Friday, November 22, 2013

माझा पहिला इमाइन प्रवास


आपल्यावरच्या भयानक तथा बाक्या प्रसंगाला कोण जर हासत असेल किंवा आपली कीव करत असेल तर आपण परत त्याची कीव करून बदला घेवू शकत नाही हा सुद्धा एका भयंकर दुखाचाच प्रकार आहे. उलट आपण खूपच शुद्र आणि ह्या अतिजागतिक जगात अतोनात मागास असल्याची भावना मनात येते. हि भावना जो मनातच ठेवतो तोच खरा शूर माणूस.

तर अश्याच एका अंमंगळ समयी आमच्या साहेबांच्या अति व्यक्तिगत सहकाऱ्याने बोलावून हातात विमानाचे टिकेट कोंबले आणि गोऱ्या साहेबाबरोबर चेन्नैला बैठकीला जावून ये असा आदेश वजा विनंती केली. आम्हाला लगेचच बारक्यापनी शाळेच्या मैदानाहून (चुकुन माकून शाळेत असेल तर ) किंवा रानातून आकाश्यात "आदिक " चिन्हासारखे विमान बघून उड्या मारणारे आम्ही आणि हातातील खुरपी, कुळव बाजूला ठिवून उभं राहून विमानाकडं नजरेआड होत नाही तोवर बघणाऱ्या  अन चर्चा करणाऱ्या रानातल्या आयाबाया अन गडी माणसं आठवली. ह्या अश्या चर्चा ऐकायला आम्ही बारकी चीरकी पोरं कायम घोड्यावर बसून असू.

व्हय, मला म्हाईत हाय, शरद पवारच हाय, रातच्या सातच्या बातम्यात सांगत व्हती बाय!

ईई बाई, वनसंला तर सगळंच माहित असतं. आमच्यात बी हाय मनावं रेडिव.

वच्छला वैनीचं खरं असंल बाई, तीकुनाय तिकडं खाल्लाकड सोलापुरा कडंच चाल्लय नव्ह का इमायीन. वरल्या वाड्यातल्या आपल्या संगुची मावळण न्हाय का सोलापूरचीती सांगत व्हती कि त्यांच्या घराजवळच हाय इमान्तळ.

ह्या बाया मान्सास्नी आक्लीचा पत्या नसतो हि काय खोटं न्हाय सांगितलं संत लोकांनी, च्यामायला, मुण्ढ्या हाय ती, संगर्ष यात्रा चालू न्हाय काय, उद्याच्याला सोलापूरला सबा हाय. लागा उगं कामाला. निस्तं बोलायला फायचेल.

तर अश्या आठवणी बाजूला ठेवून प्रवासाची तयारी केली.

साहेब मला पूर्णपणे ओळखून असल्यामुळे विमातळावर सोडवायला आले. (आमचे इग्रजी मधील संभाषण मराठीत ).

हं तर हे काय अवगढ काम नस्तेय, विकास, नुसते तिकिट दाखवायचे आणि हात वरी करायचे? ते आत सोडतात. आत जावून बसायचे आणि आपल्या विमानाची वाट बघायची आणि आलं कि वळीनं जावून विमानात बसायचं. येस्टित आणि यात कायच फरक नाही हे फक्त हवेतून उडतं एसटी जमिनीवरून.

अन हो लक्ष्यात ठेव, त्यांच्याशी जास्त बोलायचे नाही, तू पण खूप सिनियर आहे असे दाखवायचे, एक किंवा दोनच पेग घ्यायचे, नाहीतर असे कर बियरच घे. सकाळी नाष्टा करताना अगोदर जूस प्यायचा, नंतर थोडे थोडे पदार्थ घ्यायचे बशीत, एकदम भरून घ्यायची नाही प्लेट. खूप खा पण कमी कमी घेवून खा. जेवण झाल्यावर अजून जूस पी. "दोनच पेग घे" हे साहेबांनी मला चार वेळा सांगितले. कुणीतरी साहेबाचे कान भरलेले दिसतात.

तर अखेर प्रसंग आलाच. अश्या वेळी आपण एकदम नवाट खोण्ड असल्याचा अभिनय करावा किंवा एकदम अनुभवी. मधल्या माणसाचे लय हाल होतात हे मला माहितायविमानात शिरताना कावरेबावरे झाले नसल्याचा आणि मी नेहमीच विमानाने प्रवास करतो असा अभिनय करत आपला नंबर बघितला आणि खास या प्रवासासाठी घेतलेली दोन हजार रुपयाची स्याक वरच्या कप्प्यात ठेवली. बेल्ट बांधायचे टेन्शन दुपारपासून व्हतं पण ते इंग्रजी पिच्चर बघायची सवय असल्यामुळे लगीच जमलं. तरी पण शेजारच्या अति प्रोफेशनल बायीने बघितलेच माझ्याकडे. मी आपलं तिच्या हाताला माझा हात लागू नये म्हणून सरकून बसलो तर ती जास्तच आत शिरली. अगोदरच अवघडलेला मी जास्तच अवघडून गेलो

