Sunday, April 27, 2014

तू

तुझ्याशिवाय जगण्याचा कधी विचार केला नव्हता. किंबहुना तुझ्याशिवाय जगू शकेल कि नाही हि शंकाच होती. नाही काहीतरी चुकतंय. तुझ्या शिवाय जगू शकणार नाही हि खात्रीच होती. अश्या खात्र्या म्हणजे भ्रम असतात बहुतेक. नाही, मी सगळ्या विषयी का बोलू ? तो फक्त माझा भ्रम असावा. मला जास्त काळजी तुझी वाटायची. तुला माझ्याशिवाय जगणे होते कि नाही याची. म्हणून मी तुला आयुष्यात कधी एकटे पडू द्यायचं  नाही असा निर्णय घेतला आणि जगासाठी लग्न पण केले. मला याची जरुरत नव्हती कारण ते सामाजिक बंधन आहे.  आपल्या प्रेमाचे बंधन पुरेशे होते आपल्या एकत्र राहण्यासाठी, पण नात्याला नाव पाहिजे म्हणून  देवा ब्राह्मणाच्या साक्षीने अक्षता अंगावर टाकून घेतल्या. पश्चाताप काश्याचाच नाही. तू खूप दिलं. अपेक्षेपेक्षा जास्त दिले म्हणनार नाही, तश्या माझ्या अपेक्षा पण अश्या काही अचाट वैगरे नव्हत्या. जे दिले नाही ते ओरबाडून घ्यायचा कधी प्रयत्न नाही केला.

आज आपल्या पहिल्या भेटीच्या आठ वर्षानंतर हे लिहायला दुःख होतंय कि नाही माहित नाही, होत असेल तर किती होतंय ते पण कळत नाही. गेल्या चार वर्षात बहुतेक सवय झाली असावी दुखात राहायची. आता आनंदाचीच भीती वाटते. माफ कर सुखाची भीती वाटते. आनंद तर मला कश्यात पण मिळतो. मी सहज मिळवतो.  

प्रयत्न करून कुणी एकत्र राहावे या विचाराचा मी नाही. प्रेम हे उस्फूर्त असते याच्यावर तुझा पण विश्वास असेल. असणारच. प्रेमाच्या कथा आणि चारोळ्या तूच वाचून दाखवायची मला. ती कवितेतली प्रेमं, कथामधील प्रेमं, तुझं ते मला चारोळ्या वाचनाच्या कार्यक्रमाला घेवून जाणं , मला प्रेम काय असते ते समजावे म्हणून. माझ्या प्रेमासाठी मला अश्या खाद्याची गरज नाही पडायची पण तुला आवडते म्हनुन मी शोधून काढायचो पुस्तके आणि असे कार्यक्रम, खास तुझ्यासाठी. अर्थात ती मला भंकसच वाटायची. तुझ्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी अश्या किती भंकशी सहन केल्या. आज माझ्या आयुष्यात  सर्वात किमती काय असेल तर माझ्या बालपणीच्या आठवणी आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या भंकशी. यापेक्षा जगात दुसरे काहीच किमती असू शकत नाही. जेव्हा तू म्हणाली कि आपण भेटू आणि मिटवून घेवू तेव्हाच माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. आपल्यात मिट्वायचे ते काय होते? नवरा बायकोची सकाळची भांडणे संध्याकाळी गादीवर मिटतात असे मी ऐकले होते आणि त्यावर विश्वास पण होता. आज तीन वर्ष तुझ्यापासून दूर राहतोय एकदा जरी म्हटली असतीस कि सोन्या ये आता बस झालं नाटक तर विजय तुझाच झाला असता. तुझ्या विजयातच माझा आनंद आहे. हे तूला माहित होतं पण आता विसरलीस बहुतेक. पण आता महिनो न महिने तुझा होणारा पराभव मला मान्य नाही. माफ कर तुझ्या विजयाच्या आणि पराभवाच्या संकल्पना बदलल्या असतील बहुतेक.

मनाला मान्य नव्हतं तुझ्याबरोबर प्रेमाच्या देवाणघेवाणीचा सौदा करायला यायचे. एकमेकाच्या अटी मांडायच्या आणि कॉर्पोरेट जगतातील डील केल्यासारखी आपल्या प्रेमाची, आपल्या छकुलीची आणि नात्याची डील करून पुन्हा एकत्र सुखाने नांदायचे नाटक करायचे. कश्यासाठी तर समाजासाठी, लेकरासाठी. पण त्या निमित्ताने तुला भेटण्याची संधी मिळेल, तुला माझ्या डोळ्यातील भावना न बोलता समजतील आणि आपण तिथून सरळ आपल्या घरी जावू या अपेक्षेने आलो होतो. कसली चर्चा न होता सरळ "आपल्या " घरी जाण्याच्या! पण भेटताच तू माझे तुमच्या कॉर्पोरेट क्लायंटचे करतात तसे केलेले स्वागत केले. आणि काय घेणार म्हणून माझ्यासाठी मागवलेलि थम्सअप आणि तुझ्यासाठी मागवलेले रेडबुल वरूनच पुढच्या संवादाचा अंदाज आला.

