Saturday, September 14, 2013

भाग चार

आसं रात्री एकटं एकटं उगडंच उताणं पडुन चांदण्याकडं बघत राहण्यात जगातली सगळी शांतता आणि समाधान आसंल. कधी कधी अंगावरच्या कापडाचा पण त्रास वाटायला लागतो. कधी कधी का  मला तर नेहमीच त्रास वाटतो. माणसानं  थंडी वाऱ्यापासून वाचावं म्हणून पहिल्यांदाच कापड न्हायतर काय तरी अंगावर घेतलं आसल आण त्याला कळलं आसल कि, आरे वाह ह्याच्या मुळं जरा बरं वाटतंय मग सगळ्यांनीच ती कापडं वगैरे घालायला चालू केलि असतील. मग कुणी तरी दीड शहाण्या लोकांनी कापडाचा अन इज्जतीचा संबंध जोडला आसंल. आता हि वाही फकस्त  माणसानीच लावून घेतल्यामुळं तो स्वताला इतर  जनावरां पेक्ष्या हुशार समजू लागला आणि तो अजून त्याच येडातंय. नको चड्डी काढायला नको. येवढा पण काय तरास न्हाय होत.  पण गावाकडल्या रिकाम्या काळ्या वावरात उन्हाळ्यातल्या चांदण्या रात्री उताणं पडुन राहण्यात आणि हितं फरकाय.  हितं खाल्लाकडून येणाऱ्या पुण्याच्या उजेडानं सगळ्या आकाशाची मारून ठिवलिय. निम्म्या आकाश्यातल्या चांदण्याच दिसत नाहीत्या. तरी खाल्ल्या गोंधळा पेक्ष्या बरंच वाटतंय. च्यामायला येवून आपल्याला दोन चार दिवस झालं नाहीत तवरच आपुन भांडणं कसकाय केली? घालू आय काय भ्यायचंय, आली अगावर घेतली शिंगावर. पण आपुन काय भांडण्यासाठी न्हाय आलो हितं. अभ्यास करावा लागंल. आपल्या खान्दानातच काय आख्या कुणबी-शेतकऱ्यांच्या किती लेकरांच्या नशिबात आसतंय आसं शिक्षण आणि वातावरण?

उच्चभ्रू म्हणावं असंच कॉलेज आणि होस्टेल अन टेबल टेनिस, बिलियर्डस खेळायची सोय असलेली झाकपाक खानावळ. बापाच्या खात्यावर जास्त पैसे झाले म्हणून कॉलेजला दान देवून आलेली "डुड " पोरं तर शेतं घान ठिवून पोटं खपाटी गेलेल्या शेतकऱ्यांनि  स्वताच्या पोटाला चिमटा काढुन शिकायला पाठवलेली आणि इथं येवून "डुड" पणाची झूल पांघरलेली काही पोरं . च्यामायला पण आपण कश्यात मोडतो ? पहिल्यात नक्कीच नाही, मग दुसऱ्यात ? काय माहित पण आपुन कश्याची झूल पांघरली नाही हे काय कमी न्हाय. एक बरंय इथं  कुणाच्यात काहीच फरक न्हाय. खाणं, पिणं, फिरणं, सगळं अगदी बरोबरीनं. कुणीच कुणाच्या आयला मावशी म्हनायला तयार नाही. भारतात लोकशाही आणि समाजवाद खरा कुठं नांदत आसंल तर अश्या ह्या कॉलेज्यात आणि होस्टेलात. पण मग आपुन दुसऱ्या वर्गात मोडतो ते कसं? आपली आई आणि तात्या खरंच स्वताच्या पोटाला चिमटा काढून जगत असतील का? ह्याट ! सयाजी हा काय प्रश्न झाला? आयुष्यच चिमटा काढीत गेल्यामुळे आता त्यांनाच कळत नसंल कि ते चिमटा वगैरे काढून जगतायत म्हणून. पण मग फक्त आपलेच आय बाप तसे आहेत का ? छ्या छ्या तसं नाही, दोन चार शिक्षकं, साखर कारखान्यावर कामाला असणारी दोन चार कामगारं आणि दोन तीन आजून चुकून शिल्लक राहिलेली जमीनदारं  सोडली तर सगळी गावंच पोटाला चिमटं काढुन जगणारी. छ्या, गावातली जिंदगी काय खरी न्हाय गड्या, जनावरा सारखं राबुनबी शेवटी गरीबीच. आन सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांना माहीतच न्हाय कि ते गरीब आहेत. हे म्हणजे भलतंच पण बरंच म्हणायचं. शहरात कसं आसतं सगळी नोकरीलाच, न्हाय तर धंद्याला, एक शेतकरी नाही. त्यामुळं सगळी शहरं सुखी असावीत. गांधीजी सारखा येवढा मोठा माणूस खेड्याकडं चला कसाकाय म्हनला आसंल? अडाणचोट  आसंल नाही तर खोटं बोलत आसंल आम्ही शहरात येवू नये म्हणून. काय झ्याट आसतंय खेड्यात?  दवाखाना नाही, लाईट नाही, रस्ता नाही, नोकरी नाही, फकस्त ढेकळं, बैलं, नांगुर, कुळव, सांच्याला भजन, बसा बडवीत. ह्यातच जीन्दग्या बरबाद झाल्या आमच्या अनेक पिढ्यांच्या. हे काय खरं न्हाय सयाजी.