तेवढ्यात खिडकीतून बाहेर बघितले तर लाम्ब् सडक डाव्या पंख्यावरचा पत्रा थोडा तुटल्यासारखा दिसत होता. नेहमी बसणार्यांना काय होत नाहीकवा बवा विमानात बसनार्याचेच अक्सिडेण्ट होतात हे मी आइकले होते. पण नुकतेच शिव खेडाचे ट्रेनिंग करून आले असल्यामुळे "positive thinking" करून मी बाहेरून  लक्ष्य आत आणले. तर माझ्या पुढ्यातच एक भलतीच सुंदर, भुवया चंद्रकोरीप्रमाणे कोरलेली, केसाचा बुचडा गोल करून डोक्यावर ठेवलेला आणि त्याच्यावर जाळी टाकलेली,  मांडीच्या खालचे पाय उघडे असलेली आणि गरज नसताना चेहऱ्यावर मलम लावलेली हवाई सुंदरी हातवारे करीत काही तरी सांगत व्हती.

"हे विमान आहे, अपघात समयी तुमच्या सीटखाली पिशवी आहे ती घ्या आणि इथून एक दरवाजा उघडेल तिथून उडी मारा, श्वास घ्यायला तरास होत असेल तर खालचा मास्क घाला, घाबरू नका" घाबरू नका म्हणून मला तिने किती घाबरविले होते हे तिला काय माहित?

येवढे ऐकून मी शेजारच्या बाईला विचारलेच "काय हो विमानात काय बिघाड आहे का ? ती पोरगी असे का सांगत होती ? "

तिने माझ्याकडे पुन्हा "कहां कहां  से जाते है" या नजरेतून बघितलेच, पण आता आपल्यालाला इज्जतीची काळजी नव्हती तर जीवाची होती.

first time?

No, no, I always travel by plane!

actually, असे प्रत्येक ट्रीप च्या वेळी सांगण्याची पद्धत असते. काळजी करू नकोस. असे म्हणून त्या बाईने  पुन्हा हातातल्या इंग्रजी साप्तहिकातल्या अर्ध्या कपडतल्या बायका बघायला चालू केले. आणि आम्ही पुन्हा विमानाच्या तुटलेल्या पंख्याच्या चिंतेत. हे ऐकून मी भलतेच ओशाळलो होतो. एकतर अशी फिरंग दिसणारी बाई एकदम शुद्ध मराठी बोलत होती आणि आपण ज्याम उघडे पडलो होतो

माणसानं थोडं धट आसलं पाहिजे म्हणून सगळी भीती दाबून खिडकीतून बाहेर बघत बसलो. विमानाने पळायला चालू केले आणि तो पंख्यावरचा पत्त्रा आता खूपच हालायला लागला. तिथे लाल लाईट पण लागली होती. विमानाने उडी घेतली आणि एकदम वाकडे होवून तिरके पळू लागले. म्हणलं आई घातली आता, विमान तिरकं होवून एकाच अंगाडावर चालू लागलंय. माझं भूयारच तंग.  बरं आपण अगोदरच सगळ्या गावात नास्तिक असल्याचा आव आणत असल्यामुळे आणि पुरोगामी होण्याच्या छंदामुळे आता खरंच नास्तिक असल्यासारखं वाटु लागलं व्हतं. त्यामुळं देवाचं नाव घेण्याचा सोपा पर्याय आम्ही कटाप केला होता याचे खूपच दुक्ख झाले. आठ वर्षात पहिल्यांदा नास्तिक असल्याचा पश्चातापा होत होता. बायको,  पोरं, आई बाप, गाव , शेत, चावडी कसे सगळे समोर दिसू लागलं. तेवढ्यात विमान सरळ झालं आणि आकाशात उडू लागलं. जोपर्यंत " आता चेन्नैत पोचलो आहोत आणि बाहेरचे तापमान एकोणतीस डिग्री आहे असे ऐकल्यावर जीवात जीव आला".  हे लोक तापमान फिपमान कश्याला सांगतात कुणास ठावूक?

दुसऱ्या दिवशी घरून सकाळी आठ वाजता फोन -

जेवला कारं बापू?
होय जेवलो
कुठाय हापिसात पोचला का घरीच हाय अजून?
नाही मी मद्रासला आलोय काल, विमानाने
इमानानं? आगं माय गं माझं सोनं इमानानं फिरतंय गं ! ती मला मनंतच व्हतं बग, आपलं पोरगं इमानानं फिरणार एक दिस. तरीच काल दुपारी आपल्या रानातनं एक इमाईन दिसलं व्हतं त्यातच असशील बाग तू! म्या बरोबर वळ्कुन ह्यांना मनलंच व्हतं. तर त्यांनी म्हणत्यात तुला तर काय डोक्याचा भागच न्हाय!








4 comments: