Tuesday, September 27, 2016

"परिंदा" प्रकाशन आणि ऋषितुल्य डॉ.आ. ह.साळुंके सर


म्हणजे, अकरावीत परीक्षेचा फॉर्म वगैरे भरायची जबाबदारी एकदमंच अंगावर पडली. ती एक मोठीच जबाबदारी होती. “उद्या परीक्षेचा फॉर्म भरायची मुदत संपत आहे”, असा गोधंळ वर्गात उडाला कि, वर्गात काही निश्चल, अविचल आत्मे असायचे ते निर्विकार पणे कुणाला तरी विचारायचे,
“उद्या फॉर्म भरायची मुदत संपत आहे कारे ?”
“हो” समोरून सगळे गृहपाठ/ट्युटोरियाल पूर्ण असलेला आणि परीक्षेचा फॉर्म पहिल्याच दिवशी भरून पावती नीट जपून ठेवलेला सिन्सियर आत्मा आमच्याकडे तुछ वगैरे नजरेने बघत सांगायचा..
“लेट फी किती आहे?”
“एकतीस रुपये” सिंशीयर आत्मा हळूच पुढेच उजव्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या स्त्रीलिंगी सिंशीयर आत्म्यावरील नजर काढून आपल्यावर तोच तुछ कटाक्ष टाकत...

एकतीस रुपये काय जास्त नाहीत, अजून पंधरा दिवस आहेत, भरूकि निवांत फॉर्म असे मनातल्या मनात म्हणून, आम्ही तसेच कॉलेज मधून थेट थेटरात जाऊन मोहरा, रंगीला, हमसे है मुकाबला तत्सम सिनेमे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बघायला जात असू. दुपारी तीन वाजता सिनेमा बघून उनातानातून चालत खोलीवर आल्यावर समजायचे, इथे येऊन तरी करणार काय?. म्हणजे कॉलेज मधे जाऊन तरी करणार काय ? एकूण कुठेतरी जाऊन करायचे काय असले भयंकर तात्त्विक प्रश्न मला तेव्हापासून सतावतात. हे थोर वाचक मंडळींच्या ध्यानात आलेच असेल. पण त्याकाळी मी आणि माझ्या सजातीय बांधवांनी त्यावर जालीम उपाय काढला होता. गाय छाप-चुना पुडी. विडा मळणे, तोंडात टाकणे, खिडकीतून थुंकत थुंकत उगीच उताणे खोलीच्या छताकडे बघणे, विडा थुंकने, पुन्हा दुसरा बार भरणे, पुन्हा थुंकणे, गुळणा करून पुन्हा बार भरणे आणि खोलीच्या छताकडे बघत माशांचा गुन्गुंगुंगुंगुन आवाज ऐकत पडून राहणे. दुसऱ्या दिवशी तसेच कॉलेजला जाणे आणि पुन्हा तोच उपक्रम राबवत खोलीतील सतरंजी गरम करणे. अशा बीजी शेडूल मधून लेट फी भरून परीक्षेचा फॉर्म भरायची तारीख उद्यावर येऊन ठेपली कि लक्षात यायचे कि आपण लेट फीचे पैसे किंवा एकूणच परीक्षा फिसचे पैसे अक्षय कुमार, अमीर खान, उर्मिला मार्तोडकर आणि गायछापचे मालक दोंडाईवाले यांच्या समृद्धीसाठी दिले आहेत. मग सुपर लेट फीस फक्त पंचेचाळीस रुपये आहे हे समजल्यावर बरे वाटायचे आणि अजून दहा दिवस वेळ मिळायचा. परीक्षेचे किंवा तस्तम फॉर्म अगदी शेवटच्या दिवशी शाळेतल्या कारकुनाच्या हातापाया पडून भरायचे. सगळ्या शाळेतील कारकून हे संस्थाचालकाचे बाप असल्याच्या अविर्भावात का असतात हा प्रश्न मला तेव्हापासुन आजतागायत पडत आहे. अशा तर्हेने कोणत्याही गोष्टीत नरड्याला पाणी लागल्याशिवाय हालचाल करायची नाही हे आपल्या आयुष्याचे तत्व आपण लहानपणीपासून अत्यंत काळजीपूर्वक जतन करत आलो आहे.



हेच अगदी कालच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पण घडले. पण काही लोक कायम संकटात अडकून कायम यशस्वी पणे बाहेर पडत असतात त्यापैकी मी एक आहे कि काय अशी मला शंका येऊ लागली आहे. अजून पंधरा दिवस आहेत प्रकाशनाला करूकि हॉल बुक निवांत, म्हणत म्हणत धरलेली तारीख चार दिवसावर येऊन ठेपली आणि लक्षात आले आता हॉल मिळत नाही. ज्या साताऱ्याच्या दोस्ताच्या जीवावर होतो, तो फोन उचलत नाही. एकूण असे बाके प्रसंग नवीन नसल्याने मी डगमगलो नाही. कठीण समय आला आहे हे मी फक्त “किल्लेदारीच्या” मेम्ब्रास्नी सांगितले. संजय झिंजाड यांनी शून्य मिनिटात हॉल बुक केला, सौ. दिपाली झिंजाड निवेदनाचे भाषण तयार केले. संतोष डुकरे, अभिदा कुपटे , शंकरआन्ना बहिरट, पानसरे, संजू ढेरंगे यांनी गाड्या ठरवल्या व पुढच्या शून्य मिनिटात सगळे पक्के केले आणि मी नेहमीप्रमाणे फेसबुकवर स्टेटस टाकून झोपी गेलो. आळशी माणसाला अशी प्रेम करणारी माणसे कशी काय भेटतात कोण जाने.



