Wednesday, February 26, 2014

मिथुन उर्फ मिट्या

चाळीवर सगळ्याच पोरांचे आईबाप आपापल्या लेकरांना दुसऱ्याच्या लेकारांबरोबर फिरू  नकोस असे सांगायचे, कारण आपले लेकरू लय गरीबाय पण दुसऱ्याच्या लेकरामुळेच बिघडतंय ह्या नियमावर तिथल्या आम जनतेचा दांडगा विश्वास होता. तरी पण समाजात प्रस्थापित असणाऱ्या "बिघडणे" ह्या संकल्पनेला खरा न्याय दिला तो आमच्या दोन मित्र कम आदर्श कम लीडर यांनीच. एकाने खूप कष्टाने चावट हे बिरुद कमावले होते तर दुसऱ्याला आम्ही लाडाने मिथुन म्हणायचो. आणि ते दोघेपन आपल्या करणीधरणीतून मिळालेल्या टोपण नाव कम पदव्याना न्याय देण्याचा अतोनात प्रयत्न करायचे आणि त्यात यशस्वीपणे यशस्वी पण व्हायचे. ह्यांचा वट हा फक्त आमच्या चाळीपुरताच मर्यादित नव्हता तर शहरातून  कुल्पी, गारेगार बर्फ गोळा, आईस कांडी, भंगार घेवून येणारे पण यांच्या जवळचे दोस्त होते. ह्यांच्याकडून ते पैसे पण नाही घ्यायचे.

"मिथुनचा पिक्चर आलाय, राम अवतार पण चांगलाय, जिते है शानसे तर एक नम्बराय, मंदाकीनीची पांढरी साडी बघितली का?, सगळे बघितले दोस्ता आपुन काय सोडत असतो का?  काल शंभर रुपये धंदा झालता,  भागवतला एक आन प्रभातला एक बघून आलो." ह्यांच्या चर्चा पण नेहमीच अस्याच असायच्या. आमच्यासारखे घरच्यांच्या अन्यायाने पिचून - गांजून गेलेले त्यांच्या ह्या चर्चेकडे आणि प्रत्येक भावमुद्रेकडे कौतुक मिश्रित लालसेने पाहायचे. नाहीतर अश्या सिनेमाचे फक्त पोस्टरच आम्हाला बघायला मिळायचे, ते पण पेपरातच.

मिथुन हा खरच मिथुन होता. पांढरीफेक ब्यागि प्यांट, दोन्हीकडे व्यवस्थित इस्त्री करून बसविलेल्या चार चार प्लेटा, पाठीमागच्या खिश्यात लोकांना दिसेल असा पांढराच कंगवा, लाल - हिरवा - निळा किंवा पिवळा पण चमकणारा इन शर्ट, भोकं मोठी झालेला आणि मोठं बक्कल असलेला बेल्ट, पायात मोठा पांढराफेक शूज आणि त्याच्या इकडून तिकडे झोका घेणाऱ्या लांब दोऱ्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिथुन कट हेअर स्टाईल. केसांच्या बाबतीत कसलीही तडजोड नाही. कानाच्या वरती असलेला कट,  दर चार मिनिटाला केसाला मधून भांग पाडून व्यवस्थित बसविणे आणि मागचे केस हाताने कॉलर वरती टेकवून ते बिघडू नयेत म्हणून अवघडलेल्या मानेने चालणे. त्या काळी त्याच्याकडे वाकमन आणि डेक टेप होता. बापाने दिलेल्या पैस्याने तो फक्त मिथूनादाची क्यसेटच आणायचा. नाहीतर सलामे इश्क, महुवा, बेवफा सनम, सनम बेवफा, तुम तो ठहरे परदेशी अश्या काही गाण्यांचे नशीब कधीतरी उजळायचे. अस्या गाण्यांचे नसीब उजळले कि समजायचे ह्याला कुठेतरी अजून एक धोका बसलाय. आमच्या चाळीतील बऱ्याच पोरांच्या महात्वाकांक्ष्या ह्या मिथूनसराख्या दिसण्याच्या आणि वागण्याच्या होत्या.  मिथूनसारखा हेअर कट मारायचा आणि पांढरा फेक बूट घ्यायचा हि माझी महात्वाकांक्ष्या आमच्या पिताश्रिने पूर्ण होवू दिली नाही त्यामुळे माझ्या मनात बापाविषयी विषयी अजूनही आढी आहे.

