Monday, February 22, 2016

राजगड तोरणा २० फेब्रुवारी २०१६



लहानपणी कुणी दुसरा मुलगा ग्यारेगार खाताना दिसला तर मलापण ग्यारेगार खाऊ वाटायचे, दुसऱ्याने कुणी नवीन कंपास वैगरे आणला तर मला पण तसलाच कंपास वगैरे आणू वाटायचा, तरुणपणी एखादा मित्र कोणत्यातरी मुलीवर लाईन मारत आहे कळले तर मलापण तीच मुलगी आवडायची. म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टी आवडायचा छंद मला लहानपणीपासूनच होता. हो, पण हा छंद खूप सिलेक्टिव्ह होता. म्हणजे एखादा मित्र अभ्यास करताना दिसला तर मला अभ्यास करू वाटला आहे असे कधी झाले नाही. उलट त्याला पण त्या दुष्कृत्यापासून परावृत्त करावे आणि जिंदगानितली अनेक दुसरी सुखे त्याला पण दाखवावीत असे अध्यात्मिक भाव माझ्या मनात दाटून येत असत.
असेच एके दिवशी फेसबुकवर कुठेही कसल्याही विषयावर भांडण चालू नव्हते, कुणी कुणावर स्टेटस टाकलेले नव्हते, कुणा महापुरुषाची जयंती नसल्याने एखाद्या महापुरुषावर कुणी टीका केलेली नव्हती, फेक अकौंटने टाकलेल्या स्टेटसवरुन विद्वानामध्ये चर्चा परिषद भरलेली नव्हती. असे एकूंनच शांत, रुक्ष, सपक वातावरण झालेले होते. एकूणच फेसबुक म्हणजे सुगीच्या दिवसातल्या एखाद्या गावातील दुपारसारखे निर्मनुष्य झालेले आहे असे मला वाटले आणि मी कुठे काही सापडते का ते शोधू लागलो. तेव्हढ्यात एक स्टेटस वाचण्यात आले. “आपल्याला कूणी दुखाऊ नये असे वाटत असेल तर आपण पण लोकांना दुखाऊ नये, साने गुरुजी” हे स्टेटस वाचून मला पण,” मी काही दिवस फेसबुकवरून रजा घेत आहे, आमचा राम राम घ्यावा” असे स्टेटस टाकायची भयंकर उबळ आली पण मी ती उबळ महत्प्रयासाने आवरली. आणि अशा रुक्ष वातावरणात कुठे काय सापडते का हे शोधत असताना “किल्लेदारी” ह्या ग्रूपवरील संतोष डुकरे यांची “सांधण व्याली ट्रेक” हि पोस्ट वाचली, फोटो बघितले आणि चला आपण पण डोक्यात, अंगात तयार झालेले टोकसीन म्हणजे मळभ दूर करून आले पाहिजे असे वाटू लागले. ऑफिस, फेसबुक, साहित्य, राजकारण-गचकरण हे सोडून पण बाकी अनेक ठिकाणी आपण आयुष्याचा आनंद/थ्रील उपभोगू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली. फेसबुकवर प्रत्येक गोष्ट ब्ल्याक यंड व्हाईट मध्ये बघायची सवय लागलेल्या आपल्याला असं जंगलात डोंगरात घाम काढत भटकणे हे आयुष्तातील नवीन रंगाची नक्कीच वोळख करून देतील अशी खात्री वाटली आणि मला पण किल्लेदारांसारखे सारखे डोंगरात फिरायला जाऊ वाटू लागले.

संतोष डुकरे यांना मेसेज टाकला, “पुढच्या वेळी मला बोलवा” आणि ते असे फिरायला घोड्यावर बसूनच असतात ते कळले. ते म्हणाले,”तुम्ही तारीख सांगा, आपण राजगड तोरणा नाईट ट्रेक करू, कुणी नाही आलं तर आपण दोघंच जाऊ” आणि आमचे वीस तारखेला “राजगड-तोरणा” नाईट ट्रेक करायचे ठरले. कुणी नाही आले तर दोघंच जाऊ म्हणता म्हणता चांगले दहा पंधरा उत्साही मुलं मुली जमली. (मी स्वतःला अजून मुलगाच समजतो”)

काही मुलामुलींचा ग्रुप अगोदर तोरणा मुक्कामी जाणार होता आणि काही आमच्या सारख्या अतिउत्साही मुलांचा ग्रुप अगोदर राजगड चढून पुन्हा लगेच उतरून तोरन्यापर्यंत चालत जाउन पुन्हा तोरणा चढून अगोदरच्या टीमला भेटणार होता.

लहानपणी मला दुसऱ्या दिवशी दिवाळी असल्यानंतर आदल्या रात्री झोप नाही यायची. त्याचप्रमाणे संध्याकाळी ट्रेकिंगला निघायचे असल्याने मला त्या दुपारी झोप नाही आली. बायकोने मी कुठेतरी खरेच शिवाजी महाराजासाठी गड जिंकायला चाललो असल्यासारखी तयारी चालू केली होती. मी नखं काढली आहेत का हे बघण्यापासून सुरुवात झाली होती. आठ दहा चपात्या, ठेचा, मुठभर काळे तिखट आणि त्यावर पळीभर तेल, कच्चे शेंगदाणे, कांदे, काकडी, टमाटी, खजूर आणि किलोभर बटाटी. बटाटी गडावर भाजून खाण्यासाठी. ब्यागच्या एका कप्प्यात बेडशीट, चादर, टॉवेल, चड्डी, बनियान घातले आणि अजून एक शिल्लक कप्पा शोधून त्यात अडीच लिटर पाण्याची बाटली घातली. दहा बारा किलोची ती पिशवी बघून मला एक मिनिट वाटलं ह्यावेळेसचा ट्रेक रद्द करावा आणि पुढच्या वेळेस जावे. हे काय कमी होतं म्हणून शेवटी बायको स्वयंपाक घरातून भाजी कापायचा चाकू घेऊन आली आणि ब्यागच्या कुठल्या तरी कप्प्यात घालत म्हणाली, “रात्री चाललाय जवळ असावा” हे जरा अतीच वाटलं. बायकांचे प्रेम किती आंधळे असते त्याला लिमिट नसते. कधीकाळी रामपुरी बाळगायची स्वप्ने बघणारा मी आता वांगी कापायचा चाकू घेऊन राजगड जिंकायला जाणार होतो. लग्न हि गोष्टच अशी आहे. ते आपलं, “काय होतास तू काय झालास तू” असं एका दणक्यात करून टाकते. आई बाबाच्या पिशवीत चाकू वगैरे घालत आहे हे बघितल्यावर इतका वेळ माझ्याकडे दुर्लक्ष करत असलेल्या सुमेधला समजले कि बाबा काय तरी थ्रिलिंग करायला निघाला आहे आणि म्हणाला,
“बाबा कुठे चाललाय?”
“हायकिंग”, मी
“मग चाकू कशाला घेतलाय”
“आरे हरण, खरगोष काही दिसले तर मारून खायला”
आता त्याचा उत्साह दुणावला होता. तो म्हणाला, “बाबा, आपण धनुष्य बाण घेऊ त्याला दोरी लाऊ, मग बाण घेऊन तो खाली आगीत डूबवू आणि तो वरती डोंगरावर मारू, मग तो बाण वरती जाऊन झाडाला अडकेल आणि मग आपण त्या दोरीला लटकत लटकत वरती चढू”
“म्हणजे डोरेमोन, नोबिता, सुझुका सारखे का?” असे मी विचारले तर म्हणाला
“नाहीरे बाबा, बाहुबली सारखे”
हे मला जरा थोरच वाटले. आता त्याला खरेच यायचे होते पण आपण दोघे पुढच्या शनिवारी सिंहगडला जाऊ म्हणून सुटका करून घ्यावी म्हणालो तर तो म्हणाला, “नाही आज तू जिकडे चालला आहेस तिकडेच जायचे” तर त्याला आता राजगडला घेऊन जायचे ठरले आहे.