कासायास, कुठे जेवतो, फक्त विकेंडलाच पितो कि संध्याकाळी घरी आले कि घेवून बसतो असले काही न विचारता तू आणलेली अटींची यादी वाचून दाखवायला चालू केलीस. अट छोटी असो कि मोठी ती अट असल्याने ती मान्य करण्याचा प्रश्नच नव्हता पण दगडा सारखे ऐकत होतो.

आगं ज्या आई बापानी मला एकट्याला लहानाचा मोठा केला, खस्ता खाल्ल्या खेडेगावातून बाहेर पडून शहरात नाव कमवेल हि ताकत दिली आणि त्यांना मी वृद्धा श्रमात ठेविन असा तू विचार तरी कसा करू शकतेस?  या जन्मी तरी शक्य होईल का ते? अर्थात याअटीने मला आश्चर्य वैगेरे अजिबात वाटले नाही. तुला गेले काही वर्ष बदलताना मी पाहत होतो. मी वृद्धश्रमाचा खर्च करून घरात पण पैसा खर्च करायचा आणि मी जेवढा खर्च करीन तेवढाच तू पण खर्च करणार हा व्यवहार तू कधी शिकलीस ? अगं दहा वर्ष होस्टेलला होतो मी रूम पार्टनर बरोबर सुद्धा कधी हिशोब ठेवला नाही. आणि आता घरात पैश्याचा हिशोब ठेवून तुझ्या राहिलेल्या पैश्यावर मी हक्क सांगायचा नाही असे सांगतेस तेव्हा मला खूपच भंकस वाटणाऱ्या आणि तुला आवडणार्या कुटंब व्यवस्थेचाच तू अपमान करत असतेस! ज्यावेळी प्रेमात आणि घरात असे हिशोब होवू लागतत तेव्हा ते घर घर राहिलेले नसते आणि अश्या अभाशी घरातून स्वतंत्र होणे दोघांना पण सुखकारक ठरते.

आता आपण खूप दूर आलो आहोत. परतण्याच्या सर्व वाटा मला वाटतं आपण स्वताच बंद केल्या आहेत. बंद करून किल्ल्या कुठेतरी समुद्रात टाकून दिल्यात. त्या शोधणे व्यर्थ आहे कारण मिळणारच नाहीत. तशी आतून दोघांची पण इछ्या नसावी. पण आयुष्य थांबत नाही. ना तुझ्यासाठी ना माझ्यासाठी. आपण वेगळे तर झालोच आहोत, कायद्याने व्हायचे कि नाही ते तू ठरव.

मला माझे माहित नाही. पण लक्ष्यात घे तुला खूप लांब जायचे आहे. आपल्या छकुलीचे भविष्य घडवायचे आहे. त्यासाठी तू समर्थ आहेस असे वाटते. तिला सुख पैश्यात मोजायला शिकवू नकोस. आपल्या समाजात बापाचे नाव लागतेच, तुझी इछ्या असेल तर दे नसेल तर राहू दे. कधीतरी तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल, तिला त्या प्रश्नांची खंबीरपणे उत्तरे देता येतील अशी बनव. शाळेमध्ये इतर मुलांना सोडायला येणारे आई बाबा बघून ती विचारेल आई आपले बाबा कुठे आहेत तेव्हा सांग खूप दूरच्या गावी गेले आहेत तिला खूप खेळणी आणायला.

तुझे बाबा खूप चांगले आहेत आणि तुझ्यावर खूप प्रेम करतात हे सांगायला तू विसरणार नाहीस याच खात्री आहे.

अगोदर फक्त तुझाच असणारा आणि आता फक्त माझाच.







4 comments:

  1. प्रेम हि फार विलक्षण गोष्ट आहे , अकल्पित आहे , प्रत्येकाचा अनुभव आणि अनुभूती हि वेगळी आहे पण बर्याचदा ज्यांना शिखर गाठयाचेय त्यांना हात भेटत नाहीत आणि ज्यांना उतार असतो त्यांना तर काय उतारच ....

    ReplyDelete
  2. Khup mast lihlay sir... sahi..

    ReplyDelete
  3. https://www.maximizemarketresearch.com/reporttype/material-chemical/page/2/

    ReplyDelete