Friday, May 27, 2016

आज ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनासमर्पित, "बार्शीचा पांडुरंग सांगवीकर"

तारीख – २७ मे २००२
हॉस्टेल खोली नंबर – ३०५
वेळ – कातरवेळ
उदाहरणार्थ हि गेल्या अर्ध्या तासातील तिसरी सिगारेट. सिगारेटचा पण कधी कधी कंटाळा येतो पण तिच्याशिवाय दुसर कुणी जवळचं पण वाटत नाही. आज शनिवार आहे, पण हि वेळ आणि तारीख भयंकर वाईट, हा आब्या पाटील, सयाजी, आणि पैग्या माझ्या पैशाला अगोदरच पांडुरंग लावतात आणि नंतर मी रिकामा झालो कि मला यांच्या तोंडाकड बघत बसावं लागतं. शेवटचे दोनशे रुपये राहिलेत, आज बाहेर पडलं कि हे लोक पिणार खाणार आणि आपले आहे तेवढे पण पैसे संपून जाणार. त्यापेक्षा हे सिगारेटचं पाकीट आणि हि ययाती आज संपवून टाकू. एका रात्रीत. तशी मस्तच आहे ययाती.
तेवढ्यात परभणीचा आब्या पाटील, सयाजी आणि उस्मानाबादचा पैग्या अगदी दार तोडूनच एन्ट्री मारल्यासारखी एन्ट्री मारतात.
“कारे पांड्या रांडच्या, तिन्ही सांजंला खोलीत का बसलाय, आरं चलकि कि मस्त रंकाळ्यावर वगैरे जाऊन येऊ आज वर्गातल्या पोरी पण येणार हायेत, आन आज चक्क चड्डी घालून बसलाय, मला वाटलं होतं फक्त वरून टावेल टाकून बसलेला असशील” पैग्याचं क्यासेट चालू झालं
“पयली गोष्ट पैग्या ती “रांडच्या” शिवी तुझ्या तोंडात शोभत नाही, तू आपलं “आयघाल्या”, “झवन्या” ह्या आपल्या आपल्या शिव्याच देत जा, ह्या कोल्हापूरच्या पोरात मिसळून बिघडून घेऊ नको स्वतःला” पांडुरंग म्हणाला.
“अयं जाउदे, आन हि काय, आज मोठी गोल्डफ्लेक सोडून छोटी गोल्डफेक, ख्या ख्या ख्या बंडाळ उटली काय? “ आब्या पाटील दात काढत बोलला, त्याच्याकडे पांडुरंगने दुर्लक्ष केले. पण आब्या थांबायचं नाव घेत नव्हता.
“आरं पांड्या, सुदररं लका सुदर, आरं “कोटलर” वाच “पीटर ड्रकर” वाच, काय तरी फायदा हुईलरं! च्यामायला हि वि सं खांडेकर, बाबा कदम, व. पु. काळे, पु लं काय तुला भाकर देणार नाहीतरं, आरं इचार कर लका, बाप आडतीवरची निम्मि पट्टी तुला पाठवतोयरं~~~ सुधरर लका सुधर, आरं न्हायतर हि अचूत गोडबोले तरी वाचारं, आपल्या प्रचार्य बाईनी मला खास दिलंय हे “बोर्ड रूम” नावाचं पुस्तक”, आता आब्यान पाटलाने बडबड चालू केली.
“आरे साहित्य म्हणजे तुम्हाला काय समजणार, जीवनाची परिभाषा निर्माण करून आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवते ते साहित्य असते मित्रा” पांडुरंगने एकुलते एक पुस्तकी वाक्य फेकून पुन्हा लगेच बोलला,
“बाकी ते अच्युत का कोण गोडबोल्याचे पुस्तक मला माहित आहे, लोकांच्या इंग्रजीतल्या केस स्टडी वाचून त्याने मराठीत तुमच्या सारख्या चुत्याना समजावे म्हणून लिहिले आहे आणि ती आपली प्राचार्य देशपांडे म्याडम त्याची पाव्हणी आहे म्हणून त्याच्या पुस्तकाचा प्रचार करत आहे. तुम्हीच सुधरा राजेहो.., हे लोक आपापल्या लोकांना मोठं करण्यात गुंतले आहेत.
“बरं ऐका, काल मी बाबा कद्माची “पाटलाचा दणका” हि कादंबरी वाचत होतो. गावचा पाटील कादंबरीतल्या हिरोनीला उसात नेहून उडतो, त्या हिरोनीचा ठोक्या हा फौजदार असतो, त्याला समजते, आता केस कोर्टात गेलीय, मग मी थांबलो, कोर्टात काय होणार माहिताय मला. बाकी हि “यायाती” पण बरीय, ह्यात आपला राजा चोटाळ भाड्या दाखवलाय , वाड्यातल्या बायावर चढतो, गल्लीतल्या बायावर चढतो, अख्या राज्यातल्या बायावर चढतो त्यानं पण त्याचं भागत नाही म्हणून शेवटी सुनंवर पण चढतो कायकी, आता तिथपर्यंत आलंय, पुढे तो सुनंवार चढतो का नाही ते मी तुम्हाला उद्या सांगतो, तुम्ही या जाऊन रंकाळ्यावर , त्या पोरीवर शंभर दोनशे खर्च करून या मोकार, बाकी हे वि सं खांडेकर, फडके वगैरे नसते तर आमच्या सारख्या आंबट शौकिनांचे काय झाले असते कुणास ठाऊक, तुम्हाला सांगतो पोरांनो, हे काय खरे साहित्यिक नाहीत, कुणी चांगलं लिहित नाही म्हणून यांना वाचावं लागतंय”
