Friday, May 27, 2016

आज ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनासमर्पित, "बार्शीचा पांडुरंग सांगवीकर"

तारीख – २७ मे २००२
हॉस्टेल खोली नंबर – ३०५
वेळ – कातरवेळ
उदाहरणार्थ हि गेल्या अर्ध्या तासातील तिसरी सिगारेट. सिगारेटचा पण कधी कधी कंटाळा येतो पण तिच्याशिवाय दुसर कुणी जवळचं पण वाटत नाही. आज शनिवार आहे, पण हि वेळ आणि तारीख भयंकर वाईट, हा आब्या पाटील, सयाजी, आणि पैग्या माझ्या पैशाला अगोदरच पांडुरंग लावतात आणि नंतर मी रिकामा झालो कि मला यांच्या तोंडाकड बघत बसावं लागतं. शेवटचे दोनशे रुपये राहिलेत, आज बाहेर पडलं कि हे लोक पिणार खाणार आणि आपले आहे तेवढे पण पैसे संपून जाणार. त्यापेक्षा हे सिगारेटचं पाकीट आणि हि ययाती आज संपवून टाकू. एका रात्रीत. तशी मस्तच आहे ययाती.
तेवढ्यात परभणीचा आब्या पाटील, सयाजी आणि उस्मानाबादचा पैग्या अगदी दार तोडूनच एन्ट्री मारल्यासारखी एन्ट्री मारतात.
“कारे पांड्या रांडच्या, तिन्ही सांजंला खोलीत का बसलाय, आरं चलकि कि मस्त रंकाळ्यावर वगैरे जाऊन येऊ आज वर्गातल्या पोरी पण येणार हायेत, आन आज चक्क चड्डी घालून बसलाय, मला वाटलं होतं फक्त वरून टावेल टाकून बसलेला असशील” पैग्याचं क्यासेट चालू झालं
“पयली गोष्ट पैग्या ती “रांडच्या” शिवी तुझ्या तोंडात शोभत नाही, तू आपलं “आयघाल्या”, “झवन्या” ह्या आपल्या आपल्या शिव्याच देत जा, ह्या कोल्हापूरच्या पोरात मिसळून बिघडून घेऊ नको स्वतःला” पांडुरंग म्हणाला.
“अयं जाउदे, आन हि काय, आज मोठी गोल्डफ्लेक सोडून छोटी गोल्डफेक, ख्या ख्या ख्या बंडाळ उटली काय? “ आब्या पाटील दात काढत बोलला, त्याच्याकडे पांडुरंगने दुर्लक्ष केले. पण आब्या थांबायचं नाव घेत नव्हता.
“आरं पांड्या, सुदररं लका सुदर, आरं “कोटलर” वाच “पीटर ड्रकर” वाच, काय तरी फायदा हुईलरं! च्यामायला हि वि सं खांडेकर, बाबा कदम, व. पु. काळे, पु लं काय तुला भाकर देणार नाहीतरं, आरं इचार कर लका, बाप आडतीवरची निम्मि पट्टी तुला पाठवतोयरं~~~ सुधरर लका सुधर, आरं न्हायतर हि अचूत गोडबोले तरी वाचारं, आपल्या प्रचार्य बाईनी मला खास दिलंय हे “बोर्ड रूम” नावाचं पुस्तक”, आता आब्यान पाटलाने बडबड चालू केली.
“आरे साहित्य म्हणजे तुम्हाला काय समजणार, जीवनाची परिभाषा निर्माण करून आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवते ते साहित्य असते मित्रा” पांडुरंगने एकुलते एक पुस्तकी वाक्य फेकून पुन्हा लगेच बोलला,
“बाकी ते अच्युत का कोण गोडबोल्याचे पुस्तक मला माहित आहे, लोकांच्या इंग्रजीतल्या केस स्टडी वाचून त्याने मराठीत तुमच्या सारख्या चुत्याना समजावे म्हणून लिहिले आहे आणि ती आपली प्राचार्य देशपांडे म्याडम त्याची पाव्हणी आहे म्हणून त्याच्या पुस्तकाचा प्रचार करत आहे. तुम्हीच सुधरा राजेहो.., हे लोक आपापल्या लोकांना मोठं करण्यात गुंतले आहेत.
“बरं ऐका, काल मी बाबा कद्माची “पाटलाचा दणका” हि कादंबरी वाचत होतो. गावचा पाटील कादंबरीतल्या हिरोनीला उसात नेहून उडतो, त्या हिरोनीचा ठोक्या हा फौजदार असतो, त्याला समजते, आता केस कोर्टात गेलीय, मग मी थांबलो, कोर्टात काय होणार माहिताय मला. बाकी हि “यायाती” पण बरीय, ह्यात आपला राजा चोटाळ भाड्या दाखवलाय , वाड्यातल्या बायावर चढतो, गल्लीतल्या बायावर चढतो, अख्या राज्यातल्या बायावर चढतो त्यानं पण त्याचं भागत नाही म्हणून शेवटी सुनंवर पण चढतो कायकी, आता तिथपर्यंत आलंय, पुढे तो सुनंवार चढतो का नाही ते मी तुम्हाला उद्या सांगतो, तुम्ही या जाऊन रंकाळ्यावर , त्या पोरीवर शंभर दोनशे खर्च करून या मोकार, बाकी हे वि सं खांडेकर, फडके वगैरे नसते तर आमच्या सारख्या आंबट शौकिनांचे काय झाले असते कुणास ठाऊक, तुम्हाला सांगतो पोरांनो, हे काय खरे साहित्यिक नाहीत, कुणी चांगलं लिहित नाही म्हणून यांना वाचावं लागतंय”
“लागला का लका तू साहित्यावर बोलायला, चला रं पोरानो, घालूद्या ह्याची आय हितंच, बाकी तू आंबट शौकीन नाही, नुसती पुस्तकं वाचून , पुस्तकातल्या डाकूने हिरोनीला उसात नेली म्हणून खुश होणारा घाबरट आहेस तू, तुझ्यात दम असता तर त्या मंजिरीला पटवली असती, तुझ्या मागे लागलीय ती, आज बघू कुणाबरोबर येतीय रंकाळ्याला, तू बस वाचीत, तो यायातीतला राजा किती बयावर चढतोय ते” आब्याने लेक्चर दिले आणि ते तिघे तडा तडा खोलीतून निघून गेले.
हे म्हणजे तंतोतंत खरं आहे कि काय, आब्या जाताना च्यामायला शेपटीवर पाय देऊन गेला, आपल्याला पोरी पटत असताना आपण मागे का सरतोय, आताच नाही अगदी डिग्री पासून, आणि तो आपला मोठा भाऊ, चांगदेब पाटील, तो पण आजून काराच आहे, कमीत कमी खंडेराव नं तरी उरकून घ्यायला पाहिजे आता, राव त्यामुळे ह्या धाकट्या पांडुरंगचे हाल होतात. दोन मोठ्या भावाची उरकल्याशिवाय आपण कसं लग्न करायचं. हट, पांडुरंग तू खरंच थोर आहे, आहे तुला लग्न कर कोण म्हणतंय,
“आपल्या दोघातील मैत्रीच्या/प्रेमाच्या बंधाला तू कोणतहि नाव देवू नकोस, कोणत्याही नात्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस, हे असंच राहूदे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे प्रतिबिंब पडून उजळलेल्या त्या झुळू झुळू वाहत असणाऱ्या झऱ्या सारखे, त्या झर्याला जसा कुणीहि बांध घालु शकत नाही, तसेच आपण अगदी उन्मत्त होऊन्न वाहत राहू, वाहत जाऊ अव्याहतपणे प्रेमाच्या वाटेवरून त्या दूर कधीही हि न पोहचू शकणाऱ्या क्षितिजा पर्यंत” ख्या ख्या ख्या ......हे लय थोर आहे, नुसतंच वहात जायचं मायला........
हो, हे पण तंतोतंत खरंय, असली वाक्य फेकली कि पोरींना लग्नाची वचनं द्यावी लागत नाहीत. आपल्याला हे खोलीत बोलायला जमतंय पण मंजिरी समोर जमेल का? ती तयार होईल का? बर आपल्याला लग्न करायचं नाही असे पण नाही ते फक्त आपल्या हातात नाही एवढंच. बाकी आमच्या बापाने एकदा खंडेरावला बाशिंग बांधलं कि करीन कि मी लग्न.
पाचवी सिगारेट आताच संपत आली, आजून फक्त पाचंच उरल्यात. रात्रभर पुरतील का? धतसाला, पुस्तक वाचायचा मूड पण गेला. आपणच काय तरी पुस्तक फिस्तक लिहून दाखवायला पाहिजे , साहित्य काय असते ते, ह्या साडेतीन टक्क्याच्या साहित्यातून साडेशहाण्णव टक्क्यांना मुक्ती मिळवून दिली पाहिजे.
रोहिण्या पडल्यात म्हनं गावाकड, आई, आबा, म्हातारी यांची लगबग चालू झाली आसंल, कुळवणी पेरणी, चांगल्या बिया शोधा, मारवाड्याला डबल पैसे देऊन खत, बिया खरेदी करा, त्याना आपल्या जीवावर श्रीमंत करा आणि पुन्हा शेतकरी राजा म्हणून मिरवा. हे घाण आहे पांडुरंग, तू कधीही शेती करू नकोस, आयतखाऊ होऊन लोकांना शेती कशी करायची शिकव, तू साहेव होऊन बांधावर उभा राहून गारपीटीचा रिपोर्ट तयार कर, तू कलेक्टर होऊन जिल्ह्यात दुष्काळ नाही असा रिपोर्ट मायबाप सरकारला देऊन प्रमोशन बघ आणि गावातल्या लोकासमोर, मी शेतकर्यांसाठी, गरिबासाठी कलेक्टर झालोय असे भाषण दे, तू उस पिक किती खराब आहे म्हणून रिपोर्ट देणारा जलतज्ञ हो, तू कांदा हे जीवनआवश्यक पिक आहे म्हणून निर्यात बंदी करणाऱ्या सरकारात जा पण तू शेतकरी होऊ नको.
पांडुरंगा तुला तुझ्या शेतात खपलेल्या हजारो पिढ्यांची शपथ आहे, शपथ आहे तुला त्या शिन्ग्रोबाची तू शेतकरी झाला तर!!!!

