son this is bhakari, our forefather were poor people they used to eat it, even though they used to eat "Pitale Bhakari" they were fighters, now you test it, see! its cool, na? " असे लेकबाळाना ट्रेनिंग देऊ. 

अजिंठ्याला पोचलो. उत्कृष्ट व्यवस्थापन, बस थांब्यावरून लेण्यापर्यंत घेऊन जायला खास वातानुकुलीत बस व्यवस्था. वाट बघावी लागत नाही. लेन्याजवळ खुपच छान रेस्तरां दिडशे रुपयात खूप छान जेवण. जेवून गेलात तर बरे होईन कारण तीन ते चार तास तुम्हाला चढत, उतरत, बुट काढत, पुन्हा घालत खूप लेण्या बघायच्या असतात. पण अजिंठ्याच्या कलाकृती पुढे हा त्रास काहीच वाटत नाही. काही गुहा मध्ये वातानुकुलीत यंत्रणा बसवण्यात आली आहे, भारत सरकार आपल्या अमुल्य ठेव्याची एवढी काळजी करू शकते का ? या माझ्या बायकोच्या प्रश्नाला उत्तर देताना मी सांगितले "जपानने शेकडो कोटीची मदत केली आहे अजिंठ्याला तेव्हा या सोयी दिसत आहेत"