Tuesday, December 13, 2016

आर्थिक देशीवाद

शहरे अंगावर घेणे आणि यशस्वी होणे हि लोकांची तत्कालीन गरज आहे. तो काय भारतासमोर ओ करून उभ्या राहिलेल्या गरिबी, शहरीकरण, प्रदूषण, बकालीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मजुरांची पिळवणूक आणि शेवटी जातीयवाद यावरचा उपाय असूच शकत नाही. 

आपण म्याक्रो लेेवलला जर विचार केला तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारल्या शिवाय भारत आणि भारतातील लोकांचा विकास होऊ शकणार नाही. सगळेच ग्रामीण भागातले लोक जर गावगाड्यात स्थान नसलेल्या आणि गावगाड्यात सर्वोच्च स्थान असलेल्या आयतखाऊ जातींनीसमूहांनी शहरात येऊन आपल्या तथाकथित वोळखी निर्माण केल्या म्हणून गावं सोडून शहरे अंगावर घ्यायला चालू केली तर शहरात रहायला सोडा उभे राहायला जागा मिळणार नाही. 

जेंव्हा नेमाडे  एक देशीवादी  म्हणून विचार करतात  तेव्हा  फक्त  चांगदेव  काय  म्हणतो हे  विचारात न घेता पांडुरंग काय  म्हणतो, खंडेराव काय म्हणतो याचा विचार तर करावाच  लागेल  पण स्वतः  नेमाडे देशीवादाविषयी  काय  बोलतात  याचा पण विचार करावा  लागेल. 

नेमाडे जेव्हा देशीवाद किंवा जुन्या तथाकथित हिंदू संकृतीचे गोडवे गातात तेव्हा त्यांना या संस्कृती मध्ये अगदी जैन- बुद्ध काळापासून ते आजपर्यंतची संस्कृती अभिप्रेत असते. समाजासाठी एक उत्कृष्ट आर्थिकसामाजिकराजकीय व्यवस्था देण्यासाठी आपल्याला पाश्च्यात्य भांडवलशाही जिने आता Crony colonialism चे रूप घेतलेले आहे ती परवडणारी नाही तसेच ती १३० कोटी लोकांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकत पण तिच्यात नाही. आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला आपल्या संस्कृतीत आपल्या परंपराधे सापडतील. जे वाईट आहे ते सोडून जे चांगले आहे ते टिकवून, त्याच्यात काळानुरूप बदल करून, भारताच्या सर्व समजला न्याय देणारी संस्कृती उभे केली जाऊ शकते, हा आशावाद देशीवादा मधे आहे. हा भाबडा आशावाद आहे का? आपण खूप पुढे निघून आलोय का ? उदारीकरणाने आपले मागे फिरायचे दरवाजे बंद केलेत का ? तर माझे उत्तर आहे "नाही" उदारीकरणाच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी उदारीकरण सोडून न देता आपल्याल हवे तसे वापरून आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून एक नवा समृद्ध देश, समाज निर्माण  करू शकतो. तोच देशीवाद. स्वतःच्या भाषेत लिहिणे, स्वतःच्या भाषेत बोलणे, स्वतच्या भाषेत व्यापार करणे हा देशीवाद उदारीकारनाच्या ह्या जगत  सुद्धा अनेक युरोपियन आणि पौर्वात्य देश टिकवून आहेत. (असो तो मुद्दा वेगळाय)

आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याच  मातीत सापडतील म्हटले कि म्हटले कि लगेचच "मग जातीवादा विषयी आपले काय मत आहे हा एकंच धोशा सुरु होऊन "मुर्दाबाद - मुर्दाबाद" च्या घोषणा देण्या ऐवजीदेशीवाद म्हणजे जातीयवाद नाही हे समजण्याचा प्रयत्न करावा. नाही केला तरी हरकत नाही. किंवा तुम्ही गावे सोडल्या नंतर जातीयवाद नष्ट झाला का आणि ज्यांनी अगोदर गावे सोडली त्यांनी प्रगती केली हे गृहीतक जरी मान्य केले तरी आता उशिराने पांडुरंग चांगदेव खंडेराव यानी गावे सोडायला चालू केले तर तोच खेड्यातील जातीयवाद शहरात एका वेगळ्या रुपात वावरणार नाही कशावरून?

छोटे  लोक स्वतः साठी , स्वतःच्या जातीसाठी, मातृभाषिक लोकासाठी उत्तरे शोधत असतात, मोठी माणसं पूर्ण समाजासाठी उत्तरे शोधत असतात. ज्यांनी कुणी गावे सोडून शहरे अंगावर घेतली त्यांचे अभिनंदन  आहे, त्यांच्या पुढे तोच पर्याय होता पण तोच पर्यार सगळ्या पुढे  आणून सोडणे आणि सगळ्यांना आव्हान देणे कि आता तू पण गाव सोड आणि मोठा होऊन दाखव हे प्रश्नाचे तत्कालीन समाधान  शोधने आहे ह्याने संपूर्ण समाजाला दिशा मिळणार  नाही  परंतु  समाजापुढे  आणखी  कठीण  प्रश्न  तेवढे  निर्माण  करून ठेवील .  








नोकरीच्या मुलाखती आणि ....

कंपनी मधे इंटरव्हुव घेताना  कधी कधी खूप निराशा येते. अगदी एखाद्याला येड्या भोकाच्या तू MBA केलंय तू engineering केलंय तुला  चार शब्द नीट बोलता येत नाही कशाला आलारे नोकरी मागायला? असं म्हणून हाकलून  लावू  वाटते. आणि हि मंडळी बहुतकरून ग्रामीण अथवा  निमशहरी पार्श्वभूमी असणारी असतात. त्यानं  सांगावे  वाटते , अशी नोकरी बघ, असे बोल, तसल्या कंपनीत जाताना मुलाखतीची तयारी अशी कर, पण कंपनी कडून मुलाखत घेणारा म्हणून काही मर्यादा असतात.

मग मी  माझ्या भूतकाळात जातो, मला या क्षेत्रात पहिला ब्रेक मिळाला तेव्हा माझी मुलाखत जर तोंडीपण झाली असती तर मला ह्या क्षेत्रात कधीच प्रवेश मिळाला नसता. फक्त लेखीवर मला ऑफर लेटर दिले होते. पण त्या Investment Banking नावाच्या क्षेत्रात ज्ञान तर महत्वाचे असतेच पण तुमचे राहणीमान, तुमचे बोलणे, वागणे, कपडे घालणे , टेबल म्यानर्स ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात. त्याच्याशी मला जुळवून घ्यायला खूप वेळ लागला किंवा कधी कधी माझ्यातला बंडखोर बाहेर येऊन मी मुद्दाम गाबाळ्यासारखे कपडे घालून ऑफिसला जातो.

नवीन नवीन जॉईन झाल्यावर ऑफिसमधील काही मंडळी माझ्याकडे हा गावाकडचा गबाळा पोरगा Investment banking कंपनीत कसाकाय म्हणून माझ्याकडे अतिशय गरीब नजरेने बघायचे. आणि त्या नजरेने बघण्यामधे मुलींची संख्या जास्त असायची.म्हणजे अगदी उस्मानाबाद जिल्ह्यातील नागोबाचीवाडी गावातून आलेली मुलगी असली काय आणि मुंबईच्या अगदी कफ परेड मध्ये राहणारी मुलगी असली काय माझ्याकडे त्या तितक्याच तुछ्तेणे बघायच्या.

मग काही कामासाठी आल्या समजायचं "च्या मायला हि येवढा उंच टाचेचा स्यांडल घालून , केस झकास फिरवून मागे टाकून मला कॉम्प्लेक्स देत्तीय पण हिला तर "GDP" आणि "GNP" मधला फरक पण कळत नाही. हे नुसतंच " झगा झगा झगा आणि मला बघा मला बघा" आहे. असे काही घडले कि माझा आत्मविश्वास वाढायचा.

पण याचा अर्थ तुमच्याकडे ज्ञान असले म्हणून तुम्ही केपण गबाळे रहा होत नाही.ज्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचा डेकोरम पाळला पाहिजे.

सात वर्षापूर्वी पहिल्यांदाच बॉसने मला एक खूप मोठ्या कंपनीच्या मिटिंगला नेले. भारतीय कंपनीचा चेअरमन ज दोन तीन हजार करोडचा मालक आहे आणि परदेशी कंपनीचा चेरमन त्याहून मोठी कंपनी सांभाळतो. ह्या मिटिंग मधे बोसने माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि मला समजले माझे कपडे त्या मिटींगच्या योग्यतेचे नव्हते. दुसऱ्या दिवशी बॉसने मला मॉल मध्ये घेऊन जाऊन दोन कोट, तीन शर्ट, आणि दोन trousers गेऊन दिले. तेव्हापासून मी बाहेर कसे का असेना ऑफिस मध्ये मी एक Investment Banker च असतो.