ह्या मिट्याचा एक धोका तर मी याची देही याची डोळा पहिला होता. आमची शनिवारची सकाळची शाळा दुपारी सुटली असताना आम्ही लोक पोरींच्या मागे मागे चालत घराकडे चाललो होतो. चौकात गोंधळ दिसला. गर्दी दिसली कि अगोदर आत घुसून सर्वांच्या पुढे जावून पहाणे हा आमचा लहानपणीपासूनचा धर्म असल्याने हातातल्या पिशव्या सांभाळत आम्ही गर्दीत घुसून सर्वांच्या पुढे जावून उभा. पाहताक्षणी मला घाम फुटलेला अजून आठवत आहे. एका पोरीचे आईबाप आणि चाळीवरच्या आयाभैनीच्या रक्षणासाठी वाहून घेतलेले काही समाजसेवक लोक मिथुनला बदडत होते. आणि विचारात होते "सांग तूच लिहिली का हि चिट्टी, कुणी लिहिली हाय न्हायतर तुझा पायच तोडतो" कि लगेचच एक जोरात कानाखाली जाळ! एवढं मार खात असताना व  आणीबाणीचा प्रसंग उद्भवला असताना सुद्धा त्याचा हात डोक्याला आपला भांग तर मोडत नाय ना, त्याच्याकडे होता. फारच धाडशी वाटला मला तो, शेवटपर्यंत नाहीच म्हणत होता आणि कबुलच केले नाही. त्याने हि चिट्टी अशीच एका बाहेरच्या गारेगार वाल्याकडून लिहून घेवून, त्याच्या भावी प्रेमिकेला द्यायच्या आदी मला दाखवली होती. मला काही क्षण मिथुनच्या जागी मी दिसलो आणि एक झटक्यात गर्दीतून बाहेर पडून घरी जावून पांघरून घेवून झोपलो. पुढचे पंधरा दिवस माझे भीतीच्या सावटाखाली गेले. अश्या अनेक प्रसंगातून तो वाचला होता तरी आपली जिद्द सोडत नव्हता. हि नाही म्हणाली तर दुसरी, पण प्रेम हे केलेच पाहिजे ह्या ठाम मताचा असावा तो.

कधी कधी मिथुनच्या घरी पाव्हणे यायचे. ते सोलापूरचे असल्याने आम्ही चाळीतली पोरं त्यांचा अतोनात आदर करीत असू. ते आपापसात कन्नड बोलत असत. आम्हाला वाटायचे हे आपल्यालाच नावे ठेवत आहेत. आपण म्हणजे एकदम गावाकडलेच कसे काय झालो मायला, याचे दुक्ख व्हायचे. ते पण डिट्टो मिथुन सारखेच दिसायचे फक्त दोन पावले आमच्या मिथुनच्या पुढे होते. त्यांनी मिशा काढलेला होत्या आणि डोक्यावर निळा किंवा पांढरा रुमाल बांधल्यामुळे डोक्यावरचे केस छत तयार करत आणि त्यामुळे ते स्वताला  आमच्या चाळीतील मिथुन पेक्ष्या जास्त मिथुन समजत. ह्या सगळ्या मित्रांना गुटका खाणे म्हणजे आपण खूप ऐष वैगरे करतो आसे वाटायचे. आम्हाला कधी कधी दोन चार दाणे द्यायचे म्हणायचे "ऐष कराबे, ऐष". कधी कधी यांच्याकडे पैसे नसले कि ते तंबाकू खात.  यांच्याकडे चुना कधीच नसे किंवा फक्त चुना असेल तर तंबाकू नसे.  येणाऱ्या जाणाऱ्याला ते मागायचे,  लोक पण सायकल वरचे उतरून यांना तंबाकू किंवा  चुना द्यायचे. मग तंबाकू मळताना ते म्हणायचे "तम्बाकुला लावा चुना मानव जन्म नाही पुना पूना"

ते सोलापूरचे पाव्हणे आम्हाला बोलत "का बे~~~ , काय करता बे हितं~~~~ ? टॉकीज नाही काय नाही बे, कसं करमतं बे तुमाला हितं~~~~ ? ये मिट्या, घेवून ये बे ह्यांन्ला एकदा सोलापूरला, भागवत प्रभात टॉकीज दाखवू, काय हाय बे हितं,  शिटीतलं  लाईफ बघा बे एकदा" मग तर आमचा त्यांच्या विषयीचा आदर दुप्पटच होत असे.

