Monday, February 22, 2016

राजगड तोरणा २० फेब्रुवारी २०१६



लहानपणी कुणी दुसरा मुलगा ग्यारेगार खाताना दिसला तर मलापण ग्यारेगार खाऊ वाटायचे, दुसऱ्याने कुणी नवीन कंपास वैगरे आणला तर मला पण तसलाच कंपास वगैरे आणू वाटायचा, तरुणपणी एखादा मित्र कोणत्यातरी मुलीवर लाईन मारत आहे कळले तर मलापण तीच मुलगी आवडायची. म्हणजे दुसऱ्याच्या गोष्टी आवडायचा छंद मला लहानपणीपासूनच होता. हो, पण हा छंद खूप सिलेक्टिव्ह होता. म्हणजे एखादा मित्र अभ्यास करताना दिसला तर मला अभ्यास करू वाटला आहे असे कधी झाले नाही. उलट त्याला पण त्या दुष्कृत्यापासून परावृत्त करावे आणि जिंदगानितली अनेक दुसरी सुखे त्याला पण दाखवावीत असे अध्यात्मिक भाव माझ्या मनात दाटून येत असत.
असेच एके दिवशी फेसबुकवर कुठेही कसल्याही विषयावर भांडण चालू नव्हते, कुणी कुणावर स्टेटस टाकलेले नव्हते, कुणा महापुरुषाची जयंती नसल्याने एखाद्या महापुरुषावर कुणी टीका केलेली नव्हती, फेक अकौंटने टाकलेल्या स्टेटसवरुन विद्वानामध्ये चर्चा परिषद भरलेली नव्हती. असे एकूंनच शांत, रुक्ष, सपक वातावरण झालेले होते. एकूणच फेसबुक म्हणजे सुगीच्या दिवसातल्या एखाद्या गावातील दुपारसारखे निर्मनुष्य झालेले आहे असे मला वाटले आणि मी कुठे काही सापडते का ते शोधू लागलो. तेव्हढ्यात एक स्टेटस वाचण्यात आले. “आपल्याला कूणी दुखाऊ नये असे वाटत असेल तर आपण पण लोकांना दुखाऊ नये, साने गुरुजी” हे स्टेटस वाचून मला पण,” मी काही दिवस फेसबुकवरून रजा घेत आहे, आमचा राम राम घ्यावा” असे स्टेटस टाकायची भयंकर उबळ आली पण मी ती उबळ महत्प्रयासाने आवरली. आणि अशा रुक्ष वातावरणात कुठे काय सापडते का हे शोधत असताना “किल्लेदारी” ह्या ग्रूपवरील संतोष डुकरे यांची “सांधण व्याली ट्रेक” हि पोस्ट वाचली, फोटो बघितले आणि चला आपण पण डोक्यात, अंगात तयार झालेले टोकसीन म्हणजे मळभ दूर करून आले पाहिजे असे वाटू लागले. ऑफिस, फेसबुक, साहित्य, राजकारण-गचकरण हे सोडून पण बाकी अनेक ठिकाणी आपण आयुष्याचा आनंद/थ्रील उपभोगू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली. फेसबुकवर प्रत्येक गोष्ट ब्ल्याक यंड व्हाईट मध्ये बघायची सवय लागलेल्या आपल्याला असं जंगलात डोंगरात घाम काढत भटकणे हे आयुष्तातील नवीन रंगाची नक्कीच वोळख करून देतील अशी खात्री वाटली आणि मला पण किल्लेदारांसारखे सारखे डोंगरात फिरायला जाऊ वाटू लागले.

संतोष डुकरे यांना मेसेज टाकला, “पुढच्या वेळी मला बोलवा” आणि ते असे फिरायला घोड्यावर बसूनच असतात ते कळले. ते म्हणाले,”तुम्ही तारीख सांगा, आपण राजगड तोरणा नाईट ट्रेक करू, कुणी नाही आलं तर आपण दोघंच जाऊ” आणि आमचे वीस तारखेला “राजगड-तोरणा” नाईट ट्रेक करायचे ठरले. कुणी नाही आले तर दोघंच जाऊ म्हणता म्हणता चांगले दहा पंधरा उत्साही मुलं मुली जमली. (मी स्वतःला अजून मुलगाच समजतो”)

काही मुलामुलींचा ग्रुप अगोदर तोरणा मुक्कामी जाणार होता आणि काही आमच्या सारख्या अतिउत्साही मुलांचा ग्रुप अगोदर राजगड चढून पुन्हा लगेच उतरून तोरन्यापर्यंत चालत जाउन पुन्हा तोरणा चढून अगोदरच्या टीमला भेटणार होता.