तर सांगायचा मुद्दा हा आहे कि ग्रामिन्न आणि निमशहरी भागातून येणाऱ्या मुलांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कंपनी मध्ये काम करण्यासाठी पुस्तकी ज्ञान तर असतेच पण ज्या Soft Skills and Essential Skills लागतात त्याचा अभाव असतो. म्हणून ते शहरी मुला पेक्षा करियर मध्ये तीन चार वर्ष मागे चालत असतात. तो आत्मविश्वास मिळवायला ग्रामिन् मुलांची तीन चार वर्ष निघून जातात.

अशा ग्रामीण आणि निमशहरी मुलासाठी Soft skills as well as essential skill देणारी एकही संस्था मला ग्रामीण भागात दिसत नाही. म्हणजे डिग्री पूर्ण होत असतानाचा असा एक कोर्स जो विद्यार्थ्यांना शहरात कसे वागावे, मुलाखतीला तोंड कसे द्यावे यापासून,ऑफिसमधे कसे वागावे, प्रेजेन्तेशन कशी द्यावीत, जेवण कसे करावे, केस कसे कापावेत, लेखी भाषा कशी असावी, इमेल कसे लिहावेत, इमेलची  भाषा अशी असावी इत्यादी गोष्टीचे ट्रेनिंग देणारी एकही संस्था मला , कोल्हापूर, लातूर, नगर, मराठवाडा भागात आढळत नाही.

अशी ट्रेनिंग संस्था काढण्यासाठी कुणीतरी कोर्पोरेट मधील अनुभवी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. ज्यामुळे ग्रामीण विध्यार्थ्यांना त्यांचे करियर घडवणे सोपे जाईल तसेच भारताचा ७०% हुमन रिसोर्से  हा स्कीलफुल रिसोर्से होईल .











रॉश कुटुंब आणि हायकिंग

रॉशने त्याच्या थकून गेलेल्या पायाला जरा आराम दिला आणि लडखडत उभा राहत दूर दूर पर्यंत बघू लागला. त्याला कोसो दूरपर्यंत फक्त छोटी खुरटी झुडपे आणि उन्हाने तापलेले राखाडी खर्डे पिवळे डोंगर दिसत होते. त्याने पाठीमागे वळून बघितले. त्याची  पत्नी ख्रिस्टीन बरीच मागे पडली होती आणि ती पण लडखडत लडखडत चालत रॉशच्या मागे यायचा प्रयत्न करत होती. तिच्या पुढेच चालत असलेला त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा रॉनी रॉशजवळ पोचला आणि त्याच्या पप्पाच्या पायात त्याने आपलं अंग बोच्यावर आपटून दिलं.  रॉशला समजले होते कि आता रॉनी  मध्ये चालायची ताकत उरलेली नाही पण तो स्वतः पण रॉनीला उचलून घ्यायच्या स्थितीत नव्हता. ख्रिस्टीन, रॉनि  पर्यंत तरी चालू शकते कि नाही असे झाले होते पण कशीबशी आली आणि ती पण  त्या तापलेल्या मातीमिश्रीत खडकावर बसली. रॉनीने स्वतःकडील वाटर ब्याग काढली मुलाला दोन घोट दिले आणि स्वतः एक घोट आणि बायकोला एक घोट पाजून थोडी तहान भागवण्याचा प्रयत्न केला.

"पप्पा कधी येणार घर, कुठे आहे हायवे, कधी पोचणार आपण, मला आजून पाणी पाहिजे " असं स्वतःशीच पुटपुटनाऱ्या पोराला जवळ घेतलं त्याच्या केसात हात फिरवला त्याच्या डोक्याची पप्पी घेतली आणि त्याच्या मनात विचार आला, "हा माझा पोरगा आणि त्याच्या केसाचा सुगंध मी असंच आजून यापुढे पण घेऊन शकेल का  ?" आता डोळ्यातून येण्यास्स्ठी सुद्धा शरीरात पाणी उरले नव्हते. ह्या वाळवंटातून आपण सुखरूप बाहेर पोहचू कि नाही याबाबत आता रॉशचा आत्मविश्वास कमी होत चालला  होता. शेकडो किलोमीटर पसरलेले ते नेवाडाचे वाळवंट आपल्याला खाऊन टाकणार असं त्याला वाटलं पण त्याने धीर सोडला नव्हता.

आता त्यांच्याकडील, मोबाईल, क्यामेरा यांची ब्याटरी पण संपून गेली होती आणि दळणवळनाचे कोणतेही साधन आता त्यांच्याकड उरले नव्हते. रॉशने बायकोला धीर दिला आणि चला हि समोरची टेकडी गेली कि लगेच हायवे आहे म्हणून त्यांना उठवून चालू लागला. त्या दूरदूर पर्यंत फक्त उन्हाच्या झळया आणि मृगजळ दिसणाऱ्या वाळवंटात आपले संपूर्ण कुटुंब तडफडून मरताना बघायाची शिक्षा आपल्यालाच देवाने का दिली असेल अशी गोष्ट रॉशच्या मनात आली. ख्रिस्टीन मध्ये आता तिच्या मुलाला जवळ घेण्याची ताकत पण उरली नव्हती.

भूक, तहान आणि चाळीस अंश सेल्सियस तापमानात खालून गरम वरतून आग ओकणारा सूर्य, अशा भट्टीतून पुढे कसलीही आशा नसताना हे तिघे चालण्याचा प्रयत्न करत होते. उरलेल्या पाण्याचे दोन घोट रॉनीला आणि एक एक घोट आई बाप घेत होते, ते पाणी पण आता संपले होते. मृत्यूची भीती माणसा मध्ये एक वेगळीच ताकत निर्माण करते असे म्हणतात त्याप्रमाणे आता भान गेलेल्या अवस्थेत ते तिघे त्या वाळवंटात चालत होते. आता त्या तिघामध्ये खूप अंतर पण वाढले होते आणि कुणामधेही दुसऱ्याकडे लक्ष देण्याची क्षमता उरली नव्हती.

अशा वेळी जगत सर्वात महत्वाचे काय तर डोक्यावर छप्पर, आपले घर असे रॉनीच्या मनात आले आणि आपण कशाला उगीच हायकिंगला आलो आणि आलो तरी आपल्या मुलाला पण मरायला बरोबर आणले याचा त्याला खूप पश्चाताप होत होता.

तेवढ्यात त्याने  पूर्वेकडे बघितले तर अचानक ढग दाटून आलेले त्याला दिसले आणि क्षणार्धात सोसाट्याच्या वार्याने तो आसमंत व्यापून टाकला. भल्या मोठ्याढगांनी त्या संपूर्ण वाळवंटाला व्यापून टाकले एक क्षणात नव्हत्याचे होते केले. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. निसर्ग एका क्षणात संपूर्ण डावच पलटून टाकू शकतो हे रॉशच्या कुटुंबाने याची देही याची डोळा पहिले. पावसातून समोरून येणारी फोरेस्ट विभागाची जीप बघून देवाने सगळ्या चाली आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी खेळल्या आहेत आसे रॉशला वाटले.

त्या  वाळवंटाच्या आठवणीत, आता रॉश मस्त घरातील शॉवरखाली रॉनीला घेऊन बसला आहे आणि अचानक ख्रिस्टीन पण येऊन त्यांना शॉवरखाली सामील होऊन ते तिघे त्या वाळवंटाचा बदला घेत होते.

........................................................................................................................................................

ह्या तिघांच्या शोधात निघालेल्या फोरेस्ट ऑफिसर्सना ह्या तिघांचे देह काही अंतरावर पडलेले दिसले. त्यानि असा अंदाज केला कि पाण्यावाचून हे लोक मरण्याआधी भ्रमिष्ट झाले होते आणि त्यांनी कसेही इस्तंतः फिरत फिरत आपले देह टाकून दिले.रॉशच्या देहापासून ख्रिस्टीन जवळ जवळ शंभर मीटर अंतरावर पडली होती, आणि रॉनी जरासा जवळ म्हणजे पन्नास मीटर अंतरावर पडलेला होता.

फोरेस्ट ऑफिसर्सना रॉनी जिवंत आढळला, आई बापांनी एक एक घोट पिऊन लेकराला दोन दोन घोट देत राहिल्यामुळे तो वाचला असावा. रॉनीचे आईबाप त्या ट्रेकिंग ने आणि नेवाडाच्या वाळवंटाने खाल्ले. असे अनेक लोकांना खाल्ले  आहे  आतापर्यंत नेवाडाच्या वाळवंटाने.















