Wednesday, September 23, 2015

गणपती

आम्ही म्हणजेज गाव असा आमच्या तरुण मंडळाचा आव असायचा. क्रिकेट असो, हॉलीबॉल असो, राजकारण असो आमचे तरुण मंडळच एक नंबरला असायचे. पण आम्ही आजपर्यंत गणपती बसवला नव्हता. गणपतीत रिकामे राहणे, लोकांच्या मिरवणुकीत धिंगाणा घालणे,  संध्याकाळी गणपती बघायला नटून बाहेर पडलेल्या पोरीवर लाईनी मारत फिरणे  इत्यादी इत्यादी कृत्ये करण्यासाठी आपण रिकामे म्हणजेच सडं आसलं पाहिजे यावर आमच्या बहुतेक सदस्यांचे एकमत असे.

पण आजकाल वरच्या गल्लीचा गणपती खूपंच मोठा होतोय आणि त्यांच्या गणपतीला गर्दी पण जास्त जमत असल्याने त्या मंडळाचा गावात वट्ट वाढत  होता. त्यामुळे आमच्या कार्यकर्ते मंडळीत जरा चलबिचल चालू झाली होती.  त्यात गेल्या वर्षी त्यांच्या गणपतीची चर्चा आमच्या गल्लीतल्या पोरी करत होत्या हि बातमी सांगून लंगड्या संत्याने कार्यकर्त्यांच्या असंतोषात आणखी भर घातली. आता एकूण आमच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला होता. मग एके रम्य संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी गावाबाहेरच्या टेकडीवर जमून तंबाखू मळत मळत आणि चघळत चघळत गणपती बसवण्याचा निर्णय घेतला. ह्या ठरावा नंतर  आमच्या लंगड्या संत्याने उभा राहून एक जोरदार शिट्टी मारून आनंद साजरा केला. हा लंगडा संत्या लय बिलींदर होता आणि गणपतीचा मोठा भक्त पण होता.

लगेच गणेश मंडळाचा अध्यक्ष, खजिनदार वैगेरे ठरवले गेले. एका खूपच उत्साही आणि कंडबाज कार्यकर्त्याचे दुकान होते त्याला खजिनदार केले. आता कुठे पैसे कमी पडले तरी तो त्यात भर घालणार हे आम्हाला माहित होते. घरटी शंभर रुपये वर्गणी जमा  केली. गल्लीत एक माणूस स्वतःला लय शहाणा समजत होता त्यांच्या घरी वर्गणी न मागता बहिष्कार टाकला. मग गणपती आणण्याच्या दिवशी त्याची बायको आली आणि स्वतः वर्गणी देऊन निघून गेली. मग आम्ही कशी जिरवली म्हणून एकमेकाला टाळ्या देऊन पाशवी आनंद साजरा केला.

दहा दिवस कार्यकर्ते एकदम खुश आणि मग्न होते. कुणीही मंडपात डाव खेळायचा नाही हे पथ्य पाळले होते. आय बाया यायच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या पोरीपण यायच्या आणि आमचे कार्यकर्ते कॉलर ताईट करून मूर्तीजवळ किंवा बाजूला खुर्ची टाकून आपला मंडळात किती वट्ट आहे हे भक्तांना दाखवायचा प्रयत्न करायचे.
दहाव्या दिवशी मिरवणूक. मिरवणुकीवर ठरणार होते कि कोणत्या मंडळाचा गावात जास्त वट्ट आहे. मोठी बैलगाडी नारळाच्या फाट्यानि सजवली. गर्दी जमा करायचे तंत्र आम्हाला माहित होते. मंडळातील कार्याकार्त्यासाठी "OC" च्या पन्नास बाटल्या आणि बाकी गावातील म्हातारी कोतारी, बेवडी, आणि इतर मंडळी साठी हातभट्टीचे दोन मोठे दहा लिटरचे क्यान आणले होते.

बघता बघता रस्त्यात गर्दी मायना गेली. कार्यकर्ते जोशात नाचत होते. आपल्या डावाच्या घरापुढे आले कि एकेकाच्या अंगात मिथुनच येत होता. जरा उतरली कि बाजूला जायचे आणि दोन ग्लास एकाच दणक्यात संपवून पुन्हा मिरवणुकीत दाखल. त्यामुळे उत्साह कमी होण्याचा प्रश्नच नव्हता. "खली वल्ली खलि वल्ली खलि वल्ली' "येऊ कशी तशी मी नांदायला" मुंगळा " ह्या गाण्यांनी धुरुळा केलता. म्हातारी कोतारी पटके पाडोस्तोवर हातभट्टी मारून नाचत होती. एकूण आमची हवा झाली होती. रात्रीचे बारा वाजले. इंग्रजी माल संपला आणि कार्यकर्त्यांनी हातभट्टी मारायला चालू केली. कुणीच शुद्धीत नसण्याच्या अवस्थेत एका गावाबाहेरील विहिरीत गणेश विसर्जन झाले.

मिरवणूक विहिरी पर्यंत जाईपर्यंत निम्मे कार्यकर्ते पिवून रस्त्यावर आणि काही रस्त्याच्या कडेल शेतात पडले होते. त्यात लंगडा संत्या पण होता. दिवस उगवायच्या आधीच त्याची उतरली. डोळे चोळत गावाकडे बघितले आणि गावातून येणार्या आवाजांनी तो ताडकन उठला आणि गावाकड पळत सुटला.त्याचे आई, वडील, बहिण त्याच्या मातीच्या घराखाली गाडले गेले होते. अशी अनेक कुटुंबे गाडली गेली होती. भूकंपाने गावावर अवकळा आणली होती. संत्याने त्या मातीच्या ढिगार्याकडे बघितले, तिथेच जवळ असलेल्या गणपतीच्या रिकाम्या मंडपाकडे बघितले. त्याच्या आईवडिलाना गणपती वाचवू शकला नव्हता. त्याने आपल्या गळ्यातील गणपतीचा ताईत काढून त्याच्याकडे बघितले आणि तो ताईत दूर फेकून देऊन तो मातीचा ढिगारा उपसायला चालू केले. एकट्यानेच.






Wednesday, September 16, 2015

पोळ्याचे बैल आणि ईटू

नदीला पाणी आलंय म्हणून आज हि दोनचार गाबडी शाळेच्या पिशव्या हातात घेऊन तडक नदीला पोचली. नदीला पाणी आल्यावर शाळा वैगेरे गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी उगीचच असतात. घरच्यांना पण पोरं शाळेत गेलीत का कुठ कुत्री मारीत फिरत आहेत हे बघायला वेळ नसतो. तुरी फवारायच्या, कापूस फवारायचा, ज्वारीची पेरणी करायची असली उत्पादक कामं सोडून लेकरा मागे फिरायला कुणाला सवड असणार आहे! त्यांनी दप्तर नदीच्या कडेला ठेवले आणि जरा पुढे जाउन चिखल गोळा करू लागली. तेव्हढ्यात नामु परटाने धुनी धुताना ह्या चौघांना बघितले आणि जोरात शिवी हासडून म्हणाला, "ये ~~~~ गाबड्यानो, पळता का नाही शाळेत, नाहीतर एकेकाचं टांगडच तोडीन" हि चौघं थोडी गुर्मी दाखवून तिथंच थांबली. पण नामु खरंच पाण्याच्या बाहेर निघून मारायला येतोय हे बघून पोरं पण दप्तर घेऊन शाळेच्या दिशेने चालण्याचे नाटक करू लागली. नदीच्या जरा खाल्लाकडच्या बाजूला नामुच्या नजरे आड जाऊन नदीत शिरली. काळ्या चिकन मातीचा चिखल जमा केला. कडेच्या पाण्यात पोहण्याचे नाटक केले आणि तशीच चिखलात घाण झालेली कपडे घालून गावात आली.
भर दुपारचं गावात कुत्री पण दिसत नव्हती. त्या पूर्ण उभट गल्लीत कधीतरी वैभवाच्या असलेल्या काही खुणा अंगावर ठेवून भग्नावस्थेत दिवस काढणाऱ्या वाड्याच्या एका वट्ट्यावर बसून ती मुलं चिखल तिंबण्यात गढून गेली. चिखल तीम्बल्या नंतर चालू झाला खेळ "अक्का का बोका, कसाकाय ठोका". म्हणजे चिखलाचा मोठा खोल्या तयार करायचा आणि तो खाली जोरात पालता आपटायाचा. मोठा आवाज होऊन त्या दुपारची शांतता भंग करतो आणि त्या पडक्या वाड्याच्या छिन्न भिंतीतील बिळात शांत पडलेल्या चिमण्यांचा चिवचिवाट चालू होतो. त्या चिखलाच्या खोल्याला वरून भोक पडते ते दुसर्यांनी चिखलाची छोटी चपाती करून भुजवायचे. अशा तर्हेने चिखल जिंकायचा खेळ चालू झाला. दोन तीन तास असा खेळ खेळून झाल्यावर जो चिखल तयार होतो ते एक नंबर मटेरियल असते बैल किंवा काहीही बनवण्यासाठी.
ईटु, कल्या आणि फ़त्र छान बैल बनवतात. लंगडा राजा उगीच सगळ्या गोष्टीची नाटकं करतो. त्याच्याच्यान होत काहीच नाही पण भांडनाला एक नंबर आहे. इटुने दोन बैलं आणि एक खोंड बनवलं. पळत पळत घरी जाउन ज्वारी आणली आणि त्या ज्वारीचे डोळे सगळ्या बैलांना लावले. आणि बैलांना पुन्हा पुन्हा थुका लावून मालिश करू लागले. आता बैलं तयार झाली. संध्याकाळी आबा आलं कि आठाणे घेऊन बैलांना दुकानातून झुली आणि चमकीचे कागद आणून सजवायचं म्हणून इटु तिन्ही सांजा व्हायची वाट बघत बसला. उद्या पोळा असल्याने रानातली लोक आज लवकर घरी येणार हे त्या पोरांना माहित होते.
इटुचे आबा आणि आई आली, ईटुने त्यांच्याकडून आठाणे आणून बैलांना मस्त सजवू लागला. तेवढ्यात कल्याने ईटुला बोलावून त्यांच्या परसातील बैल कशी सजवत आहेत ते बघायला न्हेलं. कल्याचे वडील त्यांच्या चार बैलांना घासून धूत होते, कल्या पण धुऊ लागत होता, शिंगे कातरीने तासंत होते, आता त्या खिल्लारी बैलांच्या सिंगाला कल्याचे वडील हिंगुळ आणि बिगुड लावून रंगवु लागले. इटु तिथून तडक घरी पळत आला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला, "आताच्या आता आपल्या "हिऱ्याला" घेऊन या नाहीतर कायच खरं नाही तुमचं" आणि मोठ्याने रडू लागला. उद्या पोळा आहे, आपल्या दोस्ताना बैलं आहेत आणि आपली बैलं नाहीत हे त्याला खूपच वाईट होते. इटूची आई त्याला समजाउन सांगू लागली, आरं बाळा किती चांगली चिखलाची बैलं केलीयत तू, त्याच बैला बरोबर खेळावं …वैगेरे वैगेरे. इटुने तसलं काय नगं, मला आपली "हिऱ्या-मव्हऱ्या" आताची आता आणून द्या म्हणाला आणि ते चिखलाचे झटून केलेले दोन बैल भिंतीवर मारले. त्या बैलाचा चिखल होऊन त्या भिंतीच्या चिखलात मिसळून गेला. आणि त्याचे वडील उठून घराबाहेर पडले. चालताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. इटुच्या वडिलांच्या डोळ्यातील पाणी फक्त त्यांनाच दिसत होते. त्यांचा "हिऱ्या" दोनच महिन्यापूर्वी पोट फुगून मेला होता आणि त्यांनी कर्ज झाले म्हणून "मव्हर्याला" विकून सावकाराचे व्याज भागवले होते.


