Wednesday, June 25, 2014

पोलिस चौकीतील एक तास

हां तर तो तुला फोन करून सतावतोय?
होय साहेब आज तर गाडी जवळ थांबवून बोलला कि तू फक्त माझीचय. 
साहेब हि खूप घाबरली होती, मी नाय घाबरले, मी गाडीचा नंबर बघितला पण लक्षात नाय राहिला, मी त्याला सांगितलंबी कि आरे बाबा हिचं लग्न ठरलं आहे हिच्या नादि नको लागू, पण तो खूप डांबिस दिसतोय, साहेब मी पोलिस भरती होणार आहे, परीक्षा पण दिलीय, फिझीकल आहे पुढच्या महिन्यात. 
आरे वाह तुम्ही पोलिस भारती होणार आहात ? लक्षात ठेवा पळताना जास्त त्रास होवू लागला तर सरळ थांबा, उगीच जीव मोठाय नोकरी पेक्षा. 

तेवढ्यात मनगट आणि गळा पिवळा असलेला पांढरा फेक बगळा आत प्रवेश करतो. 

तुम्ही कोण?
साहेब मी समाजसेवक आहे आणि हि मुलं माझ्याबरोबर आहेत, साहेब त्या मुलाला पकडून द्या आम्ही दावतो त्याला, आया बहिणींनी जगावं कि नाय ?

तुझं कायरे ?
साहेब मला FIR पाहिजे माझे college leaving certificate हरवल्याचे. 

तू जा बाहेर च्या पिवून ये अर्ध्या तासाने. 

ए कायरे बाबा तुला काय झालं?
साहेब बायकोनं आन सासुरवाडीच्या लोकांनी हाणलंय ! अंगावर आणि सदऱ्यावर रक्त सांडलेला इसम म्हणाला. 
म्हातारीलाबी मारलंय का ?
होय साहेब आयला पण मारलंय. 

च्यामायला कारं ?
वायलं राहा म्हणतीय बायकू !
मग राहा कि दुसरा भाऊ  सांभाळीन आईला, बायको पण खुश आणि आईपण. (म्हातारीनं तोंडात मारून घेतल्या सारखं तोंड केलं)

आरं कायदा लय येगळाय, बायकुनं केस केली मजी जावं लागल तुला पण आणि तुझ्या आईला पण आत, वायलं राहा सुखी रहा, बायकोसंगं राहायचं बाबा  उद्या जेवणात कायतरी घातलं म्हणजे काय घ्या. 

पण साहेब Domestic Violence Act हा काय फक्त सुनासाठी नाही, सासू हि सुद्धा स्त्रीच आहे, यांच्या बायकोवर कारवाई केली पाहिजे., मी मधेच तोंड घातले. 

साहेब तुम्हाला चहा पिवून या म्हणून सांगितलंय ना, आम्हाला कायदा शिकविता वकील आहात काय. 

नाही नाही साहेब येतो मी च्या पिवून.  

अर्ध्या तासाने… 
याफीडेविट आणलाय का ?
हो साहेब, हे बघा… 

हे असे नाही चालत निट चांगले आणा. 

अजून अर्ध्या तासाने…साहेब हे घ्या दुसरे याफीडेविट !

काकडे साहेब कसे काय ओळखतात तुला ?
साहेब आमचे गाववाले आहेत… 
मग अगोदरच नाय सांगायचं ? तू बार्शीचा का ?
होय साहेब…
मी पात्रुडचाय, काय लागलं सावरलं तर येत जा… 

