Tuesday, November 26, 2013

शंभर वर्ष जगणे

परवा आज्जी वारली. गावातील लोक म्हणत होते "शंभर वर्ष्याची तर आसलंच म्हातारी, आता तिच्या सिनंचं कोणंच न्हाय गावात". होय बघितले असतील तिने शंभर पावसाळे. सत्तावीस वर्षा पूर्वीची मला आठवते तेव्हा पण ती तितकीच म्हातारी वाटायची. तरीसुद्धा रानात आम्हाला चालत घेवून जायची, कधी कधी कडेवर बसण्यासाठी माझी आणि चुलत भावाची भांडणे व्हायची म्हणून ती दोघांना पण घ्यायची. तिच्या त्या लाकुड्तोड्याच्या  आणि चांदणी  महालाच्या गोष्टी अजून जश्याच्या तश्या आठवतात. रानातल्या घरात विहिरीशेजारी खाली चवाळं अंथरून आणि गोधडी माने पर्यंत घेवून चांदण्या कडे बघत बघत तिच्या गोष्टी ऐकत झोपणे आणि त्या गोष्टीत स्वताला शोधणे. नंतर किती तरी वर्ष तिच्या गोष्टीतला लाकुडतोड्या जो राजकन्येला पळवून आणतो तो मीच आहे असे भास व्हायचे आणि मी तसेच वागायचे. तरुणपणी तिने केलेल्या वर्णनाप्रमाणे राजकन्या शोधण्याचा प्रयत्न केल्याचे पण आठवते. आज्जीच्या आणि लहानपणीच्या कित्येक आठवणी मला खूप सतावतात. आत्ताच.  मग शंभर वर्ष  आज्जीचा प्रवास मावळतीकडे सुरु झाला असेल तेव्हा तिला किती प्रकारच्या आठवणीनी छळले असेल? शंभर वर्ष्याच्या आठवणी, केवढा मोठा तो क्यान्व्हास . तिचे ते १९२० च्या आसपासचे बालपण, तरुणपण तिला त्रास देत असेल का? तिला तीन महिन्यापूर्वी भेटायला गेलो होतो, तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो "आई मी इकासाय" तिने माझ्या हाताला हात लावला आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात चुलती म्हणाली " रडायला काय होतंय आत्याला कुणास ठावूक? " पण मला त्या भावना समजल्या असाव्यात बहुतेक.

लग्न, नवरा, संसार, सहा लेकरे, नातवंडं, पत्रुंडं…… आणि शंभर पावसाळे. प्रत्येक पावसाळ्यातला वेगळा आनंद आणि वेगळ्या आठवणी. प्रत्येक सुगिने दिलेले भरभरून सुख आणि लेकरांच्या चेहऱ्यावरचे समाधान. मी आज्जीच्या मृत्यू पूर्वीच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत आहे. हो मनाचा ठाव, शक्य आहे का ते ?

तसा आठवणीना काहीच अर्थ नसावा. त्या फक्त सम्भाळाव्यात. तेच क्षण पुन्हा जमा करण्याचे प्रयत्न फसवे आणि अर्थहीन असतात. ते अशक्यच. वर्तमानात जगून भविष्याचा वेध वगैरे घ्यावा, ते ठीकाय पण कश्याला कश्याचा तरी वेध घ्यायचा हा एक मोठाच प्रश्नाय. म्हणजे आयुष्यात काही तरी मोठे करावे वगैरे वगैरे. सगळं भंकसाय. करोडो आले करोडो गेले आयुष्यात मोठे करणारे किती होते ? आणि मोठे करून काय मिळविले. गेलं कि संपलं. साधे तत्वज्ञान. सब माया है. किती वर्ष जगलो, आणि काय काय भोगलं सगळं खोटय साफ खोटं. जिथं वेळ हि संज्ञाच सापेक्ष आहे तिथे वर्ष मोजण्याला काही अर्थ आहे का?

आणि रुढ अर्थाने शंभर वर्ष जगून सुद्धा अजून जास्त जगण्याची आणि श्रुष्टी पाहण्याची नैसर्गिक मानवी इछ्या. माणसाचे जगणे शंभर वर्ष असेल किंवा दहा वर्ष असेल याला काहीच अर्थ नसावा. जायचे तर आज पण उद्या पण किंवा कधी पण.  आणि ह्या आफाट ब्रह्मांडात आणि  त्याच्या आयुष्यात आपले जगणे/अस्तित्व  म्हणजे किती शुद्र? अर्थहीन.




2 comments:

  1. शुद्र नव्हे क्षुद्र ... दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत .

    ReplyDelete
  2. आभारी आहे, उदय. लिहिताना थोडेसे दुर्लक्ष्य होते शुद्धलेखनाकडे. आणि मला याचे दोन्ही अर्थ माहित नाहीत. आपण आपले लेखन लोक वाचत आहेत हे कळल्यामुळे आता काळजी घ्यावी लागेल .

    ReplyDelete