Tuesday, September 27, 2016

"परिंदा" प्रकाशन आणि ऋषितुल्य डॉ.आ. ह.साळुंके सर


म्हणजे, अकरावीत परीक्षेचा फॉर्म वगैरे भरायची जबाबदारी एकदमंच अंगावर पडली. ती एक मोठीच जबाबदारी होती. “उद्या परीक्षेचा फॉर्म भरायची मुदत संपत आहे”, असा गोधंळ वर्गात उडाला कि, वर्गात काही निश्चल, अविचल आत्मे असायचे ते निर्विकार पणे कुणाला तरी विचारायचे,
“उद्या फॉर्म भरायची मुदत संपत आहे कारे ?”
“हो” समोरून सगळे गृहपाठ/ट्युटोरियाल पूर्ण असलेला आणि परीक्षेचा फॉर्म पहिल्याच दिवशी भरून पावती नीट जपून ठेवलेला सिन्सियर आत्मा आमच्याकडे तुछ वगैरे नजरेने बघत सांगायचा..
“लेट फी किती आहे?”
“एकतीस रुपये” सिंशीयर आत्मा हळूच पुढेच उजव्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या स्त्रीलिंगी सिंशीयर आत्म्यावरील नजर काढून आपल्यावर तोच तुछ कटाक्ष टाकत...

एकतीस रुपये काय जास्त नाहीत, अजून पंधरा दिवस आहेत, भरूकि निवांत फॉर्म असे मनातल्या मनात म्हणून, आम्ही तसेच कॉलेज मधून थेट थेटरात जाऊन मोहरा, रंगीला, हमसे है मुकाबला तत्सम सिनेमे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बघायला जात असू. दुपारी तीन वाजता सिनेमा बघून उनातानातून चालत खोलीवर आल्यावर समजायचे, इथे येऊन तरी करणार काय?. म्हणजे कॉलेज मधे जाऊन तरी करणार काय ? एकूण कुठेतरी जाऊन करायचे काय असले भयंकर तात्त्विक प्रश्न मला तेव्हापासून सतावतात. हे थोर वाचक मंडळींच्या ध्यानात आलेच असेल. पण त्याकाळी मी आणि माझ्या सजातीय बांधवांनी त्यावर जालीम उपाय काढला होता. गाय छाप-चुना पुडी. विडा मळणे, तोंडात टाकणे, खिडकीतून थुंकत थुंकत उगीच उताणे खोलीच्या छताकडे बघणे, विडा थुंकने, पुन्हा दुसरा बार भरणे, पुन्हा थुंकणे, गुळणा करून पुन्हा बार भरणे आणि खोलीच्या छताकडे बघत माशांचा गुन्गुंगुंगुंगुन आवाज ऐकत पडून राहणे. दुसऱ्या दिवशी तसेच कॉलेजला जाणे आणि पुन्हा तोच उपक्रम राबवत खोलीतील सतरंजी गरम करणे. अशा बीजी शेडूल मधून लेट फी भरून परीक्षेचा फॉर्म भरायची तारीख उद्यावर येऊन ठेपली कि लक्षात यायचे कि आपण लेट फीचे पैसे किंवा एकूणच परीक्षा फिसचे पैसे अक्षय कुमार, अमीर खान, उर्मिला मार्तोडकर आणि गायछापचे मालक दोंडाईवाले यांच्या समृद्धीसाठी दिले आहेत. मग सुपर लेट फीस फक्त पंचेचाळीस रुपये आहे हे समजल्यावर बरे वाटायचे आणि अजून दहा दिवस वेळ मिळायचा. परीक्षेचे किंवा तस्तम फॉर्म अगदी शेवटच्या दिवशी शाळेतल्या कारकुनाच्या हातापाया पडून भरायचे. सगळ्या शाळेतील कारकून हे संस्थाचालकाचे बाप असल्याच्या अविर्भावात का असतात हा प्रश्न मला तेव्हापासुन आजतागायत पडत आहे. अशा तर्हेने कोणत्याही गोष्टीत नरड्याला पाणी लागल्याशिवाय हालचाल करायची नाही हे आपल्या आयुष्याचे तत्व आपण लहानपणीपासून अत्यंत काळजीपूर्वक जतन करत आलो आहे.



हेच अगदी कालच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पण घडले. पण काही लोक कायम संकटात अडकून कायम यशस्वी पणे बाहेर पडत असतात त्यापैकी मी एक आहे कि काय अशी मला शंका येऊ लागली आहे. अजून पंधरा दिवस आहेत प्रकाशनाला करूकि हॉल बुक निवांत, म्हणत म्हणत धरलेली तारीख चार दिवसावर येऊन ठेपली आणि लक्षात आले आता हॉल मिळत नाही. ज्या साताऱ्याच्या दोस्ताच्या जीवावर होतो, तो फोन उचलत नाही. एकूण असे बाके प्रसंग नवीन नसल्याने मी डगमगलो नाही. कठीण समय आला आहे हे मी फक्त “किल्लेदारीच्या” मेम्ब्रास्नी सांगितले. संजय झिंजाड यांनी शून्य मिनिटात हॉल बुक केला, सौ. दिपाली झिंजाड निवेदनाचे भाषण तयार केले. संतोष डुकरे, अभिदा कुपटे , शंकरआन्ना बहिरट, पानसरे, संजू ढेरंगे यांनी गाड्या ठरवल्या व पुढच्या शून्य मिनिटात सगळे पक्के केले आणि मी नेहमीप्रमाणे फेसबुकवर स्टेटस टाकून झोपी गेलो. आळशी माणसाला अशी प्रेम करणारी माणसे कशी काय भेटतात कोण जाने.



पहिल्या वहिल्या पुस्तकाला म्हणजेच भोवनीलाच गुरुवर्य ऋषितुल्य डॉ आ. ह साळुंके सरांचे आशीर्वाद मिळणार होते, हे माझ्यासाठी थोरच होतं. त्यांना फक्त वाचले होते, त्यांच्या कार्याचा आवाका पाहिला होता, त्यांनी पेरलेल्या बीजांची रोपटे झाली, रोपट्यांची झाडे होऊन त्यातून एकाच्या असंख्य बिया तयार झाल्या होत्या. महाराष्ट्राला कट्टर धार्मिक वादाच्या कचाट्यातून मुक्त करून सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी निर्माण करण्यात त्यांना आलेले यश पाहत होतो पण त्यांना प्रत्यक्ष पहिले नव्हते. प्रतक्ष भेटण्याची हुरहूर होतीच.

चेहऱ्यावर खूपच नैसर्गिक आनंदी भावाने सरांनी घरी स्वागत केले आणि विविध विषयावर चर्चा करत एक तास कसा गेला ते समजलेच नाही. अतिशय शांत, संयमी, चेहऱ्यावर स्मित आणि आत्मविश्वापूर्वक प्रत्येक शब्दामागे दशकांचा अभ्यास, चिंतन आहे हे समजायला वेळ लागला नाही.

सरांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात पुस्तकातील जवळ जवळ प्रत्येक व्यक्तिरेखेला हात घातला, त्यामागील संवेदना, आणि ते जगणे त्यांनी कसे अनुभवले आहे हे सांगताना समोरच्या लोकांना हे आपलेच जीवन आहे असे वाटत असावे इतके लोक त्यांच्या भाषणाशी एकरूप झाले होते. सर, आपले पुस्तक पूर्ण वाचतील का? असशी शंका होती मला, पण जेव्हा त्यांनी प्रत्येक कथेतील संदर्भ देऊन त्याचे विश्लेषण देत होते तेव्हा त्या कथा माझ्या आहेत म्हणून नाही पण माझ्यासारख्या नवीन लिहिणाऱ्या माणसाच्या कथेला-लिहिण्याला सरांनी खूप मान दिला आहे असे मला वाटत होते.



“विकासच्या बऱ्याच कथा मला माझ्या बालपणात घेऊन गेल्या”  हे सरांचे वाक्य अगदी मी माझ्या घराच्या भिंतीवर माझ्या नावाच्या ऐवजी लिहून ठेवावे असे वाटले.

“एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या हुशारीची महती राजा पर्यंत पोचते, आणि राजा आपल्या प्रधानाला सांगतो कि त्या शेतकऱ्याच्या मुलाला घेऊन या, त्याला राजदरबारात माझा सल्लागार म्हणून ठेवायचे आहे.हे ऐकून प्रधानाला त्या मुला विषयी असूया वाटते पण राजाचा आदेश असल्याने त्याला पर्याय नसतो. राजाने दिलेला घोडा घेऊन तो शेतकऱ्याच्या मुलाला आणायला घोडा घेऊन जातो. प्रधान त्या मुलासमोर घोडा उभं करतो आणि म्हणतो, ‘बस, यावर बसून तुला राजाड्यात जायचे आहे”. तेव्हा तो मुलगा त्या घोड्याच्या पाठीकडे तोंड करून बसतो. हे पाहून प्रधानाला समाधान वाटते. हा मुलगा तर मूर्ख निघाला, राज यला पाहून ताबडतोप हाकलून देणार म्हणून तो आनंदी होतो.

जेव्हा तो त्याच अवस्थेत राजदरबारात पोचतो तेव्हा राजा चिडतो आणि विचारतो, “काय हा मूर्खपणा, मला जर माहित असते तु असा मूर्ख आहेस तर तुला बोलावले नसते, घोड्याच्या पाठीकडे तोंड करून कोण बसते का?
तेव्हा शांतपणे तो शेतकऱ्याचा मुलगा उत्तर देतो, “महाराज, मी आपला आभारी आहे, आपण मला आपल्या शेवेच्या योग्य समजलात. परंतु आपली सेवा करत असताना, उंची महालात राहत असताना, ऐश्वर्यात लोळत असताना, मी ज्या ठिकाणाहून आलो आहे त्या माझ्या गावावरील, माझ्या लोकांवरील माझी नजर कधीही दूर हटू नये यासाठी मी माझी नजर जाणीवपूर्वक मागे ठेवली आहे. हे ऐकून राजाला पण खात्री वाटली कि त्याची निवड चुकीची नव्हती.

सरांनी सांगितलेल्या या गोष्टीचा मतितार्थ खूप मोठा आहे हे मला समजायला वेळ लागला नाही.

या व्यतिरिक्त पुस्तक प्रकाशना आलेल्या माझ्या खास दोस्तांचे आणि वाचकांचे मी खास आभार मानायला विसरणार नाही. यामध्ये, बारामती मुंबई, वाळवा, जयसिंगपुर, पेठवडगाव, कराड, सांगली, बार्शी, सिरसाव, सासुरे, साताऱ्याहून आलेल्या सर्व मित्रांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण उपस्थित राहून माझा आत्मविश्वास वाढवला या बद्दल धन्यावद देतो.

तसेच काही व्यक्तिगत, सामजिक कारणामुळे जे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु कायम मला प्रोत्साहन देत असतात त्यांचे पण मी आभार मानतो. 

आणि माझे चार शब्द संपवतो. जय हिंद जय महराष्ट्र.






Wednesday, June 8, 2016

नाणेघाट



माझं ना आता, आमच्या गावच्या वरच्या आळीच्या पारीसारखं झालंय, म्हणजे नाही म्हणून कुणाला म्हणायचंच नाही, मग आपल्या जीवाला कितीबी त्रास होऊद्या. ह्या असल्या भिडगस्त स्वभावाचा मला इतका त्रास होतोय तर त्या बिच्यार्या पारीला किती त्रास होत असंल याचा विचार सुद्धा करू नये. आपल्या गडी मानसाचं काय कसबी चालतं, पण बायामानसाला किती सोसावं लागंत आसल याचा कुणी विचार करंल कि नाही!. पण तिने एकदा सामासेवेचे व्रत अंगावर घेतलं कि घेतलं, ती घेतला वसा तसा टाकणार नाही याची मला आणि गावाला ग्यारंटी आहे. गावाला जास्त आहे. तर ह्या नाही, नाही म्हणण्याच्या स्वभावामुळे मला पारीसाराख्याच भयंकर अडचणी येतात. बरं तिच्या मदतीला तिने हाक मारली कि सगळा गाव धाऊन येतो, आपल्याकडे तसले विशेष काहीच नसल्याने, आपली कामे आपल्यालाच करावी लागतात. असो.

म्हणजे, शनिवार दिनांक ४ जुन २०१६ रोजी हरिश्चंद्रगडाची स्वारी आणि संतोष डुकरे यांच्या घरी दुध-भाकरी-लसणाची चटणी यांना कुस्करून खाण्याचे योजिले असताना मी शनिवारी सकाळी अकरा वाजता उठलो. उठून बघतो तर , संतोष डुकरे यांचे १३ मिस कॉल , अभिजीत कुपटे यांचे आमच्या घराबाहेर उभे राहून ९ मिस कॉल आणि व्हात्स मध्ये अनंत मेसेज. त्यात अशोकआण्णा पवार यांचा एक मेसेज अवार्ड विनिंग ठरला.

“रात्री इकासरावचे दोन-तीन वाजेपर्यंत फेसबुकवर स्टेटस पडून, डिलीट होत होते, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, ते सकाळी आकरा वाजता उठतील”

आणि ते खरेच ठरले, मी त्या शेवटच्या दोन DDR साहेबांनी केलेल्या लार्जच्या प्रेमळ आवाहनाला नाही म्हणायला पाहिजे होते असे वाटले. पण पुन्हा आपल्याला नाही तर म्हणताच येत नाही हा स्वभाव आडवा आला. मी तंतोतंत आकराला उठून आकरा वाजून सात मिनिटांनी अभिजित आण्णाच्या कोर्पियो मध्ये बसलो होतो. त्यामुळे गडावर स्वारी करायला उशीर झालेला असताना आमचा उत्साह अजिबात कमी झाला नव्हता. अभिजित अन्नाचा आणि शंकर अन्नाचा रेबनचा गोगल, ती पांढरीफेक कोर्पियो आणि मी कडेला बसलेला सामान्य इसम. अशी तिघांची सवारी निघाली. टोल नाक्यावर समोरच्या सगळ्या कार गाड्यांना टोल घेतला आणि आमची कोर्पियो आली कि लागबघीने गेट वरती घेतले. आयला म्हणालो वट्ट आहे. पण नेमका कुणाचा ते कळलं नाही. कोर्पियोचा, रेबनचा कि दोन अण्णांचा? आपला वट्ट वगैरे असण्याची शक्यता सुतराम कि काय म्हणतात तशी सुद्धा नव्हती. शंकर अण्णांनी सांगितले, “अहो इथे कोर्पिओ आणि रेबनचा गोगल घातला कि टोल घेत नाहीती” मग मी अभिजित आण्णाला सल्ला दिला, “अभी तू अख्ख्या कोर्पियोला रेबनचा काच बसवून घे समोर, तुला च्यामालाया कोण डीझेलचे पैसे सुद्धा मागणार नाहीत ह्या पिंपरी चिंचवडात” पण त्याला हा उपाय पटला नाही.

सुमारे चार वाजता संतोष अण्णांच्या मळ्यातल्या घरी पोचलो. वांगी, टरबूज, शहाळी वगैरे वानवळा गोळा केला तोपर्यंत संतोष अण्णांनी म्हशीची धार काढून ठेवली होती. रानातल्या घरात मस्त दुधात कुस्करून बाजरीची भाकरी लसणाची चटणी खाल्ली. त्यात कोल्हापुरच्या आमच्या अभिजित पैलवानाला भाकरी कुस्करता येत नव्हती म्हणून त्याला आम्ही अभिजन असे घोषित करून टाकले आणि संतोष अण्णांनी त्याला भाकरी कुस्करून दिली.


आता येवढं जेवल्यावर हरिश्चंद्रगड चढायचा का? अशा प्रश्नार्थक नजरेने अभीने माझ्याकडे बघितले आणि सर्वजन सहमत झाले. मला हरिश्चंद्र गडाला जायचे असताना, संतोष, आभी आणि शंकर आण्णा घाबरल्यामुळे आम्ही नानेघाटात जायचे ठरवले. अभी तर म्हणाला इथेच झोपू, पण लगेच अर्नाव म्हणाला , ओय इकडे वाघरू येतंय आणि ते खाऊन टाकतंय, बाहीर झोपायचं नाही, तवा नाही का म्हातारी खाल्ली वाघराने. मग छोट्या अर्नावने वाघराणे म्हातारी कशी खाल्ली ते अगदी हातवारे करून सांगितले. आणि हा एकूण पश्चिम जुन्नर तालुका बिबट्याने हैराण करून टाकल्याचे समजले. काही घरांना आणि गोठ्यांना मोठ मोठी कुंपणे पाहून त्याची दाहकता समजून आली.
ह्या सगळ्या गडबडीत एका अवलियाची भेट झाली, सागर चव्हाण उर्फ बकरी उत्पादक. ह्यांच्या विषयी स्वतंत्र लेख आहे, आतापुरते माहित करून घ्या कि फॉक्सव्यगन मधील नोकरी सोडून आता १०० शेळ्या पाळत आहे आणि लवकरच १००० शेळ्या करणार आहे.



रात्री ९ वाजता शनी अमावाषेचा आमचा प्रवास चालू झाला. शिवनेरीच्या पायथ्याला वळसा घालून पुढे निघालो, शिवनेरीकडे बघून आभार मानले आणि पुढे निघालो. अंधारात नेमके कुठून कुठे चाललो आहोत हे समजत नव्हते. डोंगर रांगा, पठारे, आजून डोंगर रांगा आणि कच्चे पक्के रस्ते पार करत एकदाचे नाणे घाटात पोचलो. आम्हाला रस्ता असा एकदम संपले याची जाणीव नसल्याने आमची आभ्याची कोर्पिओ घाटात जाता जाता वाचली. म्हणजे डांबरी सडक आणि अचानक रस्ता संपणे. हे थोर वाटले.

पूर्वेकडील पठारावरून असंख्य किलोमीटर वरून येणारा रस्ता आणि पश्चिमेला जोडणारा तो नाणे घाट. ज्यांनी कुणी बनविला असेल तो सातवाहन राजा आणि त्याची संस्कृती थोर असली पाहिजे. एखाद्या संस्कृतीची चिन्हे अडीच हजार वर्ष टिकतात म्हणजे तिचे मानवी इतिहासातील योगदान वादादीतच असते. नाणेघाटाच्या अस्तित्वाची आणि तिथून होणाऱ्या व्यापाराची साक्ष देत उभा असलेला तो दगडी अजस्त्र रांजण मला खुणावत होता.


हो, “मीच तो रांजण, मी अनेक लोकांच्या तहान भागवल्या, श्रीमंत व्यापारी, त्यांचे गुलाम  नोकर, त्यांच्या सुंदर बायका, त्यांनी विकायला आणलेल्या दासी, आणि हो पश्चिमेकडील व्यापारी आणि त्यांनी पाशिमेकडून विकायला आणलेले पदार्थ सगळे पाहिले आहे. पाप पाहिले आहे पुण्य पाहिले आहे, पाप पुण्याची देवाणघेवाण पाहिली. यातल्या कुणाचीही तहान भागवताना मी कधीही दुजाभाव केला नाही, सैनिक असो, राजा असो, राणी असो, दासी असो, परदेशातून विकायला आणलेली गोरी गणिका असो, सगळ्यांची तहान भागवली. आज त्या क्षणांचा मी एकटाच साक्षीदार आहे. होय मी रांजन आहे. माझ्यासारखे खूप होते, पण सगळे काळाच्या पडद्याआड गेले, मला अजून किती वर्ष इथून माणसांना जाताना बघायचे आहे काय ठाऊक. पण आता यांना कळत नाही माझा वापर कसा करायचा. कुणी येतं माझ्यात पैसे टाकतं, कुणी येऊन माझी मापं काढतं, कुणाला काहीच कळत नाही आणि विचारतं ह्यात काय विशेष आमच्या गावात पण हाय असला रांजण पण जरा बारका आहे. ह्या अडीच हजार वर्षात करोडो तर्हेचे लोक दाखवलेत भगवंता अजून किती बघायचे बाकी आहेत कुणास ठाऊक.

जराच थांब विकास, जरासं ऐकून घे, खुप दडलंय माझ्या पोटात, ह्या हजारो वर्षाच्या कालखंडात शेकडो संस्कृत्या लुप्त पावल्या, प्रत्येकाचे पाप पुण्याचे हिशोब वेगळे होते, प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना वेगळ्या होत्या ह्या प्रत्येक कालखंडातील लाखो करोडो स्त्रि पुरुषांच्या करोडो घटना पाहून पाहून आता मी ह्या घटनाकडे तटस्थपणे पाहायला शिकलो आहे. समजले आहे मला पाप, पुण्य, राजा, चोर, भिकारी, राणी, दासी, गणिका, सैनिक, गुलाम, भाऊ, बहिण, बायको, मुलगा, मुलगी, सून, सासू  आणि ह्या भोवती घुट माळणाऱ्या ह्या संस्कृत्या म्हणजे सगळी माया आहे. मानवाने निर्माण केलेल्या संस्कृती नावाच्या एका चक्रव्युव्हात आडकून माणूस प्राणी त्याच स्वताच्या चाक्रव्ह्युवातून बाहेर पडायचा मार्ग शोधतोय आणि अजूनच गुरफटून जातोय. माझी संस्कृती चांगली कि तुझी चांगली ह्या तद्दन खोट्या संकल्पेनेसाठी रक्ताचे पाट ह्याच घाटातून वाहताना पहिले आहेत. आता नको वाटतं पुढे पण मागचीच पाने उलटत बसल्यासारखे बसायला.चेहरे बदलतील, प्रकार बदलातील माणसं तीच असतील खूप कंटाळा आलं आहे मला. विकास जरा पुढे, हो त्या घाटाच्या उजव्या बाजूला जरा खोदून बघ, हो तिथेच खोदून बघ, तुला सातवाहन कालीन हत्यारांची पेटी सापडेल. ती उघड, त्यातील अजस्त्र असं ते हत्यार घे. मोठ्या पोलादी गोळ्याला साखळी जोडलेली असेल. ते घेऊन बाहेर ये आणि उधवस्त करून टाक मला ह्या  अमरत्वाच्या शापातून. नाको वाटतं आता तीच तीच माणसं वेगवेगळ्या वेषात पाहायला. उठतोयस ना ?





रांजनाचा आवाज ऐकून दचकून जाग आली तर घाटाच्या खालच्या बाजूने, मुलांचा आणि सुंदर मुलींचा एक कळप वरती चढून आला होता आणि घाटातल्या गुहेत आम्ही बाटलीत उजेड कसा घालून ठेवला असेल आणि यांना आता उठवावे कि नाही याच्या विचारात होता. मला स्त्रीदाक्षिन्य आठवले आणि त्या गुहेचा गजांचा दरवाजा उघडला. पण दुर्दैव कोणतीही मुलगी आता वार्वासाला आली नाही. मी  वाईट वाटून घेतले नाही.माझ्या शेजारी भयंकर अक्राळ विक्राळ लोकांना झोपलेले पाहून त्या आल्या नसतील अशी स्वतःची समजूत काढून घेऊन सगळ्यांना उठवले आणि पहाटे पाच वाजता नानाच्या अंगठ्यावर चढून घटाची भव्यता पाहण्यात गुंग होऊन गेलो. उडी मारली कि डायरेक्ट मुंबईला पोचलो असतो. तिथन बऱ्याच वानराचे लिंग दिसत होती. मोठी मोठी पर्वतावरून सुळक्या सारखी एकदम टोक करून वरती आलेली. माणसाच्या कल्पना शक्तीची पण दाद द्यावी. नाव काय दिले त्तर वानरलिंग. थोर माणसं.




तिथून कांटाळलेल्या अवस्थेत कुकेडेश्वराचे देऊळ बघितले, गावकर्यांनी त्या नदीचे पत्र बदलून गाव्साठी केलेली जागा बघून वाईट वाटले आणि पुढे चावंडगड बघायला निघालो. रस्त्यावर पाद लागलेल्या आंब्यांचे आंबे खात खात. चावंडगडाच्या पायथ्याशी पोचलो. गडाच्या पायथ्याशी असलेले महितर पाट्या आता ह्या सरकारने बदलेल्या वाटल्या. अगोदर सारखे त्या पत्यावर जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचे फोटो नव्हते आणि लिखाणात उल्लेख करताना “मराठा सरदार” ऐवजी “मराठी सरदार” असं उल्लेख केला होता. चला चालायचंच म्हणून गड चढू लागलो. गड मोठा आहे, थेट आहे.
आम्ही दमणार तेवढ्यात वरून एक नाजूकसा आवाज कानी पडला आणि पोरांचा वेग वाढला. वरती मोटिवेशन आहे याची कल्पना सर्वांना आली होती. सागर चव्हाण हा तरुण चुणचुणीत मुलगा सगळ्यांच्या पुढे होता.  अगदी पाय घसरला कि मरूच अशा टोकावर चढून आम्ही दाराजाच्या जरा खाली पोचलो तर तिथे एक बारा असलेला तरुण आणि एक सुंदरी तिथल्या कठड्यावरील लावलेल्या संरक्षक गजांना वार्निश रंग देत होते. शेजारी भिगे होट तेरे गाणे हे आयफोनवर चालू होते.

सागर धावत जाऊन म्हणाला,” काय गुतं घेतलय काय? “
‘काय म्हणालात, आम्हाला नाही समजले?’ तो साधारण मुलगा आणि सुंदरी
“न्हाय म्हणलं रंग द्यायचं contract घेतलंय काय, आमच्या गोट फार्मचे पण घ्या कि conract, काय तुमचा भाव काय असेल ते सांगा?” पुन्हा सागर चव्हाण
“नाही हो, आम्ही एका संस्थेचे आहोत, आम्ही पुण्याहून आलो आहोत आम्ही हे प्रेमाने करत आहोत हे काम” ती सुंदरी.

“मग आम्हीबी प्रेमानेच इचारतो कि, आमचंबी प्रेमानेच कराकी, काम” सागर चव्हाण मिटी न सोडता.
मग मी म्हणालो, “चला सागर शेट पुढे, तुमचा गोट फार्म रंगवायला कुणी म्हातारं भेटतो का बघू”
एकूण रागरंग ओळखून संतोष आन्ना मला म्हणालेच, “विकीदा एखादी पोरगी बघा आपल्या सागरला, वेटरनरी डॉक्टर असलं तर सोन्यावाहून पिवळे. म्हणजे शेळ्या मेंढ्यांना घरचा डॉक्टर मिळेल आणि सागर ट्रेकिंग गेल्यावर गोट फर्मची काळजी पण करायची गरज नाही,  नाहीतर कसली बी  बघा पण बघा नाहीतर पोरगं कायतरी बालामत आणील"

वरती अपेक्षा भंग झाला. काहीच नसेल वाटले होते पण जुन्या काळातील अनेक अवशेष भेटले.म्हणजे हा किल्ला उगीच किल्ला म्हणून नव्हता तर याचा सामरिक उपयोग झालेला असावा आणि बऱ्या पैकी वस्ती पण असावी. दगडा पासून बनवलेली संडासाची भांडी खूप मजेदार वाटली आणि संडासच्या खोल्या पण . ह्या संडासच्या खोल्यांचा काळ किती मागे जातो हे ठाऊक करून घ्यायला पाहिजे. म्हणजे संडासची अशी भांडी दगडाची का असेना कधीपासून वापरत आली ते समजेल.