तुमच्या मदतीची गरज लागू नये हीच अपेक्शाय. 
धन्यवाद 








Monday, June 16, 2014

म्हातारी

पावसाळ्यातील फट्ट पडलेलि चांदणी रात्र. आकाशात कुठे तरी ढगांच्या पुंजक्याने चांदण्या झाकल्यात,  तेवढेच कायते पावसाळ्याचे अस्तित्व. कुठेतरी ईरवड टाकल्यागत आकाशात दिसणाऱ्या ढगात चंद्र आतबाहेर करून बाहेर बांधलेल्या जनावरांना स्वताचे अस्तित्व दाखवून देत आहे. विहिरीच्या उपस्यावर बांधलेला कोट्यात झोपलेल्या म्हातारीला काहीतरी संशय आला आणि जागिच असलेल्या तिने आपले डोळे उघडले. झोपूनच मागे हात लांबवला, चुलीवरची डाळीची आमटी असलेली तवली कलंडली पण तिने तशीच व्यवस्थित धरून पुन्हा ठेवली, आविल्यावर हात गेला पण काड्याचं डबडं हाताला लागत नव्हतं. मनातल्या मनात सुनेला दोनचार शिव्या दिल्या. "आवदसा कधी काय निट न्हाय ठीवणार" हळुच  उठून बसली आणि हात वरती करून मिडिवर चिंदकात ठेवलेलं काड्याचं डबडं घेतलं. उघडून बघितलं तर अर्धीच काडी तीपण गुल नसलेली, तसंच अंदाज्यानं म्हातारीनं मिडीच्या पलीकडल्या बाजूला हात घालून डबडं घेतलं, त्यात  चांगल्या दोनचार काड्य़ा होत्या. खरं पाहता म्हतारिला उजेडाचि गरजच नव्हति अगदि डोळॆ झाकुन तिला गोठा कम घरातिल सुई सुद्धा सापडलि असती पण  तिने आता उजेड करायला काड्याचं डबडं घेतलं होतं. डाव्या बाजुला अजिबात हालाचाल  न होवु देता तिने काडि पेटवलि आणि झोपलेल्या नातवाच्या अंगावर धरुन उजेड केला. सधारण  आठ वर्षाच्या  पोराच्या मांडीवरून भले मोठे जनवार कमरेकडे चालले होतं, डाव्या हातात काडी ठेवुन उजव्या हाताने वायुवेगाने जनावराने वर केलेलि मुन्डी पकडलि, लाथेने दरवाजा उघडाला, वाकुन बाहेर आलि. तडक उपस्यावरुन उतरुन लिम्बाच्या खालि आलि आणि ते हातातिल जनावर रानात भिरकावुन देवून म्हसोबकडे बघत कोपरापासून हात जोडले, म्हातारीच्या मनगटावरुन कोपरापर्यंत सर्र्कर्ण घसरलेल्या पार जुन्या  कळकट बांगड्याचा खळ्ळ आवाज त्या रानातील मंद झुळूक असलेल्या शांत वातावरणात इस्कटुन गेला. म्हातारी हात जोडून काही काळ हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली "म्हसुबा तूचरे बाबा, येवढ्या रातचं माझ्या नातवाला आशिर्वाद द्यायला आला. माझा नातु मोठा माणुस  होनार! असा आशिर्वाद मिळाला आसंल का कुणाला तरि ?"

परत निघाली, गोठ्याच्या बाहेर उभ्या असलेल्या बैलापुढे कडबा गोळा करून टाकला आणि निवांत बसून रवंथ करत असलेल्या बैलाच्या पाठीवर थाप मारून बाहेरच बाजंवर लेपाटं अंगावर घेवून "पांडुरंग पांडुरंग" करत बसलेल्या म्हताऱ्यावर एक नजर टाकली. संपूर्ण अंगावरून पांघरून घेवून बसलेली ती मूर्ती म्हातारीच्या मस्ताकात बसली. कवाच संसारात साथ मिळाली नाही पांडुरंगाच्या नावाखाली स्वताला सगळ्या जबाबदार्यातून तेवढे मुक्त करून घेतले. पण आता तिला त्याचा  त्रास होत नव्हता. सवय झाली होती. आता जे काय घडले ते म्हाताऱ्याला माहित असेल कि नसेन हा प्रश्न पण तिला पडला नाही, कारण त्याचा काहीच उपयोग नव्हता. फाकट उघडून आत गेली, नातवाच्या मांडीवरून हात फिरवला, गालावरून हात फिरवून बोटे मोडली, विरघळत चाललेली आणि मध्ये मध्ये भोकं असलेली चादर नातवाच्या कमरेवरून तोंडावर टाकली आणि उताणी झाली. छताकडे हात जोडुन म्हणाली सांभाळगं  आई लक्ष्मीआई, म्हसुबाराया माझ्या लेकराबाळांना.

तिनेच एकटीच्या हिमतीवर उभा केलेलं राज्य होते ते!