शहराकडं चला आसं आंबेडकरनी सांगितलं, खरंच बोलला माणूस. मंत्रच दिला. पाळला  ईमानदारीनं बामणांनी. एक बामन दिसत न्हाय कोणत्याच गावात. शहाणे लोक. निळी नेमाटि कधीच लावणार नाहीत पण इचार मात्र आंबेडकरचेच फॉलो करणार. हे  राजकारण आणि समाजकारण कधी जायचं कुणास ठावूक तुझ्या डोक्यातून सयाजी? साला ह्यातच संपला कुणबी. आपुन न्हाय, आपुन अभ्यास करायचा. इंजिनेर व्हायचं. पोरी तश्या  चांगल्याच आहेत वर्गात. बघू काय होतंय. न्हाय न्हाय ! थर्ड एअर पर्यंत पोरीकडे नाही बघायचं.

खनावळितलं  वातावरण तीन चार दिवसातच अंगावर आलं मायला. जेवण फीवन बरंचाय. बरंचाय म्हणजे चांगलचंय. आपल्याला घरी  तीन भाज्या, कोशिंबिरी का काय म्हणत्यात ती, भात, शिरा अश्या समद्या गोष्टी एकदम कधी मिळाल्यात का सानासुदिशिवाय? पण मेसचा मालक मस्तच रंगेल दिसतोय, एका तरण्या ताट स्वयपाक करणाऱ्या बाईसोबत तिच्या नवऱ्या समोरच चाळं करत व्हता. जबरी बलात्कारापेक्ष्या हि लयच घाण. एका वेळी तीन लोकावर बलात्कार करतोय तो माणूस. ती बाई, तिचा नवरा, आणि गोड सहा वर्षाची मुलगी. बलात्कार काय फक्त शारीरिक असतो का? तिच्या नवऱ्यावर कसला जबरी बलात्कार होत आसंल जवा त्याचा मालक त्याच्या समोर त्याच्या बायकोवर चढत आसंल. ह्याट काय खरं न्हाय ह्या सामाज्याचं जोपर्यंत भूक आहे तोपार्य्नात हे राहणार. शोषण कर्ते बदलतील शोषक बदलतील पण बलात्कार चालू राहतील ह्याला कुणीच थांबवू शंकणार नाही सयाजी तू लय टेन्शन घेवू नको. आन तुला काय माहित तिचा नवराच तिला त्याच्याकडे पाठवीत नसंल. दुनिया लय येगळ्या येगळ्या लोकांनी भरलीय तू नको पडु त्यात. पण खरच मायला रुबाबंय ह्या मेसच्या मालकचा कॉलेजच्या बोर्डापासून ते पोरा पर्यंत लयच वट हाय म्हणं त्याचा. पण खूपच घाण दिसतं ते, गळ्यात पाचेक तोळ्याची चेन, वरच्या दोन गुंड्या उघड्या, आठ बोटात आंगठ्या, भरदार मिश्या आणि पायात कोल्हापुरी चप्पल. घाण काय दिसतंय, जळतोय सयाजी तू, एकदा मामाच्या गळ्यातील चेन मागितल्यावर आई तुला म्हणाली व्हती ह्या वर्षीच्या तुरी झाल्या कि घेवू, कश्याचं काय तीनदा येवून गेल्या तुरी. शेतकऱ्याच्या पोरांनी असलं नाद करूनि. आपण नोकरी लागल्यावरच घ्यायची. किती दालीद्री तिच्यायला आपण आणि आपला समाज. आणि उगंच  मराठा म्हणून स्वताला राज्यकर्ती जमात समजून नसलेली छ्याती फुगुवून जगण्यात काय अर्थ हाय का? हा म्हणजे शुद्ध वेडझवे पणा आहे होय शुद्ध पुणेरी भाषेत "वेड्झवेपणा" . हाहाहाहाहाहा !

त्याला शोधत असणारी इक्बाल आणि आबांनी त्याला एकट्यालाच बघितलं.
"ये सयाजी च्यामायला एवढ्या लांब कश्याला यायचं? तिथंच बाथरूममधी उरकायचं लका, कोणत्या नटीचा फोटो आणलाय का बग रं जरा इक्बाल ह्यानं"

इक्बाल , "आरं बाथरूम मधी कुणीतरी समाजसेवकाने माधुरी दीक्षितचा फोटो लावलाय. आयला पोरं पण भारीच हायती. सयाजी इतक्या लांब कश्याला यायचं"

"हाहाहाहाहाहा " दोघांचा मिळुन हसण्याचा आवाज.

तुमच्या डोक्यात त्याच्याशिवाय काय नसतं का रे? जगात अजून बरीच मोठी मोठी सुखं हायती. डोळं उघडुन बघा. डुकराच्या मनात गूच तसं तुमच्या मनात कायम सेक्स.

आर पण हि बारकी बारकी सुख मिळाल्याशिवाय मोठ्या  सुखाकडं कसं जायचं मित्रा? बरं जाउद्या आज हीत वरीचं झोपू , मी येतो तिघांची पांघरुणा घेवून.

क्रमश:




No comments:

Post a Comment