Monday, May 23, 2016

भारतीय अर्थव्यवस्था, शेतकरी , कामगार, मध्यम वर्ग ...


परदेशी कंपन्यांना भुलवण्या करीता विकसित देशांमध्ये भारताची वोळख एकशेविस करोड गिर्हाईकांचा आणि ३०-३५  करोड पक्क्या मध्यमवर्गीयांचा म्हणजे महिन्याच्या महिन्याला खिशात पैसे येणाऱ्यांचा देश किंवा एक बाजार आहे अशी करून देतात. पण परदेशी कंपन्यातील कारभारी मूर्ख नसतात. म्हणजे १२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सगळेच काही पिझ्झाचे गिऱ्हाईक नसते हे पिझ्झा बनवणाऱ्या कंपन्यांना चांगले माहित असते, किंवा सगळीच लोकसंख्या काही कार खरेदी करणारी नसते हे कारचे सुटे भाग किंवा कार बनवणाऱ्या कंपन्यांना चांगले माहित असते. त्यामुळे त्यांची धोरणे हि ह्या देशातील साधारणपणे पंधरा कोटी लोकसंखेला गृहीत धरूनच आखलेली असतात. अशा वेळी देशातील २०% लोकांना सेवा देण्यासाठी येणाऱ्या आणि देशातील साधारणपणे 4% लोकांना सुद्धा रोजगार न पुरवणाऱ्या कंपन्यांना सरकार पायघड्या घालते, सवलती देते. एखाद्या कंपनीने नुसती गुंतवणूक करणार असे घोषित केले तरी सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी आपण जग जिंकल्याच्या अविर्भावात घोषणा करून विकास केला, विकास केला अशा घोषणा देत बसतात. प्रत्यक्षात या केलेल्या घोषनापैकी किती गुंतवणूक प्रत्यक्षात उतरते आणि त्या गुंतवणुकीतून किती रोजगार निर्माण होतो हे गुलदस्त्यातच असते. किंवा तो रोजगार सरकारने दिलेल्या सवलती पेक्षा खूप कमी असतो. 