आपल्या शंकर आण्णा बहिरट यांनी आपलं चालू ट्रेक्तर दावणीला बांधले आणि त्यांची रामप्यारी घेऊन आम्ही सिंहगडाच्या पायथ्याला वळसा घालून पाबे घाटातून उतरलो आणि राजगडला जायचे म्हणून उजवीकडे वळलो तर तोरण्याच्या पायथ्याला पोहोचलो पुन्हा वळून राजगड पायथ्याला आलो. संध्याकाळी नऊ वाजता ब्याटऱ्या लावून पाच जणांनी राजगड चढायला चालू केले. वरती पूर्ण चंद्र बघून मित्रांना ब्याटऱ्या बंद करायला सांगितले. त्यांनी त्या बंद केल्या आणि वरती असलेला गोल चमकदार चंद्र आम्हाला वाट दाखवू लागला. हातातील ब्याटऱ्या पेक्षा चांदण्यांचा उजेड स्वछ् होता. पाठीवर दहा पंधरा किलोची ब्याग घेऊन राजगड चढणे हे थोर आहे दहाच मिनिटात समजले.
गडावर पोचलो तर मला अगोदर तिथलं पाणी संपले आहे असे सांगून चार चार लिटर पाणी पाठीवर लादून घेउन यायला लावणाऱ्या सहकाऱ्याला राजगडावरून फेकून द्यायची इछा झाली पण ती मी आवरली. अशा अनेक इछा आजपर्यंत मी आवरत आलो आहे. वरती पिटलं भाकरी पासून ते चहा पोह्या पर्यंत सगळे मिळत होते. दोन देवळात आमच्यासारखेच गडकरी गर्दी करून आत बसले होते आणि पूर्ण गडावर बाकी कुत्रं सुद्धा नव्हतं पण दोघेजन बाहेरच एका खडकावर चादर पांघरून आमची वाट बघत बसले होते. आम्हाला बघताच दोघांचा एकसाथ आवाज आला, “ कोंबड्या आणलायसा नव्हं $$$$$” आणि पुढे  कोल्हापुरी लांबत जाणारा टोन

“आन किती ह्यो वेळ, आम्ही कोल्हापूरहुन आन्नाअन्ना करत तुमच्या आदी पोचलो आणि तुम्हाला पुण्याहून किती उशीर $$$$$$$$$ आणि हे साहेब कोण , आगांभया सायबाचं लय हाल झालेलं दिसत्यात जणू$$$$$$$$$$, टाचा घाशीत ओरबडत आनलेला दिसतंय सायबाला, आब्या हितं नाइंटी नाइंटी मिळतीया, घेतूस का भावा, आपुन आल्याआल्या तीच येवस्था बघितली .......आणि आम्हाला बघून त्या दोघांना झालेला आनंद त्यांच्या बोलण्यातून थांबत नव्हता. लय उशीर झालायसा जेवायला काय आणलया, चला चालू करू ह्या गोष्टींवर एकमत झाले आणि आम्ही शंकर अण्णांनी आणलेली भेळ आणि  बाकीच्यांनी आणलेल्या चपात्या ठेचा काढून बका बका खाऊ लागलो.

तेवढ्यात राजगडाच्या चोर वाटेने म्हणजे कठीण वाटेने वरती एक ग्रुप आला आणि आम्हाला वोलांडून पुढे गेला. त्यांच्यात शेवटला मागे राहून टाचा घासत घासत एक जीन्स घातलेली आंटी हळू हळू आपल्या अंगाचा बोजा ओढत येत होती. ती जवळ येताच तो म्हणाला,

“मावशे जेव उलींसं $$$$$$, लय गळाटल्याली दिसतीया $$$$$” ह्या आगंतुक आवतानाने ती शहरी महिला जराशी बावरली पण त्याने त्याच्या पोटात साठवलेली हजार सशाची इमानदारी आहे तशी चेहऱ्यावर आणली आणि पुन्हा म्हणाला, “मावशे कोल्हापुरी मानसाचं आवतान हाय ह्ये, आम्ही उगीच खोटं खोटं न्हाय बोलणार”

एव्हडं बोलल्यावर ती आंटी आपली जीन्स सांभाळत बसली आणि एक घास खाल्ला कि तिला ठसकाच लागला. तिच्याबरोबर असलेली एक सुबक ठेंगणीने आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि सरळ निघून गेली. आमच्या नजरा तितक्या पण वाईट नव्हत्या पण तिला कोण सांगणार राव!. आंटि दोन घास खाऊन निघून गेल्या आणि तो आमच्याकडे जिंकल्याच्या अविर्भावात बघू लागला.
त्याचं नाव पीएचडी बंड्या अशी वोळख आम्हाल आभ्याने करून दिली. मी आदराने घातलेला नमस्कार त्याने तितक्याच आदराने आणि अदबीने स्वीकारला.

“मग कोणत्या विषयात केलीय आपण पीएचडी सर?” मी
त्याचे लक्ष खाण्यावर आहे हे बघून आभ्याने सांगितले,”गावातल्या लडतरी!, म्हणजे बंड्याने गावातल्या लडतरीवर पीएचडी केली आहे” हा शब्द ऐकताच बंड्याने आपल्या विषयी दोनचार कौतुकाचे शब्द बोलले जात आहेत हे बघून पुन्हा माझ्याकडे बघितले आणि म्हणाला

“अगोदरचा कडीकोयंडा जाऊन शेटर आल्याने गावातल्या लडतरी वाढल्या आहेत, हा निष्कर्ष आहे माझ्या शोध निबंधाचा’
“मला काही समजले नाही म्हणून मी अभ्याकडे बघितले तर त्याने माझ्या ज्ञानात भर घातली. तो म्हणाला, अगोदर काष्टा होता, आता साड्या आल्या, काम सोपं झालं असा निष्कर्ष आहे त्याचा. “ मी बंड्याच्या निष्कर्षाला सालुट ठोकला.

एकूण ह्या खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही राजगडावरील हवेचा आस्वाद घेत असताना संतोष डुकरे आणि पायगुडे हे रात्री तीन वाजता पोहोचले आणि जरा पण न थांबता म्हणाले हं चला लगेच तोरण्याला जायचं हितून, फकस्त बारा किलोमीटर चालले कि सकाळपर्यंत तोरण्यावर. ह्या माणसाचं कौतून करावं वाटलं. बुलेटवरून शिर्डीवरून डायरेक्ट राजगडला येवून वरती चढतो आणि जराशीही उसंत न घेता म्हणतो चला लगेच चालत तोरण्याला सकाळ पर्यंत पोहोचायचे आहे.

“मी हितंच झोपतो, मला काय शक्य नाही बुआ म्हटलो आणि ह्या पोरांनी माझा निरोप घेतला. जाताना नीट जावं कि, पण तसं नाही,  संतोष डुकरे हे मला “हितं माकडं खूप आहेत सांभाळून राहा,  हे सांगायला विसरले नाहीत.

आता त्या पौर्णिमेच्या चांदण्याकडे आवकाशात बघत सह्याद्रीवरील हवा खात मी त्या गडाच्या माचीवर एकटाच झोपलो होतो आणि अवकाशातून चंद्र, चंद्राला वोलांडून मंगळ आणि पुढे प्रकाशाच्या वेगाने अवकाशात फिरता आलं आणि सूर्यमालेच्या बाहेरील ग्रहावरील वातारण शोधता आलं तर काय भारी होईल अशा स्वप्नात रमत असताना, माकडं येऊन माझी उशाला ठेवलेली ब्याग पळवतील ही भीती होतीच. पांघरून घेऊन पडून त्या अवकाशाकडे बघताना ह्या नास्तिक माणसाच्या मनात सुद्धा भुताच्या गोष्टी येत होत्या, म्हणजे ह्या गडावर किती लढाया झाल्या असतील किती लोकांचे आत्मे हितंच फिरत असतील वगैरे वगैरे वगैरे.  पण आत्मा वगैरे सगळे झूट आहे असे स्वतःला समजाऊन मी तसेच पहाटेची वाट बघत पडलो. डोळ्याला डोळा न लागता चार वाजता उठलो आणि बालेकिल्ल्यावर जाऊन यावे म्हटले तर चंद्र मावळला होता, माझ्याकडे ब्याटरी नव्हती मग निम्म्यातून परत येऊन आजून सकाळची वाट बघत बसलो.

सहा वाजल्या आणि तोरण्यावरून मेसेज आला, तोरण गडावर पोहोचलो, मी बघितले ह्या लोकांनी कुठे  गंज वैगेरे पेटवली आहे का. तर तसे काय दिसले नाही. आता व्हात्सअप चा जमाना आहे.
दिवस उगवायला मी बालेकिल्ल्यावर चढत होतो एकटे असण्याची एक औरच मजा असते. तुम्ही तुमच्या सवडीने, आवडीने वागू शकता. बालेकिल्ल्याच्या दरवाजावर पोहोचताच तिथे एक प्रेमी युगुल (ज्या कुणी हे नाव शोधले असेल त्याचा सत्कार करायला पाहिजे) होते. मी त्यांच्याकडे न बघितल्या सारखे केले आणि पुढे गेलो. आपण प्रेम किंवा तत्सम गोष्टी करणाऱ्यांना कधीच त्रास देत नाही. बालेकिल्ल्यावर पोहोचलो आणि जाणवले कि खरेच हि श्रुष्टी खूप सुंदर आहे आणि थोडे कष्ट घेण्याची ताकत असली तर आपण ह्या सुंदरतेचा खूप आनंद लुटू शकू. राजगडावरून दिसणारा सूर्योदय आणि वसंतातील हवी असणारी ती हवा.

त्या अफाट सुंदरतेची अनुभूती घेत मी पुढे पुढे सरकत होतो तर मला तिथे अर्धी चड्डी घातलेले चिमणराव आणि गुंड्याभाऊ दिसले. दोघांनीही कडत इस्त्री घातलेल्या खाकी अर्ध्या चड्ड्या घातल्या होत्या आणि ती मंडळी काय तरी गोळा करत असल्याचा भास होत होता. गुंड्याभाऊच्या मोठाल्या आणि केसाळ  मंड्या खूप विद्रूप दिसत होत्या आणि शर्ट थोडा वरती गेल्याने त्याची ढेरी बाहेर येऊन तिच्यावरचे केस घाणेरडे दिसत होते. त्याच्या शेजारी उभारलेला चिमणराव १९७२ च्या दुष्काळातून सुकडी खाऊन कसा बसा वाचलेला आहे असे वाटत होते.

काही मिनिटातच दहा बारा मंडळी जमा झाली आणि आपापल्या हाफ चड्ड्या घालून परेड सावधान मध्ये उभी राहिली. गुंड्याभाऊ आणि चिमणराव त्यांचे लीडर असावेत. ते पुढे उभारून आदेश देत होते आणि बाकी लोक ते मानून आपल्या भाषेत परेड सावधान परेड विश्राम करत होते. ते लोक मराठीतच घोषणा देत असावेत आणि काहीतरी प्रार्थना बोलत असावेत पण त्यांची मराठी मला कळली नाही. पण ते लोक प्रार्थना संपल्यावर शिवाजी महाराज कि जय असे म्हणाले नाहीत. तो राजगड असून सुद्धा. तिथल्या वातावरणाचा आनंद घ्यायचा सोडून “हे काय याड लागल्या सारखं करून राहिली बुआ” असं तिथे आलेली काही मराठवाड्यातील जाणती मंडळी आपापसात बोलत असताना मी ऐकले.
वोळीत उभे राहून त्यांनी नमस्ते सदा उत्सले सदावत्सले  असं बरंच काही बरळले आणि शेवटी संपत संपत संपत असे म्हणून रिकामे झाले. मी तिथे कुठे संपत आहे का बघितले तर मला दिसला नाही. परंतु हे सगळे लोक मला खूप थोर वाटले.

आता मला एकट्याला उतरून तोरण्याला जायचे होते. मी गड उतरायला चालू केले. सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलबिलाट ऐकत राजगडासारख्या  सह्य्राद्रीतील गडावरून एकटेच घामेघून होऊन उतरत राहण्यात जो शारीरिक आणि मानसिक आनंद आहे त्याला तोड नाही. आणि मी मनातल्या मनात माझेच धन्यवाद मानत होतो. एकटेच मागे राहिल्यामुळे मला हि अनुभूती मिळत होती. तासात खाली उतरलो पाय पसरून खाली बसून पाणी प्यालो. असं एकटेच अधून मधून कोणता तरी गड चढत येत राहायचं असा निश्चय केला आणि बुलेटला किक मारून तोरण्याला निघालो.

बाकी टीम खाली येत होतीच. तोरण्याच्या पायथ्याला “जरासा विसावा” ह्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. ते हॉटेल मराठी माणसाचे होते आणि तो मालक आमच्याशी खूपच अदबीने वागत होता. काय पाहिजे काय नाही जवळ येऊन विचारत होता. मराठी माणूस इतका विनयशील तो फक्त महाराष्ट्राच्या बाहेरच असू शकतो ह्या माझ्या विश्वासाला तिथे तडा गेला. खूप मस्त मटन रस्सा आणि भाकरी खाऊन मी हॉटेल मालकाला म्हणालो “जरा काड्याच्या डबड्यातील कडी द्याहो मालक, दात टोकरायचे आहेत! ” तर त्याने टूथ पिक आणून मला अजून एक धक्का दिला. मी त्याला उठून मिठीच मारणार तोच मागे भिंतीवर मोठा शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्याखाली लिहिले होते ते मी वाचले.

“मराठा जात आमची हिमालयाला भोक पाडू, आमचा नाद केला तर हितंच जित्ता गाडू”
हे वाचलं आणि मी मिठी मारायचं क्यान्सल करून एकदम ब्रेक दाबून खाली बसलो. तिथं नाद करायला जाने मला डेंजर वाटले. बिल देतान पुन्हा तो मालक आमच्याशी खूप अदबीने वागला, ते बघून मला वाटले. माणूस जसा लिहितो तसाच असला पाहिजे असे काही नाही.

  


Friday, February 19, 2016

शिवजयंती १६ फेब्रुवारी २०१६ आणि गुगल डूडल





सिक्स प्याक असलेले सहा फुटी तीनशे सैनिक आठ फुटी भाले आणि तसल्याच तलवारी घॆउन लाखो सैनिकांची मुंडकी उडवतात, डेडाळ बाहेर काढतात आणि आपण थेटरात बसून स्पार्टन स्पार्टन स्पार्टन असं भूक लागोस्तोवर ओरडत सिनेमा बघून बाहेर पडतो. हे खोटे आहे हे  माहित असून सुद्धा आपण युरोपियन थोर आणि आशियन म्हणजे मागास किंवा जंगली अशी आपलीच स्वतची प्रतिमा बनवतो आणि हजार रुपये खर्च करून घरी येतो.


सिकंदर ग्रीस मधून येतो लढाया करतो आणि जाताना मरून जातो. त्याच्या नंतर त्याच्या तथाकथित कमावलेल्या साम्राज्याचे काय होते कुणालाच माहित होत नाही पण आपण त्याला जगज्जेता म्हणता म्हणता थकत नाही.

इतिहासाच्या पुस्तकात नेपोलिन द ग्रेट बघून आपण कौतुकाने भारावून जातो आणि ज्याला ज्याला माहित नाही त्याला नेपोलियन किती ग्रेट होता हे  सांगताना आपल्याला इतिहासाचे किती गिन्यान आहे हे दाखवण्याचा सुप्त हेतू साध्य करतो. वास्तविक पाहता नेपोलियनचे टोटल साम्राज्य  सध्या असलेल्या महाराष्ट्राच्या भूभागा एवढे सुद्धा नसते पण नेपोलियन दे ग्रेट म्हणताना आपल्याला आपल्या विषयी उगीच न्यूनगंड वैगेरे वाटत असतो.

युरोपियन लोक त्यांच्या राजांचे आणि इतिहासाचे ग्लोरिफिकेशन करताना थकत नाहीत. चित्रपटातून आणि उपलब्ध असलेल्या सगळ्या माध्यमातून त्यांचा इतिहास श्रेष्ठ, त्यांचे राजे श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी ते कुठलीही उणीव सोडत नाहीत.

आणि आपल्या भारतात जगाच्या इतिहासाने नोंद घ्यावी असा राजा होऊन गेला आहे आणि तो मान महाराष्ट्राला मिळाला आहे हि गोष्ट  संघटीतपणे आपण आणि आपल्या सरकारने जगापर्यंत पोहचवण्याचा किती प्रयत्न केला हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर शून्य येते. जगासमोर सोडाच पण भारतासमोर किती पोहचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पण उत्तर शून्यच येते. चारशे वर्षापूर्वी आत्मविश्वास हरवून बसलेल्या आणि दुरंगी गुलामीची सवय लागलेल्या भारतीयांना स्वाभिमान परत मिळवून स्वातंत्र्य मिळवून देणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव करायचा सोडून त्यांना आजच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनवले जाते आणि त्यात सुद्धा चिखलफेक किंवा संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.  हा मराठी माणसाचा  एकात्मिक पराभव आहे तो आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे.

प्रत्येक गोष्टीत आपल्याला मत असते आणि आपले मत बाकीच्यांपेक्षा वेगळे असते आणि ते मांडून आपण जगापासून वेगळे आहोत असे दिसण्याचा पर्यंत करणे यामध्ये काही गैर आहे असे मला तर वाटत नाही. पण ते मत मांडून  झाल्यावर सामुहिक हितासाठी मी माझ्या मताचा त्याग करतो आणि एखाद्या गोष्टीवर आपण सगळे एखाद्या विशिष्ट कार्यासाठी एकत्र येतो असे क्वचितच घडताना दिसते.

आपल्या भावना पण इतक्या नाजुक असतात कि शिवाजी महाराजांना कुणी शिवज्या म्हटलं कि त्या  दुखावतात. कुणी शिवज्या म्हणण्याने किंवा लिहिल्याने शिवाजी महाराज लहान होत नसतात हे आपल्याला माहित असताना सुद्धा असे होते. बरे एखादा समोर म्हणतोय, मागे कोण काय चर्चा करत असेल याचा कुणी विचार करतो का?. लोकांनी मागे सुद्धा शिवाजी महाराजाविषयीच काय एकूणच महापुरुषांविषयी मनातून आदर बाळगला पाहिजे असे आपण वागतो का? कारण एखादा माणूस शिवाजी महाराजांचा किंवा त्यांच्या विचारांचा विरोधक नसून सुद्धा स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्या कडून दुखावला गेल्यामुळे तो शिवाजी महाराजांच्या कार्याचा सुद्धा विरोधक होऊ शकतो हि गोष्ट आपण विसरून जातो . आणि हि गोष्ट भारतातील सगळ्याच महापुरुषांच्या आणि त्यांच्या अनुनायाना लागू होते. यावेळी अशा भावनिक अनुयायाकडे दुर्लक्ष करून चालणे शिकल्याशिवाय आपण एक मराठी समाज म्हणून पुढे  जाऊ शकणार नाही.

तुमच्या ग्रुपचे नाव छत्रपति ग्रुपच आहे बुआ असे उपरोधाने जेव्हा एखादा मराठेतर बुद्धिवादी विचारतो तेव्हा त्याचा छुपा अर्थ "तुमचा हा जातीयवादी मराठा ग्रुप असल्यासारखे वाटते बॉ" असा असतो. असा प्रश्न विचारला म्हणून त्या प्रश्न विचारणाऱ्याचा तिरस्कार करण्यापेक्षा छत्रपतींच्या नावाने ग्रुप काढणारे म्हणून आपल्या  वागण्यात काही उणीवा आहे का याचे सुद्धा आत्मपरीक्षण केले पाहिजे ? छत्रपती ह्या शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक पदवीला आज संकुचित अर्थ प्राप्त झाला आहे का याचा विचार छत्रपतींचे अनुयायांनी करायला पाहिजे तसाच शिवाजी काय आमच्या जातीचा आहे काय त्याची जयंती किंवा स्मारकासाठी आम्ही करदात्यांनी का म्हणून पैसे द्यावे असे म्हणणार्यांनी पण एकदा शिवरायांच्या चरित्राचा आभ्यास करायला हरकत नसावी.

महाराष्ट्राच्या मुंबईती कोण एक उद्योगपती दोन हजार कोटी रुपयांचे घर चार माणसासाठी बांधतो त्यावेळी  शिवरायांचा वारसा सांगणारे आम्ही ह्या व्यवस्थे बद्दल एक प्रश्न उपस्थित करत नाही पण महाराजांच्या स्मारकासाठी तीनशे कोटी म्हटले कि आपल्या पोटात गोळे यॆउ लागतात. तसल्याच उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयाचे कर्ज माफ होते आणि सरकार खतावरील आणि शेतीच्या औषधावरील सबसिडी संपवायची म्हणते तेव्हा कुणालाही शेतकर्यांची आठवण येत नाही पण शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय निघाला कि आम्हाला शेतकरी दिसतो. ह्याला दुसरे तिसरे काही नसून आजची गुंतागुंतीची समाजव्यवस्था आणि जातीय व्यवस्था कारणीभूत आहे.

परंतु चित्र इतके पण नकारात्मक नक्कीच नाही. शिवजयंतीच्या निमित्ताने फेसबुक आणि इतर सोशल मिडिया वर सगळ्या जातीय आणि धर्मीय मंडळीनी शिवरायांचा डूडल गुगलवर यावा यासाठी जे प्रयत्न केले ते भारतीय एकात्मतेकडे पहिले पाउल का समजले जाऊ नये ? आपल्या सर्वांना माहित होते कि डूडल गुगल हे आपले साध्य नाही तर ते लोकामध्ये, तरुणांमध्ये, तरुणीमध्ये उत्साह निर्माण करण्याचे साधन होते .
त्या निमित्ताने शिवरायांची आठवण करून विचारांचा प्रसार करण्याचे आणि शिवरायांना मानवंदना देण्याचे ते एक साधन होते.  डूडलच पाहिजे असता तर एखाद्या धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या मंत्र्याने गुगलच्या ओफ़िस मध्ये फोन केला असता तर त्यांच्या बापाने डूडल लावला असता पण त्याने काय साध्य झाले असते?

त्यामुळेच आज मला ह्या डूडल गुगल चळवळीत सामील झालेल्यांचे अभिनंदन करू वाटत आहे. याचवेळी जे ह्यामुळे काही साध्य होणार नाही असे समजून सामील झाले नव्हते त्यांचे पण अभिनंदन करून त्यांना एवढे सांगू वाटत आहे कि कुठून तरी आणि कशी तरी सुरुवात करावी लागते. आपल्याला काय माहित एखादी छोटी वाटणारी  चळवळ उद्या मोठे रुप घेऊन मोठे परिवर्तन घडवून आणू शकते.

आणि शेवटी ज्यांनी टिंगल केली त्यांना पण हे सांगू वाटत आहे कि मित्रानो तुमचा हेतू हा कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता किंवा शिवाजी महाराजांचा किंवा कुणाचाच अपमान करण्याचा नव्हता तुम्ही फक्त तुमची मते मांडली. आणि आपला तो मते मांडण्याचा अधिकार तसाच राहावा म्हणून आपल्याला इथून पुढे काम करायचे आहे.

शिवरायांचे विचार जगात पोहचवण्याची आणि त्याला एक वलय प्राप्त करून देण्याची चळवळ जी चालू झाली आहे ती इथून पुढे अजून जोर धरील अशी अपेक्षा आहे.






























Saturday, February 13, 2016

जखमेवरचा पापुद्रा वेलेंटाईन डे



कोल्हापूरचा पाउस वेडा असतो आणि वेड लावतो. तो लक्ष धारांनी कोसळूत आसपासच्या हिरव्या डोंग्राईत नाजूक जलधारांच्या स्वरूपात रोमांस ओतणारा पाउस पहिल्यांदाच बघताना माझ्यासारख्या आळशी मुलांनी कसे वागावे हेच समजत नव्हते. त्या हिरव्याजर्द वोल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीची खिडकी सकाळी उघडली आणि रात्रभर अविरत रोमांस भरणी करत असलेला तो पाउस सकाळीपण जराशीहि उसंत न घेता आपल्या महत्कार्यात तसाच गुंतलेला होता. सकाळी नऊ वाजता दूरपर्यंत अगदी चित्रातल्या प्रमाणे दिसत असलेल्या त्या डोंगरावर अंधार करून तो ती प्रेमाची उधळण करत होता. मी त्या खिडकीतंच असलेल्या माझ्या बेड्मधून उठून तिथेच खिडकीच्या आतल्या बाजूने ठेवलेल्या साधळलेल्या काडीपेटीने बऱ्याच वेळा प्रयत्न करून सिगारेट पेटवली आणि ती काडीपेटी त्या खिडकीतून बाहेर भिजण्यासाठी फेकून दिली. त्या खिडकीतून बाहेर पावसात एका रेषेत जाऊन नंतर विखरत जाणाऱ्या धूराणे मला हे सगळंच किती क्षणभंगुर आहे याची एक क्षणभर जाणीव करून दिली. मी नेहमीप्रमाणे विचारात गुंग होणार तोच मागून आवाज आला..
“उटबे रांडेच्या कॉलेजला नाही का यायचे?”
आणि त्याने माझ्या तोंडातील सिगारेट काढून स्वतःच्या तोंडात घातली. ती सिगारेट बिडी सारखी पकडून त्याने पटपट दोनचार कश मारले आणि थोटुक शिल्लक असताना ती खिडकीतून टाकून दिली. आणि फेकल्या फेकल्या धूर तसाच तोंडातून बाहेर येत असताना अजून म्हणाला.

“आयला विक्या रांडेच्या रात्री चड्डी घालून झोपला होता कि काय, मायला सुधरला कि? मग कुणाच्या नावाने मुट मारली रात्री ?”

तर हा पंक्या. निपानिहून दररोज यायचा. याच्या पायात भिंगरी आणि तोंडात टेपरोकोर्डर.  दोन्ही कायम चालू. मधून केसांचा तेरे नाम स्टाईल भांग पाडलेला, हिरवा, निळा गडद शर्ट आणि गुड्ग्यावर तीन चार ठिकाणी फाटलेली जीन्स घालून यायचा आणि कायम पोरींच्या घोळक्यात असायचा. हा सहनशीलतेचा पुतळा असावा. म्हणजे त्याच पोरींच्या त्याच त्याच फालतू गोष्टी सहन करणे, त्यांना चहा पाणी चोकलेट वगैरेची देवानघेवाण करणे ह्या अतिशय कंटाळा येणाऱ्या गोष्टी तो अविरतपणे अगदी देवपूजा करावी तितक्याच तन्मयतेने करायचा. यातून त्याला काय प्रोडकटीव्ह मिळत होते का नव्हते ते माहित नाही पण तो हि असली कामे अगदी मनापासून करायचा.

