Saturday, September 14, 2013

भाग चार

आसं रात्री एकटं एकटं उगडंच उताणं पडुन चांदण्याकडं बघत राहण्यात जगातली सगळी शांतता आणि समाधान आसंल. कधी कधी अंगावरच्या कापडाचा पण त्रास वाटायला लागतो. कधी कधी का  मला तर नेहमीच त्रास वाटतो. माणसानं  थंडी वाऱ्यापासून वाचावं म्हणून पहिल्यांदाच कापड न्हायतर काय तरी अंगावर घेतलं आसल आण त्याला कळलं आसल कि, आरे वाह ह्याच्या मुळं जरा बरं वाटतंय मग सगळ्यांनीच ती कापडं वगैरे घालायला चालू केलि असतील. मग कुणी तरी दीड शहाण्या लोकांनी कापडाचा अन इज्जतीचा संबंध जोडला आसंल. आता हि वाही फकस्त  माणसानीच लावून घेतल्यामुळं तो स्वताला इतर  जनावरां पेक्ष्या हुशार समजू लागला आणि तो अजून त्याच येडातंय. नको चड्डी काढायला नको. येवढा पण काय तरास न्हाय होत.  पण गावाकडल्या रिकाम्या काळ्या वावरात उन्हाळ्यातल्या चांदण्या रात्री उताणं पडुन राहण्यात आणि हितं फरकाय.  हितं खाल्लाकडून येणाऱ्या पुण्याच्या उजेडानं सगळ्या आकाशाची मारून ठिवलिय. निम्म्या आकाश्यातल्या चांदण्याच दिसत नाहीत्या. तरी खाल्ल्या गोंधळा पेक्ष्या बरंच वाटतंय. च्यामायला येवून आपल्याला दोन चार दिवस झालं नाहीत तवरच आपुन भांडणं कसकाय केली? घालू आय काय भ्यायचंय, आली अगावर घेतली शिंगावर. पण आपुन काय भांडण्यासाठी न्हाय आलो हितं. अभ्यास करावा लागंल. आपल्या खान्दानातच काय आख्या कुणबी-शेतकऱ्यांच्या किती लेकरांच्या नशिबात आसतंय आसं शिक्षण आणि वातावरण?

उच्चभ्रू म्हणावं असंच कॉलेज आणि होस्टेल अन टेबल टेनिस, बिलियर्डस खेळायची सोय असलेली झाकपाक खानावळ. बापाच्या खात्यावर जास्त पैसे झाले म्हणून कॉलेजला दान देवून आलेली "डुड " पोरं तर शेतं घान ठिवून पोटं खपाटी गेलेल्या शेतकऱ्यांनि  स्वताच्या पोटाला चिमटा काढुन शिकायला पाठवलेली आणि इथं येवून "डुड" पणाची झूल पांघरलेली काही पोरं . च्यामायला पण आपण कश्यात मोडतो ? पहिल्यात नक्कीच नाही, मग दुसऱ्यात ? काय माहित पण आपुन कश्याची झूल पांघरली नाही हे काय कमी न्हाय. एक बरंय इथं  कुणाच्यात काहीच फरक न्हाय. खाणं, पिणं, फिरणं, सगळं अगदी बरोबरीनं. कुणीच कुणाच्या आयला मावशी म्हनायला तयार नाही. भारतात लोकशाही आणि समाजवाद खरा कुठं नांदत आसंल तर अश्या ह्या कॉलेज्यात आणि होस्टेलात. पण मग आपुन दुसऱ्या वर्गात मोडतो ते कसं? आपली आई आणि तात्या खरंच स्वताच्या पोटाला चिमटा काढून जगत असतील का? ह्याट ! सयाजी हा काय प्रश्न झाला? आयुष्यच चिमटा काढीत गेल्यामुळे आता त्यांनाच कळत नसंल कि ते चिमटा वगैरे काढून जगतायत म्हणून. पण मग फक्त आपलेच आय बाप तसे आहेत का ? छ्या छ्या तसं नाही, दोन चार शिक्षकं, साखर कारखान्यावर कामाला असणारी दोन चार कामगारं आणि दोन तीन आजून चुकून शिल्लक राहिलेली जमीनदारं  सोडली तर सगळी गावंच पोटाला चिमटं काढुन जगणारी. छ्या, गावातली जिंदगी काय खरी न्हाय गड्या, जनावरा सारखं राबुनबी शेवटी गरीबीच. आन सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांना माहीतच न्हाय कि ते गरीब आहेत. हे म्हणजे भलतंच पण बरंच म्हणायचं. शहरात कसं आसतं सगळी नोकरीलाच, न्हाय तर धंद्याला, एक शेतकरी नाही. त्यामुळं सगळी शहरं सुखी असावीत. गांधीजी सारखा येवढा मोठा माणूस खेड्याकडं चला कसाकाय म्हनला आसंल? अडाणचोट  आसंल नाही तर खोटं बोलत आसंल आम्ही शहरात येवू नये म्हणून. काय झ्याट आसतंय खेड्यात?  दवाखाना नाही, लाईट नाही, रस्ता नाही, नोकरी नाही, फकस्त ढेकळं, बैलं, नांगुर, कुळव, सांच्याला भजन, बसा बडवीत. ह्यातच जीन्दग्या बरबाद झाल्या आमच्या अनेक पिढ्यांच्या. हे काय खरं न्हाय सयाजी.