परदेशातून भारतात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी खूप फोकस्ड असतात आणि त्यांचा नफा कमावणे हा एकंच उद्देश असतो. अर्थात नफा कमावणे हाच उद्देश कोणत्याही धंदेवाईक माणसाचा असला पाहिजे त्यात दुमत नाही. परंतु ह्या मोठमोठ्या परदेशी किंवा स्वदेशी कंपन्या एकूणच अर्थव्यवस्थेचा किंवा समाजाचा आर्थिक स्तर कसा उंचावता येईल याचा विचार करताना किंवा अभ्यास करताना दिसत नाहीत. उलट कमीत कमीत रोजगार निर्मिती करून जास्तीत जास्त नफा कमावणे, तो नफा कमावण्यासाठी सरकारकडून सवलती मागणे, जास्तीत जास्त सवलतीसाठी सरकारवर दबाव आणणे हेच काम करत असतात. आणि असे धंदेवाले किंवा हजारो करोडचे मालक असणारे देशी परदेशी भांडवलदार जेव्हा सरकारला, भारताचे आर्थिक धोरण कसे असावे, परदेशी कंपन्यासाठी आणि देशी कंपन्यासाठी सरकारने काय करावे, कुठे अजून जास्त गुंतवणुकीला परवानगी द्यावी, कुठून पैसा उभा करण्यासाठी मदत करावी असे वगैरे सल्ले देतात तेंव्हा त्या सल्यामागे भारताचा विकास व्हावा, किंवा भारतातील १२० कोटी जनतेचा आर्थिक स्तर उंचावला जावा हा उद्देश असतो कि, त्यांच्या अनेकाविध क्षेत्रातील कंपन्यांचा नफा कसा वाढेल, त्याना अल्ट्रा नफा कसा कमावता येईल आणि त्यांचे आर्थिक साम्राज्य अजून मोठे आणि मजबूत करता येईल याचा विचार जास्त करत असतील याचा विचार न सरकार करताना दिसते ना जनता.  

सर्वसमावेशक आर्थिक धोरण बनवणे हे काम धंदेवाल्या लोकांचे नसते तर सरकारचे असते पण तिथून तर नेहमी निराशाच पदरी पडली आहे. परदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे, स्वदेशी भांडवलदाराणा मोठे करणे, गुंतवणुकीत मदत करणे म्हणजे विकास होईल आणि गरिबी कमी होईल हे समोर ठेवून धोरणे आखली पण गेल्या वीस वर्षात तसे होताना दिसत नाही. उलट गरीब आणि श्रीमंत यामधील दरी वाढत चाहली आहे. अर्थात या उदारीकरणाने एका नवीन अपत्याला जन्म दिला आहे ते म्हणजे मध्यम वर्गीय समाज. यांची लोकसंख्या अंदाजे २६% धरली जाते पण ती प्रत्यक्षात कमी आहे. 

काही लोक श्रीमंत झाले कि त्यांणी कमावलेला पैसा पाझरून (trickle-down theory ) गरीबा पर्यंत पोचेल अशी अफवा काही लोकांनी पसरवली आणि आणि साडेपाच टक्के लोक गर्भ श्रीमंत होत चालले आहे , दहा टक्के लोक श्रीमंत होत चालले आहेत आणि १५% लोक अतिशय असुरक्षित जिंदगी जगत महिना पगार घेऊन पिझ्झा , खात आहेत, वोडका पीत आहे, विकेंडला बायकोला, गर्लफ्रेंडला मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमा दाखवत आहेत आणि महिन्याच्या शेवटाला पेट्रोल भरण्यासाठी क्रेडीट कार्ड वापरत आहेत. आणि त्या क्रेडीट कार्डाचे बिल देण्यासाठी आणि घराचा हप्ता देण्यासाठी १२- १४ तास काम करत आहेत. आणि तरी या लोकांना रात्री झोप लागत नाही, उड्या नोकरी गेली तर घरचे हप्ते कसे फेडू, कराचे हप्ते कसे फेडू, पुढल्या वर्षी परदेशात सहलीला जायला येईल कि नाही अशा प्रकारच्या चिंतांनी त्यांना नेहमी ग्रासलेले असते. ह्या लोकांना वाटत आहे देशाचा विकास होतोय, स्वतःचा विकास होतोय. पण हे लोक खरी जिंदगी जगत आहेत असे त्यांना वाटत आहे आणि ते ह्या विकासाचे आणि उदारीकरणाचे कट्टर समर्थक आहेत.

