Thursday, December 24, 2015

सिंहगडची अत्युच्च अनुभूती



शुक्रवारच्या रात्री जास्त झाली नसेल तर शनिवारी सकाळी सिंहगड चढायचंच ह्या उद्देशाने तु पहाटे उठू शकशील. पहाटे साडेचार वाजता उठल्यावरविवाहित असशील तर बायकोला, लिव्ह इन मध्ये असशील तर जोडीदाराला आणि नशीबवान असशील तर गर्लफ्रेंडला उठवायचा प्रयत्न कर. त्यांच्याकडून तुला पहाटे पहाटे अनपेक्षितपणे नाहीत्याच कामासाठी झोपमोड केली म्हणून शिव्या बसतील. अगदीच दुर्दैवाने पछाडलेला असशील आणि मित्राबरोबर राहत असशील तर रूम पार्टनरला उठवायचा प्रयत्न कर, तो तुला "भंजाळला काय येड्झव्या, एवढ्या थंडीचं कुठे आयघालतो, झोप उगं" असे म्हणून पुन्हा गोदडीत घुसायला प्रोत्साहित करील. पण तू त्याच्या प्रोत्साहनाकडे दुर्लक्ष करून रिकामं होऊन ये. गेले पंधरा दिवस ऑफिसला/कॉलेजला  जाताना वापरत असलेले वास मारके सॉक्स फेकून देऊन दुसरे धुतलेले सॉक्स घाल, बूट चढव आणि बाईकला किक मारून सिंहगड रोडच्या दिशेने निवांत पहाटेच्या चांदण्यांची मजा घेत सावकाश गाडी चालवू लाग. अगोदर तो मोबाइल फेकून दे नाहीतर कानाला हेड फोन लावून पहाटेच्या शांत आणि निसर्गातील संगीताला फुकट मुकशील. जरा पुण्याच्या बाहेर पडले कि तुला हेल्मेट काढून त्या स्वछ, खुल्या आणि थोड्याशा बोचणाऱ्या हवेला तोंडावर घेऊ वाटेल. बिन्दास्त हेल्मेट काढ, दोन मांड्याच्या मध्ये ठेव आणि चेहऱ्यावर थंड हवा घेत सावकाश पुढे जात रहा. डोळ्यांना, गालांना, गळ्याला, केसातून आत जाउन अगदी डोक्याला सुद्धा त्या थंड आणि वर्जिन हवेचा स्पर्श तुला नक्कीच स्वर्ग सुख देईल.

काही आनंदी क्षणातच खडकवासला धरण लागेल. इथे अजून पर्यटकांची गर्दी झालेली नसेल. त्यामुळे वडापाव, चहा, भेळबुट्टा (मक्याच्या कणसाला मराठी शब्द) विकणारे लोक पण नसतील आणि लोकांना पाण्यात उतरू नका, पर्यावरणाचे रक्षण करा वैगेरे वैगेरे ज्ञान देणारे स्वयंभू समाजसेवक पण नसतील.

तिथे तांबडं फुटायच्या अगोदरचा संधीप्रकाश, त्या तलावाच्या आतून कुठून तरी किनारा शोधत येऊन स्वतःचे अस्तित्व त्याच किनाऱ्यावर संपवून घेणाऱ्या नाजूक लाटा, त्या तरंगणाऱ्या नाजूक लाटावरील वातावरणात व्यापलेले आणि स्वत:चे अस्तित्व संपवणाऱ्या प्रकाशाची वाट बघत असलेले धुके तुझे लक्ष वेधून घेईल. डावीकडे असलेले जंगल खुणावेल आणि उजवीकडे तळ्यात कुठेतरी दूर असलेली बोट तुला आवाज देईल.

 "ये विचित्र मानसाजरा थांब इथे, त्या तळ्याच्या पाण्यात अर्धं बुडून आणि अर्धं बाहेर राहून आपले अस्तित्व दाखवणाऱ्या खडकावर जरा बुड टेक. पाण्यात पाय सोडून बसलास तरी चालेल. सुरुवातीला पाणी थंड वाटेल पण नंतर तुला पाण्यात गरम आणि बाहेर जास्त थंडी वाटेल. आता पाण्यातून पाय बाहेर काढू वाटणार नाहीत. थोडा वेळ ह्या तलावावरील थंड हवेचा, धुक्याचा आणि त्या हळुवार नाजूक आवाज करणाऱ्या पाण्याच्या लाटांच्या संगीताचा अनुभव घे. किती वेळ गेला हे तुला समजणार नाही. डोंगरा पलीकडून येणारी सूर्यकिरणे ह्या धुक्याला खाउन टाकतील.  तेंव्हा मी  तुला स्पष्ट दिसू लागेल आणि तू माझ्यावर आणि त्या संपूर्ण दृशावर प्रेम करू लागशील. तू मला अगदीच रसिक दिसत आहेस. मला हाकणाऱ्या या अरसिक सैनिकांच्यात राहून कंटाळा आला आहे. मला माहित आहे तू माझ्याजवळ येऊ शकणार नाहीस, पण त्या सूर्याच्या उगवणाऱ्या सोनेरी किरणात मी ह्या तलावावर तरंगत असताना तू दुरून एखादा सुंदर फोटो तरी काढशील.