“लागला का लका तू साहित्यावर बोलायला, चला रं पोरानो, घालूद्या ह्याची आय हितंच, बाकी तू आंबट शौकीन नाही, नुसती पुस्तकं वाचून , पुस्तकातल्या डाकूने हिरोनीला उसात नेली म्हणून खुश होणारा घाबरट आहेस तू, तुझ्यात दम असता तर त्या मंजिरीला पटवली असती, तुझ्या मागे लागलीय ती, आज बघू कुणाबरोबर येतीय रंकाळ्याला, तू बस वाचीत, तो यायातीतला राजा किती बयावर चढतोय ते” आब्याने लेक्चर दिले आणि ते तिघे तडा तडा खोलीतून निघून गेले.
हे म्हणजे तंतोतंत खरं आहे कि काय, आब्या जाताना च्यामायला शेपटीवर पाय देऊन गेला, आपल्याला पोरी पटत असताना आपण मागे का सरतोय, आताच नाही अगदी डिग्री पासून, आणि तो आपला मोठा भाऊ, चांगदेब पाटील, तो पण आजून काराच आहे, कमीत कमी खंडेराव नं तरी उरकून घ्यायला पाहिजे आता, राव त्यामुळे ह्या धाकट्या पांडुरंगचे हाल होतात. दोन मोठ्या भावाची उरकल्याशिवाय आपण कसं लग्न करायचं. हट, पांडुरंग तू खरंच थोर आहे, आहे तुला लग्न कर कोण म्हणतंय,
“आपल्या दोघातील मैत्रीच्या/प्रेमाच्या बंधाला तू कोणतहि नाव देवू नकोस, कोणत्याही नात्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस, हे असंच राहूदे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे प्रतिबिंब पडून उजळलेल्या त्या झुळू झुळू वाहत असणाऱ्या झऱ्या सारखे, त्या झर्याला जसा कुणीहि बांध घालु शकत नाही, तसेच आपण अगदी उन्मत्त होऊन्न वाहत राहू, वाहत जाऊ अव्याहतपणे प्रेमाच्या वाटेवरून त्या दूर कधीही हि न पोहचू शकणाऱ्या क्षितिजा पर्यंत” ख्या ख्या ख्या ......हे लय थोर आहे, नुसतंच वहात जायचं मायला........
हो, हे पण तंतोतंत खरंय, असली वाक्य फेकली कि पोरींना लग्नाची वचनं द्यावी लागत नाहीत. आपल्याला हे खोलीत बोलायला जमतंय पण मंजिरी समोर जमेल का? ती तयार होईल का? बर आपल्याला लग्न करायचं नाही असे पण नाही ते फक्त आपल्या हातात नाही एवढंच. बाकी आमच्या बापाने एकदा खंडेरावला बाशिंग बांधलं कि करीन कि मी लग्न.
पाचवी सिगारेट आताच संपत आली, आजून फक्त पाचंच उरल्यात. रात्रभर पुरतील का? धतसाला, पुस्तक वाचायचा मूड पण गेला. आपणच काय तरी पुस्तक फिस्तक लिहून दाखवायला पाहिजे , साहित्य काय असते ते, ह्या साडेतीन टक्क्याच्या साहित्यातून साडेशहाण्णव टक्क्यांना मुक्ती मिळवून दिली पाहिजे.
रोहिण्या पडल्यात म्हनं गावाकड, आई, आबा, म्हातारी यांची लगबग चालू झाली आसंल, कुळवणी पेरणी, चांगल्या बिया शोधा, मारवाड्याला डबल पैसे देऊन खत, बिया खरेदी करा, त्याना आपल्या जीवावर श्रीमंत करा आणि पुन्हा शेतकरी राजा म्हणून मिरवा. हे घाण आहे पांडुरंग, तू कधीही शेती करू नकोस, आयतखाऊ होऊन लोकांना शेती कशी करायची शिकव, तू साहेव होऊन बांधावर उभा राहून गारपीटीचा रिपोर्ट तयार कर, तू कलेक्टर होऊन जिल्ह्यात दुष्काळ नाही असा रिपोर्ट मायबाप सरकारला देऊन प्रमोशन बघ आणि गावातल्या लोकासमोर, मी शेतकर्यांसाठी, गरिबासाठी कलेक्टर झालोय असे भाषण दे, तू उस पिक किती खराब आहे म्हणून रिपोर्ट देणारा जलतज्ञ हो, तू कांदा हे जीवनआवश्यक पिक आहे म्हणून निर्यात बंदी करणाऱ्या सरकारात जा पण तू शेतकरी होऊ नको.
पांडुरंगा तुला तुझ्या शेतात खपलेल्या हजारो पिढ्यांची शपथ आहे, शपथ आहे तुला त्या शिन्ग्रोबाची तू शेतकरी झाला तर!!!!

1 comment:

  1. https://www.maximizemarketresearch.com/reporttype/material-chemical/

    ReplyDelete