पण उदारीकरणाच्या प्रक्रीयेतून बाहेर फेकल्या गेलेल्या किंवा नकारात्मक दृष्ट्या परिणाम झालेल्या शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्या ७०% लोकांचा विचार ना हे उदारीकरण करत आहे, ना हे सरकार करत आहे आणि उदारीकरणाची महत्वाची किंवा आधारस्तंभ असलेली संकल्पना जिला आपण “मार्केट/बाजार" म्हणतो ती तर कधीच कुणाची काळजी किंवा विचार करत नसते. मार्केटचा एकंच नियम असतो. टिकत नसला तर संपून जा. ह्या स्पर्धेत टिकत नसल्याने ६० कोटी भारतीय शेतकरी, शेतमजूर यांनी संपून जावे यासाठी तर हे सगळे धोरणे बनवणारी आणि धोरणे राबवणारी मंडळी वाट बघत नसतील? असा संशय यायला वाव आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा शेतकऱ्यांचा विषय आहे, भारतात गरिबी होती आहे आणि काही तरी मदतीच्या अपेकेक्षेने शेतकरी आत्महत्या करत आहेत किंवा शेतकऱ्यांना मदत करा, वर्गणी जमा करा, कर्ज माफ करा अशा मागण्या करणार्यांना अजून खऱ्या परिस्थितीची जाणीव झालेली नाही कि “रोग हाल्याला इंजेक्शन पखालीला” हा खेळ सगळी मिळून खेळत आहेत आणि हाल्याचे दु:ख कुणाला समजतंच नाही किंवा हे लोक त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. कारण हाल्याला भयंकर मोठा रोग झालेला आहे आणि आता आपल्याकडे त्यासाठी औषध आहे कि नाही याची खात्री नसल्याने हळूहळु हाल्या आता मेलेलाच बरा आहे, आपण दुसरे रेडकु जो आपला लाडका मध्यमवर्गीय आहे त्यालाच नीट सांभाळू अशी भूमिका घेत आहेत हे समजायला मार्ग नाही. तसे समजत असतील तर हाल्या मेला तर दुसरे आवडते रेडकू म्हणजे मध्यमवर्गीय टिकू शकणार नाही हे तरी ह्या धोरणे ठरवणाऱ्या लोकांना ठाऊक आहे कि नाही कुणास ठाऊक. किंवा मुद्दाम आजरी पाडलेला हाल्या जेव्हा चवताळेल आणि रेडकाला ढूसंन्या द्यायला चालू करेल तेव्हा ह्या देशात अराजक मजल्याशिवाय रहाणार नाही.

भारतीय अर्थव्यवस्थेकडे सहज नजर टाकली तरी लक्षात येते कि भारतमातेची फक्त चोळीच रेशमी आहे बाकी अंगावरील लुगड्याचं पाक पटकर होऊन गेलेलं आहे. त्यामुळे जे श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि उदारीकरणाने त्या मध्यमवर्गीयात स्थान मिळवलेल्या लोकांना भारतमातेची फक्त ती रेशमी चोळीच दिसत आहे आणि उदारीकरणाच्या बाहेर राहुन जगण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ७०% जनतेला भारतमातेचे ते फाटके लुगडे दिसत आहे. आता कुणी ह्या देशाकडे कसे बघत आहे हे ते लोक ७० टक्क्या मध्ये आहेत  कि  ३० टक्क्या मधे आहेत यावर अवलंबून आहे.

भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पन्ना मधे शेतीचा वाटा हा फक्त १४% आहे पण त्या चौदा टक्क्यावर जवळ जवळ ६०% लोक जगतात. सेवा आणि ओद्योगिक क्षेत्राचा वाट हा ८६% आहे आणि त्यावर ४०% लोक जगत आहेत. आता ह्या ८६% उतपन्ना मध्ये जे गर्भ श्रीमंत आहेत जे फक्त ४%  आहेत त्यांची संपत्ती जर वजा केली तर शिल्लक काय उरतो आणि त्यात हा मधमवर्गीय विकास झाला म्हणून जगतो आणि गरीब शेतकरी मायबाप सरकारकडे अशा लावून बसलेला असतो. 

देशाच्या एकूण उतप्पान्नापैकी फक्त १२% उत्पन्नावर गुजराण करणारे ६०% शेतकरी आणि शेतमजूर एका वेगळ्याच दृष्ट चक्रात अडाकले आहेत. म्हणजे सरकारला गरिबांना, श्रीमंतांना, मध्यमवर्गीयांना,  नोकरदारांना स्वस्तात धान्य, भाजीपाला किंवा शेती उत्पादने देण्याची गरज वाटते परंतु शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव किंवा जास्त भाव देण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे शेतीमालाच्या किमती ह्या जाणीवपूर्वक कमी ठेवल्या जातात किंवा वाढल्या तर परदेशातून धान्य आयात करून त्या कमी केल्या पण ग्राहकांना त्रास होतु नये याची काळजी सरकार घेते. तिथे शेतकऱ्यांची काळजी ह्यावी हे सरकारच्या मनात सुद्धा येत नाही. सरकार मग दुष्काळग्रस्तासाठी काहीशे कोटी जाहीर करून आपली जबाबदारी पूर्ण केल्याच्या अविर्भावात आम्ही शेतकरीच आहोत म्हणून पेपरात जाहिराती देते. उदा. ज्वारीचा, कापसाचा, उसाचा, कडधान्याचे गेल्या दहा वर्षातील भाव बघितले तर जवळ जवळ सारखेच आहेत, पण शेती व्यतिरिक्त मालाची भाव वाढ हि जवळ जवळ दहापट झाली आहे, नोकरदारांच्या पगारी दहा पटीने वाढल्या आहेत आणि ह्या भाववाढीच्या जामान्या मध्ये शेतकर्यांनी त्याच त्याच भावात धान्य विकून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची, शिक्षणाची, सामाजिक गरजांची आणि पोटाची जाबाबदारी पूर्ण करण्याची अपेक्षा केली जाते. 

एकीकडे शेतीमालाला भाव नाही त्यात कान्द्यासारख्या पिकाला जीवन आवश्यक वास्तूमध्ये टाकनारे सरकार भेटले आहे. शेतीमाला भाव नसण्याच्या दृष्टचक्रात शेतकरी अडकलेला असताना दुसरी खूप मोठी अडचण भारतीय शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या पुढे येऊन राहिली आहे तिच्याकडे अजून सरकारचे लक्ष गेलेले दिसत नाही. 

दोन पिढ्याच्या अगोदर सरासरी प्रती कुटुंब १५ एकर जमीन असावी. ती जमीन पंधरा लोकांच्या कुटुंबाला पोसायला पुरेशी नव्हती पण शेतकरी तसेच जगत होते. कारण त्यांना त्यावेळी पण माहित नव्हते कि ते गरीब आहेत आणि त्याना आजून पण समजलेले नाही कि ते गरीब आहेत. कुटुंबे विभागली जाऊन तीन-चार एकर जमिनी वाटणीला आल्या. जमिनीच्या छोट्याशा तुकड्या मध्ये जे पिकते त्याला भाव नाही. मग हे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतात आणि आहे ती चार एकर जमीन पण निघून जाते आणि काही लोक आत्महत्त्या करतात किंवा तर कुटुंब कबिल्यासह शहरात येऊन झोपडपट्टीत भर टाकतात.

इथे होते शहरे बकाल होण्यास सुरुवात, अकुशल कामगारांचा नको तेवढा पुरवठा भांडवलशाही शोषणाला उत्तेजन देतो. म्हणून हे ग्रामीण भागातून सर्वस्व गमावून आलेले अकुशल कामगार हे भांडवलशाहीचे आवडते अपत्य आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा एक उपाय आहे असे म्हणतात. शिक्षण कशासाठी तर शेतीवरील भार करण्यासाठी. आपण शेतीवरील भार किती कमी करू शकतो आणि सेवा क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्राम ह्या ग्रामीण भागात सध्या शेतीवर अवलंबून असलेल्या लोकापैकी किती टक्के लोकांना भविष्यात सामावून घेण्याची क्षमता आहे किंवा क्षमता निर्माण करून शकतो याला खूप खूप मर्यादा आहेत.  २०% अतिरिक्त भार पडला तरी सुद्धा शहरे कोलमडून पडू शकतात. म्हणजे ७०% लोकसंख्या मोठ्या शहरात ,यामध्ये निमाशाहरी भागातून होणारे कुशल कामगारांचा सुद्धा समावेश आहे हे म्हणजे आताच्या मोठ्या शहरांची दुप्पट वाढ. हे चित्र भयानक आहे.

शेती क्षेत्रात रोजगार उपलब्ध नाही, शहरे सेवा औद्योगीक क्षेत्रामधे एवढ्या लोकसंखेला सामावून घेण्याची क्षमता नाही म्हणजे भारताचा आर्थिक दृष्ट्या कोसळण्याच्या काही अगोदरचा काळ चालू आहे का?


(लेखामधील टक्केवारी हि निश्चित नसून सर्वसाधारण पणे लेखाच्या उद्देश पोहोचवण्याच्या सोयी साठी मांडलेली आहे)  

Tuesday, May 17, 2016

पर्शाट



कॉलेजला असनाऱ्या प्रत्येक नवतरुणाला आपण पण तसंच असलं पाहिजे असं वाटावं तसा असणारा परशा. आत्मविश्वासपूर्ण, देखणा, मजबूत बांध्याचा, क्रिकेट टीमचा कप्तान असून सुद्धा कॉलेज मध्ये छान  मार्क मिळवणारा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवाला जीव देणारे दोन दोस्त असणारा. असा परशा त्या गरीब घरचीच नाही तर त्यांच्या पूर्ण त्याच्या खानदानासाहित पावण्यारावळ्याची सुद्धा तो त्या गरिबीतून मुक्ती करण्यासाठी जन्म घेतलेला आवतार आहे, अशी त्याच्या घरच्यांची खात्री असते. “आम्हाला उनाताणात काम करावं लागतं, जरा सावलीतीली नोकरी बघा” ह्या वाक्यातून परशाच्या बापाच्या कित्येक पिढ्यांचे दु:ख अधोरेखित होते. पण जगरहाटीप्रमाणे आपला हिरो परशा हा तिच्या अर्चीचीच स्वप्ने बघत असतो.

नुसती अर्ची आली म्हणून नावेतून तलावात खुपसी मारून पोहत, पळत त्याच्या प्रेमाला नुसतं बघायला जाणारा परशा हा अखिल भारतीय तरुण मंडळाचा आदर्श असतो. आणि ती आर्ची म्हणजेच पोपटाचा डोळा आहे आणि तो आपल्याला फोडायलाच पाहिजे नाहीतर ह्या जिंदगीत काहीच अर्थ नाही, असल्या मायावी विचारांनी त्याच्याच नाहीतर महाराष्ट्रातील प्रत्येक परशाच्या डोक्यात घर केलेले असते.

प्रेम होत असताना आणि प्रेम करत असताना परशाच्या, प्रत्येक देहबोलीत, डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास आहे. तो जातीय उतरंडीत सर्वात खालच्या जातीतून येत असून सुद्धा, घरची कमालीची गरिबी असून सुद्धा पाटलाच्या पोराला , “असशील पाटलाचा, तरी उभा चीरीन” असं म्हणणारा परशा मांडताना दिग्दर्शकाने प्रेमात पडल्यावर मुलगा हिरो आसतो आणि गावात जातीयवाद पण जेवढी चर्चा होतेय तेवढा नाही हे सिद्ध केले आहे. नाहीतर गावच्या पाटलाच्या पोराला पारध्याच्या पोराने , “उभाच चिरीन ” असं म्हणनं आमच्या गावात तर अजून पण शक्य नाही.

प्रत्येक मनुष्य जीवाचे इथपर्यंतचे आयुष्य हे आनंदमय, स्वप्नमयच असते. पण प्रत्येक मानवाच्या जीवनात संघर्ष पाचवीला पुजलेला नसला तरी सटवाईने तो लिहून ठेवलेलाच असतो. नाहीतर बालपणीचे ,नवतारुण्यातील लोकांचे फोटू बघताना “आयुष्य सुंदर आहे” असे वाटत असते तर त्यांचेच चाळीसीतील रापलेले चेहरे बघितल्यानंतर,” ह्याला जर फिरून ह्याची जिंदगी लहानपणापासून सुरु करायचा चांस दिला तर ह्याला किती आनंद होईल” असे भाव आपल्या मनात येत असतात. पण आपल्याला  माहित असते कुणाला फिरून जरी लहानपणापासून जगण्याचा चांस दिला तरी तो फिरून तिथंच येणार असतो. त्यामुळेच तो चांस कुणालाच मिळत नसावा.