लहानपणी मला दुसऱ्या दिवशी दिवाळी असल्यानंतर आदल्या रात्री झोप नाही यायची. त्याचप्रमाणे संध्याकाळी ट्रेकिंगला निघायचे असल्याने मला त्या दुपारी झोप नाही आली. बायकोने मी कुठेतरी खरेच शिवाजी महाराजासाठी गड जिंकायला चाललो असल्यासारखी तयारी चालू केली होती. मी नखं काढली आहेत का हे बघण्यापासून सुरुवात झाली होती. आठ दहा चपात्या, ठेचा, मुठभर काळे तिखट आणि त्यावर पळीभर तेल, कच्चे शेंगदाणे, कांदे, काकडी, टमाटी, खजूर आणि किलोभर बटाटी. बटाटी गडावर भाजून खाण्यासाठी. ब्यागच्या एका कप्प्यात बेडशीट, चादर, टॉवेल, चड्डी, बनियान घातले आणि अजून एक शिल्लक कप्पा शोधून त्यात अडीच लिटर पाण्याची बाटली घातली. दहा बारा किलोची ती पिशवी बघून मला एक मिनिट वाटलं ह्यावेळेसचा ट्रेक रद्द करावा आणि पुढच्या वेळेस जावे. हे काय कमी होतं म्हणून शेवटी बायको स्वयंपाक घरातून भाजी कापायचा चाकू घेऊन आली आणि ब्यागच्या कुठल्या तरी कप्प्यात घालत म्हणाली, “रात्री चाललाय जवळ असावा” हे जरा अतीच वाटलं. बायकांचे प्रेम किती आंधळे असते त्याला लिमिट नसते. कधीकाळी रामपुरी बाळगायची स्वप्ने बघणारा मी आता वांगी कापायचा चाकू घेऊन राजगड जिंकायला जाणार होतो. लग्न हि गोष्टच अशी आहे. ते आपलं, “काय होतास तू काय झालास तू” असं एका दणक्यात करून टाकते. आई बाबाच्या पिशवीत चाकू वगैरे घालत आहे हे बघितल्यावर इतका वेळ माझ्याकडे दुर्लक्ष करत असलेल्या सुमेधला समजले कि बाबा काय तरी थ्रिलिंग करायला निघाला आहे आणि म्हणाला,
“बाबा कुठे चाललाय?”
“हायकिंग”, मी
“मग चाकू कशाला घेतलाय”
“आरे हरण, खरगोष काही दिसले तर मारून खायला”
आता त्याचा उत्साह दुणावला होता. तो म्हणाला, “बाबा, आपण धनुष्य बाण घेऊ त्याला दोरी लाऊ, मग बाण घेऊन तो खाली आगीत डूबवू आणि तो वरती डोंगरावर मारू, मग तो बाण वरती जाऊन झाडाला अडकेल आणि मग आपण त्या दोरीला लटकत लटकत वरती चढू”
“म्हणजे डोरेमोन, नोबिता, सुझुका सारखे का?” असे मी विचारले तर म्हणाला
“नाहीरे बाबा, बाहुबली सारखे”
हे मला जरा थोरच वाटले. आता त्याला खरेच यायचे होते पण आपण दोघे पुढच्या शनिवारी सिंहगडला जाऊ म्हणून सुटका करून घ्यावी म्हणालो तर तो म्हणाला, “नाही आज तू जिकडे चालला आहेस तिकडेच जायचे” तर त्याला आता राजगडला घेऊन जायचे ठरले आहे.

आपल्या शंकर आण्णा बहिरट यांनी आपलं चालू ट्रेक्तर दावणीला बांधले आणि त्यांची रामप्यारी घेऊन आम्ही सिंहगडाच्या पायथ्याला वळसा घालून पाबे घाटातून उतरलो आणि राजगडला जायचे म्हणून उजवीकडे वळलो तर तोरण्याच्या पायथ्याला पोहोचलो पुन्हा वळून राजगड पायथ्याला आलो. संध्याकाळी नऊ वाजता ब्याटऱ्या लावून पाच जणांनी राजगड चढायला चालू केले. वरती पूर्ण चंद्र बघून मित्रांना ब्याटऱ्या बंद करायला सांगितले. त्यांनी त्या बंद केल्या आणि वरती असलेला गोल चमकदार चंद्र आम्हाला वाट दाखवू लागला. हातातील ब्याटऱ्या पेक्षा चांदण्यांचा उजेड स्वछ् होता. पाठीवर दहा पंधरा किलोची ब्याग घेऊन राजगड चढणे हे थोर आहे दहाच मिनिटात समजले.
गडावर पोचलो तर मला अगोदर तिथलं पाणी संपले आहे असे सांगून चार चार लिटर पाणी पाठीवर लादून घेउन यायला लावणाऱ्या सहकाऱ्याला राजगडावरून फेकून द्यायची इछा झाली पण ती मी आवरली. अशा अनेक इछा आजपर्यंत मी आवरत आलो आहे. वरती पिटलं भाकरी पासून ते चहा पोह्या पर्यंत सगळे मिळत होते. दोन देवळात आमच्यासारखेच गडकरी गर्दी करून आत बसले होते आणि पूर्ण गडावर बाकी कुत्रं सुद्धा नव्हतं पण दोघेजन बाहेरच एका खडकावर चादर पांघरून आमची वाट बघत बसले होते. आम्हाला बघताच दोघांचा एकसाथ आवाज आला, “ कोंबड्या आणलायसा नव्हं $$$$$” आणि पुढे  कोल्हापुरी लांबत जाणारा टोन

“आन किती ह्यो वेळ, आम्ही कोल्हापूरहुन आन्नाअन्ना करत तुमच्या आदी पोचलो आणि तुम्हाला पुण्याहून किती उशीर $$$$$$$$$ आणि हे साहेब कोण , आगांभया सायबाचं लय हाल झालेलं दिसत्यात जणू$$$$$$$$$$, टाचा घाशीत ओरबडत आनलेला दिसतंय सायबाला, आब्या हितं नाइंटी नाइंटी मिळतीया, घेतूस का भावा, आपुन आल्याआल्या तीच येवस्था बघितली .......आणि आम्हाला बघून त्या दोघांना झालेला आनंद त्यांच्या बोलण्यातून थांबत नव्हता. लय उशीर झालायसा जेवायला काय आणलया, चला चालू करू ह्या गोष्टींवर एकमत झाले आणि आम्ही शंकर अण्णांनी आणलेली भेळ आणि  बाकीच्यांनी आणलेल्या चपात्या ठेचा काढून बका बका खाऊ लागलो.

तेवढ्यात राजगडाच्या चोर वाटेने म्हणजे कठीण वाटेने वरती एक ग्रुप आला आणि आम्हाला वोलांडून पुढे गेला. त्यांच्यात शेवटला मागे राहून टाचा घासत घासत एक जीन्स घातलेली आंटी हळू हळू आपल्या अंगाचा बोजा ओढत येत होती. ती जवळ येताच तो म्हणाला,

“मावशे जेव उलींसं $$$$$$, लय गळाटल्याली दिसतीया $$$$$” ह्या आगंतुक आवतानाने ती शहरी महिला जराशी बावरली पण त्याने त्याच्या पोटात साठवलेली हजार सशाची इमानदारी आहे तशी चेहऱ्यावर आणली आणि पुन्हा म्हणाला, “मावशे कोल्हापुरी मानसाचं आवतान हाय ह्ये, आम्ही उगीच खोटं खोटं न्हाय बोलणार”

एव्हडं बोलल्यावर ती आंटी आपली जीन्स सांभाळत बसली आणि एक घास खाल्ला कि तिला ठसकाच लागला. तिच्याबरोबर असलेली एक सुबक ठेंगणीने आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि सरळ निघून गेली. आमच्या नजरा तितक्या पण वाईट नव्हत्या पण तिला कोण सांगणार राव!. आंटि दोन घास खाऊन निघून गेल्या आणि तो आमच्याकडे जिंकल्याच्या अविर्भावात बघू लागला.
त्याचं नाव पीएचडी बंड्या अशी वोळख आम्हाल आभ्याने करून दिली. मी आदराने घातलेला नमस्कार त्याने तितक्याच आदराने आणि अदबीने स्वीकारला.

“मग कोणत्या विषयात केलीय आपण पीएचडी सर?” मी
त्याचे लक्ष खाण्यावर आहे हे बघून आभ्याने सांगितले,”गावातल्या लडतरी!, म्हणजे बंड्याने गावातल्या लडतरीवर पीएचडी केली आहे” हा शब्द ऐकताच बंड्याने आपल्या विषयी दोनचार कौतुकाचे शब्द बोलले जात आहेत हे बघून पुन्हा माझ्याकडे बघितले आणि म्हणाला

“अगोदरचा कडीकोयंडा जाऊन शेटर आल्याने गावातल्या लडतरी वाढल्या आहेत, हा निष्कर्ष आहे माझ्या शोध निबंधाचा’
“मला काही समजले नाही म्हणून मी अभ्याकडे बघितले तर त्याने माझ्या ज्ञानात भर घातली. तो म्हणाला, अगोदर काष्टा होता, आता साड्या आल्या, काम सोपं झालं असा निष्कर्ष आहे त्याचा. “ मी बंड्याच्या निष्कर्षाला सालुट ठोकला.

एकूण ह्या खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही राजगडावरील हवेचा आस्वाद घेत असताना संतोष डुकरे आणि पायगुडे हे रात्री तीन वाजता पोहोचले आणि जरा पण न थांबता म्हणाले हं चला लगेच तोरण्याला जायचं हितून, फकस्त बारा किलोमीटर चालले कि सकाळपर्यंत तोरण्यावर. ह्या माणसाचं कौतून करावं वाटलं. बुलेटवरून शिर्डीवरून डायरेक्ट राजगडला येवून वरती चढतो आणि जराशीही उसंत न घेता म्हणतो चला लगेच चालत तोरण्याला सकाळ पर्यंत पोहोचायचे आहे.

“मी हितंच झोपतो, मला काय शक्य नाही बुआ म्हटलो आणि ह्या पोरांनी माझा निरोप घेतला. जाताना नीट जावं कि, पण तसं नाही,  संतोष डुकरे हे मला “हितं माकडं खूप आहेत सांभाळून राहा,  हे सांगायला विसरले नाहीत.

आता त्या पौर्णिमेच्या चांदण्याकडे आवकाशात बघत सह्याद्रीवरील हवा खात मी त्या गडाच्या माचीवर एकटाच झोपलो होतो आणि अवकाशातून चंद्र, चंद्राला वोलांडून मंगळ आणि पुढे प्रकाशाच्या वेगाने अवकाशात फिरता आलं आणि सूर्यमालेच्या बाहेरील ग्रहावरील वातारण शोधता आलं तर काय भारी होईल अशा स्वप्नात रमत असताना, माकडं येऊन माझी उशाला ठेवलेली ब्याग पळवतील ही भीती होतीच. पांघरून घेऊन पडून त्या अवकाशाकडे बघताना ह्या नास्तिक माणसाच्या मनात सुद्धा भुताच्या गोष्टी येत होत्या, म्हणजे ह्या गडावर किती लढाया झाल्या असतील किती लोकांचे आत्मे हितंच फिरत असतील वगैरे वगैरे वगैरे.  पण आत्मा वगैरे सगळे झूट आहे असे स्वतःला समजाऊन मी तसेच पहाटेची वाट बघत पडलो. डोळ्याला डोळा न लागता चार वाजता उठलो आणि बालेकिल्ल्यावर जाऊन यावे म्हटले तर चंद्र मावळला होता, माझ्याकडे ब्याटरी नव्हती मग निम्म्यातून परत येऊन आजून सकाळची वाट बघत बसलो.

सहा वाजल्या आणि तोरण्यावरून मेसेज आला, तोरण गडावर पोहोचलो, मी बघितले ह्या लोकांनी कुठे  गंज वैगेरे पेटवली आहे का. तर तसे काय दिसले नाही. आता व्हात्सअप चा जमाना आहे.
दिवस उगवायला मी बालेकिल्ल्यावर चढत होतो एकटे असण्याची एक औरच मजा असते. तुम्ही तुमच्या सवडीने, आवडीने वागू शकता. बालेकिल्ल्याच्या दरवाजावर पोहोचताच तिथे एक प्रेमी युगुल (ज्या कुणी हे नाव शोधले असेल त्याचा सत्कार करायला पाहिजे) होते. मी त्यांच्याकडे न बघितल्या सारखे केले आणि पुढे गेलो. आपण प्रेम किंवा तत्सम गोष्टी करणाऱ्यांना कधीच त्रास देत नाही. बालेकिल्ल्यावर पोहोचलो आणि जाणवले कि खरेच हि श्रुष्टी खूप सुंदर आहे आणि थोडे कष्ट घेण्याची ताकत असली तर आपण ह्या सुंदरतेचा खूप आनंद लुटू शकू. राजगडावरून दिसणारा सूर्योदय आणि वसंतातील हवी असणारी ती हवा.

