Monday, August 26, 2013

हागवण

वैशाखातलं असह्य ऊन घेवून आलेला हा पण नेहमीसारखाच एन नवीन दिवस, नवीन म्हणजे फक्त क्यालेण्डरवर एक आगावु तारीख, बाकी सगळं काल  परवाचंच किंवा इथल्या कामगारांच्या पाचवीलाच पुजलेलं. नऊ वाजल्यापासूनच तळपायला चालू केलेल्या उन्हामुळे आकरा वाजेपर्यंत एके काळी जवान असलेल्या पण अनेकांनी पिळून आणि निचडुन घेवून बेवारस सोडून दिलेल्या रांडेसारखी अवस्था झालेल्या साखर कारखान्यावरचं वातावरण जास्तच भकास, उदास आणि भयानक शांत वाटत होतं. वृध्द लिंबाच्या झाडाच्या आडोश्याला गेली वीस वर्ष चालू असलेल्या आंधळ्या तात्याच्या घर वजा हॉटेलच्या फाटक्या तुटक्या छताखाली तीच दररोजची चारपाच मंडळी हा पण दिवस लोटण्याची वाट बघत होती. आंधळा तात्या तिथल्या मंडळीना, "आता तीन चार तास झालं, आता तरी तुमाला च्या प्यावाच लागल" अशी विनंती वजा धमकी देत होता. पण हि मंडळी नुसतंच रांजणातलं थंड पाणी पिवून उन्हाच्या झळयापासून बरं वाटावं म्हणून तोंडावर  मारत परत परत तीच पेपरची पानं खुर्च्यावर आणि बाकड्यावर वाकडं तिकडं होत वाचत होती. कारखान्याच्या उजाड केलेल्या माळरानावर ह्या हॉटेलातील चार पाच मंडळी आणि  लागुनच असलेल्या डांबरी रस्त्यावरून जाणारी एखादी जीप, एसटी किंवा सायकल त्या शांततेला छेद देवून जात. प्रत्येक थांबणाऱ्या वाहनकडं तात्या आशाळभूत नजरेने पाहायचा. एखादा तरी चहा जाईलच! पण तिथल्या मंडळीना चार पाच गीऱ्हांइके  एकदम आली तर आपल्याला उठावं  लागतं कि काय हि भीती पण कायमचीच मनात.

तिथूनच दोन तीन फर्लांगवर असणाऱ्या आणि  एके काळी हजारो लोकांची पोटं भरणाऱ्या कारखान्याच्या बंद पडलेल्या चीमनिकडं पहावत नाही. कसलंही वर्तमान नसलेल्या कामगारांच्या आणि त्यांच्या पोरा बाळांच्या जीन्दग्या भयानक भविष्यकाळाची चाहूल लागल्यमुळं जास्तच खचून गेल्या आहेत. प्रत्येक ढगाला असनारी सोनेरी किंवा चंदेरी किनार सुद्धा हितल्या शोषणकर्त्यानी काढून घेतलिय याची जाणीव इथल्या वाऱ्यावर संसार पाडलेल्या कामगारांना खूप अगोदरच झालीय. आपली पोरं बाळं शिक्षणा अभावी बरबाद होताना डोळ्यासमोर बघण्याची शिक्ष्या आम्हाला नियतीनं का दिली आसंल, अशी चर्चा काही भोळी भाबडी कामगारं तात्याच्या हॉटेलात नाहीतर ईट्ठल रुक्मिणीच्या देवळात बसून करत असतात. 

घरी बसून काय करायचं म्हणून कामगार कारखान्यात जातच आहेत.  पंख्यांचा खट-खट-खट असा आवाज, बाजूला ठेवलेला पाण्याचा डेरा, वरती भिंतीवर असलेले साखर सम्राटांचे फोटो आणि त्यांच्या शेजारी सगळ्यात मोठ्या आकारात जाणत्या राजाचा १९७७ सालचा फेटेधारी गोबऱ्या  गालाचा हसतानाचा फोटो. गेल्या अनेक महिन्यापासून गांजून गेलेल्या कामगारां मुळे सुतकी कळा आलेल्या त्या हाफिसात ते गोबऱ्या गालाचे हास्य खूपच विकृत वाटत होते. काम नाही, पगार नाही म्हणू कामगारांच्या चाललेल्या गप्पा एकदम शांत होतात त्या अचानक आलेल्या लहान मुलाच्या आर्त हाकेने.

