Saturday, February 1, 2014

शिवनेरी ट्रेक



पहाटे चारच्या थंडीत "ये विक्या राहूदे बे शिवनेरी, हनुमान टेकडीवर जावून मस्त "Good Luck"  चा बनमस्का खाऊ, सकाळी सकाळी  "FC"  चा  Crowd  बघू आणि येवू, आता चार वाजल्यात, सूर्योदय शिवनेरिवरुन नाही पाहू शकणार आपण"  ह्या आम्ल्याला  Crowd  चा  लय नाद. एक क्षण मी पण गाडी थांबविली आणि वाटलं चला हनुमान टेकडीवरच. पण लगेच स्पीड वाढवला आणि म्हटले "नाही आज शिवजन्मस्थानाचे दर्शन घेवूनच अन्न पाणी घ्यायचे" सकाळच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत  केजरीवालसारखं मुंडक्याला मफलर गुंडाळून वरून हेल्मेट घातले व ९०च्या स्पीडने सुसाट सुटलो. अम्ल्या अश्या वेळी मागे बसतो. खाली नुकताच घेतलेला ट्रेकिंग चा बर्मुडा घातला होता त्यामुळे पायाला भयंकर थंडी वाजत होती पण दीड हजार रुपयाला घेतलेला खाकी बरमुडा घालून पैसे फेडायचे होते, थंडी वाजली तरी चालेल पण दीड हजार फिटले पाहिजेत हि आपली कनिष्ठ मध्यमवर्गीय भावना जास्तच त्रास देत होती.

चाकणच्या पुढे चहा प्यायला थांबलो, आसपासाच्याच गावातले एक जोडपे पण चहा प्यायला थांबले होते. त्यातला पुरुष उठला आणि हॉटेल मालक कम वेटर कडे जावून म्हणाला

उटी/उसी काय हाय का? डॉक्टर बी चालंल!
नाही दारू ठीवीत न्हाय आपण.
बघा कि पान्नासिक रुपय जास्त देतो.
आहो नाहिवो.
मग द्या दोन चहा.

चहा घेतल्यावर तो पुरुष -
किती झालं ?
दोन चहाचं इस रुपय.
लय महागय राव, दहा रुपयाला चहा असतो का ?

आणि हाच माणूस दारूसाठी पन्नास रुपये सहजच जास्त मोजायला तयार होता.

शिवनेरीच्या पायथ्याला पोचलो. पूर्वेकडून येणाऱ्या पिवळ्या आणि  सोनेरी प्रकाशात न्हाहून निघालेला अर्धा शिवनेरी आणि त्याच डोंगराच्या कपारीत कोरलेली बुद्ध लेणी आम्हाला खुणावत होती. दोन तासाच्या भयंकर थंडीत केलेल्या प्रवासाचा शिन गळून पडला. अर्धा थंड आणि अर्धा शिवनेरी गरम असावा असा भास . किती स्थित्यंतरे पाहिली असतील ह्या किल्ल्यांनी? लेण्यांनी तर अफाटच. तिथली ती तपश्चर्या घरे अजूनही कुणाची तरी वाट बघत असतील का? आपल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या भूतकाळाप्रमाणे कुणीतरी यावे आणि केशरी वस्त्रे धारण करून आपल्या शांततेचा फायदा घेत स्वताला मुक्त करून घ्यायचा प्रयत्न करावा. अगोदरच निरव शांततेसाठी कोरलेल्या गुहांना आजची शांतता भयानकच शांत वाटत असेल. हजारो नसतील तर व्यवस्थित कोरलेल्या शेकडो गुहा नक्कीच असतील शिवनेरीच्या दोन्ही बाजूंनी. आज आपण फक्त विचारच करू शकतो, किती लोकांनी बुद्धाने दाखविलेल्या मार्गांने जावून दुखःवर आणि भीतीवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला असेल. इतिहासात जाण्याची मजा पण काही औरच असते.

सिंहगडाची सवय असलेल्या आम्हाला शिवनेरी छोटा वाटला, पण खूप शांत, कसलीही दुकानदारी येथे नाही, आमचे दही घ्या, गरम पिटले घ्या, चटई टाकते बसा हे अजिबात नाही. प्रवेश कर नाही, गडाचे पावित्र्य राखा असे सांगणारे पुणेरी बोर्ड नसून सुद्धा पावित्र्य राखले जातेय. आणि महत्वाचे म्हणजे कसलाही प्रवेश कर नसून सुद्धा संपूर्ण गडावर सुंदर बाग आणि फुले आहेत आणि त्यांची निगा पण राखली जातेय. गडावर कुठेही कचरा आणि पाण्याच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या नाहीत.

गडाच्या सुरुवातीलाच थोडाफार पडलेल्या अवस्थेत अंबार खाना आहे. पुरातत्व खात्याने त्याचा विकास करण्याच्या नादात सिमेंटने बांधू नये एवढीच अपेक्श्या आपण करू शकतो. गडावरून उत्तरेकडे चालत गेल्यानंतर शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. देवळाच्या पायरीला कधी न जाणारा हात त्या पायरीवर आपोआप गेला आणि डोक्याला लागला. तोच अंगात शिरशिरी येवून संपूर्ण अंग शहारून आले. इथेच जिजाऊने महाराष्ट्राच्या दैवताला जन्म दिला होता. तो वाडा आपल्याला अगदी सतराव्या शतकात घेवून जातो. फक्त तिथे असलेली पिवळी शिवमूर्ती शोभत नव्हती. काळ्या पाषाणाची मूर्ती खूप शोभून दिसली असती. तिथून थोडा पुढे गेले कि एक टकमक टोक इथे पण आहे. त्याला पाहून आम्ल्या म्हणाला "आयला विक्या या टकमक टोकाचा वापर माझ्या आयुष्यातील काही सभ्य ग्रहस्थ आणि कुलीन स्त्रियांसाठी करण्याची खूप इच्छया आहे" मग मी त्याला "All The Best"  दिले.

जेवढी शक्य आहेत तेवढी लेणी पाहून घेतली आणि पोटात कावळे वोराडू लागले म्हणून ताबडतोप खाली निघालो. निघताना पाच सहा वेगवेगळय शाळेतील सहली आल्या होत्या. वाशीम, खुलताबाद, संगमनेर, बुलढाणा भागातील खेड्यातील सहली. ती लहान मुले बघून खूप मज आली आणि आम्हाला आमच्या बालपणीच्या सहली आठवल्या. सगळ्यात चांगली कपडे घालण्याचा केलेला प्रयत्न, घरून आईने करून दिलेला चिवडा, शंकरपाळ्या आणि बुंदीचे लाडू. कधी नहितेच खिशात असलेले पैसे. पोरांच्या चेहऱ्यावर अफाट आनंद दिसत होता. आणि आमच्यासारख्या हाफ चड्डी वाल्याकडे ती मुले कौतुकाने बघत होती. त्यांना काय माहित आम्ही पण त्यांच्यातलेच आहोत. आज उगिच चंगाळ्या घालून गळ्यात क्यामेरा अडकविला असल्यामुळे वेगळे दिसत आहोत.

5 comments:

  1. खरंच छान लिहिता बाबा तुम्ही! 1 नंबर !! असे वाटत कि वाचतच रहाव!

    ReplyDelete
  2. Waa .. Khupach chhan ..!!! Congrats ani dhanyawad..!!!

    ReplyDelete