"पहाटेच्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, अंधुक धुक्यात दूरवर पाण्यावर तरंगणारी शिडाची बोट "

हा सुंदर फोटो तुला भेटेल आणि ते सौंदर्य अनेक लोकांकडून नावाजले जाइल. त्यातंच मी माझे सुख मानेल. नाहीतर जवळ आला तर माझ्यातील घाण तुला दिसेल आणि तू माझा तिरस्कार सुद्धा करू शकशील. त्यामुळे तू थांब,  दूरच रहा. दूर राहिला तरच आपले प्रेम कायम राहील. चिरकाल. "

तळ्यातील बोटेतून येणाऱ्या ह्या सादेला कसा प्रतिसाद द्यायचा ते तू ठरव. शौर्याची गाथा सांगणाऱ्या आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या सिंहगडला लवकर गाठायचे कि ह्या निसर्गातील प्रत्येक आवाजांना आणि आवाहनांना प्रतिसाद देत देत पुढे जायचे हे तुला ठरवावेच लागेल . कारण तुला तुझ्या वाटेवर अनेक ठिकाणी असे आवाज ऐकू येतील, अशी आवाहने केली जातील. प्रत्येक ठिकाणी मोह होतील, पण तुझा वेळ कुठे, कुणाला आणि किती द्यायचा हे तू ठरवले असेल तर तुला जास्त अडचणी येणार नाहीत.

सिंहगड खुणावतोय? तो उगवतानाचा सुर्य, सिंहगडाच्या अर्ध्या चढाईवरील कड्यावरून पहाचाय? मग तसेच पुढे जात रहा. तलावात्तील बोटीच्या आर्त सादेला प्रतिसाद नंतर कधीतरी देता येईल.

आजून काही काळ मोटारसायकल चालवल्या नंतर पुढे तुला अतिशय उत्साही सायकलस्वार  दिसतील. गैरसमज करून घेऊन नकोस. ते सकाळी सकाळी उठून बाजारला चाललेले, काहीतरी विकायला चाललेले किंवा कामानिमित्त चाललेले कष्टाळू लोक नसतील. ते विकेंडला वजन कमी करण्यासाठी चाललेले तरुण तरुणी असतील. त्यांच्या सायकली इम्पोर्टेड असतील, सायकलच्या खालच्या नळीला पाण्याची बाटली लावलेली असेल. जरा जवळ गेल्यानंतर तुला कळेल त्यात खूपच  सुंदर अशा दोन मुली पण आहेत. त्यांना डोळ्यात साठवून ठेव. परत घरी गेल्या नंतर बायकोला सांगायला बरे पडेल, ”शिक काही तरी त्या मुलींकडून, पहाटे पहाटे सायकलवर सिंहगड चढायला चालल्या होत्या, हाफ चड्डी घालून सुद्धा त्यांना थंडी वाजत नव्हती, याला म्हणायचे डेडीकेशन, नाहीतर तू आठ वाजे पर्यंत अंथरुणातून बाहेर येत नाहीस”  

हा असला डायलॉग तुझ्या तोंडातून बायकोला अंडर इस्टीमेट केल्याने बाहेर पडला हे बायकोच्या उत्तरावरून वरून तुझ्या लगेच लक्षात येईल. ती जेव्हा म्हणेल, “ठीक आहे मला पण हाफ चड्डी घेऊन दे आणि सायकल घेऊन दे, मी पण जाते हाफ चड्डी घालून सिंहगडला. सिंहगडलाच काय अगदी राजगडला पण जाते”  हा काळ खूप कठीण असेल. अशी संकटे तुला वोढवून घ्यायची सवयच आहे, हे तुझ्या लक्षात येईल. अशा वेळी तू काहीच न बोलता टीव्हीचा च्यानेल बदल. काही काळानंतर संकट आले तसे आपोआप गायब पण होईल.