चित्रपटामध्ये सुरुवातीला मर्द भासणारा परशा जेव्हा मुलीच्या बापाला रंगेहात सापडतो तेव्हा मात्र त्याच्या मर्दानगिला ओहोटी लागते कि काय असे वाटते आणि तो त्याला बेदम मारणाऱ्या त्याच्या प्रेमिकेच्या भावाच्या अंगावर हात टाकायचे धाडस करत नाही. ह्यालाच म्हणतात भारतीय मुलगा. आपण काहीतरी त्यांची चूक केल्याची भावना हि त्यावेळी मुलांना हतबल बनवते. असे कितीतरी मार खाल्लेले प्रेमवीर मी डोळ्याने बघितले आहेत.  घरी येऊन वडील मारत असताना खाली बघून मार खात जेव्हा तो निघून जातो तेव्हा खऱ्या पारशाचा सिनेमा चालू होतो. इतका वेळ तो अर्चीचा असतो.
ह्या घटनेपासून परशाच्या देहबोलीत जो फरक जाणवलाय तो ३६०% आहे. तिथे परशा मधील कलाकार जागा करायचे काम दिग्दर्शकाने केले आहे. माराणे तोंड फुटून रेल्वे स्टेशनवर उतरणारा परशा जेव्हा स्वतःच्या घराची जबाबदारी घ्यायचीय म्हणून झाडून काढतो तेव्हाचा त्याचा अभिनय जगातील कोणत्याही प्रेम करणाऱ्या माणसाला जिंकून जातो.

“जातु बाहेर, मी काढतो झाडून” असे म्हणणारा परशा

आणि “तुला लसून पण सोलायला येत नाही का ?” असे आश्चर्य चकित होऊन तेव्हा हसत हसत विचारणारा पण आतून थोडासा नाराजी झाकून अर्चिला विचारणारा नवरा , परशाने अफाट पणे साकारला आहे.
इथून पुढची चाळीस मिनिटे फक्त परशाची आहेत. किती जरी प्रेम केले तरी बायकोवर संशय घ्यायचा नवऱ्याचा जन्मजात अधिकार पण गाजवातोच.
पण परशाच्या अभिनयाला उंची तेव्हा प्रपात होते जेव्हा तो हॉटेल मध्ये अर्चिला कांठाळीत मारून तिच्या मागे रस्त्यावरून चालत असतो. त्याचे ते चालणे, त्याचे कमी झालेले वजन, त्याचा तो शर्ट पाहून एक उमदा कलाकार मराठी सिनेमा श्रुष्टीला भेटला याचा मला खूप आनंद झाला. पारशाच्या माध्यामतून दिग्दर्शकाने एक बाजू समोर मांडलीय ती  आजपर्यंतच्या अनेक लेखात कुणी मांडलेली दिसली नाही.

परशाला त्याच्या आईबापाची आठवण येत नाही का ? कि परशा अर्चीच्या प्रेमात येवढा अखंड बुडालाय कि तो स्वताचे कुटुंब विसरला आहे. जर परशाचे आई वडील श्रीमंत असले असते आणि अर्चीचे गरीब तर अर्चिला इतकी आठवण आली असती का ? आणि परशा एवढ्या सोप्या पद्धतीने श्रीमंत घराला विसरू शकला असता का ? असे बरेच प्रश्न दिग्दर्शक आपल्या समोर मांडतो.

शेवटी संपताना एवढेच म्हणू इच्छितो कि या चित्रपटाचा नायक अर्ची नसून परशा आहे. 

Friday, May 13, 2016

नागराज आणि वादविवाद

गरिबाला श्रीमंत  झाल्यावर सुद्धा  गरिबी सोडत नाही. कारण जुने श्रीमंत नवीन श्रीमंतावर, कधीकाळी आपल्यापुढे हमाली करणारा आज  रुबाब करू लागला म्हणून जळत असतात. बाकी  गरीबांचं काम तर फक्त जळनेच असते. ते पण जुन्या श्रीमंतावर नाही , आपल्यातून मोठ्या झालेल्या श्रीमंतावर. कारण जुन्या श्रीमंताची गरिबांनी अगोदरच गुलामी पत्करलेली असते आणि आपल्यातून वरती गेलेल्या गरीबाची गुलामी स्वीकारणे सोडा पण त्याला बदनाम करून कसा  अजून खाली खेचता येईल याचेच प्रयत्न होत असतात. मग ह्या बदनामी साठी गरिबांना जुने श्रीमंत मदत करतात आणि काय हवे नको त्याची मदत करतात. रिसोर्सेस पुरवतात. लोकमतची बातमी योगायोग कशी असू शकते.

मग एकदा आपल्यातून मोठा झालेला बदनाम झाला कि हुर्रे हुर्रे , कशी काय जिरवली, आम्ही असे म्हणून स्वतःच्याच टिर्या  बडवून घेतात.

नेमकं तसंच झालंय, नागराज मंजुळेच्या बाबतीत. फ्यांद्री च्या यशानंतर कुणालाही नागराज आणि त्याची बायको वेगळे राहतात किंवा नागराजने त्याच्या बायकोला सोडले आहे हे समजले नव्हते. पण जेव्हा "सैराट" बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घालू लागला  तेव्हा काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. आणि हे प्रस्थापिथ लोक काहीतरी कुरुळीच्या  शोधात होते त्यांना शेटजी भटजीचा पेपर असलेल्या लोकमतने ती कुरुळी पुरवली.

मी म्हणले आहे ना वरती, "अशा वेळी श्रीमंत किंवा प्रस्थापिथ लोक गरिबांना हत्यारे पुरवतात आणि गरीबं लढत बसतात" कुणासाठी हे त्यांना माहित नसते. त्यांना वाटते हे स्वतासाठी लढत आहेत, स्वजातीसाठी लढत आहेत पण तसे काही नसतं. हे त्यांना पण माहित नसतं.


