Saturday, February 15, 2014

फ्यांड्री

करमणुकीला वास्तवतेची जोड दिली तर कलाकृती अतिशय सुंदर तर बनूच शकते पण जो संदेश आहे तो सुद्धा अतिशय भेदकपणे लोकापर्यंत पोहचवू शकते. आजपर्यंत  ह्याच गोष्टी अवती भोवती होत असताना आपण त्याकडे त्रयस्थ नजरेने पाहत आलो आहोत किंवा त्याचाच एक भाग बनून मजा घेत आलोय, तीच गोष्ट दुसर्या बाजूने पहिली तरी किती अन्यायी आणि अत्याचारी असते ते हलगीच्या कांठाळ्या बसणाऱ्या आवाजात सांगितले आणि दाखविले आहे नागराज मंजुळे याने. चित्रपटामध्ये कुणीही हिरो नाही व्हिलन सुद्धा नाही. आहे तो प्रोटोगोनीस्ट जांबुवंतराव कचरु माने उर्फ जाम्ब्या. व्हिलनचि भूमिका अतिशय चपखल पणे पार पाडलीय आपल्या ह्या समाजव्यवस्थेने, जिच्या सनातनतेचा आणि  परंपरेचा अभिमान आपण नेहमीच कधी उघडपणे तर कधी झाकून झाकून बाळगत आलो आहोत. 

चित्रपट तुम्हाला तुम्ही तरुण आणि वृद्ध असाल तर तुमच्या बालपणात घेवून जातो आणि षोडशवर्षीय असाल तर तुमचेच जगणे तुमच्यासमोर मांडतो. फरक एकच आहे कि तुम्हाला जो लाईन मारण्याचा नैर्सर्गिक अधिकार आहे तो जाम्ब्याला नाही. त्याला त्याचं दलितत्वाचे ओझं घेवूनच जगावं लागणार आहे हे त्याच्या बापाला कळलेलं वास्तव त्याला कळलेलं नाही. त्यामुळे तो प्रेम करतोय बंड करतोय, ते ओझं झुगारून टाकून त्याच्या दुसर्या वर्गमिमित्रासारखंच स्वातंत्र्यातील आयुष्य जगायचं प्रयत्न करतोय. पण ते एवढे सोपं नाही, कारण ते ओझं तो एकटा झुगारून देवूही शकेल पण त्याच्याबरोबर एक कुटुंब पण आहे आणि त्या कुटुंबाच्या सुखदुखापासुन तो वेगळा होवू शकत नाही. शतकानुशताकाच्या गरिबीशी आणि तिच्या उपशाखांशी लढण्यातच सारी ताकत खर्च झालेली असल्यामुळे ह्या गुलामगिरीविरुद्ध लढण्यासाठी आता ताकताच शिल्लक राहिली नाही आणि त्यातच गुरफटत आपला संसार करायचा आहे, पोरीची लग्न करायची आहेत लेकराची पोटं भरायची आहेत. अश्या अतिशय सर्वसामान्य दलित बापांचे प्रतिनिधित्व उत्तमपणे केले आहे किशोर कदमने. किशोर कदम कुठेच कलाकार वाटत नाही. वाटतो तो मध्यमवयातच थकलेला पिचलेला दलित जो आपल्या प्रत्येक गावात आणि आपल्या आसपास असतो. ज्याच्याशी आपण दररोजचा व्यवहार करत आसतो आणि त्याच्याकडून जोहाराची पण अपेक्श्या करत असतो. 

चित्रपटाची सुरुवात थोडीशी हळू होते पण नंतर हवा तेवढा वेग पकडतो. चित्रपटात लहान सहान गोष्टी अश्या पकडल्या आहेत कि तिथे वास्तवतेशी तडजोडच नाही. चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करणारा जाम्ब्या, दररोज लोकांच्या शेतातून निरगुडीचे फोक आणून झाप विकणारे त्याचे कुटुंब. जाम्ब्याच्या बहिणीला बघायला जीपमध्ये येणारे आणि मराठीत बोलणारे पाव्हणे. पाव्ह्न्यांचे मराठीत बोलणे आणि हुंड्याच्या वाटाघाटी ह्या आपल्या परंपरेपासून आणि संस्कुर्तीपासून अलग असून बाकी मराठी समाजापासून कश्या वेगळ्या आहेत, पण ते उच्चवर्णीयांच्या असल्यामुळे त्यांचे अंधानुकरण होत आहे आणि त्यातच आपली भाषा आणि खरी संकृती मरत असून आपण एका वाईट संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत हेच दाखवायचे असावे नागराज मंजुळेला. 

विरोधाभासाचा उच्चांक म्हणजे हागायला बाहेर हागणदारीत जाणाऱ्या माणसाचे आपल्या स्मार्ट फोन मधून फेसबुकवर फोटो अपलोड करणे. अश्या एक न अनेक प्रसंग जाणिवपूर्वक घातले आहेत कि आले आहेत हे दिग्दर्शकालाच माहित पण अश्या लहान लहान पण अर्थपूर्ण घटनांनी चित्रपट अर्थपूर्ण बनला आहे. 

चित्रपटातील सर्वोत्तम  सीन, म्हणजेच राष्ट्रगीताशी संबधित परंपरा पाळण्याच्या नादात आपल्या कुटुंबाचे दिवसभराचे कष्ट वाया जाणार म्हणून खाटकाच्या खाटिक खाण्यातील शंभर बोकडाच्या चेहऱ्यावरची व्याकुळता घेवून फक्त असहाय उभेच राहणारा कचरु. पण हे करूण दृश्य पाहताना सुद्धा चित्रपट ग्रहात अनेक कोपर्यातून हास्याचे फवारे येत होते. हे पाहून असे वाटले हे लोक दुखात आनंद पाहणारे आहेत कि जगातील संवेदनशीलता कमी होत चालली आहे? 

शेवटी ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आपला जाम्ब्या बंड करतो पण ती बंडाची भूमिका आयुष्यभर बरोबर घेवून जावून तो ते यशस्वी करू शकेल कि त्याच्या बापासारखंच पराभव स्वीकारून आपले जगणे चालू ठेवीन हाच खरा प्रश्न आहे. अचानक होणारा शेवट आपल्याला अवाक करून जातो. 

चित्रपटगृहातील  खुर्चीवरून उठताना डोक्याला हात लावा, जर रक्त येत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही आहात. 

 


4 comments:

  1. चांगला चित्रपट आहे... पाहीला... प्रत्येक संवेदनशील माणसाने पहायला हवा.. बाकी मग अंतर्मुख होणे आलेच..

    ReplyDelete
  2. ब्लॉगवरच्य सर्व पोस्ट वाचल्या आणि असे वाटत होते मी सांगत होतो आणि तुम्ही लिहित आहात .फारच समविचारी लेखन.मी पण मराठी आणि इन्ग्लीश मधे ब्लॉगींग करतो.
    mukbadhir.tumblr.com
    soarofshepherd.tumblr.com

    ReplyDelete
  3. https://www.maximizemarketresearch.com/reporttype/material-chemical/

    ReplyDelete