येताना सागरला त्या सुंदरीने फोन नंबर दिला आणि आम्ही डोक्यावर हात मारून घेतला.





Friday, May 27, 2016

आज ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनासमर्पित, "बार्शीचा पांडुरंग सांगवीकर"

तारीख – २७ मे २००२
हॉस्टेल खोली नंबर – ३०५
वेळ – कातरवेळ
उदाहरणार्थ हि गेल्या अर्ध्या तासातील तिसरी सिगारेट. सिगारेटचा पण कधी कधी कंटाळा येतो पण तिच्याशिवाय दुसर कुणी जवळचं पण वाटत नाही. आज शनिवार आहे, पण हि वेळ आणि तारीख भयंकर वाईट, हा आब्या पाटील, सयाजी, आणि पैग्या माझ्या पैशाला अगोदरच पांडुरंग लावतात आणि नंतर मी रिकामा झालो कि मला यांच्या तोंडाकड बघत बसावं लागतं. शेवटचे दोनशे रुपये राहिलेत, आज बाहेर पडलं कि हे लोक पिणार खाणार आणि आपले आहे तेवढे पण पैसे संपून जाणार. त्यापेक्षा हे सिगारेटचं पाकीट आणि हि ययाती आज संपवून टाकू. एका रात्रीत. तशी मस्तच आहे ययाती.
तेवढ्यात परभणीचा आब्या पाटील, सयाजी आणि उस्मानाबादचा पैग्या अगदी दार तोडूनच एन्ट्री मारल्यासारखी एन्ट्री मारतात.
“कारे पांड्या रांडच्या, तिन्ही सांजंला खोलीत का बसलाय, आरं चलकि कि मस्त रंकाळ्यावर वगैरे जाऊन येऊ आज वर्गातल्या पोरी पण येणार हायेत, आन आज चक्क चड्डी घालून बसलाय, मला वाटलं होतं फक्त वरून टावेल टाकून बसलेला असशील” पैग्याचं क्यासेट चालू झालं
“पयली गोष्ट पैग्या ती “रांडच्या” शिवी तुझ्या तोंडात शोभत नाही, तू आपलं “आयघाल्या”, “झवन्या” ह्या आपल्या आपल्या शिव्याच देत जा, ह्या कोल्हापूरच्या पोरात मिसळून बिघडून घेऊ नको स्वतःला” पांडुरंग म्हणाला.
“अयं जाउदे, आन हि काय, आज मोठी गोल्डफ्लेक सोडून छोटी गोल्डफेक, ख्या ख्या ख्या बंडाळ उटली काय? “ आब्या पाटील दात काढत बोलला, त्याच्याकडे पांडुरंगने दुर्लक्ष केले. पण आब्या थांबायचं नाव घेत नव्हता.
“आरं पांड्या, सुदररं लका सुदर, आरं “कोटलर” वाच “पीटर ड्रकर” वाच, काय तरी फायदा हुईलरं! च्यामायला हि वि सं खांडेकर, बाबा कदम, व. पु. काळे, पु लं काय तुला भाकर देणार नाहीतरं, आरं इचार कर लका, बाप आडतीवरची निम्मि पट्टी तुला पाठवतोयरं~~~ सुधरर लका सुधर, आरं न्हायतर हि अचूत गोडबोले तरी वाचारं, आपल्या प्रचार्य बाईनी मला खास दिलंय हे “बोर्ड रूम” नावाचं पुस्तक”, आता आब्यान पाटलाने बडबड चालू केली.
“आरे साहित्य म्हणजे तुम्हाला काय समजणार, जीवनाची परिभाषा निर्माण करून आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवते ते साहित्य असते मित्रा” पांडुरंगने एकुलते एक पुस्तकी वाक्य फेकून पुन्हा लगेच बोलला,
“बाकी ते अच्युत का कोण गोडबोल्याचे पुस्तक मला माहित आहे, लोकांच्या इंग्रजीतल्या केस स्टडी वाचून त्याने मराठीत तुमच्या सारख्या चुत्याना समजावे म्हणून लिहिले आहे आणि ती आपली प्राचार्य देशपांडे म्याडम त्याची पाव्हणी आहे म्हणून त्याच्या पुस्तकाचा प्रचार करत आहे. तुम्हीच सुधरा राजेहो.., हे लोक आपापल्या लोकांना मोठं करण्यात गुंतले आहेत.
“बरं ऐका, काल मी बाबा कद्माची “पाटलाचा दणका” हि कादंबरी वाचत होतो. गावचा पाटील कादंबरीतल्या हिरोनीला उसात नेहून उडतो, त्या हिरोनीचा ठोक्या हा फौजदार असतो, त्याला समजते, आता केस कोर्टात गेलीय, मग मी थांबलो, कोर्टात काय होणार माहिताय मला. बाकी हि “यायाती” पण बरीय, ह्यात आपला राजा चोटाळ भाड्या दाखवलाय , वाड्यातल्या बायावर चढतो, गल्लीतल्या बायावर चढतो, अख्या राज्यातल्या बायावर चढतो त्यानं पण त्याचं भागत नाही म्हणून शेवटी सुनंवर पण चढतो कायकी, आता तिथपर्यंत आलंय, पुढे तो सुनंवार चढतो का नाही ते मी तुम्हाला उद्या सांगतो, तुम्ही या जाऊन रंकाळ्यावर , त्या पोरीवर शंभर दोनशे खर्च करून या मोकार, बाकी हे वि सं खांडेकर, फडके वगैरे नसते तर आमच्या सारख्या आंबट शौकिनांचे काय झाले असते कुणास ठाऊक, तुम्हाला सांगतो पोरांनो, हे काय खरे साहित्यिक नाहीत, कुणी चांगलं लिहित नाही म्हणून यांना वाचावं लागतंय”
“लागला का लका तू साहित्यावर बोलायला, चला रं पोरानो, घालूद्या ह्याची आय हितंच, बाकी तू आंबट शौकीन नाही, नुसती पुस्तकं वाचून , पुस्तकातल्या डाकूने हिरोनीला उसात नेली म्हणून खुश होणारा घाबरट आहेस तू, तुझ्यात दम असता तर त्या मंजिरीला पटवली असती, तुझ्या मागे लागलीय ती, आज बघू कुणाबरोबर येतीय रंकाळ्याला, तू बस वाचीत, तो यायातीतला राजा किती बयावर चढतोय ते” आब्याने लेक्चर दिले आणि ते तिघे तडा तडा खोलीतून निघून गेले.
हे म्हणजे तंतोतंत खरं आहे कि काय, आब्या जाताना च्यामायला शेपटीवर पाय देऊन गेला, आपल्याला पोरी पटत असताना आपण मागे का सरतोय, आताच नाही अगदी डिग्री पासून, आणि तो आपला मोठा भाऊ, चांगदेब पाटील, तो पण आजून काराच आहे, कमीत कमी खंडेराव नं तरी उरकून घ्यायला पाहिजे आता, राव त्यामुळे ह्या धाकट्या पांडुरंगचे हाल होतात. दोन मोठ्या भावाची उरकल्याशिवाय आपण कसं लग्न करायचं. हट, पांडुरंग तू खरंच थोर आहे, आहे तुला लग्न कर कोण म्हणतंय,
“आपल्या दोघातील मैत्रीच्या/प्रेमाच्या बंधाला तू कोणतहि नाव देवू नकोस, कोणत्याही नात्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस, हे असंच राहूदे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे प्रतिबिंब पडून उजळलेल्या त्या झुळू झुळू वाहत असणाऱ्या झऱ्या सारखे, त्या झर्याला जसा कुणीहि बांध घालु शकत नाही, तसेच आपण अगदी उन्मत्त होऊन्न वाहत राहू, वाहत जाऊ अव्याहतपणे प्रेमाच्या वाटेवरून त्या दूर कधीही हि न पोहचू शकणाऱ्या क्षितिजा पर्यंत” ख्या ख्या ख्या ......हे लय थोर आहे, नुसतंच वहात जायचं मायला........
हो, हे पण तंतोतंत खरंय, असली वाक्य फेकली कि पोरींना लग्नाची वचनं द्यावी लागत नाहीत. आपल्याला हे खोलीत बोलायला जमतंय पण मंजिरी समोर जमेल का? ती तयार होईल का? बर आपल्याला लग्न करायचं नाही असे पण नाही ते फक्त आपल्या हातात नाही एवढंच. बाकी आमच्या बापाने एकदा खंडेरावला बाशिंग बांधलं कि करीन कि मी लग्न.
पाचवी सिगारेट आताच संपत आली, आजून फक्त पाचंच उरल्यात. रात्रभर पुरतील का? धतसाला, पुस्तक वाचायचा मूड पण गेला. आपणच काय तरी पुस्तक फिस्तक लिहून दाखवायला पाहिजे , साहित्य काय असते ते, ह्या साडेतीन टक्क्याच्या साहित्यातून साडेशहाण्णव टक्क्यांना मुक्ती मिळवून दिली पाहिजे.
रोहिण्या पडल्यात म्हनं गावाकड, आई, आबा, म्हातारी यांची लगबग चालू झाली आसंल, कुळवणी पेरणी, चांगल्या बिया शोधा, मारवाड्याला डबल पैसे देऊन खत, बिया खरेदी करा, त्याना आपल्या जीवावर श्रीमंत करा आणि पुन्हा शेतकरी राजा म्हणून मिरवा. हे घाण आहे पांडुरंग, तू कधीही शेती करू नकोस, आयतखाऊ होऊन लोकांना शेती कशी करायची शिकव, तू साहेव होऊन बांधावर उभा राहून गारपीटीचा रिपोर्ट तयार कर, तू कलेक्टर होऊन जिल्ह्यात दुष्काळ नाही असा रिपोर्ट मायबाप सरकारला देऊन प्रमोशन बघ आणि गावातल्या लोकासमोर, मी शेतकर्यांसाठी, गरिबासाठी कलेक्टर झालोय असे भाषण दे, तू उस पिक किती खराब आहे म्हणून रिपोर्ट देणारा जलतज्ञ हो, तू कांदा हे जीवनआवश्यक पिक आहे म्हणून निर्यात बंदी करणाऱ्या सरकारात जा पण तू शेतकरी होऊ नको.
पांडुरंगा तुला तुझ्या शेतात खपलेल्या हजारो पिढ्यांची शपथ आहे, शपथ आहे तुला त्या शिन्ग्रोबाची तू शेतकरी झाला तर!!!!

Monday, May 23, 2016

भारतीय अर्थव्यवस्था, शेतकरी , कामगार, मध्यम वर्ग ...


परदेशी कंपन्यांना भुलवण्या करीता विकसित देशांमध्ये भारताची वोळख एकशेविस करोड गिर्हाईकांचा आणि ३०-३५  करोड पक्क्या मध्यमवर्गीयांचा म्हणजे महिन्याच्या महिन्याला खिशात पैसे येणाऱ्यांचा देश किंवा एक बाजार आहे अशी करून देतात. पण परदेशी कंपन्यातील कारभारी मूर्ख नसतात. म्हणजे १२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सगळेच काही पिझ्झाचे गिऱ्हाईक नसते हे पिझ्झा बनवणाऱ्या कंपन्यांना चांगले माहित असते, किंवा सगळीच लोकसंख्या काही कार खरेदी करणारी नसते हे कारचे सुटे भाग किंवा कार बनवणाऱ्या कंपन्यांना चांगले माहित असते. त्यामुळे त्यांची धोरणे हि ह्या देशातील साधारणपणे पंधरा कोटी लोकसंखेला गृहीत धरूनच आखलेली असतात. अशा वेळी देशातील २०% लोकांना सेवा देण्यासाठी येणाऱ्या आणि देशातील साधारणपणे 4% लोकांना सुद्धा रोजगार न पुरवणाऱ्या कंपन्यांना सरकार पायघड्या घालते, सवलती देते. एखाद्या कंपनीने नुसती गुंतवणूक करणार असे घोषित केले तरी सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी आपण जग जिंकल्याच्या अविर्भावात घोषणा करून विकास केला, विकास केला अशा घोषणा देत बसतात. प्रत्यक्षात या केलेल्या घोषनापैकी किती गुंतवणूक प्रत्यक्षात उतरते आणि त्या गुंतवणुकीतून किती रोजगार निर्माण होतो हे गुलदस्त्यातच असते. किंवा तो रोजगार सरकारने दिलेल्या सवलती पेक्षा खूप कमी असतो. 

परदेशातून भारतात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी खूप फोकस्ड असतात आणि त्यांचा नफा कमावणे हा एकंच उद्देश असतो. अर्थात नफा कमावणे हाच उद्देश कोणत्याही धंदेवाईक माणसाचा असला पाहिजे त्यात दुमत नाही. परंतु ह्या मोठमोठ्या परदेशी किंवा स्वदेशी कंपन्या एकूणच अर्थव्यवस्थेचा किंवा समाजाचा आर्थिक स्तर कसा उंचावता येईल याचा विचार करताना किंवा अभ्यास करताना दिसत नाहीत. उलट कमीत कमीत रोजगार निर्मिती करून जास्तीत जास्त नफा कमावणे, तो नफा कमावण्यासाठी सरकारकडून सवलती मागणे, जास्तीत जास्त सवलतीसाठी सरकारवर दबाव आणणे हेच काम करत असतात. आणि असे धंदेवाले किंवा हजारो करोडचे मालक असणारे देशी परदेशी भांडवलदार जेव्हा सरकारला, भारताचे आर्थिक धोरण कसे असावे, परदेशी कंपन्यासाठी आणि देशी कंपन्यासाठी सरकारने काय करावे, कुठे अजून जास्त गुंतवणुकीला परवानगी द्यावी, कुठून पैसा उभा करण्यासाठी मदत करावी असे वगैरे सल्ले देतात तेंव्हा त्या सल्यामागे भारताचा विकास व्हावा, किंवा भारतातील १२० कोटी जनतेचा आर्थिक स्तर उंचावला जावा हा उद्देश असतो कि, त्यांच्या अनेकाविध क्षेत्रातील कंपन्यांचा नफा कसा वाढेल, त्याना अल्ट्रा नफा कसा कमावता येईल आणि त्यांचे आर्थिक साम्राज्य अजून मोठे आणि मजबूत करता येईल याचा विचार जास्त करत असतील याचा विचार न सरकार करताना दिसते ना जनता.  

सर्वसमावेशक आर्थिक धोरण बनवणे हे काम धंदेवाल्या लोकांचे नसते तर सरकारचे असते पण तिथून तर नेहमी निराशाच पदरी पडली आहे. परदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे, स्वदेशी भांडवलदाराणा मोठे करणे, गुंतवणुकीत मदत करणे म्हणजे विकास होईल आणि गरिबी कमी होईल हे समोर ठेवून धोरणे आखली पण गेल्या वीस वर्षात तसे होताना दिसत नाही. उलट गरीब आणि श्रीमंत यामधील दरी वाढत चाहली आहे. अर्थात या उदारीकरणाने एका नवीन अपत्याला जन्म दिला आहे ते म्हणजे मध्यम वर्गीय समाज. यांची लोकसंख्या अंदाजे २६% धरली जाते पण ती प्रत्यक्षात कमी आहे. 

काही लोक श्रीमंत झाले कि त्यांणी कमावलेला पैसा पाझरून (trickle-down theory ) गरीबा पर्यंत पोचेल अशी अफवा काही लोकांनी पसरवली आणि आणि साडेपाच टक्के लोक गर्भ श्रीमंत होत चालले आहे , दहा टक्के लोक श्रीमंत होत चालले आहेत आणि १५% लोक अतिशय असुरक्षित जिंदगी जगत महिना पगार घेऊन पिझ्झा , खात आहेत, वोडका पीत आहे, विकेंडला बायकोला, गर्लफ्रेंडला मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमा दाखवत आहेत आणि महिन्याच्या शेवटाला पेट्रोल भरण्यासाठी क्रेडीट कार्ड वापरत आहेत. आणि त्या क्रेडीट कार्डाचे बिल देण्यासाठी आणि घराचा हप्ता देण्यासाठी १२- १४ तास काम करत आहेत. आणि तरी या लोकांना रात्री झोप लागत नाही, उड्या नोकरी गेली तर घरचे हप्ते कसे फेडू, कराचे हप्ते कसे फेडू, पुढल्या वर्षी परदेशात सहलीला जायला येईल कि नाही अशा प्रकारच्या चिंतांनी त्यांना नेहमी ग्रासलेले असते. ह्या लोकांना वाटत आहे देशाचा विकास होतोय, स्वतःचा विकास होतोय. पण हे लोक खरी जिंदगी जगत आहेत असे त्यांना वाटत आहे आणि ते ह्या विकासाचे आणि उदारीकरणाचे कट्टर समर्थक आहेत.

पण उदारीकरणाच्या प्रक्रीयेतून बाहेर फेकल्या गेलेल्या किंवा नकारात्मक दृष्ट्या परिणाम झालेल्या शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्या ७०% लोकांचा विचार ना हे उदारीकरण करत आहे, ना हे सरकार करत आहे आणि उदारीकरणाची महत्वाची किंवा आधारस्तंभ असलेली संकल्पना जिला आपण “मार्केट/बाजार" म्हणतो ती तर कधीच कुणाची काळजी किंवा विचार करत नसते. मार्केटचा एकंच नियम असतो. टिकत नसला तर संपून जा. ह्या स्पर्धेत टिकत नसल्याने ६० कोटी भारतीय शेतकरी, शेतमजूर यांनी संपून जावे यासाठी तर हे सगळे धोरणे बनवणारी आणि धोरणे राबवणारी मंडळी वाट बघत नसतील? असा संशय यायला वाव आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा शेतकऱ्यांचा विषय आहे, भारतात गरिबी होती आहे आणि काही तरी मदतीच्या अपेकेक्षेने शेतकरी आत्महत्या करत आहेत किंवा शेतकऱ्यांना मदत करा, वर्गणी जमा करा, कर्ज माफ करा अशा मागण्या करणार्यांना अजून खऱ्या परिस्थितीची जाणीव झालेली नाही कि “रोग हाल्याला इंजेक्शन पखालीला” हा खेळ सगळी मिळून खेळत आहेत आणि हाल्याचे दु:ख कुणाला समजतंच नाही किंवा हे लोक त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कारण हाल्याला भयंकर मोठा रोग झालेला आहे आणि आता आपल्याकडे त्यासाठी औषध आहे कि नाही याची खात्री नसल्याने हळूहळु हाल्या आता मेलेलाच बरा आहे, आपण दुसरे रेडकु जो आपला लाडका मध्यमवर्गीय आहे त्यालाच नीट सांभाळू अशी भूमिका घेत आहेत हे समजायला मार्ग नाही. तसे समजत असतील तर हाल्या मेला तर दुसरे आवडते रेडकू म्हणजे मध्यमवर्गीय टिकू शकणार नाही हे तरी ह्या धोरणे ठरवणाऱ्या लोकांना ठाऊक आहे कि नाही कुणास ठाऊक. किंवा मुद्दाम आजरी पाडलेला हाल्या जेव्हा चवताळेल आणि रेडकाला ढूसंन्या द्यायला चालू करेल तेव्हा ह्या देशात अराजक मजल्याशिवाय रहाणार नाही.

भारतीय अर्थव्यवस्थेकडे सहज नजर टाकली तरी लक्षात येते कि भारतमातेची फक्त चोळीच रेशमी आहे बाकी अंगावरील लुगड्याचं पाक पटकर होऊन गेलेलं आहे. त्यामुळे जे श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि उदारीकरणाने त्या मध्यमवर्गीयात स्थान मिळवलेल्या लोकांना भारतमातेची फक्त ती रेशमी चोळीच दिसत आहे आणि उदारीकरणाच्या बाहेर राहुन जगण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ७०% जनतेला भारतमातेचे ते फाटके लुगडे दिसत आहे. आता कुणी ह्या देशाकडे कसे बघत आहे हे ते लोक ७० टक्क्या मध्ये आहेत  कि  ३० टक्क्या मधे आहेत यावर अवलंबून आहे.

भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पन्ना मधे शेतीचा वाटा हा फक्त १४% आहे पण त्या चौदा टक्क्यावर जवळ जवळ ६०% लोक जगतात. सेवा आणि ओद्योगिक क्षेत्राचा वाट हा ८६% आहे आणि त्यावर ४०% लोक जगत आहेत. आता ह्या ८६% उतपन्ना मध्ये जे गर्भ श्रीमंत आहेत जे फक्त ४%  आहेत त्यांची संपत्ती जर वजा केली तर शिल्लक काय उरतो आणि त्यात हा मधमवर्गीय विकास झाला म्हणून जगतो आणि गरीब शेतकरी मायबाप सरकारकडे अशा लावून बसलेला असतो. 

देशाच्या एकूण उतप्पान्नापैकी फक्त १२% उत्पन्नावर गुजराण करणारे ६०% शेतकरी आणि शेतमजूर एका वेगळ्याच दृष्ट चक्रात अडाकले आहेत. म्हणजे सरकारला गरिबांना, श्रीमंतांना, मध्यमवर्गीयांना,  नोकरदारांना स्वस्तात धान्य, भाजीपाला किंवा शेती उत्पादने देण्याची गरज वाटते परंतु शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव किंवा जास्त भाव देण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे शेतीमालाच्या किमती ह्या जाणीवपूर्वक कमी ठेवल्या जातात किंवा वाढल्या तर परदेशातून धान्य आयात करून त्या कमी केल्या पण ग्राहकांना त्रास होतु नये याची काळजी सरकार घेते. तिथे शेतकऱ्यांची काळजी ह्यावी हे सरकारच्या मनात सुद्धा येत नाही. सरकार मग दुष्काळग्रस्तासाठी काहीशे कोटी जाहीर करून आपली जबाबदारी पूर्ण केल्याच्या अविर्भावात आम्ही शेतकरीच आहोत म्हणून पेपरात जाहिराती देते. उदा. ज्वारीचा, कापसाचा, उसाचा, कडधान्याचे गेल्या दहा वर्षातील भाव बघितले तर जवळ जवळ सारखेच आहेत, पण शेती व्यतिरिक्त मालाची भाव वाढ हि जवळ जवळ दहापट झाली आहे, नोकरदारांच्या पगारी दहा पटीने वाढल्या आहेत आणि ह्या भाववाढीच्या जामान्या मध्ये शेतकर्यांनी त्याच त्याच भावात धान्य विकून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची, शिक्षणाची, सामाजिक गरजांची आणि पोटाची जाबाबदारी पूर्ण करण्याची अपेक्षा केली जाते. 

एकीकडे शेतीमालाला भाव नाही त्यात कान्द्यासारख्या पिकाला जीवन आवश्यक वास्तूमध्ये टाकनारे सरकार भेटले आहे. शेतीमाला भाव नसण्याच्या दृष्टचक्रात शेतकरी अडकलेला असताना दुसरी खूप मोठी अडचण भारतीय शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या पुढे येऊन राहिली आहे तिच्याकडे अजून सरकारचे लक्ष गेलेले दिसत नाही. 

दोन पिढ्याच्या अगोदर सरासरी प्रती कुटुंब १५ एकर जमीन असावी. ती जमीन पंधरा लोकांच्या कुटुंबाला पोसायला पुरेशी नव्हती पण शेतकरी तसेच जगत होते. कारण त्यांना त्यावेळी पण माहित नव्हते कि ते गरीब आहेत आणि त्याना आजून पण समजलेले नाही कि ते गरीब आहेत. कुटुंबे विभागली जाऊन तीन-चार एकर जमिनी वाटणीला आल्या. जमिनीच्या छोट्याशा तुकड्या मध्ये जे पिकते त्याला भाव नाही. मग हे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतात आणि आहे ती चार एकर जमीन पण निघून जाते आणि काही लोक आत्महत्त्या करतात किंवा तर कुटुंब कबिल्यासह शहरात येऊन झोपडपट्टीत भर टाकतात.

इथे होते शहरे बकाल होण्यास सुरुवात, अकुशल कामगारांचा नको तेवढा पुरवठा भांडवलशाही शोषणाला उत्तेजन देतो. म्हणून हे ग्रामीण भागातून सर्वस्व गमावून आलेले अकुशल कामगार हे भांडवलशाहीचे आवडते अपत्य आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा एक उपाय आहे असे म्हणतात. शिक्षण कशासाठी तर शेतीवरील भार करण्यासाठी. आपण शेतीवरील भार किती कमी करू शकतो आणि सेवा क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्राम ह्या ग्रामीण भागात सध्या शेतीवर अवलंबून असलेल्या लोकापैकी किती टक्के लोकांना भविष्यात सामावून घेण्याची क्षमता आहे किंवा क्षमता निर्माण करून शकतो याला खूप खूप मर्यादा आहेत.  २०% अतिरिक्त भार पडला तरी सुद्धा शहरे कोलमडून पडू शकतात. म्हणजे ७०% लोकसंख्या मोठ्या शहरात ,यामध्ये निमाशाहरी भागातून होणारे कुशल कामगारांचा सुद्धा समावेश आहे हे म्हणजे आताच्या मोठ्या शहरांची दुप्पट वाढ. हे चित्र भयानक आहे.

शेती क्षेत्रात रोजगार उपलब्ध नाही, शहरे सेवा औद्योगीक क्षेत्रामधे एवढ्या लोकसंखेला सामावून घेण्याची क्षमता नाही म्हणजे भारताचा आर्थिक दृष्ट्या कोसळण्याच्या काही अगोदरचा काळ चालू आहे का?


(लेखामधील टक्केवारी हि निश्चित नसून सर्वसाधारण पणे लेखाच्या उद्देश पोहोचवण्याच्या सोयी साठी मांडलेली आहे)