माझा इंजनेर पोरावर आणि पोरीवर लहानपणापासून राग आहे. म्हणजे मी खरंच लाइन मारत असलेल्या आणि मनापासून प्रेम करत असलेल्या बहुतेक पोरी ह्या इंजीनियरिंगला गेल्या आणि मी कलेला कवटाळले. अर्थात त्या ललनाणी इंजिनीयरिंगला जाउन काय दिवे लावले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण कले पेक्षा ते भारी असते आणि त्याने पोट भरते ह्या एकाच कारणामुळे ह्या पोरी सुट्टीला गावी जीनची प्याण्ट घालून आल्या कि आमच्यासारख्या कलेच्या पोराकाडे तुच्छ  नजरेने बघत. बरे ह्या तुच्छ  नजरेने बघतात ते पण समजून घेऊ. पण ह्यांना त्यांच्या कॉलेजच्या शहरापासून आमच्या गावापर्यंत सोडायला त्यांचे तसलेच जीन्स प्यांट आणि बुट घातलेले दोस्त येत आणि बस मधून न उतरताच त्या पोरीना बाय बाय करून मनातल्या मनात डोळ्याने पप्पी देऊन तसेच पुढे जात. ह्या असल्या नाजूक पण स्पोठक गोष्टी आमच्या सारख्या आणि कायम एस्टी स्त्यांडच्या टपरीवर पडीक असलेल्या आमच्या मित्रांच्या नजरेतून लपत नसत.  ते सहन करण्यापालीकडचे पण असे. अशा अनेक जीन्स प्यांट बूटवाल्या पोरांना तिथेच बदडून काढण्याचे मनसुबे आम्ही कलेच्या लोकांनी बांधले होते. पण मी एक सुहृदई, प्रेमळ आणि गांधीजींच्या अहिंसेवर विश्वास ठेवणारा असल्याने ते मनसुबे तडीस नेले नाहीत.                                                      

आम्ही कलेला कवटाळले याचे कारण आम्हाला कला आवडत होती असे नाही तर तिचे नखरे कमी असत. जर्नल लिहा, सराना खुश ठेवा, ७०% हजरी लावा, म्याडमला घाबरायचे नाटक करा असले अत्याचार कला करत नव्हती. कलेची फक्त परीक्षा द्या एवढी एकंच अट असायची. त्यामुळे कमी त्रासदायक म्हणून माझे कलेवर कायम प्रेम राहिले आहे.