पहिल्या वहिल्या पुस्तकाला म्हणजेच भोवनीलाच गुरुवर्य ऋषितुल्य डॉ आ. ह साळुंके सरांचे आशीर्वाद मिळणार होते, हे माझ्यासाठी थोरच होतं. त्यांना फक्त वाचले होते, त्यांच्या कार्याचा आवाका पाहिला होता, त्यांनी पेरलेल्या बीजांची रोपटे झाली, रोपट्यांची झाडे होऊन त्यातून एकाच्या असंख्य बिया तयार झाल्या होत्या. महाराष्ट्राला कट्टर धार्मिक वादाच्या कचाट्यातून मुक्त करून सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी निर्माण करण्यात त्यांना आलेले यश पाहत होतो पण त्यांना प्रत्यक्ष पहिले नव्हते. प्रतक्ष भेटण्याची हुरहूर होतीच.

चेहऱ्यावर खूपच नैसर्गिक आनंदी भावाने सरांनी घरी स्वागत केले आणि विविध विषयावर चर्चा करत एक तास कसा गेला ते समजलेच नाही. अतिशय शांत, संयमी, चेहऱ्यावर स्मित आणि आत्मविश्वापूर्वक प्रत्येक शब्दामागे दशकांचा अभ्यास, चिंतन आहे हे समजायला वेळ लागला नाही.

सरांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात पुस्तकातील जवळ जवळ प्रत्येक व्यक्तिरेखेला हात घातला, त्यामागील संवेदना, आणि ते जगणे त्यांनी कसे अनुभवले आहे हे सांगताना समोरच्या लोकांना हे आपलेच जीवन आहे असे वाटत असावे इतके लोक त्यांच्या भाषणाशी एकरूप झाले होते. सर, आपले पुस्तक पूर्ण वाचतील का? असशी शंका होती मला, पण जेव्हा त्यांनी प्रत्येक कथेतील संदर्भ देऊन त्याचे विश्लेषण देत होते तेव्हा त्या कथा माझ्या आहेत म्हणून नाही पण माझ्यासारख्या नवीन लिहिणाऱ्या माणसाच्या कथेला-लिहिण्याला सरांनी खूप मान दिला आहे असे मला वाटत होते.



“विकासच्या बऱ्याच कथा मला माझ्या बालपणात घेऊन गेल्या”  हे सरांचे वाक्य अगदी मी माझ्या घराच्या भिंतीवर माझ्या नावाच्या ऐवजी लिहून ठेवावे असे वाटले.

“एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या हुशारीची महती राजा पर्यंत पोचते, आणि राजा आपल्या प्रधानाला सांगतो कि त्या शेतकऱ्याच्या मुलाला घेऊन या, त्याला राजदरबारात माझा सल्लागार म्हणून ठेवायचे आहे.हे ऐकून प्रधानाला त्या मुला विषयी असूया वाटते पण राजाचा आदेश असल्याने त्याला पर्याय नसतो. राजाने दिलेला घोडा घेऊन तो शेतकऱ्याच्या मुलाला आणायला घोडा घेऊन जातो. प्रधान त्या मुलासमोर घोडा उभं करतो आणि म्हणतो, ‘बस, यावर बसून तुला राजाड्यात जायचे आहे”. तेव्हा तो मुलगा त्या घोड्याच्या पाठीकडे तोंड करून बसतो. हे पाहून प्रधानाला समाधान वाटते. हा मुलगा तर मूर्ख निघाला, राज यला पाहून ताबडतोप हाकलून देणार म्हणून तो आनंदी होतो.

जेव्हा तो त्याच अवस्थेत राजदरबारात पोचतो तेव्हा राजा चिडतो आणि विचारतो, “काय हा मूर्खपणा, मला जर माहित असते तु असा मूर्ख आहेस तर तुला बोलावले नसते, घोड्याच्या पाठीकडे तोंड करून कोण बसते का?
तेव्हा शांतपणे तो शेतकऱ्याचा मुलगा उत्तर देतो, “महाराज, मी आपला आभारी आहे, आपण मला आपल्या शेवेच्या योग्य समजलात. परंतु आपली सेवा करत असताना, उंची महालात राहत असताना, ऐश्वर्यात लोळत असताना, मी ज्या ठिकाणाहून आलो आहे त्या माझ्या गावावरील, माझ्या लोकांवरील माझी नजर कधीही दूर हटू नये यासाठी मी माझी नजर जाणीवपूर्वक मागे ठेवली आहे. हे ऐकून राजाला पण खात्री वाटली कि त्याची निवड चुकीची नव्हती.

सरांनी सांगितलेल्या या गोष्टीचा मतितार्थ खूप मोठा आहे हे मला समजायला वेळ लागला नाही.

या व्यतिरिक्त पुस्तक प्रकाशना आलेल्या माझ्या खास दोस्तांचे आणि वाचकांचे मी खास आभार मानायला विसरणार नाही. यामध्ये, बारामती मुंबई, वाळवा, जयसिंगपुर, पेठवडगाव, कराड, सांगली, बार्शी, सिरसाव, सासुरे, साताऱ्याहून आलेल्या सर्व मित्रांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण उपस्थित राहून माझा आत्मविश्वास वाढवला या बद्दल धन्यावद देतो.

तसेच काही व्यक्तिगत, सामजिक कारणामुळे जे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु कायम मला प्रोत्साहन देत असतात त्यांचे पण मी आभार मानतो. 

आणि माझे चार शब्द संपवतो. जय हिंद जय महराष्ट्र.