Tuesday, May 17, 2016

पर्शाट



कॉलेजला असनाऱ्या प्रत्येक नवतरुणाला आपण पण तसंच असलं पाहिजे असं वाटावं तसा असणारा परशा. आत्मविश्वासपूर्ण, देखणा, मजबूत बांध्याचा, क्रिकेट टीमचा कप्तान असून सुद्धा कॉलेज मध्ये छान  मार्क मिळवणारा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवाला जीव देणारे दोन दोस्त असणारा. असा परशा त्या गरीब घरचीच नाही तर त्यांच्या पूर्ण त्याच्या खानदानासाहित पावण्यारावळ्याची सुद्धा तो त्या गरिबीतून मुक्ती करण्यासाठी जन्म घेतलेला आवतार आहे, अशी त्याच्या घरच्यांची खात्री असते. “आम्हाला उनाताणात काम करावं लागतं, जरा सावलीतीली नोकरी बघा” ह्या वाक्यातून परशाच्या बापाच्या कित्येक पिढ्यांचे दु:ख अधोरेखित होते. पण जगरहाटीप्रमाणे आपला हिरो परशा हा तिच्या अर्चीचीच स्वप्ने बघत असतो.

नुसती अर्ची आली म्हणून नावेतून तलावात खुपसी मारून पोहत, पळत त्याच्या प्रेमाला नुसतं बघायला जाणारा परशा हा अखिल भारतीय तरुण मंडळाचा आदर्श असतो. आणि ती आर्ची म्हणजेच पोपटाचा डोळा आहे आणि तो आपल्याला फोडायलाच पाहिजे नाहीतर ह्या जिंदगीत काहीच अर्थ नाही, असल्या मायावी विचारांनी त्याच्याच नाहीतर महाराष्ट्रातील प्रत्येक परशाच्या डोक्यात घर केलेले असते.

प्रेम होत असताना आणि प्रेम करत असताना परशाच्या, प्रत्येक देहबोलीत, डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास आहे. तो जातीय उतरंडीत सर्वात खालच्या जातीतून येत असून सुद्धा, घरची कमालीची गरिबी असून सुद्धा पाटलाच्या पोराला , “असशील पाटलाचा, तरी उभा चीरीन” असं म्हणणारा परशा मांडताना दिग्दर्शकाने प्रेमात पडल्यावर मुलगा हिरो आसतो आणि गावात जातीयवाद पण जेवढी चर्चा होतेय तेवढा नाही हे सिद्ध केले आहे. नाहीतर गावच्या पाटलाच्या पोराला पारध्याच्या पोराने , “उभाच चिरीन ” असं म्हणनं आमच्या गावात तर अजून पण शक्य नाही.

प्रत्येक मनुष्य जीवाचे इथपर्यंतचे आयुष्य हे आनंदमय, स्वप्नमयच असते. पण प्रत्येक मानवाच्या जीवनात संघर्ष पाचवीला पुजलेला नसला तरी सटवाईने तो लिहून ठेवलेलाच असतो. नाहीतर बालपणीचे ,नवतारुण्यातील लोकांचे फोटू बघताना “आयुष्य सुंदर आहे” असे वाटत असते तर त्यांचेच चाळीसीतील रापलेले चेहरे बघितल्यानंतर,” ह्याला जर फिरून ह्याची जिंदगी लहानपणापासून सुरु करायचा चांस दिला तर ह्याला किती आनंद होईल” असे भाव आपल्या मनात येत असतात. पण आपल्याला  माहित असते कुणाला फिरून जरी लहानपणापासून जगण्याचा चांस दिला तरी तो फिरून तिथंच येणार असतो. त्यामुळेच तो चांस कुणालाच मिळत नसावा.

चित्रपटामध्ये सुरुवातीला मर्द भासणारा परशा जेव्हा मुलीच्या बापाला रंगेहात सापडतो तेव्हा मात्र त्याच्या मर्दानगिला ओहोटी लागते कि काय असे वाटते आणि तो त्याला बेदम मारणाऱ्या त्याच्या प्रेमिकेच्या भावाच्या अंगावर हात टाकायचे धाडस करत नाही. ह्यालाच म्हणतात भारतीय मुलगा. आपण काहीतरी त्यांची चूक केल्याची भावना हि त्यावेळी मुलांना हतबल बनवते. असे कितीतरी मार खाल्लेले प्रेमवीर मी डोळ्याने बघितले आहेत.  घरी येऊन वडील मारत असताना खाली बघून मार खात जेव्हा तो निघून जातो तेव्हा खऱ्या पारशाचा सिनेमा चालू होतो. इतका वेळ तो अर्चीचा असतो.
ह्या घटनेपासून परशाच्या देहबोलीत जो फरक जाणवलाय तो ३६०% आहे. तिथे परशा मधील कलाकार जागा करायचे काम दिग्दर्शकाने केले आहे. माराणे तोंड फुटून रेल्वे स्टेशनवर उतरणारा परशा जेव्हा स्वतःच्या घराची जबाबदारी घ्यायचीय म्हणून झाडून काढतो तेव्हाचा त्याचा अभिनय जगातील कोणत्याही प्रेम करणाऱ्या माणसाला जिंकून जातो.

“जातु बाहेर, मी काढतो झाडून” असे म्हणणारा परशा

आणि “तुला लसून पण सोलायला येत नाही का ?” असे आश्चर्य चकित होऊन तेव्हा हसत हसत विचारणारा पण आतून थोडासा नाराजी झाकून अर्चिला विचारणारा नवरा , परशाने अफाट पणे साकारला आहे.
इथून पुढची चाळीस मिनिटे फक्त परशाची आहेत. किती जरी प्रेम केले तरी बायकोवर संशय घ्यायचा नवऱ्याचा जन्मजात अधिकार पण गाजवातोच.
पण परशाच्या अभिनयाला उंची तेव्हा प्रपात होते जेव्हा तो हॉटेल मध्ये अर्चिला कांठाळीत मारून तिच्या मागे रस्त्यावरून चालत असतो. त्याचे ते चालणे, त्याचे कमी झालेले वजन, त्याचा तो शर्ट पाहून एक उमदा कलाकार मराठी सिनेमा श्रुष्टीला भेटला याचा मला खूप आनंद झाला. पारशाच्या माध्यामतून दिग्दर्शकाने एक बाजू समोर मांडलीय ती  आजपर्यंतच्या अनेक लेखात कुणी मांडलेली दिसली नाही.

परशाला त्याच्या आईबापाची आठवण येत नाही का ? कि परशा अर्चीच्या प्रेमात येवढा अखंड बुडालाय कि तो स्वताचे कुटुंब विसरला आहे. जर परशाचे आई वडील श्रीमंत असले असते आणि अर्चीचे गरीब तर अर्चिला इतकी आठवण आली असती का ? आणि परशा एवढ्या सोप्या पद्धतीने श्रीमंत घराला विसरू शकला असता का ? असे बरेच प्रश्न दिग्दर्शक आपल्या समोर मांडतो.

शेवटी संपताना एवढेच म्हणू इच्छितो कि या चित्रपटाचा नायक अर्ची नसून परशा आहे. 

1 comment:

  1. https://www.maximizemarketresearch.com/reporttype/material-chemical/

    ReplyDelete