Friday, February 19, 2016

शिवजयंती १६ फेब्रुवारी २०१६ आणि गुगल डूडल





सिक्स प्याक असलेले सहा फुटी तीनशे सैनिक आठ फुटी भाले आणि तसल्याच तलवारी घॆउन लाखो सैनिकांची मुंडकी उडवतात, डेडाळ बाहेर काढतात आणि आपण थेटरात बसून स्पार्टन स्पार्टन स्पार्टन असं भूक लागोस्तोवर ओरडत सिनेमा बघून बाहेर पडतो. हे खोटे आहे हे  माहित असून सुद्धा आपण युरोपियन थोर आणि आशियन म्हणजे मागास किंवा जंगली अशी आपलीच स्वतची प्रतिमा बनवतो आणि हजार रुपये खर्च करून घरी येतो.


सिकंदर ग्रीस मधून येतो लढाया करतो आणि जाताना मरून जातो. त्याच्या नंतर त्याच्या तथाकथित कमावलेल्या साम्राज्याचे काय होते कुणालाच माहित होत नाही पण आपण त्याला जगज्जेता म्हणता म्हणता थकत नाही.

इतिहासाच्या पुस्तकात नेपोलिन द ग्रेट बघून आपण कौतुकाने भारावून जातो आणि ज्याला ज्याला माहित नाही त्याला नेपोलियन किती ग्रेट होता हे  सांगताना आपल्याला इतिहासाचे किती गिन्यान आहे हे दाखवण्याचा सुप्त हेतू साध्य करतो. वास्तविक पाहता नेपोलियनचे टोटल साम्राज्य  सध्या असलेल्या महाराष्ट्राच्या भूभागा एवढे सुद्धा नसते पण नेपोलियन दे ग्रेट म्हणताना आपल्याला आपल्या विषयी उगीच न्यूनगंड वैगेरे वाटत असतो.

युरोपियन लोक त्यांच्या राजांचे आणि इतिहासाचे ग्लोरिफिकेशन करताना थकत नाहीत. चित्रपटातून आणि उपलब्ध असलेल्या सगळ्या माध्यमातून त्यांचा इतिहास श्रेष्ठ, त्यांचे राजे श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी ते कुठलीही उणीव सोडत नाहीत.

आणि आपल्या भारतात जगाच्या इतिहासाने नोंद घ्यावी असा राजा होऊन गेला आहे आणि तो मान महाराष्ट्राला मिळाला आहे हि गोष्ट  संघटीतपणे आपण आणि आपल्या सरकारने जगापर्यंत पोहचवण्याचा किती प्रयत्न केला हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर शून्य येते. जगासमोर सोडाच पण भारतासमोर किती पोहचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पण उत्तर शून्यच येते. चारशे वर्षापूर्वी आत्मविश्वास हरवून बसलेल्या आणि दुरंगी गुलामीची सवय लागलेल्या भारतीयांना स्वाभिमान परत मिळवून स्वातंत्र्य मिळवून देणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव करायचा सोडून त्यांना आजच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनवले जाते आणि त्यात सुद्धा चिखलफेक किंवा संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.  हा मराठी माणसाचा  एकात्मिक पराभव आहे तो आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे.

प्रत्येक गोष्टीत आपल्याला मत असते आणि आपले मत बाकीच्यांपेक्षा वेगळे असते आणि ते मांडून आपण जगापासून वेगळे आहोत असे दिसण्याचा पर्यंत करणे यामध्ये काही गैर आहे असे मला तर वाटत नाही. पण ते मत मांडून  झाल्यावर सामुहिक हितासाठी मी माझ्या मताचा त्याग करतो आणि एखाद्या गोष्टीवर आपण सगळे एखाद्या विशिष्ट कार्यासाठी एकत्र येतो असे क्वचितच घडताना दिसते.

आपल्या भावना पण इतक्या नाजुक असतात कि शिवाजी महाराजांना कुणी शिवज्या म्हटलं कि त्या  दुखावतात. कुणी शिवज्या म्हणण्याने किंवा लिहिल्याने शिवाजी महाराज लहान होत नसतात हे आपल्याला माहित असताना सुद्धा असे होते. बरे एखादा समोर म्हणतोय, मागे कोण काय चर्चा करत असेल याचा कुणी विचार करतो का?. लोकांनी मागे सुद्धा शिवाजी महाराजाविषयीच काय एकूणच महापुरुषांविषयी मनातून आदर बाळगला पाहिजे असे आपण वागतो का? कारण एखादा माणूस शिवाजी महाराजांचा किंवा त्यांच्या विचारांचा विरोधक नसून सुद्धा स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्या कडून दुखावला गेल्यामुळे तो शिवाजी महाराजांच्या कार्याचा सुद्धा विरोधक होऊ शकतो हि गोष्ट आपण विसरून जातो . आणि हि गोष्ट भारतातील सगळ्याच महापुरुषांच्या आणि त्यांच्या अनुनायाना लागू होते. यावेळी अशा भावनिक अनुयायाकडे दुर्लक्ष करून चालणे शिकल्याशिवाय आपण एक मराठी समाज म्हणून पुढे  जाऊ शकणार नाही.

तुमच्या ग्रुपचे नाव छत्रपति ग्रुपच आहे बुआ असे उपरोधाने जेव्हा एखादा मराठेतर बुद्धिवादी विचारतो तेव्हा त्याचा छुपा अर्थ "तुमचा हा जातीयवादी मराठा ग्रुप असल्यासारखे वाटते बॉ" असा असतो. असा प्रश्न विचारला म्हणून त्या प्रश्न विचारणाऱ्याचा तिरस्कार करण्यापेक्षा छत्रपतींच्या नावाने ग्रुप काढणारे म्हणून आपल्या  वागण्यात काही उणीवा आहे का याचे सुद्धा आत्मपरीक्षण केले पाहिजे ? छत्रपती ह्या शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक पदवीला आज संकुचित अर्थ प्राप्त झाला आहे का याचा विचार छत्रपतींचे अनुयायांनी करायला पाहिजे तसाच शिवाजी काय आमच्या जातीचा आहे काय त्याची जयंती किंवा स्मारकासाठी आम्ही करदात्यांनी का म्हणून पैसे द्यावे असे म्हणणार्यांनी पण एकदा शिवरायांच्या चरित्राचा आभ्यास करायला हरकत नसावी.

महाराष्ट्राच्या मुंबईती कोण एक उद्योगपती दोन हजार कोटी रुपयांचे घर चार माणसासाठी बांधतो त्यावेळी  शिवरायांचा वारसा सांगणारे आम्ही ह्या व्यवस्थे बद्दल एक प्रश्न उपस्थित करत नाही पण महाराजांच्या स्मारकासाठी तीनशे कोटी म्हटले कि आपल्या पोटात गोळे यॆउ लागतात. तसल्याच उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयाचे कर्ज माफ होते आणि सरकार खतावरील आणि शेतीच्या औषधावरील सबसिडी संपवायची म्हणते तेव्हा कुणालाही शेतकर्यांची आठवण येत नाही पण शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय निघाला कि आम्हाला शेतकरी दिसतो. ह्याला दुसरे तिसरे काही नसून आजची गुंतागुंतीची समाजव्यवस्था आणि जातीय व्यवस्था कारणीभूत आहे.

परंतु चित्र इतके पण नकारात्मक नक्कीच नाही. शिवजयंतीच्या निमित्ताने फेसबुक आणि इतर सोशल मिडिया वर सगळ्या जातीय आणि धर्मीय मंडळीनी शिवरायांचा डूडल गुगलवर यावा यासाठी जे प्रयत्न केले ते भारतीय एकात्मतेकडे पहिले पाउल का समजले जाऊ नये ? आपल्या सर्वांना माहित होते कि डूडल गुगल हे आपले साध्य नाही तर ते लोकामध्ये, तरुणांमध्ये, तरुणीमध्ये उत्साह निर्माण करण्याचे साधन होते .
त्या निमित्ताने शिवरायांची आठवण करून विचारांचा प्रसार करण्याचे आणि शिवरायांना मानवंदना देण्याचे ते एक साधन होते.  डूडलच पाहिजे असता तर एखाद्या धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या मंत्र्याने गुगलच्या ओफ़िस मध्ये फोन केला असता तर त्यांच्या बापाने डूडल लावला असता पण त्याने काय साध्य झाले असते?

त्यामुळेच आज मला ह्या डूडल गुगल चळवळीत सामील झालेल्यांचे अभिनंदन करू वाटत आहे. याचवेळी जे ह्यामुळे काही साध्य होणार नाही असे समजून सामील झाले नव्हते त्यांचे पण अभिनंदन करून त्यांना एवढे सांगू वाटत आहे कि कुठून तरी आणि कशी तरी सुरुवात करावी लागते. आपल्याला काय माहित एखादी छोटी वाटणारी  चळवळ उद्या मोठे रुप घेऊन मोठे परिवर्तन घडवून आणू शकते.

आणि शेवटी ज्यांनी टिंगल केली त्यांना पण हे सांगू वाटत आहे कि मित्रानो तुमचा हेतू हा कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता किंवा शिवाजी महाराजांचा किंवा कुणाचाच अपमान करण्याचा नव्हता तुम्ही फक्त तुमची मते मांडली. आणि आपला तो मते मांडण्याचा अधिकार तसाच राहावा म्हणून आपल्याला इथून पुढे काम करायचे आहे.

शिवरायांचे विचार जगात पोहचवण्याची आणि त्याला एक वलय प्राप्त करून देण्याची चळवळ जी चालू झाली आहे ती इथून पुढे अजून जोर धरील अशी अपेक्षा आहे.






























4 comments:

  1. दादू आत्मचिंतन करायला लावणारे लिखाण आहे...चला सुरवात केलीय यातुन नक्कीच चांगल आणि विधायक कार्य सुरू होईल अशी आशा करायला हरकत नाही

    ReplyDelete
  2. 👍👍 डुडल मोहीमेन तरुणांन मध्ये चागलाच ऊत्साह निर्मान केला हेही नसे थोडके 👌👌

    ReplyDelete
  3. 👍👍 डुडल मोहीमेन तरुणांन मध्ये चागलाच ऊत्साह निर्मान केला हेही नसे थोडके 👌👌

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete