Monday, July 13, 2015

बाहुबली





मी अपवाद वगळता हिंदी सिनेमाच्या नादाला लागत नाही. ते सरसोंदा खेत, मकाई दि रोटी, एकाच प्रकारच्या संगीतात अनेक गाणी असल्याचे भासवून नाचणारे पंजाबी वाणाचे चपाती हिरो यापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळे असणार म्हणून बाहुबली हा तमिळ सिनेमा बघायला गेलो. तो मूळ तेलगु सिनेमा आहे समजल्यावर सुद्धा अजिबात अपेक्षा भंग झाला नाही. त्या मल्टीप्लेक्स मधील ५० एम एम च्या पडद्यावर ७० mm दिसणारा पहिलाच सीन येतो आणि समजते हि वेगळीच ब्रीड आहे. प्रेक्षक अगोदरच आपल्या उंचावलेल्या अपेक्षांचा डोलारा सांभाळला जाणार आहे असे समजून खुर्चीत आपले बुड हालवून मजबूत करून घेतात आणि आपल्या शेजारी कोण आलं असेल ह्याची उस्तुकता मनात ठेवत आपली जागा शोधणाऱ्या प्रेक्षकाकडे आणि ब्याटर्यांच्या उजेडाकडे दुर्लक्ष करून आपली सगळी शक्ती डोळ्यात आणून डोळे सिनेमात घालतात.

तिथून चालू होणारा अडीच तासाचा प्रवास पहिल्यापासूनच संपूच नये असे वाटत राहते. पडद्यावर दिसणाऱ्या अफाट धबधब्याच्या पाण्यामध्ये राणीने स्वताचा जीव देऊन वाचवलेले बाळ जेंव्हा त्याच पर्वतांच्या आणि धबधब्यांच्या कुशीत वाढून मोठा बाहुबली बनते तेव्हा तो शिवलिंग उचलणारा बाहुबली म्हणजे प्रभास खरा मर्द वाटतो. सहा फुट उंच, साऊथ स्टाईल दाढी, गालावर हास्य आणि गव्हाळ वर्ण. तो पूर्ण चित्रपटभर भारतीय संस्कृती खांद्यावर घेणारा आणि खऱ्या भारताचे नेतृत्व करणारा हिरो वाटत राहतो. तिथे आपल्याला त्याचे येट प्याक आहेत कि सिक्स प्याक आहेत हे बघायची गरजंच पडत नाही. त्या ईश्वरायेवढ्या पर्वतावरून फेसाळनाऱ्या अवाढव्य धबधब्यातून वरती चढू पाहणाऱ्या बाहुबलीने तुम्हाला जिंकलेले असते. पहिला अर्धा पाऊन तास बाहुबलीला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवण्यासाठी खर्च केलाय पण प्रेक्षकांना अजिबात असे वाटत नाही कि कधी तो आपल्या इप्सित स्थळी पोहोचतोय आणि कधी भिड्तोय. बाहुबलीचे आपल्या इप्सित स्थळाकडे पोहोचण्यासाठी सुरु झालेले पर्वतारोहण चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देते. कधी कधी आपल्याला जाणीव होते कि हे दृश्य मिशन इम्पोसिबल टू मध्ये बघितल्या सारखे वाटतेय पण त्यामुळे त्या दृश्याची उंची अजिबात कमी होत नाहीय किंवा कॉपी केली आहे असे म्हणण्याची इच्छा आपण दाबून टाकतो.

तम्मना भाटीया पण चांगलीच दिसलीय. एका पुरुषाचे काम आणि जोखीम अंगावर घेतलेल्या आणि आपले स्त्रीत्व लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीला तिचे स्त्रीत्व बहाल करून देण्याचे काम जेव्हा बाहुबली करतो तेव्हा त्या नृत्य दिग्दर्शकाला सलामच करू वाटतो. “एकाच गाण्यामध्ये तिची लढावू कपडे उतरवून तिचा शृंगार करणारा आणि त्या श्रुंगाराला आपल्या बाहुपाशात घेऊन तिला अत्युच्च पातळीवर घेऊन जाणारा बाहुबली “ हे दृश चित्रपटाची उंची वाढवते.

राजघराण्यातील राजकारण, राजमहाल, कपटे, युध्द ह्या प्रत्येक गोष्टी दाखवताना दिग्दर्शकाने कुठेही कंजुषी केलेली नाही. आपण युद्धे अनेक बघितली आहेत, महाभारत पहिले आहे, ट्रोय, अलेक्झांडर, ३०० पहिला आहे. यातील युद्ध त्या युद्धाच्या भव्यातेपुढे कुठेही कमी पडत नाही. उलट अगोदर कधीही नाही पाहिलेले युद्धातील डावपेच यातील युद्धामध्ये दिसतात. तलवार युद्ध, भाला युद्ध, घोडयावर बसने, उतरणे, घोड्यावरून मारणे, हत्ती मारणे ह्या गोष्टी करताना शंभर किलोचा असलेला बाहुबली कुठेही कमी पडत नाही.

राजकुमारचे मुंडके उडवल्या नंतर काही सेकंद त्याच लईत तसेच चालत राहणारे त्याचे मुंडके विरहित धड प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावते. आता कुठे चालू झालंय असे वाटत असतानाच सिनेमा संपतो आणि अडीच तास कसे गेले तेच आपल्याला काळत नाही. आता फायनल लढाईची वाट अजून एक वर्ष बघावीच लागणार आहे.
हा चीत्रपट म्हणजे बॉलीवूडला दिलेली एक चेतावणी आहे.... Improve or perish.