Sunday, August 24, 2014

पोळा



म्हणजे आम्ही सहावी सातवीत असू. श्रावणातील तिसऱ्या सोमवार पर्यंत भुरभूर पडुन रानं थोडी ओली झालेली असायची आणि एखाद्या संध्याकाळी खाल्लाकडुन भरून येवून आदळ्या म्हणजेच दणकेबाज पाऊस व्हायचा आणि बहुत इंतजार असलेला तो क्षण यायचा, म्हणजे नदी भरून वहायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळी बारकी चीरकी घरच्यांच्या नजरा चुकवून नदीला. पाणी जर जास्त असेल तर कुणीपण पण दाब द्यायचा, 'हे भाड्खावूच्यानो व्हा लांब नाहीतर एकेकाला सडकून काडीन, नदीच्या जवळ जरी गेलाव तरी काय खरं नाही सांगून ठिवतो, हि हि बारकू आण्णाचा नातू लय चालूय ह्याला व्हकाळित द्या एक , हि उडी टाकायच्या नादात दिसतोय" असे म्हणून कुणीपण आम्हाला बदडून खिदाडुन लावायचे आणि ते स्वतः किती जबाबदार नागरिक आहेत हे सिद्ध करायचे

मग आम्ही पोरं दुपारी लोकं जरा कामधंद्याला रानात गेली कि हळुच नदीला यायचो. त्यादिवशी लक्ष्मीआयच्या देवळाच्या घाटावर कायमंच कपडे धूत असणाऱ्या दोन-तीन बायका जास्तच खुश दिसायच्यानेहमीप्रमाणे डबक्यात धुणं धुण्याऐवजी आज वाहत्या पाण्यात धुणं धुवायला मिळाल्याचा आनंद. त्या बायका दिवसभर धुणंच धूत असतात इतकी कापडं त्यांच्याकडून कुठून येत असतील हा प्रश्न माझ्या बालमनाला पडायचा. मग आम्ही त्यांची पण नजर चुकवून जायचो, नाहीतर त्यातील एक खडूस म्हातारी आम्हाला तिथून पण खिदाडुन द्यायची. मग आम्ही चांगला चिखल शोधत जायचो. गाव आणि शिवार काळ्या आईनं समृद्ध असल्याने कधी चिकन मातीच्या चिखलाची कमी नाही पडायची. जमेल तेव्हढा चिखल जमा करून गावात घेवून यायचे आणि चालू व्हायचा खेळ

 "अक्काका बोका, कसा काय ठोका"  

हा खेळ म्हणजे चिखल तिंबूण-तिंबूण कनकी सारखा करायचा आणि त्याचा खोल्या करून प्रत्येकाने फरशीवर आदळयचा. मोठा आवाज होवून ज्याच्या खोल्याला वरून मोठे भोक पडेल ते भोक दुसऱ्याने त्याच्या चिखलाने भरायचे. त्याला आम्ही पोळी म्हणायचो. अश्या तर्हेने आम्ही एकमेकाचा चिखल जिंकायचो आणि चिखलपण  खूप चिवट बनायचा. आणि मग संध्याकाळ पर्यंत त्याचा बैल जोडी बनवायचा कार्यक्रम चालू व्हायचा. हे काम पोळ्याच्या अगोदर दोन दिवस चालायचे. बैलाला डोळे म्हणून ज्वारीचे दोन दाणे लावणे. बैल उलु नये म्हणून प्रयत्न करणे, त्यांची शिंगे रंगविणे इत्यादी इत्यादी कामे करताना तहान भूक हरवायची. मग दुसऱ्या दिवशी खऱ्या बैलाबरोबर आमच्याही बैलाची मिरवणूक निघायची. समोर हलगीच्या आवाजात फेटा बांधून आपल्या बैलाचा कासरा घेवून गावात फिरण्यात काय तो आनंद

लाइटच नाही, मालिका कोणती लागलीय, डॉरेमोन बघितले का असली कसलीही कारणे आमच्या आनंदाच्या आड आली नाहीत. सगळे सन, सगळे मोसम कसे बहारदार पद्धतीने साजरे करायचो आणि जीवन जगायचो. आज पोळ्याच्या दिवशी एका गावाकडील दोस्ताला पोळ्याच्या शुहेछा दिल्या तर तो वाकडे तोंड करून म्हणाला, " आमच्यात पोळा नसतो, हा गणपती मात्र मोठा असतो, तू गणपतीला जेवायला ये आमच्याकडे".  मी हो म्हणालो. मला माहित आहे त्याच्या वडिलांनी दोन बैलामागे उभाराहून रानात पेरायला कुळवायला येरझऱ्या घालूनच त्याला शिकवले आहे

 मित्रानो आपल्या सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेछ्या