काल "इंजिनीर डे" च्या शुभेछा देऊन आमच्या दु:खावर डागण्या देणारे आणि  भारी भारी पोस्ट मराठीत लिहिणाऱ्या इंजीनेरामुळे दिवसभर डोक्याला शॉट बसत होते. त्यात एक पोस्ट तर आमच्या त्या काळातील एका प्रेमानेच टाकली होती.  तिच्या इंजिनीर  नवऱ्याला मिठीत घेऊन फोटो आणि वरती ट्याग लाइन "इंजिनीर मुळेच हे जग चालते".  हि पोस्ट तिने  मला ट्याग केली नसली तरी ती मलाच उद्देशून होती हे न समाजान्या इतका मी काय "हा " नाहीये. अशा खपल्या काढणारे लोक आणि लोकी यांना धडा शिकवण्यासाठी आपण साऱ्या कलेवर प्रेम करणाऱ्या कलाप्रेमी कार्यकर्त्यांनी "कला दिवस" सुद्धा साजरा करण्याचे मी आवाहन करत आहे.









Tuesday, September 15, 2015

त्या माळरानाच्या मधून वाहणाऱ्या  क्यानॉलच्या कमरेइतक्या पाण्यात उड्या मारत आणि एकमेकांच्या टांगड्या वोढत पोहणाऱ्या शिडशिडीत अंगाच्या नागड्या पोरांकडे तो किनाऱ्यावर उभा राहून बघतोय. वैशाखातले दुपारचे उन लागू नये म्हणून त्याने टोपी आणि गॉगल घातलाय. ती शिडशिडीत आणि काळ्या वैगेरे रंगाची पोरं पाण्यातून बाहेर येउन अंग शेकेल अशी माती अंगावर टाकून घेत आहेत आणि माती भाजल्यावर क्षणभर ओरडून मग अंगाला शेकणाऱ्या गर्मीचा आनंद घेऊन पुन्हा पाण्यात उडी टाकत आहेत. त्या पोरांचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नाहीय. तो त्यांच्यात स्वताला शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्याला कपडे काढून पाण्यात उडी मारू वाटतेय पण गेलेल्या भूतकाळातील क्षणाला किती जरी प्रयत्न केला तरी तो पकडू शकणार नाही याची त्याला भीती वाटतेय. पाणी पण जरा घानंच दिसतेय. तो पाण्यात उतरतो, ओंजळीत घेऊन तोंडावर मारतो आणि तिथंच जराश्या अंतरावर असणाऱ्या भुईमुगाच्या शेताकडे जातो. भुईमुगाच्या शेंगा काढत असताना शेतात येणारा वास त्याला खूप आवडतो. शहरात मिळणाऱ्या प्रत्येक पर्फुम मध्ये तो वास शोधत असतो. पण त्याची आवड हि पांढरपेशी नाही हे कळल्यापासून त्याने ते पर्फुम शोधायचे बंद केलंय.  बायका वेल उपटत आहेत, त्यांची लेकरं उनात त्या वेलींच्या गर्दीत मातीत काहीतरी खेळ शोधत आहेत.  नाहीतर तवलीत, जर्मनच्या डब्यात, किंवा खोल्यात करून दिलेला भाकरीचा काला चिवडत दिवस कधी मावळतोय आणि आईचे लक्ष आपल्याकडे कधी जातंय याची वाट बघत आहेत.  तो पुढे सारून एक वेल हातात घेऊन शेंगा खाऊ लागला तेवढ्यात त्याला एक माउली आपल्या जराश्या थोराड पोराला शिव्या देताना दिसली,
"ये मुडद्या कुठे फिरतोयरं जरा शेंगा तोडू लाग म्हणलं तर गोळा आलाय तुझ्या पोटात…सांगून ठीवते, काय शेंगा खायच्या असल्या तर हितंच खा, घरी गेल्यावर वाटुन आलेल्या शेंगाला हात लावशील तर मुडदाच बसवील तुझा, काय मेलं हि बी  असलाच आणि ह्याचा बाप बी असलाच, नकु करून सोडलाय जीव ह्या बाप लेकानी'. त्याने तो वेल खाली टाकला आणि घराच्या दिशेने सावकाश निघाला.