Thursday, September 5, 2013

धन्यवाद गुरुजी

  1. दहावीचे वर्ष, सगळ्या पोरांना अभ्यासासाठी शाळेत झोपायची सक्ति. रात्रीच्या नऊ वाजत आलेल्या. दोन तासापासून शालि, बदगी, टॉवेल, लुंग्या, चवाळि अंगावर घेवून पेंगत पेंगत वाचत असल्याचे सोंग आणून, सरांची घरी जाण्याची वाट बघत आखिल विद्यार्थी समाज. शेवटी ती वेळ येतेच, सर हात पसरून मोठ्याने आळस देतात आणि म्हणतात. "गोडग्या ~~~~ आक्रा वाजेपर्यंत कुणी झोपले कि मला सांग, टांगडंच तोडतो एकेकाचं.

    सर खिडकीतून लांब... गेलेले दिसले कि माझी बाकड्य़ावरुन उडी मारून सगळ्यांच्या समोर जावून घोषणा - "तर पोराहो, अश्या प्रकारे सर घरापर्यंत पोचलेले हायेत. आणि गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मंडळाने आणलेला मंगलाबाई बनसोडे याचा अमेरिकेत नाव गाजवून आलेला तमाशा आपली वाट बघत हाये. लवकरात लवकर नाही पोचले तर गण गवळण हुकेल" पेंगत असलेल्या पोरांच्या झुपी कुठच्या कुठे पळुन गेल्या आणि पुन्हा टॉवेल, लुंग्या तोंडावर बांधून अखिल विद्यार्थी समाज तमाश्यासाठी तयार झाला. अश्या तर्हेने रातभर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटून शाळेत आलो तर सगळ्यांची अंथरून पांघरुणे शाळेच्या कार्यालयात जमा झालेत असे समजले. काही पोरांना पहाटेच्या गारव्यात घाम आला, काही पोरांना लगवि लागल्यासारखं वाटु लागलं आणि काही माझ्यासारखी पोरं "घालू आय हुइल ती हुइल" असे म्हणून टॉवेल तोंडावर घेवून झोपी गेली.

    सकाळी प्रार्थनेच्या वेळी जेव्हा आम्हा सगळ्या दहावीच्या समाज्याला वर्गातील मुलींच्या समोर सर हाताने, काठीने, रुळाने बदडत होते तेव्हा समस्त वर्ग भगिनींचे चक चू चू चू असे आवाज त्याही स्थितीत आम्हाला त्या मारापेक्ष्या जास्त त्रास देत असलेले चांगले आठवत आहे. अंगावर उमटलेले वळ एक आठवडाभराने गेले पण मनात उमटलेले वळ अजूनही तसेच्या तसेच आहेत. सर, मला विद्यार्थी बनविल्याबद्दल आपला सदैव ऋणी राहील.

    भोसले सर, डि. पी जाधव सर, वाघमारे सर, जैंद सर, काट्मोरे गुरुजी आणि सर्व गुरुजन वर्ग, आज गावापासून शेकडो किलोमिटर दूर तुम्ही दिलेल्या शिदोरीच्या जीवावरच जग पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करत आहोत, काही चुकीचे करताना अजून रुळाचे फटके आणि शब्दाच्या माराच्या भितिने पोटात तोच गोळा आल्यासारखे वाटते. तुमच्या हातून अनेक पिढ्या घडविण्याचे काम होत आहे. सगळ्याच मुलांना तुमच्यासारखेच गुरुजी भेटावेत अशी अपेक्ष्या व्यक्त करून आपल्याला "Teacher's Day" च्या शुभेच्च्या देतो.

No comments:

Post a Comment