हां,  तर त्या सुंदर सायकलस्वारांना पाठीमागे सोडून ते पुन्हा सिंहगडावर भेटतील या आशेने पुढे जात रहा. काही काळानंतर तू सिंहगडाच्या पायथ्याशी पोचशील. पायथ्याशी गेल्यानंतर थोडं वरती चढताना दोन ग्रहस्थ तुझी गाडी अडवून वीस रुपये मागतील. तसे झाले तर तुझा रस्ता चुकला आहे, तू गाडी उजवीकडे वळव आणि थोड्याशा तिरक्या रस्त्याने चालवत रहा. साधारण चार किलोमीटर नंतर खरा सिंहगडचा पायथा लागेल. तिथे तुझ्या अगोदरच काही कारगाड्या, एखादी बस आणि काही मोटार सायकली असतील. तुझ्या लक्षात येईल तू एकटाच रसिक आणि विचित्र नाहीस.

थोडं पुढे गेला कि तुला कळणार नाही खाली जंगलात जाणारा रस्ता धरावा कि वरती चढून जाणारा. वरती चढून जाणारा रस्ता धर आणि चालू लाग. तुला पाचच मिनिटात धाप लागू लागेल. पहिले पंधरा मिनिट खूप जड जातील. तू अजून दहा टक्के पण चढला नसतील तर तुला वाटेल,”मायला चला परत, हे काय आपल्याच्याने जमणार नाही” तरी पण धीर सोडू नकोस आणि हळू हळू चालत राहा. वीस मिनिटानंतर तुझा त्रास कमी व्हायला चालू होईल. शरीर एक गती घेईल, शरीरात एक उर्जा तयार होईल, पाय दुखायचे, धाप लागायची बंद होईल आणि आणि तू एका मशीन सारखा गड चढू लागशील. आता थंडी पण पळू गेलेली असेल. स्वेटर काढून कमरेला गुंडाळ. थोडासा घाम आलेला असेल तर ती डोंगरावरील हवा मस्त वाटेल. आता तुला तू पक्का ट्रेकर असल्याचा भास होईल आणि काही लोक तुझ्याकडे खुप आकर्षित नजरेने बघत आहेत असा तुला भास होईल. तो फक्त भासंच असेल.

निम्म्यावर पोहोचल्यावर तुला पूर्वेकडू सूर्य हळू हळू वरती येताना दिसेल आणि तुझा उत्साह दुप्पट होईल. ती डोंगरात विखुरलेली सूर्याची किरणे आणि तुझ्या शरीरात आलेला उत्साह हा अवर्णनीय असेल. तेवढ्यात तिथे जरा अवघड अशा चढावर दोन सुंदर मुली थकून बसलेल्या दिसतील आणि त्यांना त्यांचे तीन मित्र विनवत असतील, “चलो यार, आब थोडा तो बचा है, बस इत्तुसा बचा है डियर” पण त्या काहि हलायला तयार नसतील. तू त्यांच्याकडे उगीच एक कटाक्ष टाकत रुबाबात पुढे जाशील आणि तुला गेल्या वर्षी तोरणा किंवा तत्सम गड चढताना झालेली एक घटना आठवून तुझ्या तोंडावर स्मितहास्य उत्पन्न होईल.

तू त्या गडाच्या कठीण कडयावरून उतरत असताना आणि खाली काही मुली आणि मुले, मुलीना चढता येत नाही म्हणून खोळंबली होती. मग तू उतरताना त्या मुलीला हात देऊन वरती घेतले होते आणि नंतर खालून हात लाऊन ढकलून वरती चढवले होते. तिने वरती पोहोचल्यावर तुझ्याकडे एक मस्त कटाक्ष टाकला होता आणि त्याचवेळी खाली असलेल्या तिच्या बॉयफ्रेंड वाटणाऱ्या इसमाने तुझ्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला होता. पण तुला माहित होते, जसं तिच्या त्या सेक्सी काटाक्षाला काहीही अर्थ नसतो, क्षणभर आतून गुद्गुल्या करवून घेऊन तो तिथेच सोडून द्यायचा असतो, तसंच तिच्या बॉयफ्रेंड नामक प्राण्याच्या कटाक्षाला पण काही अर्थ नसतो. तो पण तिथेच सोडून देऊन पुढे चालायचे असते.

बरोबर एक तास वीस मिनिटांनी तू गडावर पोहोचशील. तिथल्या सरकारने बांधलेल्या भिंतीवर अंग टाकून दे. जास्त वेळ थांबू नकोस नाहीतर पुढे जाऊ वाटणार नाही. लगेच उठ आणि तिथल्या मावशीकडून मस्त वाफाळलेल्या भुईमुगाच्या वोल्या शेंगा घे. आणि खात खात चालू लाग. आता तुला एका गोष्टीचे बरे वाटेल. तुझ्या बरोबर तुझा कुणीहि मित्र आला नाही. नाहीतर त्या मित्रामुळे सिंहगडला भोगजे करून परत यावे लागले असते. कारण त्यांच्या बायकांनी त्यांना सारखे फोन करून पिडले असते. “ घरी येणारे~~~~प्लीज ~~~, विकेंडला तरी घरी थांबत जा वैगेरे वैगेरे ......

उदाहरणार्थ आपण वरती चढत असतानाच तुझ्या मित्राच्या घरून येणारे फोन तुझ्या डोक्याला शॉट देत असतात आणि तुझ्या मित्रांची तोंडे बघण्यासारखी झालेली असतात.

१.      गोपी, व्हेअर द हेल आर यु, म्यान, यु आर सपोज टू बी ब्याक बाय एट, आय टेल यु, गोपी धिस इस गेटिंग वर्स डे बाय डे
२.      गोपी, कहा पाहोंच गये, जल्दी आओं डार्लिंग, आज मेरी “दि” आ राही है ना ?
३.      गोपी, आरे कुठे आहेस तू ~~~~ कधी येणार परत, आरे विकेंड तरी दे रे कुटंबाला, अगोदर त्या दोस्तांना सोड बरे तू, अरे तू बाथरूम मधील दिवा पण बंद नाही केला जाताना, मी जातेय आईकडे, तू येउच नको आता. (इथे प्रत्येक वाक्यावर अनुसार धरावा)
अशा मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबाला सिंहगडला येऊन सुद्धा सहन करण्या ऐवजी एकटाच  आला त्याचे तुला समाधान वाटेल. स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात वेळ दिल्याचा तुला आनंद वाटेल.

आता चालत चालत पस्चीमेकडील बाजूने विंड पोइंटला चालत जा. सूर्य प्रकाशात उजळून गेलेल्या त्या सह्याद्रीच्या रांगेत रुबाबात उभे असलेला राजगड आणि तोरणा खुणावत असेल. तुला त्यावेळी त्या गडाकडे बघून एक मुजरा करू वाटेल. तसं वाटलं तर बिंधास्त कर. लाजायचे कारण नाही. पुढचा राजगढच प्ल्यान करत करत तू विंड पोइंटलं पोहोचशील. तिथे कड्यावर अंग टाकून दे. पश्चिमेकडील तीन हजार फुट खोल दरीतून वरती येणारी हवा आणी इकडे पूर्वेकडून सूर्यप्रकाशात न्हावून येनारी हवा खात जितका वेळ आवडेल तितका वेळ डोळे झाकून पड.

यासारखे दुसरे मेडीटेशन तुला कधीच करायला मिळणार नाही. आता तुला तुझे शरीर हळू हळू हलके वाटू लागेल. आणि तू तुझ्या आयुष्याच्या एक सर्वोच्च क्षण उपभोगत असशील. 