आता ह्या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे नागराजच्या पहिल्या बायकोसाठी कुणाला किती दु:ख आहे किंवा आखिल स्त्रिजातीसाठी आपल्याला किती कनव हा भाग आपण जरा लांब ठेऊया.   ह्यातील काही टीकाकार नागराजच्या यशाने जळून टीका करत आहेत का?  तर तसे बिलकुल नाही .

ह्यासाठी आपण जरा मुळात जाऊ. सैराट यायच्या अगोदर हवा झाली कि हा सिनेमा मराठा विरोधी आहे. त्याला अनेक ठिकाणाहून फूस पण मिळाली पण सिनेमा मध्ये मराठा विरोधी असे काहीच नाही. पण "आता आम्हाला नागराज हा हिरो मिळाला आणि कशी काय आम्ही पाटलाची पोरगी पळवून नेली" किंवा "परशा पाटलाच्या पोराला उभा चीरीन म्हणतो , बघा लक्षात ठेवा!" असले स्टेटस पडू लागल्याने काही मराठा तरुण अस्वस्थ झाले. आणि फेसबुकवर आपल्या भावना दुखायला तर निमित्तच हवे असते. नुसतं "ऊस" म्हटले कि दोन्हीकडल्या भावना दुखावतात.अशा गोष्टींचा वापर सोशल मीडियातील आणि वातानुकुलीत खोलीत बसून धोरणं बनवणाऱ्या चाणक्यांनी घेतला नसता तर नवलंच.

तेच झाले,  नागराजने कुणाच्या बोच्याखाली जाळ लावलाय,आणि लय पोळतय म्हणून बोंबलत कोण सुटलंय हे बघून मला आश्चर्याच वाटत आहे. आणि ज्याच्या बोच्याखाली सैराटने जाळ लावलाय ते लोक  बोच्यावर बर्फ ठेवून हा धिंगाणा बघत आहे.

राहता राहिलं नागराजच्या बायको सोडण्याचे त्याविषयी आपल्याला अजून काहीच माहिती नाही आणि त्याने खरी जरी सोडली असली तरी बायको सोडणे गुन्हा नाही. न्यायालयात काय असेल तो न्याय होईल.आपलयाला  हितं दररोज दारू पिऊन सुजलेले तोंड घेऊन शिवाजी महाराजांची भूमिका करून मराठी लोकांना जगवनारा आवडतो आपण गरिबीतून वरती येऊन प्रथापिथाच्या बुडाखाली जाळ करणारा नागराज पटत नाही? कारण आपल्या भावना उगीच नागराजच्या भक्तांनी दुखावलेल्या असतात.

मोठे व्हा !