शहराकडं चला आसं आंबेडकरनी सांगितलं, खरंच बोलला माणूस. मंत्रच दिला. पाळला  ईमानदारीनं बामणांनी. एक बामन दिसत न्हाय कोणत्याच गावात. शहाणे लोक. निळी नेमाटि कधीच लावणार नाहीत पण इचार मात्र आंबेडकरचेच फॉलो करणार. हे  राजकारण आणि समाजकारण कधी जायचं कुणास ठावूक तुझ्या डोक्यातून सयाजी? साला ह्यातच संपला कुणबी. आपुन न्हाय, आपुन अभ्यास करायचा. इंजिनेर व्हायचं. पोरी तश्या  चांगल्याच आहेत वर्गात. बघू काय होतंय. न्हाय न्हाय ! थर्ड एअर पर्यंत पोरीकडे नाही बघायचं.

खनावळितलं  वातावरण तीन चार दिवसातच अंगावर आलं मायला. जेवण फीवन बरंचाय. बरंचाय म्हणजे चांगलचंय. आपल्याला घरी  तीन भाज्या, कोशिंबिरी का काय म्हणत्यात ती, भात, शिरा अश्या समद्या गोष्टी एकदम कधी मिळाल्यात का सानासुदिशिवाय? पण मेसचा मालक मस्तच रंगेल दिसतोय, एका तरण्या ताट स्वयपाक करणाऱ्या बाईसोबत तिच्या नवऱ्या समोरच चाळं करत व्हता. जबरी बलात्कारापेक्ष्या हि लयच घाण. एका वेळी तीन लोकावर बलात्कार करतोय तो माणूस. ती बाई, तिचा नवरा, आणि गोड सहा वर्षाची मुलगी. बलात्कार काय फक्त शारीरिक असतो का? तिच्या नवऱ्यावर कसला जबरी बलात्कार होत आसंल जवा त्याचा मालक त्याच्या समोर त्याच्या बायकोवर चढत आसंल. ह्याट काय खरं न्हाय ह्या सामाज्याचं जोपर्यंत भूक आहे तोपार्य्नात हे राहणार. शोषण कर्ते बदलतील शोषक बदलतील पण बलात्कार चालू राहतील ह्याला कुणीच थांबवू शंकणार नाही सयाजी तू लय टेन्शन घेवू नको. आन तुला काय माहित तिचा नवराच तिला त्याच्याकडे पाठवीत नसंल. दुनिया लय येगळ्या येगळ्या लोकांनी भरलीय तू नको पडु त्यात. पण खरच मायला रुबाबंय ह्या मेसच्या मालकचा कॉलेजच्या बोर्डापासून ते पोरा पर्यंत लयच वट हाय म्हणं त्याचा. पण खूपच घाण दिसतं ते, गळ्यात पाचेक तोळ्याची चेन, वरच्या दोन गुंड्या उघड्या, आठ बोटात आंगठ्या, भरदार मिश्या आणि पायात कोल्हापुरी चप्पल. घाण काय दिसतंय, जळतोय सयाजी तू, एकदा मामाच्या गळ्यातील चेन मागितल्यावर आई तुला म्हणाली व्हती ह्या वर्षीच्या तुरी झाल्या कि घेवू, कश्याचं काय तीनदा येवून गेल्या तुरी. शेतकऱ्याच्या पोरांनी असलं नाद करूनि. आपण नोकरी लागल्यावरच घ्यायची. किती दालीद्री तिच्यायला आपण आणि आपला समाज. आणि उगंच  मराठा म्हणून स्वताला राज्यकर्ती जमात समजून नसलेली छ्याती फुगुवून जगण्यात काय अर्थ हाय का? हा म्हणजे शुद्ध वेडझवे पणा आहे होय शुद्ध पुणेरी भाषेत "वेड्झवेपणा" . हाहाहाहाहाहा !