Monday, December 14, 2015

व्यसन वर्तमानपत्राचे

किशोर वयात मला पेपर वाचायचे व्यसन लागले होते. दारू जशी रोज सेमंच असते व कडूच लागते तरी लोकांना ती रोज रोज पिऊ वाटते. तसे पेपरला पण रोज रोज तेच लिहीलेले असले, तरी तेच तेच वाचायचे व्यसन लोकांना लागलेले असते, पण ते मान्य करत नाहीत कि ते व्यसनी आहेत. पण मी सन्माननीय वाचकांना अगोदरच जाहीर कबुली दिली आहे.
सबब त्या काळी मी कला शाखेत शिकत असल्याने काहीच काम नसायचे आणि त्यामुळे माझ्या व्यसनांधतेला सीमाच राहिली नव्हती. मी दररोज तीन-तीन तास तीन चार वर्तमानपत्राचा फडशा पाडायचो. त्यामुळे मला बेन्जामिन नेतण्याहू पासून ते मायावती पर्यंत आणि भैऱ्या बिब्या पासून पीव्ही नार्सिम्हराव, सीताराम केसरी पर्यंत सगळ्यांच्या आयुष्यातील खाजगी आणि राजकीय घटनांची वित्तंबातमी असायची. मग त्या माहित्या मी नको तेव्हा लोकांच्या तोंडावर मारून आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडायचो. पण हळू हळु मला समजले कि गेल्या पंधरा वर्षातील सगळी वर्तमानपत्रे बघितली तर बातम्या त्याच आहेत, संपादकीय तेच आहेत फक्त तारखा आणि नावे बदलली पाहिजेत.
अशा तऱ्हेने पेप्रात काहीच अर्थ नाही हे लक्षात आल्याने आमच्या घरचे पुणेरी “लोकमान्य सकाळ” हे वर्तमानपत्र मी दीडच मिनिटात वाचून पूर्ण करू लागलो. नंतर नंतर मला दीड मिनिट पण खूप वाटू लागला म्हणून मी पेपर्वाल्याकडून तो पेपर घेऊन फक्त टेबलवर ठेवू लागलो. महिन्याला सत्तर रुपये रद्दीचे येतात तेव्हा बरे वाटते पण बिल दीडशे रुपये येते हे लक्षात आले असते तर मला स्वतःला मराठी म्हणवून घ्यायचा अधिकार राहिला नसता.
तर अशाच एका सांप्रतकाळी (मला ह्या शब्दाचा नेमका अर्थ आजून माहित नाही) सकाळला रद्दीत घालत असताना माझी नजर पेपरच्या शेवटच्या पानावर पडली. “मुक्त पीट”. पहिली दोन वाक्य वाचली आणि याशिवाय दुसरे क्लासिक साहित्यच असू शकत नाही असे वाटून मी तो ललित लेख वाचावयास घेतला. गेले सहा महिने हे क्लासिक साहित्य वाचून मी त्या सहा महिन्यातील अगणित लेखांचा गोषवारा आपल्या समोर मांडत आहे.
लेखक/लेखिका खालील नावात सामावलेले असतील -----
• मृण्मयी शहादेकर पानसे किंवा,
• विष्णुदत्त कुळकर्णी इचलकरंजीकर, निवृत्त वरिष्ठ लिपिक ब्यांक ऑफ महाराष्ट्र किंवा,
• अर्जुन पाटील कोठावळेकर, निवृत्त लेफ्टनंट, भारतीय सेना,
• कु. आर्या नचिकेत देशपांडे, कोथरूड, विद्यार्थिनी,
• सौ कलावती धोंडीबा मुरूमवाले वैद्य, गृहिणी
मुक्त पिट
मृण्मयी शहादेकर पानसे
मी तशी नाशिकची. १९८४ साली मला जेव्हा हे पाहायला आले तेव्हा मी नुकतीच बारावी पास झाले होते. पाहण्याचा कार्यक्रम झाला. मी लाजत मुरडत समोर आले. तेव्हाच आमच्या सासरेबुवांचा आवाज मी ऐकला आणि काळजात धस्स झाले. पण तिकडची स्वारी आणि मी गच्चीवर बोलायला गेल्यावर त्यांनी सांगितले कि बाबा खूप प्रेमळ आहेत. फक्त आवाज आणि तोंड भरगच्च आहे, बाकी सगळं ओके आहे. आता नाशिकहून पुण्याला नांदायला यायचे म्हणजे एक दबाव होताच. एक तर पुणे हे त्याकाळी सुद्धा सांस्कृतिकच शहर होते (आता सुद्धा आहेच म्हणा). एकदाची नांदायला आले. सासू आणि मामंजी खूप प्रेमळ भेटले. तिकडच्या स्वारिणी नाही तर मामंजींनीच सांगितले पदवी करून घे. मग मी बाहेरून बीए केले. मामंजीनी त्यांच्या ओळखीच्या पितळे एंड संस मध्ये मला अकौंट कारकून म्हणून तेव्हा लावले ते मी आता गेल्या महिन्यातच सुटले.
पुण्याचा आणि नासिकचा चांगलाच संबंध आणि मिलाप आमच्या घराण्यात झाला. बघता बघता आम्हाला दोन मुले आणि एक मुलगी झाली. नचिकेत, ऋषिकेश, आणि मृणालिनी. नचिकेत आणि ऋषिकेश आता अमेरिकेत असतात आणि मृणालिनी लग्न करून युकेला गेलीय. आमच्या मुलीने आंतर जातीय लग्न करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. जावई हे वैज्ञानिक आहेत. नातवंडे येतात उन्हाळी सुट्टीत. मग आम्ही मजा करतो.
परवाच आम्ही दोघे म्हणजे इकडची स्वारी आणि मी केदारनाथ आणि बद्रीनाथला जाऊन आलो. सासू आणि मामंजी येऊ शकले नाहीत. खूप थकले आहेत. आम्ही केशरी टूर मधून गेल्तो. खूप मजा आली.
एकूण मी पुण्याची सून आहे. मला सकाळने संधी दिल्याने मी आभारी आहे.
पुढील भागात कु. आर्या नचिकेत देशपांडे, कोथरूड, विद्यार्थिनी,