मी या मिथुन पोरामधे  फिरत असल्यामुळे  शाळेत माझा वट वाढला होता. वर्गातील कुणीही माझ्या नादि लागत नव्हते. म्हणजे त्यावेळी मी थोडक्यात भारी वैगेरे झालो होतो. विकास दहावीतच गुटका, १२०/३०० खायला लागला आहे अशी अफवा पण पसरलेली असावी.

मिथुनला लाडाने पुन्हा आम्ही मिट्या बोलवायला चालू केले होते. आता त्याचे खरे नाव फक्त आईवडिलांना आठवत असेल.  बस. अजून काही दिवसांनी कळले कि मिट्याला आता खरंखुरं प्रेम झालंय आणि तो खरंच लय सिरियस आहे. चावटचं झेंगाट अगोदरच चालू होतं त्यासाठी त्याला खूप प्रयत्न पण करावे लागले नव्हते, पाखरू अलगद जाळ्यात अडकलं होतं. चावटचे झेंगट आहे आणि तो दररोज जुगतो हे काय मिट्याला सहन नाही व्हायचे आणि तो दुप्पट जोमाने कामाला लागायचा.

भर दुपारी चाळीत कुणीही नव्हते, आमच्या घरचे पण गावी गेले होते. मिट्या त्याचे क्यासेट घेवून आला. क्यसेटच्य दोन्ही बाजूनी बारा वेळा एकच गाणं रेकॉर्ड केलं होतं. "कोई जब तुम्हारा हृदय तोड दे तडपता हुआ कोई छोड दे तभी तुम मेरे पास आणा प्रिये" गाणं लावलं आणि आम्ही तयारीला लागलो. त्याला आता प्रेमपत्र लिहायचे होते. त्याने लिहिले "प्रिय कला ' आणि मी जोरजोराने हसू लागलो. च्यायला हिच्याबरोबर कुणाला कसकाय प्रेम होवू शकते. चावटणे मला रपका मारून गप बसविले आणि मिट्याने  प्रेमपत्र पूर्ण केले तोपर्यंत त्याच्या आवडीचे गाणे बारा वेळा वाजून झाले होते. नंतर मला कळले कि ते गाणे तिला ऐकवण्यासाठी मोठ्या आवाजात लावले होते. चाळीतल्या एका बारक्या पोराला बोलाविले. त्याने चिट्टी पोहचवण्याचे काम केले. मिट्या आणि चावट उत्तराची वाट वघत बसले होते आणि मी घाबरून आतमध्ये. कला बाहेर आली आणि तिने ती चिट्टी मिट्या समोर फाडून कागद मोरीत घातले. खूप मोठा धोका झाला होता मिट्याला अजून एकदा. माझ्या आंगाला संधी मिळेल तेव्हा झटणाऱ्या पोरीने मिट्याला होय म्हणावे असे मला मनापासून वाटायचे.

कली नाही म्हणाली म्हणून काय तरी उतारा पाहिजे होता. टेन्शन घालवायचे म्हणून चावटणे पिक्चरची पुंगळी सोडली. मी वडिलांना चार रुपये मागितले तीन रुपये तिकीट आणि एक रुपया खारमुरे वैगरे. वडिलांनी विचारले कोणता पिक्चर तर मी म्हणालो "आराधना " पटकन पैसे काढले आणि दिले आणि म्हणाले "आमच्या काळातला पिक्चर आहे मी आठ वेळा बघितला होता"

