Friday, September 13, 2013

नीचतम लोकशाही

1995, विधानसभा निवडणूक, उमेदवार गरीब शेतकऱ्याचा पोरगा, कार्यकर्ते त्यापेक्ष्या अतिसामान्य.  फाटके,  तुटके तरी पण घरून भाकर बांधून येणारे आणि उमेदवाराकडून कसलीही अपेक्ष्या नसलेले. कुणी तुळजा भवानीला नवस बोलून आपला उमेदवार निवडुन येई पस्तोर चप्पल सोडलेली, कुणी मटन सोडलेले, कुणी तंबाकू सोडलेली. स्वताच्या कल्याणासाठी जेवढे कष्ट घेतले नसतील, नवस बोलले नसतील तेवढे आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी बोललेले. चमत्कार घडतो. ह्या फाटक्या आणि गरीब कार्यकर्त्याचा उमेदवार भलत्याच मात्तब्बर आणि प्रस्थापित आमदाराला हारवून निवडुन येतो. तुराट्याच्या घरात, गायीच्या गोट्यात आणि घर नाही म्हणून परसात राहणारी पोरं आपलाच दोस्त आमदार झाला म्हणून हा जल्लोष करतात. विद्रोहाचा विजय होतो.

एकाच वर्षा नंतर. एके काळचा विद्रोही उमेदवार आणि आजच्या सत्ताधारी आमदाराचा बंगला. फाटके तुटके तेच झिजलेले कार्यकर्ते कामाच्या आशेने आलेले. बंगल्याच्या हॉलमध्ये गळा आणि मनगट पिवळे धमुक असलेले तेच बगळे ज्यांनी अगोदरच्या प्रस्थापित वतनदार आमदाराकडून पण सत्ता भोगलेली आणि ह्या कार्यकर्त्यांना त्याच्या तत्कालीन मालक विरुद्ध प्रचार कराल तर घर उनात बांधण्याची धमकी दिलेली. त्यांना बघून पोरं दचकतात. इकडे तिकडे बघतात.

"बसारं बसा !" एक घोगरा पण माजलेला आवाज
"आरं सोफ्यावर न्हाय खाली बसारं" पुन्हा तोच आवाज

"च्यायला सगळी पुढारीच हायेत हितं!" स्वगत

काही पोरं लगेच बसतात, कंटाळून आलेली असतात, काही खोळम्बतात, दोघं कडेला उभा राहतात.

कारं ? खाली बसायला लाज वाटती का? झेड पी सदस्य हायस काय? धाकटं मालक येत्याल आता, आताच आंगुळ झालीय, देव पूजा चालूय मालकाची. दुपारच्या बारा वाजलेल्या असतात. थोरलं मालक अधिवेशनाला गेल्यात.

खाली बसलेल्या सात पोराकडे बघून उभा राहिलेल्या दोघांना कीव येते आणि ते तसेच बाहेर पडतात.

विद्रोहाचा एकाच जळजळीत वर्षात पराभव !

जनता ज्यावेळी आपणच निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधीना मालक म्हणते ती लोकशाहीची निच्चांकी पातळी असते. आपण सध्या लोकशाहीच्या नीचतम पातळीतून मार्गक्रमण करत आहोत. जोपर्यंत महाराष्ट्रातले सगळे मालक, सरंजाम, वतनदार नष्ट होवून जनतेच्या बरोबरीला येत नाहीत तोपर्यंत भारतात लोकशाही प्रस्थापित होणे कठिन आहे.  





No comments:

Post a Comment