Wednesday, July 17, 2013

गांधारी मावशी

घरी पोचून अर्धा एक घंटा झाला आसल , कि बाहेरून आवाज, कोण पकू (प्रकाश ) आलाय व्हय? गांधारी मावशीचा आवाज मी लांबूनच ओळखला .

आई, "व्हय आताच आलाय "

गांधारी मावशी , "येरय पोरा च्या प्यायला, लय दिसांनी आलाय ग माय, एकटाच आलाय जणू?

आई गपच! मी, "येतो येतो मावशे आलोच हात पाय धुवून!

आमच्याच घराच्या मागच्या परसात परटाच्या वाड्यामागून गेलं कि तिचं घर. घर मजी जुन्या वाटणीत आलेला वाडा म्हणायचा म्हणून एक दग...ड मातीचं वरती माळवद असलेलि जुनी खोली आणि समोर तुराट्याचा कुड बांधून केलेलि अजून एक खोली, बाहेर शेळ्या बांधलेल्या, त्यांच्या लेंड्या, मूत आणि शेजारीच चुलीवर ठेवलेला गाडगं. गाडग्यात आम्बड्याचि भाजी शिजत असलेल्या जुन्या ओळखीच्या वासानं मला बरंच वाटलं.

गांधारीनं आला व्हयरं, म्हणुन दोन्ही गालावर हात फिरवून बोटं कडा कडा मोडली, थाम थाम, सतरंजी हातरते असं म्हणून कधीकाळी सतरंजी असलेलं एक मोठं फडकं हातरलं .

बस! एकटाच आलाय व्हयरं? असू बापडिचं, लय ताप पडत आसल पोराला अन बायकुला घिवून यायला, खुशाल हायती नव्हं? लय शिकल्याली हाय म्हनं तुझी बायकू? पोरगं मोठ झालं आसल आता, जातं का शाळत?, चांगला सायाबासारखा दिसतुयास बग आता, किती हड्कुळा व्हता, निका गावात कुत्री मारीत फिरायचा, लय खस्ता खाल्या बग तुझ्या आयनं, नवर्याचा ताप, तू तर काय सळायाचास बाबा, तीन पोरीवर तू लाड्काच, पण मावलीनं सगळं केलं बग, कदि म्हणून वैताग केला न्हाय, थाम पवं करते… नकु नकु , आगं लय पोट भरलय माझं, घरी आल्या आल्या वांग्याची आमटी आणि भाकर हानलीय कुस्कुरून, थाम मग च्या करते, कोराच कर, आरं कारं ? घरचं दूद हायकी, लगीच काडते शेर्डीचं ताजं दूद,

आग न्हाय मावशे मी कोराच च्या पेतो आग वजन कमी व्हावं म्हणून,

आरं वजन कमी हुइल तुझ्या वैऱ्याचं ! आसं रं का म्हन्तुस?

एक घोट घेतला, शेळीच्या दुधाचा चहा जात नव्हता!

कसाबी आसुदि तुजा बाप, पण तीन पोरीची लग्न केली , तुला शिकवलं, काय कमी केलं रं ? त्याला काय म्हणत जावू नकुरं, आता आसतो एकाद्याला नाद ती काय लोकाच्या माणसावणी घरदार सुडुन निस्तं पेतच न्हाय बसत , श्यात तर इकलं न्हाय न्हवं ? तूबी पेतो का काय? न्हाय कानावार येतं मनून इचारलं , जावू दि काय बी ऊटवित्याति गावात, कुणाचं काय चांगलं झाल्यालं बगवतं काय, लयच बारा बोड्याचं हाय आपलं गाव ! आन चौवीस घंटं जरी पेला तुझा बाप, तरी तुला काय लय हाय व्हय, लय पगार हाय मनं कि तुला? किती हाय ? उगं मानसं मंत्याती मनून इचारलं ! चांगलाय पगार मावशे! नकु सांगू आमाला न्हायतर आमि कवा तरी मागायचो तुला!

एक काम करकी आमच्या संतुला काम बग कि, घीवून जा कि पुण्यात, बग कि रं कसली लक्ष्मी वाणी बायकू हाय दोन पोरं हायती अन हि पोरगं उटलं कि पिपळाकडंच पळतंय, डावच खेळतय दिस कळत न्हाय रात कळत न्हाय , काम न्हाय काय न्हाय! ती दोन चार गाबडी हायती वरच्या गलीची, गार भरली त्यांची, त्यांनीच नाद लावलाय, निहरी करून गेला कि रातच्याला कवा येतो त्याच्या बायकुलाच माहित,

आता तर दोन एकर इकून ट्याक्टरच घ्याचा मनतय, मी तर हातच टेकलं बग ! काय न्हाय बग त्याच्या पोराकड बागू जीव तुटतो, माझं काय राहिलं आता लाकडं नदीला गिली, ह्या मावलीची काळजी वाटती. व्हय मावशे घेतो गाठ संतुची, येवू का आता?

आरं आणि एक गोष्ट, त्या कोंडीराम बामनाची दोन एकर इकायला निघाली म्हनं घिवून टाक तेवढी, तुझ्या दाजीच्या आईक्न्यात हाय ती, तुझ्याशिवाय कुणाला न्हाय देणार, त्याची पोरं मनं कुटं पर मुलकात अस्त्याती त्याला कायला पाहिजे आता शेति. तू घिवून ठिव आरं माघं पुढं कामाला येती, किती जरी लांब गेला तरी मरायला गावातच यायचाय कि, हाय का न्हाय, आर आपलं जनगोत हितं! गाव सुडून जमतंय का आपल्याला?

व्हय व्हय मावशे बघतो कायतरी, येवू का?

व्हय येत जा गावाकडं , तेवढं जीमिणीचं बघ!

No comments:

Post a Comment