संध्याकाळी सायकल वर आम्ही तिघे सिनेमाला. मी टॉकिज कडे वळलो तर मिट्या म्हणाला "तिकडं न्हाय हिकडं, आपुन भक्त प्रल्हाद बघायला चाललो आहोत" ह्याच्यावर मी भलताच नाराज झालो. देवाचा सिनेमा बघण्यात कसली आलीय मजा? टीव्हीवर येइलच कि. "आ तू चलरे तुला आवडेल भक्त प्रल्हाद" इति मिट्या.
"दिलफेक व्हीडीवो" जवळ सायकली थांबविल्या, त्या दोघांनी बाहेरून भजी आणि पापड घेतले आणि आम्ही आता घुसलो. आतलं वातावरण भायानच होतं. टीव्हीचा आवाज बंद, सगळी लोक शांत आणि टीव्हीकड ध्यान मग्न. आम्ही मध्ये जागा करून बसलो. माझे बारीक लक्ष टीव्हीत. एकूण नकाशा कसा असतो हे मला मन लावून बघायचे होते. तेवढ्यात चावटणे पापडाचा कडकडा आवाज केला आणि भजी काढून खायला चालू केले. सगळ्या लोकांचे लक्ष ह्या दोघाकडे. हे आपले भजी खात लोकांचे चेहरे बघत. तेव्हड्यात चावटने शेजारच्या माणसाला विचारले "किती शॉट झाले ?"दहा सेकंद शांतता आणि मिट्या आणि चावट उठून दरवाज्याकडे पळाले, मला काहीच कळले नाही पण बाहेर येवून बघतोय तर मिट्या जोरजोरात हसतोय आणि चावट शांत आहे.

"च्यायला चावटाच्या म्हाताऱ्याला बी नेमकं आजच यायचं होतं भक्त प्रल्हाद बघायला"
"आईच घातली कि, आता चावटच्या बापानं आपल्या वडिलांना सांगितले तर ?"

दुसर्या दिवशी सकाळी चावटाचे वडील मला म्हणाले
"तू शाळा शिकतोस, हुशार हायस, आमच्या गाबड्याच्या नादि लागू नकोस"

ह्या बापाला अजून हि मी सलाम करतो. स्वताच्या पोराच्या नादाला लागू नको असे म्हणणारा बाप वेगळाच.

मीट्याने अजून हार मानली नव्हती. आता आम्ही चिट्टी लिहायला रानात गेलो. मिट्याने सुई, चाकू आणला होता. त्याने खरच रक्ताने चिट्टी लिहिली. एक पोरगी पोराला इतकं वेड लावू शकते हे पहिल्यांदाच बघत होतो. भर दुपारची वेळ म्हणजे आमची वेळ. चावट आपल्या झेंगाटला भेटायला अश्याच दुपारी जातो. कारण बघायला कुणीच नसते. दुपारी ती चिट्टी घेवून एका लहान पोराला पाठवले आणि वाट बघता बसलो. ती बाहेर आली आणि चिट्टीला त्याच्यासमोर डबडं लावलं. त्यात मिटयाचे रक्त खरोखरच जळत होते. त्याच्या चेहरा बघून मला खूप वाईट वाटले. पण समाधान वाटले कि कमीत कमीत हि बापाला तरी नाही सांगणार. दुसऱ्या दिवशी कलीने मला बोलाविले आणि म्हणाली , "तू कश्याला फिरत असतो त्या मिट्या बरोबर, मला नाही आवडत तो, तु कायबी माग तुला देते" तरी पण मी म्हणालोच त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. मग ती म्हणाली तू जा आत्ता. आता कधीतरी वाटतं आपण त्यावेळी खूप मोठी गोष्ट मिस केली असावी.


तरी त्याचं तिच्यावरचे प्रेम् कमी झाले नव्हते. तिच्या घरासमोरून मारलेल्या चकरा मुळे मिट्याने फक्त अजून एकदा मार खावू नये अशीच इछ्या असायची माझी. नको तो दिवस उगवला, तिचा साखरपुडा झाला. तो दिवस मिट्याने दोन देशी पेवून साजरा केला. मला तो शेवटचा आठवतो तो तिच्या लग्नात "वो मामा जरा भात वाढा कि अजून म्हणून वाढप्याला बोलावणारा "

मला माहित नाही आज तो कुठे आहे पण आज जेवढा मी त्याला मिस करतोय तेवढा त्याच्या जवळचा होतो कि नाय कुणास ठावूक.





No comments:

Post a Comment