त्या अफाट सुंदरतेची अनुभूती घेत मी पुढे पुढे सरकत होतो तर मला तिथे अर्धी चड्डी घातलेले चिमणराव आणि गुंड्याभाऊ दिसले. दोघांनीही कडत इस्त्री घातलेल्या खाकी अर्ध्या चड्ड्या घातल्या होत्या आणि ती मंडळी काय तरी गोळा करत असल्याचा भास होत होता. गुंड्याभाऊच्या मोठाल्या आणि केसाळ  मंड्या खूप विद्रूप दिसत होत्या आणि शर्ट थोडा वरती गेल्याने त्याची ढेरी बाहेर येऊन तिच्यावरचे केस घाणेरडे दिसत होते. त्याच्या शेजारी उभारलेला चिमणराव १९७२ च्या दुष्काळातून सुकडी खाऊन कसा बसा वाचलेला आहे असे वाटत होते.

काही मिनिटातच दहा बारा मंडळी जमा झाली आणि आपापल्या हाफ चड्ड्या घालून परेड सावधान मध्ये उभी राहिली. गुंड्याभाऊ आणि चिमणराव त्यांचे लीडर असावेत. ते पुढे उभारून आदेश देत होते आणि बाकी लोक ते मानून आपल्या भाषेत परेड सावधान परेड विश्राम करत होते. ते लोक मराठीतच घोषणा देत असावेत आणि काहीतरी प्रार्थना बोलत असावेत पण त्यांची मराठी मला कळली नाही. पण ते लोक प्रार्थना संपल्यावर शिवाजी महाराज कि जय असे म्हणाले नाहीत. तो राजगड असून सुद्धा. तिथल्या वातावरणाचा आनंद घ्यायचा सोडून “हे काय याड लागल्या सारखं करून राहिली बुआ” असं तिथे आलेली काही मराठवाड्यातील जाणती मंडळी आपापसात बोलत असताना मी ऐकले.
वोळीत उभे राहून त्यांनी नमस्ते सदा उत्सले सदावत्सले  असं बरंच काही बरळले आणि शेवटी संपत संपत संपत असे म्हणून रिकामे झाले. मी तिथे कुठे संपत आहे का बघितले तर मला दिसला नाही. परंतु हे सगळे लोक मला खूप थोर वाटले.

आता मला एकट्याला उतरून तोरण्याला जायचे होते. मी गड उतरायला चालू केले. सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलबिलाट ऐकत राजगडासारख्या  सह्य्राद्रीतील गडावरून एकटेच घामेघून होऊन उतरत राहण्यात जो शारीरिक आणि मानसिक आनंद आहे त्याला तोड नाही. आणि मी मनातल्या मनात माझेच धन्यवाद मानत होतो. एकटेच मागे राहिल्यामुळे मला हि अनुभूती मिळत होती. तासात खाली उतरलो पाय पसरून खाली बसून पाणी प्यालो. असं एकटेच अधून मधून कोणता तरी गड चढत येत राहायचं असा निश्चय केला आणि बुलेटला किक मारून तोरण्याला निघालो.

बाकी टीम खाली येत होतीच. तोरण्याच्या पायथ्याला “जरासा विसावा” ह्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. ते हॉटेल मराठी माणसाचे होते आणि तो मालक आमच्याशी खूपच अदबीने वागत होता. काय पाहिजे काय नाही जवळ येऊन विचारत होता. मराठी माणूस इतका विनयशील तो फक्त महाराष्ट्राच्या बाहेरच असू शकतो ह्या माझ्या विश्वासाला तिथे तडा गेला. खूप मस्त मटन रस्सा आणि भाकरी खाऊन मी हॉटेल मालकाला म्हणालो “जरा काड्याच्या डबड्यातील कडी द्याहो मालक, दात टोकरायचे आहेत! ” तर त्याने टूथ पिक आणून मला अजून एक धक्का दिला. मी त्याला उठून मिठीच मारणार तोच मागे भिंतीवर मोठा शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्याखाली लिहिले होते ते मी वाचले.

“मराठा जात आमची हिमालयाला भोक पाडू, आमचा नाद केला तर हितंच जित्ता गाडू”
हे वाचलं आणि मी मिठी मारायचं क्यान्सल करून एकदम ब्रेक दाबून खाली बसलो. तिथं नाद करायला जाने मला डेंजर वाटले. बिल देतान पुन्हा तो मालक आमच्याशी खूप अदबीने वागला, ते बघून मला वाटले. माणूस जसा लिहितो तसाच असला पाहिजे असे काही नाही.

  


2 comments:

  1. एक नंबर... एकदम फक्कड... मजा आली वाचताना..

    ReplyDelete