Thursday, May 12, 2016

सैराटणे काढला मराठी चित्रपट श्रुष्टीतील प्रस्थापितांच्या बुडाखाली जाळ

We can easily forgive a child who is afraid of the dark; real tragedy of life is when men are afraid of the light.
.
डीक्षण..........साहित्य , नाटक, सिनेमा मध्ये डीक्षण हि जी संकल्पना असते त्या संकल्पनेच्या आयला पठाण लाऊन बोली भाषा हीच खरी डीक्षण असते आणि साहित्याची किंवा चित्रपटाची वगैरे कोणतीही वेगळी भाषा नसते हे सिद्ध केले आणि मराठी सिनेमा मध्ये पहिली क्रांती आणली. क्लास निर्माण करण्यासाठी पुस्तकी भाषेत लिहायची गरज नसते पुस्तकी भाषेत सिनेमा करण्याची गरज नसते आणि गाणी सुद्धा अगदी ग्रामीण भाषेत लिहून गाऊन त्याला लोकगीत म्हणण्याऐवजी क्लास म्हणता येऊ शकते हे सिद्ध केले अजयअतुल यांनी.
सदाशिव पेठेत आणि शिवाजी पार्काच्या पाषाण खडकात अडकून पडलेल्या मराठी सिनेमा त्याने खडकावर जोरदार घन मारून उपाळ फोडलं आणि आता मराठी सिनेमाचा झरा अगदी निर्मळ पाण्याने भरून झुळू झुळू वाहिल्याशिवाय राहणर नाही.
मराठी सिनेमात ऊस, दाखवलाय, शेती दाखवलीय, ग्रामीण भाग दाखवलाय पण आजपर्यंत दिसणारे ते ढोंगी होतं असं वाटण्या इतकं सैराट मधील चित्रण वास्तववादि आहे. सिनेमात असतं तसं नसतं असं म्हणताना आपल्याला दहादा विचार करावा लागेल. जेंव्हा आपण पर्षाचे मित्र बघतो, कॉलेज मध्ये दुसऱ्याच वर्गात बसून प्राध्यापकाच्या कांठाळीत हाननारा उगवता नेता पाटलाचा पोरगा बघतो आणि बेंचवर एकांगी पडून पर्शाकडे बघणारी अर्ची बघतो. हे तिथंच थांबत नाही तर उगवत्या नेत्याची तक्रार करायला गेलेल्या प्राध्यापक मंडळीना जेव्हा त्याचा बाप जो कॉलेजचा संस्थापक असतो तो म्हणतो, सरांना वोळख करून द्या कोण कसं आहे आपल्या कॉलेज मध्ये कसं राहायचे आणि तिथंच बसलेला कार्यकर्ता जेव्हा उगवता नेता म्हणजे प्रिन्सच्या वाढदिवसासाठी त्याच प्राध्यापक मंडळीना वर्गणी जमा करायला सांगतो तेव्हा आपल्या शिक्षण व्यवस्थेला नागराज जोरात कानसुलीत मारतो.
चित्रपट इथून गती घेतो आणि परशाचे आणि अर्चीचे प्रेम वाढत जाते. हे प्रेम वाढताणाचा प्रवास मांडताना अर्चीचे पारशाच्या आईला, ‘कसं काय आत्या बराय का” हा प्रश्न विचारने म्हणजे आत्याच्या पोराला आत्येभाऊ म्हननारांची आणि आपली संकृती वेगळी आहे हे प्रकर्षाने जाणवते.
हि झाली एक बाजू. जेव्हा ह्यांना रंगे हाथ पकडले जाते तेव्हा परशाच्या मदतीला येणारा प्राध्यापक विचारतो, “झोपलाय ना तिच्याबरोबर देकी सोडून आता” ह्या डायलॉग मधून नागराजला दलित समाजातील बदला घेण्याची भावना तर दाखवायची नसेल ना? असे वाटते. ती तितकीच खरी असते.
गाणी, रोमांस लंगड्याचे दुकानदाराच्या पोरीवर लाईन मारणे यामुळे मला माझे बालपण आठवले. फक्त एका दुकादाराच्या पोरीला बाघायला मिळावे म्हणून मी एकदा दिवसातून पाच वेळा चुना पुडी आणायला गेलो होतो तेंव्हा तिची आई म्हणाली होती, “ किती चुना खातो रं इकास, का घराला देतोय?’ नंतर मी तिच्या दुकानाला कधीच गेलो नव्हतो. असो.
मध्यंतरा नंतर सिनेमा ग्रीप पकडतो आणि खऱ्या ड्राम्याला सुरुवात होते. इथपर्यंत लगेच समजून पण येते कि सुरुवातीला नवखे वाटणारे कलाकार आणि त्यांचा अभिनय आता मुरलेल्या सुपरस्टार सारखा वाटू लागतो. हैद्राबाद मध्ये झोपडपट्टी राहायला गेल्या नंतर,” इथं किडा मुंगी सारखं जगायचं का ?” असे जेव्हा अर्ची रडत रडत विचारते तेव्हा तिचा निश्चय ढासळतो कि काय असे वाटते पण नाही ती टिकते. तिचे प्रेम एवढे कच्चे नसते. जीवनाचा संघर्ष करताना स्टोव्ह घेऊन येणारा परशा बघून मला माझी आठवण झाली, मीपण असाच स्टोव्ह घेऊन आलो होतो. मला सोपे गेले कारण मला पाठींबा द्यायला लोक होते, माझा बाप साखर कारखान्याचा चेरमन नव्हता म्हणून माझ्यामागे पिस्तुल घेऊन लोक पाठवले नव्हते त्यामुळे परशा खरा हिरो वाटतो. पाटलाच्या पोरीला झाडून काढायचा त्रास होऊ नये म्हणून स्वतः झाडणारा, स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालणारा, एका गरीब प्रेम करणाऱ्या नवऱ्याची देहबोली जी पारशाने वठवली आहे त्याला तोड नाही. चित्रपट बघताना माझ्या डोक्यात कायम एक विचार होता, हा संबध फक्त जातीशी आहे का ? पारधी असलेला परशा म्हणून त्याला पाटलाचा विरोध आहे का ? तर तसं नाही. कारखान्याचा चेरमन असलेला कोणीही मराठा जर त्याच्या पोरीवर फाटक्या गरीब घरातील मराठा पोराने प्रेम केले असते तरी त्याच्या अंगावर हे लोक पिस्तुल घेऊन गेलेच असते. कारण तो पाटील सत्ताधारी आणि पैशाचा माज असलेला मराठा आहे आणि त्याच्या दिमतीला आमचे साहेब म्हणून हुजरे करणारे गरीब मराठा आहेत. त्याची पोरगी पळून गेली म्हणून सामान्य मराठ्याची इज्जत जाते पण गरीब मराठ्याची पोरगी पळून गेल्यावर त्या साखर कारखान्याच्या चेरमनची इज्जत जात नसते हे वास्तव आहे.
चित्रपट तेव्हा उंची गाठतो जेव्हा परशा अर्चीवर संशय घेतो आणि हैदराबादच्या रस्त्यावरून हे दोघे भांडत फिरत असतात. तेव्हा इमानदार असलेली अर्ची आणि बायकोवर संशय असलेला एक हतबल नवरा जेव्हा रस्त्यावर अगतिकपणे बसतो तेव्हा गावाकडे असताना पैलवान असलेला परशा आणि आता निम्मे वजन कमी होऊन हाडकुळा झालेला नवरा म्हणजेच खरा नटसम्राट. ह्याला इथे मोठे मोठे सवांद फेकून लोकांना जेरीस आणण्याची गरज पडत नाही.
सिनेमा बघताना कायम जाणवत राहतं कि नागराज मंजुळे यांनी शेक्सपियर कोळून पिलेला आहे.
“whole world is a stage and we are mere puppets in the hands of destiny “ दुखान्त हीच सर्वश्रेष्ठ कलाकृती समजली जाते हे नागराज यांना माहित असावे.
धक्कादायक शेवट करताना हिंसेचे स्वरूप कसे असते. Condemned, death race हे चित्रपट इंग्रजी मध्ये मला हिंसात्मक वाटतात. पण शेवटी लहान बाळ चालताना रक्ताचे पाउले उमटून दाखवली जाणारी हिंसा हि त्या हिंसेपेक्षा भयानक वाटली आणि हितं माझ्या डोळ्यात पाणी येताना मला कंट्रोल करताना माझी धांदल उडाली. मी सेन्सोर बोर्डवर वर असतो तर या चित्रपटाला ”A” हे प्रमाणपत्र दिले असते. (हे वाक्य दिग्दर्शकाने कोम्प्लीमेंट म्हणून घ्यावे)
शेवटी एक सांगतो. नागराजने गावगाडा ओळखला आहे, जातीव्यवस्था ओळखली आहे हेच त्याच गोष्टीवरून सिद्ध होते कि, पारधी असणारा पारश मराठ्याची पोरगी घेऊन पळून गेला तरी त्याची जात त्याच्या घरच्यांना जातीतून बहिष्कृत करते. भारतात जातीव्यवस्था टिकण्याचे हेच गमक आहे इथे उच्च पासून तथाकथित कनिष्ट पर्यंत सगळ्यांनाच जातीचा अभिमान आहे. आणि जात अशीच टिकून राहणार आहे हा भयंकर दुखदायक आत्मविश्वास माझ्यात निर्माण होतो.