“आरे येवढा पाउस आहे कसं जायचं कॉलेजला, बंद होईल जाऊ कि मग’
“ह्यो काय बार्शीचा पाऊस नाय बे लगीच बंद व्हायला, हितं असंच जायचं असतंय”

मला पण जायचंच होतं. नाहीतर आज मंजिरी दिसली नसती. मला वाटलं होतं एवढ्या पावसाचं ती यायची नाही पण पंक्याने हितं सगळं असंच असतंय म्हणल्यावर बरं वाटलं. मग मी शून्य मिनिटात, दात घासून, अंघोळ करून आणि ती माझी मळकी जीन्स घालून कॉलेजला तयार झालो. हॉस्टेल पासून दोनिकशे मीटरवर असलेल्या कॉलेजला मी आणि पंक्या एका छत्रीतून निघालो. त्या डोंगरावरून एका छत्रीत जाताना आम्ही दोघे दोन्हीकडून भिजत होतो.

“विक्या, असल्या पावसाच्या मंद वातावरणात मला तुझ्याबरोबर एका छत्रीत भिजत जावं लागतंय, काय पाप केलं हुतं कुणास ठाऊक मी” असं पंक्या म्हणाला.
चालत चालत कॉलेज आलं. आता तो त्या पोरींच्या घोळक्यात जाणार होता.
मी म्हणालो, “पंक्या मी आलोच”
“कुठं चालला बे रांडया, आता त्या येड्या लवड्याचा पीरीयड हाय नव्हं!”

“मी आलोच संडास करून” असे मी म्हणालो आणि तसंच कॉलेजच्या खालच्या बाजूने क्यांटीन मध्ये गेलो. थोडासा भिजलेलो मी आत जाऊन त्या टेबलजवळ गेलो तर मंजिरी माझी वाटच बघत बसली होती. मला कमाल वाटली. माझा अंदाज खरा ठरला. ती आली होती आणि माझी वाट पण बघत बसली होती. कधी कधी आपल्याला आपलीच किमत माहित नसते हे मला तेव्हा कळले.  एवढ्या पावसातून आली होती पण ती जरा सुद्धा भिजली नव्हती कि तिच्या त्या लांबसडक वेड्यावाकड्या केसावर कुठे एखादा पाण्याचा टपोरा थेंब सुद्धा दिसत नव्हता याचे मला आश्चर्य वाटले. ह्या कोल्हापूरच्या लोकांना पावसाची सवय असली पाहिजे. तिनेच दोन चहा मागविले. माझे लक्ष चहाकडे नव्हते. ती आज खूपच सुंदर दिसत होती. तिच्या सुंदरतेची तारीफ मी कधीच केली नव्हती पण आज ती करावीशी वाटत होती. तिने डावीकडच्या बाजूला आलेले ते लांब केस उजव्या हाताने अतिशय नाजूकपणे पाठीमागे उजव्या बाजूला टाकले आणि वाफाळलेला चाहाचा घोट घ्यायचे निमित्त करत माझ्याकडे बघू लागली. मला कसंतरीच झालं आणि माझे लक्ष तिच्या उजव्या छातीवरून खाली पोटा पर्यंत लोंबनाऱ्या काही केसावर खिळून राहिले. ह्या शहरातील मुलींचे केस एवढे सुंदर कसे असतात आणि ते इतके चमकतात कसे याचे आश्चर्य वाटले. मला तिच्या त्या पुढे आलेल्या केसात हात फिरवायची किंवा त्या केसांना हातात घेऊन कुरवाळायाची तीर्व इच्छा झाली. त्या केसातून हात फिरवताना तिच्या भरलेल्या छातीला थोडासा नाजूक स्पर्श मला आवडलाच असता. पण मनातील गोष्टी मनातच ठेवायची सवय झाली होती.

कधीच न अवघड्णारे आम्ही दोघे आज अवघडलो होतो. बहुतेक त्या रोम्यांटिक वातावरणाचा परिणाम असावा. ती म्हणाली, “आज लेक्चरच करायला नको वाटत आहे, वाटतंय असंच जावं आणि दिवसभर पावसात भिजत भटकत राहावं. पन्हाळ्यावर नाहीतर गगनबावड्याला काय मज्जा येईल नाय?”
मला तर हेच पाहिजे होते.

“होय खूप मज्जा येईल, मला पण भिजायला, पावसात डोंगरात फिरायला खूप आवडते. जाऊयाका चल गगन बावड्याला?”

“चल लगेच निघू”

आम्ही चांगले मित्रच होतो. आता एवढ्या सुंदर आणि सुडौल मुलीबरोबर पावसात भिजायला ते पण पन्नास किलोमीटर लांब जायचे आहे म्हणाल्यावर मी आपल्याकडील सराजम चेक केला तर खिशात दहा रुपयाची शेवटची नोट आणि सात रुपये सुट्टे होते. महिन्याची पंधरावी तारीख होती.

तिथून इंटरकॉमवर लायब्ररी मध्ये फोन केला. मला माहित होते पंक्या दोनचार पोरीना घेऊन तिथेच बसला असेल. तर होताच.

“हं बोल रांडया?”
“काय नाही, जरा तुझी गाडी पाहिजे होती, जरा कोल्हापूरला जायचंय”
“मग जाकी घेऊन”

गाडी घेतली. आज ती पहिल्यांदाच माझ्या मागे बसली होती. तसे म्हणायला पहिल्यांदाच कोणीतरी मुलगी माझ्या गाडीच्या पाठीमागच्या सीटवर बसली होती. तशा गावाकडे अनेक बायका बसवून नेल्या होत्या पण त्या डियेड केलेल्या म्याडम वैगेराना शाळेत सोडायला. त्यात कसला आलाय विरंगुळा. ते तर कामच होतं. पण हा असला प्रत्येक तरुणाला हावाहवासा प्रसंग तसा पहिल्यांदाच. ती माझ्या अंगाला स्पर्श होणार नाही याची काळजी घेत मागच्या शीटवर बसली. आणि आम्ही पावसात घुसलो. गाडी चालवत तोंड वर करून त्या स्वतः मधेच रममाण होऊन कोसळणाऱ्या पावसाचे टप्पोरे थेंब तोंडावर घेतले आणि स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेत गाडी सुसाट चालवलली. पण तो आंदन निखळ नव्हता. पुढे जाऊन पेट्रोल भरायचे होते आणि माझ्या खिशात पैसे नव्हते हे मला माहित होते. पण मी रिस्क घेण्यात एक नंबर होतो. गाडी पेट्रोल पंपावर नेली. चार लिटर म्हणालो त्या पेट्रोल भरणाऱ्या पोराने तिच्याकडे बघितले माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्या पावसात सुद्धा याच्या डोक्यातून धूर निघालेला मला दिसला. पेट्रोल भरल्यानंतर मी खिशात हात घालण्याचे नाटक सुद्धा केले नाही. मंजिरीने पर्स मधून काढून पैसे दिले होते. आमच्या सहा महिन्याचा दोस्तीमध्ये तिने मला ओळखून सोडले असावे.

एकतर येवढा वेळ अविरत पाउस चालू आहे तो बंद होतो कि काय याची भीती माझ्या मनात कायम होती. पण ती भीती तिच्या चेहऱ्यावर मला दिसली नाही. तो फरक असेल मराठवाड्याचा आणि कोल्हापूरचा. पावसाचे शिंतोडे अंगावर घेत आम्ही कोल्हापूर सोडलं आणि गगनबावड्याच्या रस्त्याला लागलो पण अजून विशेष असं काही होतंच नव्हते. दोघामध्ये सुरक्षित अंतर ठेऊन ती खरेच पावसाचा आनंद लुटते कि काय अशी भीतीदायक शंका माझ्या मनात येऊ लागली होती. आता गगनबावड्याचा  जंगलातील मस्त रस्ता लागला होता. दोन्ही बाजूनी उंच उंच झाडांचे जंगल आणि मधेच पावसाच्या पाण्याने स्वच्छ निर्मळ रस्ता. मी कमी वेगात गाडी चालवू लागलो आणि मला हळूहळू बदल जाणवू लागला. आमच्यातले अंतर कमी झाले आहे असे जाणवले आणि ते चेक करण्यासाठी मी एका खड्ड्यातून गाडी नेली असता तिच्या छातीचा नाजून स्पर्श एक पळभर माझ्या पाठीला झाला. आणि काही मिनिटातच तिच्या नाजून लांबसडक बोटांचा हात माझ्या खांद्यावर पडला. तो बहुतेक माझ्या आयुष्यातील कोणत्याही स्त्रीचा पहिला स्पर्श असावा. त्या पावसात माझ्या नाकातून आणि कानातून वाफा निघत आहेत असे जाणवले.

पहिले पाउलच कठीण असते एकदा धाडस करून पहिले पाउल टाकले कि पुढचा रस्ता रिकामा होतो त्या न्यायाने ती मला त्या पावसात चिटकून अगदी बिलगून बसली आणि पावसाला त्याचे सलग तीन दिवस अविरत बरसणे सफल झाल्याचे समाधान लाभले असावे. आणि त्याने आपला वेग वाढवून आमच्यावरील जलधारांचा अभिषेक कमी किंवा बंद होणार नाही याची काळजी घेतली.
गगनबाववाड्याला पोहोचनार तोच पाउस बंद झाला आणि इतका वेळ जलधारांच्या सुरु असलेल्या  अभिषेका नंतर आता हव्याहव्याशा सूर्यकिरणांचा अभिषेक चालू झाला. गगनबाववाड्याच्या कड्यावरून दूर पर्यंत दिसणारा कोकण प्रदेश डोळ्याचे पारणे फेडत होता. हाजारो फुट उंच बसून दूर शेकडो किलोमीटर अगदी समुद्रापर्यंतच्या धरणीचे रूप मी आपल्या डोळ्यात साठवत होतो. आणि त्या समोरच्या धरणीच्या पलीकडे असलेल्या समुद्रावरून अक्राळ विक्राळ ढग आपल्याच दिशेने येत आहेत याची जाणीव होत होती. आयुष्तातील मी अनुभवलेले सर्वात सुंदर आणि भीतीदायक दृश्य असावे. ह्या पर्वतरांगाना, ह्या धरणीमातेला एका दणक्यात नेस्तनाभूत करण्याची ताकत त्या ढगामध्ये आहे असे मला जाणवले. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या गगनगिरी महाराजांच्या मठातील एका साधूने आम्हाला, “आरे पोरांनो जावा घरी खूप मोठं विघ्न येताना दिसत आहे” असे सांगून बघितले आणि तो निघून गेला. आणि काही मिनिटातच सुर्यनारायनाला आपल्या पंजात घेऊन त्या ढगांणी आमच्यासमोर त्या पर्वतरांगाना आपल्या क्व्ह्यात घेतले आणि संपूर्ण अंधार करून ते ढग पाणी वोतू लागले. इतका वेळ त्या ढगांमध्ये आणि निसर्गाच्या अक्राळविक्राळ रुपामध्ये समाउन गेलेलो मी, तिने माझा हात तिच्या हातात घट्ट दाबून घेतल्यामुळे   भानावर आलो. हो मी तिथे एकटा नव्हतो, आम्ही दोघे होतो. नंतर आमच्या भावनांनी त्या भीतीवर, निसर्गावर मात केली आणि आम्ही एकमेकांच्या मध्ये मिसळून गेलो. लहान मुलाला एखादे खेळणे पहिल्यांदाच मिळाल्या नंतर तो जो उत्साहाने खेळत असतो तोच उत्साह. आणि ते खेळणे आपले नसले आणि दुसऱ्याचे असले तर या उत्साहाला चार चांद लागतात आणि ते खेळणे पुन्हा मिळते कि नाही ह्या आविर्भावाने ते लहान मूळ खेळू लागते अगदी तसे.

तिने मला सर्वस्व दिले. तिच्या केसाचा सुगंध, तिच्या शरीराचा सुगंध तिच्या व्होटाची चव तिच्या जिभेची चव आजून अगदी आहे तशी माझ्या तोंडात, नाकात दरवळत आहे. तीच होती तिच्यामुळे मला हा स्वर्गीय सुगंध, स्वर्गीय चव अनुभवायला मिळाली. आणि मी ठरवले लग्न करीन तर हिच्याशीच. मी असे नेहमीच ठरवायचो. एकदा गावाकडे मामीच्या दूरच्या नातेवाईकांच्या लग्नाला गेलो होतो. त्या लग्नात एक सुंदर मुलगी दिसली होती. दिवसभर तिच्याकडे बघत होतो. ती त्या ग्रामीण भागात खूपच सुंदर होती. वास्तविक पाहता मला त्या काळी सगळ्याच मुली सुंदर दिसत असाव्यात. आता पण काही फरक पडलेला नाहीये. असो, मग ते लग्न झाले आणि आम्ही आपापल्या गावी निघालो तर ती जवळ येऊन म्हणाली होती,

“तुम्ही कधी आलता कोल्हापूरहुन?”
मग मी म्हणालो, “कालंच” आणि पुढे काय बोलायचे ते मला समजले नव्हते. ती म्हणाली होती, “याकी आमच्या गावाला”. मी येतो म्हणालो होतो. मग मी ठरवले होते, केले तर हिच्याशीच लग्न करायचे. वास्तविक पाहता मला अशा मुली आवडल्या कि लग्न करू वाटायचे. आता समजते जुन्या लोकांना अनेक बायका कशाकाय असायच्या ते.

ती गेली अमाप सुख देऊन गेली. आयुष्यभारासाठी एक आठवण साठवण आणि सुगंध देऊन गेली. तिच्या सुगंधाची बरोबरी जगात कुनाबरोरच शक्य नाही. ती, ते सुख एकमेवाद्वितीय होते. आपल्या नशिबात हे सुख नसते. ते खेळणे दुसऱ्याचे होते, ते काही काळच देवाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिले असावे. आता तिच्या नवऱ्याला ती तेच सुख देत असेल काय? तिच्या नवऱ्याला तिच्या त्या केसाच्या, श्वासाच्या सुगंधाचे आपल्या इतकेच कौतुक असेल काय?

नंतर तिला मी शोधायचा प्रयत्न केला नाही, कधीतरी एक दोस्त म्हणाला होता, ती ऑस्ट्रेलियात असते, नंतर एक दोस्त म्हणाला होता तिचा डिवोर्स झालाय. ते ऐकून माझ्या काळजात एकदम चर्र झाले आणि तिचा तो गोड आनंदी चेहरा माझ्यासमोर शुष्क, निस्तेज झाल्यासारखं भासला. आणि मी एकापाठोपाठ दुसरी सिगारेट पेटवली होती.

आता मला ती कुठे आहे माहित नाही, मी ते शोधण्याचा प्रयत्न पण करत नाही. पण जिथे असेल तिथे ती सुखीच असेल अशी अपेक्षा करत असतो. हसऱ्या आनंदी बालपणाचे, तरुणपणाचे हा जिंदगीचा प्रवास काय करून ठेवील भरोसा नसतो. एकदा चालत पुढे गेलो कि पुन्हा मागे येऊन फिरून चालू करायला संधी नाही.


आज अशीच व्यालेंटाईन डे च्या दिवशी तिची आठवण जखमेवरच पापुद्रा काढून ती ओली करावी आणि तिच्या वेदनांचा आनंद लुटावा तसेच काहीतरी घडले.  

Thursday, February 11, 2016

डेविड हेडलिस आर्यांचे पत्र

प्रती,
डेविड हेडली उर्फ श्री देविदास हडलीकर
सप्रेम नमस्तुते!!!
आपण खरे आर्यच आहोत. आम्ही आपल्या आर्यभूमितून हिंदुस्थानात आलो. आपण पण आर्यभूमितून हिंदुस्थानातच यायला निघाला होतात पण चुकून अमेरिकेत पोचलात आणि आपणास वाटले तोच हिंदुस्थान आहे. अमेरिकेलाच चुकून हिंदुस्थान माफ करा अर्याव्रत समजून तुम्ही तिथल्या लोकांना रेड इंडीयन म्हणू लागलात. परंतु आपणास आता समजलेले दिसते आहे कि तुमचे खरे बंधू हे आर्यव्रतात म्हणजे आजच्या हिंदुस्थानात राहत आहेत. काही दुष्ट आणि आर्यद्वेस्टे लोक ह्या पवित्र अर्यभूमिला भारत म्हणतात पण लवकरच आपण मिळून त्यांचा बंदोबस्त करू अशी आशा आहे.
हिंदुस्थानातील आर्य लोक हे यवनी आक्रमणाच्या छायेत जगत आहेत आणि आपला आर्य धर्म धोक्यात आला आहे. हे आपणास समजताच आपण आपल्या भावांच्या मदतीला यायचाच होतास याची आम्हाला खात्री होती. आपण तसे मदतीला आला आहातच. ह्या भारतातील यवनी लोकांनी आणि ह्यांच्या नादीला लागून इथल्या काही शुद्र मूळनिवासिनी परमप्रिय आर्यसंस्कृती विसरून आर्यवर्ताचा हिंदुस्थान सुद्धा नाही तर चक्क भारत बनवून टाकला आहे. आर्यवर्ताचा हिंदुस्थान केला, हिंदुस्थानचा भारत केला इथपर्यंत आपण सहन केले पण जेव्हा हि पवित्राभूमी त्याच शुद्र मूळनिवासीणी मिळून यवनांच्या ताब्यात देण्याचा घाट घातला तेव्हा आपल्याला लढणे भाग आहे. हि लढाई आपण सुरु केलेली नाही तर आपल्यावर लादलेली आहे. आणि इतिहास गवाह आहे, जेव्हा जेव्हा आर्यावर संकटे आली आहेत तेव्हा तेव्हा आपण साम दाम दंड ह्या सगळ्या नितींचा उपयोग करून ती संकटे उलथून टाकलेली आहेत. अगदी महावीर जैन आणि गौतम बुद्ध पासून ते संत तुकारामा पर्यंत कुणीही आपल्या आर्यवर्तातील सत्तेला उलथून टाकू शकले नाहीत तिथे आजचे फुरोगामी कीस झाड कि पत्ती. आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय सत्तेला गेल्या पाच हजार वर्षात काही हादरे बसले पण तसल्या हादर्यांनी आर्यविचार पराभूत होणे शक्य नाही. हे तुला माहित असेलंच.
गेल्या पन्नास वर्षापासून आर्यवर्तात लोकशाही आलेली आहे. त्याला पण आपलेच पूर्वीचे आर्यवृतातील आजचे अंग्ला लोक कारणीभूत आहेत पण त्यांना पण लवकरच दृष्टांत होऊन तेपण पुन्हा वैदिक होतील अशी अपेक्षा आहे.
परंतु आजची प्राथमिकता हि आर्यभूमीवर आलेले यवनांचे आणि फुरोगाम्यांचे संकट उलथवून लावणे हि आहे. आज लोकशाही मार्गाने मिळवलेल्या सत्तेचा आपल्याला त्यासाठी पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. श्री डेविडजी माफ करा देविदासजी आपण फक्त आम्ही सांगेल तसे बोलत राहा बाकी आम्ही सर्व करतो. आम्ही आपले लोक इथल्या व्यवस्थेत इथून तिथून सगळीकडे अगोदरच पेरलेले आहेत. त्यामुळे एकदा उठाव झाला कि याभूमीला आर्यभूमी म्हणून घोषित करणे कठीण नाही. एकदा तसे झाले कि इथले मूळ लोक आपोआपच आपले गुलाम होऊन जातील. त्यासाठी हि लोकशाही व्यवस्था आणि संविधान हे कसे घातक आहे हे हिथल्याच लोकांच्या गळी घातले पाहिजे. आणि त्याची काळजी नसावी. आम्ही इथल्या संविधानाच्या विरोधात सावकाश सावकाश विष पेरत आहोत आणि त्याचा फायदा पण दिसू लागला आहे. इथले मूळ लोकंच आता आर्य संस्कुर्तीचे गोडवे गावू लागले आहेत. तुम्ही फक्त बघत रहा ह्या आर्यवर्तातच नाही तर संपूर्ण वसुंधरेलाच अर्यावृत करणे हे आपले उद्दिष्ट आहे आणि तो दिनू लांब नसेल. काही शतके वाट पहिली आहे अजून फक्त काही दशके थांबायचे आहे.
परंतु सुरुवात आपल्याला यवनांना ह्या हिंदुस्थानातून हाकलून देऊन इथे अनियंत्रित आर्यसत्ता प्रस्थापित करुण करायची आहे. .
आपलेच बांधव.
सदा वत्सले.
@विकासगोडगे