Tuesday, September 15, 2015

त्या माळरानाच्या मधून वाहणाऱ्या  क्यानॉलच्या कमरेइतक्या पाण्यात उड्या मारत आणि एकमेकांच्या टांगड्या वोढत पोहणाऱ्या शिडशिडीत अंगाच्या नागड्या पोरांकडे तो किनाऱ्यावर उभा राहून बघतोय. वैशाखातले दुपारचे उन लागू नये म्हणून त्याने टोपी आणि गॉगल घातलाय. ती शिडशिडीत आणि काळ्या वैगेरे रंगाची पोरं पाण्यातून बाहेर येउन अंग शेकेल अशी माती अंगावर टाकून घेत आहेत आणि माती भाजल्यावर क्षणभर ओरडून मग अंगाला शेकणाऱ्या गर्मीचा आनंद घेऊन पुन्हा पाण्यात उडी टाकत आहेत. त्या पोरांचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नाहीय. तो त्यांच्यात स्वताला शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्याला कपडे काढून पाण्यात उडी मारू वाटतेय पण गेलेल्या भूतकाळातील क्षणाला किती जरी प्रयत्न केला तरी तो पकडू शकणार नाही याची त्याला भीती वाटतेय. पाणी पण जरा घानंच दिसतेय. तो पाण्यात उतरतो, ओंजळीत घेऊन तोंडावर मारतो आणि तिथंच जराश्या अंतरावर असणाऱ्या भुईमुगाच्या शेताकडे जातो. भुईमुगाच्या शेंगा काढत असताना शेतात येणारा वास त्याला खूप आवडतो. शहरात मिळणाऱ्या प्रत्येक पर्फुम मध्ये तो वास शोधत असतो. पण त्याची आवड हि पांढरपेशी नाही हे कळल्यापासून त्याने ते पर्फुम शोधायचे बंद केलंय.  बायका वेल उपटत आहेत, त्यांची लेकरं उनात त्या वेलींच्या गर्दीत मातीत काहीतरी खेळ शोधत आहेत.  नाहीतर तवलीत, जर्मनच्या डब्यात, किंवा खोल्यात करून दिलेला भाकरीचा काला चिवडत दिवस कधी मावळतोय आणि आईचे लक्ष आपल्याकडे कधी जातंय याची वाट बघत आहेत.  तो पुढे सारून एक वेल हातात घेऊन शेंगा खाऊ लागला तेवढ्यात त्याला एक माउली आपल्या जराश्या थोराड पोराला शिव्या देताना दिसली,
"ये मुडद्या कुठे फिरतोयरं जरा शेंगा तोडू लाग म्हणलं तर गोळा आलाय तुझ्या पोटात…सांगून ठीवते, काय शेंगा खायच्या असल्या तर हितंच खा, घरी गेल्यावर वाटुन आलेल्या शेंगाला हात लावशील तर मुडदाच बसवील तुझा, काय मेलं हि बी  असलाच आणि ह्याचा बाप बी असलाच, नकु करून सोडलाय जीव ह्या बाप लेकानी'. त्याने तो वेल खाली टाकला आणि घराच्या दिशेने सावकाश निघाला. 




No comments:

Post a Comment