"बाबा"
बाबाच्या पाठोपाठ आपोआप बाकीचे लोक पण उठतात आणि त्या मुलाकडे काळजी आणि दया युक्त नजरेने बघायला लागतात. 

"बाबा मला हागवण लागलीय, सकाळपासून फोक सुट्ल्यात, आई मनली, कारखान्यातून तुम्हाला घेवून दवाखान्यात जा, सकाळपासून सात वेळा झालीय"

असं बोलताना त्याचा आवाज संपला आनि तो रडु लागला. बापानं खांद्यावरच रुमाल काढला आणि पोराचंपण आणि स्वतःचं  पण डोळं  पुसलं. त्या मुलाचा अवतार बघून ऑफिसमधल्या बऱ्याच लोकांना कंठ आवरण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पोराला स्टुलावर बसवून, कुनाकडंच पैसे मिळणार नाहीत हे माहित असताना सगळ्याकडे फक्त आशाळभूत नजरा फिरवल्या. लोकांच्या नजरेतच उत्तर कळले होते. त्यांचा तरी काय दोष, सगळे लोक सारख्याच परिस्थितीतून जात होते. हे दृष्या नेहमीचंच झालं होतं, अनेक वेळा तर लोकांच्या मयतीला सुद्धा पैसे नसायचे, वर्गणी करून लाकडं गोळा करावी लागायची.  इथं पण ह्या लहान मुलाकड बघून चू चू चू करण्या शिवाय कोणीच काही करू शकत नव्ह्ते.

स्वतःच्या खांद्यावरचा रुमाल पोराच्या डोक्याला बांधून बाप पोराला दवाखान्यात घेवून निघाला. तीन किलोमिटर चालत गेल्यानंतर गावात दवाखाना. रखरखनाऱ्या उन्हात आनवानि चालताना पायाला बसणारे चटके पोरगं आता दवाखान्यात जावून आपुन निट होणार या भावनेने विसरलं होतं. चढ उताराची डांबरी सडक चढुन उतरून घामेजलेले बापलेक जेव्हा सरकारी दवाखान्यात पोचले तेव्हा पाच मिनिट उशीर झाला म्हणून सिस्टर ने केस पेपर काढून  दिला नाही. बापाला भोवळ यायची पण त्याने पोराकडे बघितले आणि सावरून घेतलं. पोराला जरा जरा कळू लागलं होतं. तिथून तडक RMP आणि खूपच प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरकडे हे बाप लेक मोठ्या आशेने गेले. आता चार नंबर संपल्या नंतर आपलाच नंबर असं बापानं पोराला सांगितलं आणि त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. बाप पोटात आलेला गोळा दाबायचा प्रयत्न करत ठरवत होता कि इंजेक्शन दिल्यावाशिवाय सांगायचंच नाही कि आमच्याकडे पैसे नाहीत. डॉक्टरांनी बोलाविले आणि विचारले काय झाले. पोरगं जमेल तेवढी टाकत एकवटून म्हणालं , "हागवण लागलीय, सकाळपासून फोक सुट्ल्यात थांबतच न्हायत"
डॉक्टर तपासणार तेवढ्यात बापाला राहवलं नाही आणि म्हणालाच , "डॉक्टर साहेब आमच्याकडं  पैसे नाहीत पण मी आणून देईन" हे ऐकताच डॉक्टर साहेबांनी हिंजाडून पोराला ढकलून दिलं आणि म्हणाले , : न्हाय न्हाय तसलं काय नाही, पैसे घेवून या, संतोष, पुढच्याला पाठवरे"

अपमानित झालेला आणि त्याहीपेकश्या आपण पोराला साधं दवाखान्यात दाखवू शकत नाही याची जाणीव झालेल्या जगातल्या कोणत्यापण बापाची जी अवस्था होईल तीच अवस्था यापन बापाची झाली.  रस्त्याच्या  कडेच्या एका टपरीवजा हॉटेलातून दोन दोन गलास पाणी पिवून पुन्हा तोच चढ उताराचा रस्ता बापलेक गुमान चालू लागली. दोघांच्या पण मनात वेगवेगळी चक्र चालू असताना बापानं विचारलं,  "आरं पण तुला संडास नाही आली आजून लय वेळ झालं? "

"न्हाय आली, पण माझं पाय लय दुकाया लागल्यातंय"
"झालं  आता तेवढा चढ चढला कि आलंच आपलं  घर"




No comments:

Post a Comment