Sunday, January 26, 2014

२६ जानेवारी

विसेक वर्षापूर्वी, उद्या २६ जानेवारी म्हणता आदल्या दिवशी शाळेला दुपारून सुट्टी मिळायची. कपडे धुवायला आणि इस्त्री करायला असावी बहुतेक. कारण अपवाद वगळता सगळ्या लेकराकडे एकच खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा. मग त्या दिवशी आम्ही सगळे दोस्त कुणाच्या तरी एकाच्या घरी जमायचो आणि पितळंच्या तांब्यात कोळसा टाकून आमची इस्त्री चालू व्हायची. तास दोन तास झटून झाल्यावर हा खेळ बंद व्हायचा कुणाच्या तरी सदऱ्यावर कोळसा पडल्यावर. तो बिचारा बारकं तोंड करून जायचा आणि आईचं धपकं खायचा. त्या धपक्याच्या आवाजानं आम्ही गपचीप लेपाटं अंगावर घेवून झोपायचं सोंग करायचो. तेवढ्यात आई म्हणायची "झोपंय मुडद्या कायतरी जी न्हाय तीच उदेग करून बसतंय, येवूदि ह्यांना तुला सांगते कसं असतं ती " संध्याकाळी वडील आल्यावर बहुतेक परटाकडून इस्त्री करून आणत असतील कारण दुसर्या दिवशी सदरा आम्ही ज्या अवस्थेत सोडलेला असायचा त्यापेक्ष्या भलताच चांगला दिसायचा.

खाकी चड्डीत कधी न्हायतीच पांढरा सदरा खवुन प्रमुख पाव्हणे, सरपंच, पाटील, भावी सरपंच आणि मुख्याध्यापक यांची भाषणे संपायची वाट बघायची. दोनचार तास उन्हात बसायचा त्रास व्हायचा, पण वैताग नाही यायचा कारण शाळेला सुट्टी आणि भाषणे संपल्यावर मिळणारी दोन बिस्किटे आणि दोन लेमन गोळ्या. एकदा कार्यक्रमाचे अध्यक्श्य शेवटचे वाक्य म्हणाले "आज २६ जानेवारीच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपुन सगळी हाव नाहीतर काय खरं नव्हतं, गांधीजी, पंडित नेहरू, सुभाष चंद्रबोस ह्यांची आठवण काढून मी माजे चार शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र!" कि आम्ही पोरं ओळीत उभे राहून गोळ्या बिस्किटाची परात आमच्या पर्यंत कधी येतीय त्याची वाट बघत बसायचो. शेवटच्या भाषणा नंतर मिळणाऱ्या दोन बिस्किटाची आणि लेमन गोळ्याची चव आज सहजच आणि नेहमीच उपलब्ध असणाऱ्या "हर्सिस " ला कधीच मिळणार नाही.

पांढरा सदरा आणि खाकी चड्डी शाळेच्या गणवेशातून हद्दपार करणाऱ्यांचा जाहीर निषेध निषेध निषेध!

No comments:

Post a Comment