त्याला शोधत असणारी इक्बाल आणि आबांनी त्याला एकट्यालाच बघितलं.
"ये सयाजी च्यामायला एवढ्या लांब कश्याला यायचं? तिथंच बाथरूममधी उरकायचं लका, कोणत्या नटीचा फोटो आणलाय का बग रं जरा इक्बाल ह्यानं"

इक्बाल , "आरं बाथरूम मधी कुणीतरी समाजसेवकाने माधुरी दीक्षितचा फोटो लावलाय. आयला पोरं पण भारीच हायती. सयाजी इतक्या लांब कश्याला यायचं"

"हाहाहाहाहाहा " दोघांचा मिळुन हसण्याचा आवाज.

तुमच्या डोक्यात त्याच्याशिवाय काय नसतं का रे? जगात अजून बरीच मोठी मोठी सुखं हायती. डोळं उघडुन बघा. डुकराच्या मनात गूच तसं तुमच्या मनात कायम सेक्स.

आर पण हि बारकी बारकी सुख मिळाल्याशिवाय मोठ्या  सुखाकडं कसं जायचं मित्रा? बरं जाउद्या आज हीत वरीचं झोपू , मी येतो तिघांची पांघरुणा घेवून.

क्रमश:




Friday, September 13, 2013

नीचतम लोकशाही

1995, विधानसभा निवडणूक, उमेदवार गरीब शेतकऱ्याचा पोरगा, कार्यकर्ते त्यापेक्ष्या अतिसामान्य.  फाटके,  तुटके तरी पण घरून भाकर बांधून येणारे आणि उमेदवाराकडून कसलीही अपेक्ष्या नसलेले. कुणी तुळजा भवानीला नवस बोलून आपला उमेदवार निवडुन येई पस्तोर चप्पल सोडलेली, कुणी मटन सोडलेले, कुणी तंबाकू सोडलेली. स्वताच्या कल्याणासाठी जेवढे कष्ट घेतले नसतील, नवस बोलले नसतील तेवढे आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी बोललेले. चमत्कार घडतो. ह्या फाटक्या आणि गरीब कार्यकर्त्याचा उमेदवार भलत्याच मात्तब्बर आणि प्रस्थापित आमदाराला हारवून निवडुन येतो. तुराट्याच्या घरात, गायीच्या गोट्यात आणि घर नाही म्हणून परसात राहणारी पोरं आपलाच दोस्त आमदार झाला म्हणून हा जल्लोष करतात. विद्रोहाचा विजय होतो.

एकाच वर्षा नंतर. एके काळचा विद्रोही उमेदवार आणि आजच्या सत्ताधारी आमदाराचा बंगला. फाटके तुटके तेच झिजलेले कार्यकर्ते कामाच्या आशेने आलेले. बंगल्याच्या हॉलमध्ये गळा आणि मनगट पिवळे धमुक असलेले तेच बगळे ज्यांनी अगोदरच्या प्रस्थापित वतनदार आमदाराकडून पण सत्ता भोगलेली आणि ह्या कार्यकर्त्यांना त्याच्या तत्कालीन मालक विरुद्ध प्रचार कराल तर घर उनात बांधण्याची धमकी दिलेली. त्यांना बघून पोरं दचकतात. इकडे तिकडे बघतात.

"बसारं बसा !" एक घोगरा पण माजलेला आवाज
"आरं सोफ्यावर न्हाय खाली बसारं" पुन्हा तोच आवाज

"च्यायला सगळी पुढारीच हायेत हितं!" स्वगत

काही पोरं लगेच बसतात, कंटाळून आलेली असतात, काही खोळम्बतात, दोघं कडेला उभा राहतात.

कारं ? खाली बसायला लाज वाटती का? झेड पी सदस्य हायस काय? धाकटं मालक येत्याल आता, आताच आंगुळ झालीय, देव पूजा चालूय मालकाची. दुपारच्या बारा वाजलेल्या असतात. थोरलं मालक अधिवेशनाला गेल्यात.

खाली बसलेल्या सात पोराकडे बघून उभा राहिलेल्या दोघांना कीव येते आणि ते तसेच बाहेर पडतात.

विद्रोहाचा एकाच जळजळीत वर्षात पराभव !

जनता ज्यावेळी आपणच निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधीना मालक म्हणते ती लोकशाहीची निच्चांकी पातळी असते. आपण सध्या लोकशाहीच्या नीचतम पातळीतून मार्गक्रमण करत आहोत. जोपर्यंत महाराष्ट्रातले सगळे मालक, सरंजाम, वतनदार नष्ट होवून जनतेच्या बरोबरीला येत नाहीत तोपर्यंत भारतात लोकशाही प्रस्थापित होणे कठिन आहे.  





Wednesday, September 11, 2013

"विसाव्या शतकातील मराठी साहित्य

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकामध्ये मराठी साहित्याला ग्लानी आली होती. सुमारे आठशे वर्षा नंतर सुद्धा मराठी साहित्य संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या प्रभावातून मुक्त होवू शकले नव्हते. तरी सुद्धा संत ज्ञानेश्वर हे मुळचे मराठीच असावेत कि नाहीत ह्यावर अनेक संशोधकांचे एकमत झालेले नाही. पद्य हा प्रकार कठिन आणि न समजणारा समजला जात होता.  त्यामुळे लोक गद्द्याकडे वळल्याचे निराशादायक चित्र तयार झाले होते. हा मराठी साहित्यातला काळा कालखंड असावा.  पद्याला फेसबुक ह्या माध्यमाद्वारे खूपच भयंकर आणि कडव्या टिकेला सामोरे जावे लागत असल्यामुळे कवी लोक कविता करायला धजत नसावेत असे पण काही इतिहासकार आणि साहित्य तज्ञांचे मत आहे. तर आता हे फेसबुक काय होते? तर यावर संशोधन चालू आहे. महामहीम मार्तंडेशंकर गिरिधारी यांच्या मते फेसबुक हे त्या काळच्या विरोधी पक्षांनी एकत्र येवून सरकारला शिव्या देण्यासाठी तयार केलेले मध्यम असावे. तर आता विरोधी पक्ष्य आणि सरकार ह्या काय भानगडी होत्या ह्यावर पण संशोधन चालू आहे.  काही संशोधकांच्या मते त्याकाळी दोन जाती असाव्यात एक सरकार आणि दुसरी विरोधक. ह्या दोन जातीतील वैरामुळे खूप मनुष्यहानी झाल्याची पण खूप उदाहरणे आहेत. पण ह्या फेसबुक नामक दुधारी तलवारीचा वापर तत्कालीन होतकरू साहित्यिक आणि शीघ्र कवी आपली साहित्ये प्रसवण्यासाठीच जास्त करत असावेत असेही अलिकडेच पुणे नामक जमिनीखाली गाडल्या  गेलेल्या शहरातील उत्खननात आढळलेल्या संगणक सदृश्य पदार्थात सापडलेल्या माहितीवरून समजून येते.

महामहीम मार्तंडेशंकर गिरिधारी यांचा असाही दावा आहे कि तत्कालीन मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी श्रीमान ग्रेस, श्रीमान मर्ढेकर, श्रीमान वी. वा. शिरवाडकर ह्यांनी व अश्या अनेकानी अनेक तर्हेच्या न उमजणाऱ्या तसेच प्रेमाच्या, निसर्गाच्या, वीर रसाच्या कविता लिहून मराठी साहित्यात कोंडी निर्माण केलेल्या संत साहित्याच्या भिंतीवर धडका देवून साहित्याला मोकळी वाट करून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. विद्रोह नामक नवीनच संकल्पना या काळात उदयाला आलेली पण दिसते पण त्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.

पण खऱ्या अर्थाने मराठी साहित्यामध्ये रेनासंस आणण्याचे श्रेय द्यावे लागेल ते संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी या प्रख्यात कवींना.  शेतामध्ये, रणांगणावर, घरात आणि संसारात अडकलेले मराठी काव्य लोकल मध्ये, ऒफ़िस मध्ये घेवून जाण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांच्यामुळेच मुलीना आणि मुलांना बाप सुद्धा आपल्यावर प्रेम करतो हे समजून आले. त्यांच्या पश्चात त्यांचे साहित्य एक हजार वर्षा नंतर जगातील सर्व प्रमुख म्हणजेच  मराठीच्या आक्रमणामुळे ज्या पाच पंचेवीस भाषा उरल्या आहेत त्या भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.  जगातील हजारो विश्वविद्यालयामध्ये अजूनही त्यांचे काव्य शिकविले जाते हाच आहे पुरावा त्याच्या वैश्विकतेचा आणि चिरंतनतेचा. आज जगातला कोणताच असा प्रदेश नाही कि तिथे यांच्या काव्याची पारायणे बसविली जात नाहीत. मराठीच नाही तर जागतिक स्तरावर तयार झालेली साहित्यिक कोंडी फोडून मराठी साहित्याला जगातील साहित्याचा मैलाचा दगड बनवण्याचा माण मिळवून दिल्याबद्दल आणि चांद्या पासून बांद्या मार्गे निव जर्सी पर्यंत पोहोचलेले मराठी विश्व कायमच संत संदीप आणि संत सलिल याचा आभारी राहील व अभिमान पण बाळगेल.

कुमार : दिग्विजयसिंग पांडे आणि मार्टिन केस्तोवोस्की , यांच्या "विसाव्या शतकातील मराठी साहित्य" ह्या शोध निबंधातून.
निव जर्सी 
सन ३१२९



Thursday, September 5, 2013

धन्यवाद गुरुजी

  1. दहावीचे वर्ष, सगळ्या पोरांना अभ्यासासाठी शाळेत झोपायची सक्ति. रात्रीच्या नऊ वाजत आलेल्या. दोन तासापासून शालि, बदगी, टॉवेल, लुंग्या, चवाळि अंगावर घेवून पेंगत पेंगत वाचत असल्याचे सोंग आणून, सरांची घरी जाण्याची वाट बघत आखिल विद्यार्थी समाज. शेवटी ती वेळ येतेच, सर हात पसरून मोठ्याने आळस देतात आणि म्हणतात. "गोडग्या ~~~~ आक्रा वाजेपर्यंत कुणी झोपले कि मला सांग, टांगडंच तोडतो एकेकाचं.

    सर खिडकीतून लांब... गेलेले दिसले कि माझी बाकड्य़ावरुन उडी मारून सगळ्यांच्या समोर जावून घोषणा - "तर पोराहो, अश्या प्रकारे सर घरापर्यंत पोचलेले हायेत. आणि गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मंडळाने आणलेला मंगलाबाई बनसोडे याचा अमेरिकेत नाव गाजवून आलेला तमाशा आपली वाट बघत हाये. लवकरात लवकर नाही पोचले तर गण गवळण हुकेल" पेंगत असलेल्या पोरांच्या झुपी कुठच्या कुठे पळुन गेल्या आणि पुन्हा टॉवेल, लुंग्या तोंडावर बांधून अखिल विद्यार्थी समाज तमाश्यासाठी तयार झाला. अश्या तर्हेने रातभर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटून शाळेत आलो तर सगळ्यांची अंथरून पांघरुणे शाळेच्या कार्यालयात जमा झालेत असे समजले. काही पोरांना पहाटेच्या गारव्यात घाम आला, काही पोरांना लगवि लागल्यासारखं वाटु लागलं आणि काही माझ्यासारखी पोरं "घालू आय हुइल ती हुइल" असे म्हणून टॉवेल तोंडावर घेवून झोपी गेली.

    सकाळी प्रार्थनेच्या वेळी जेव्हा आम्हा सगळ्या दहावीच्या समाज्याला वर्गातील मुलींच्या समोर सर हाताने, काठीने, रुळाने बदडत होते तेव्हा समस्त वर्ग भगिनींचे चक चू चू चू असे आवाज त्याही स्थितीत आम्हाला त्या मारापेक्ष्या जास्त त्रास देत असलेले चांगले आठवत आहे. अंगावर उमटलेले वळ एक आठवडाभराने गेले पण मनात उमटलेले वळ अजूनही तसेच्या तसेच आहेत. सर, मला विद्यार्थी बनविल्याबद्दल आपला सदैव ऋणी राहील.

    भोसले सर, डि. पी जाधव सर, वाघमारे सर, जैंद सर, काट्मोरे गुरुजी आणि सर्व गुरुजन वर्ग, आज गावापासून शेकडो किलोमिटर दूर तुम्ही दिलेल्या शिदोरीच्या जीवावरच जग पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करत आहोत, काही चुकीचे करताना अजून रुळाचे फटके आणि शब्दाच्या माराच्या भितिने पोटात तोच गोळा आल्यासारखे वाटते. तुमच्या हातून अनेक पिढ्या घडविण्याचे काम होत आहे. सगळ्याच मुलांना तुमच्यासारखेच गुरुजी भेटावेत अशी अपेक्ष्या व्यक्त करून आपल्याला "Teacher's Day" च्या शुभेच्च्या देतो.