Wednesday, April 2, 2014

होळी

आमच्या इमारतीत पेटलेल्या होळीकडे त्रयस्थासारखे पंधरा मिनिटे बघताना बालपणात गेलो. 
दोन दिवस अगोदर आम्ही दोन्ही मोठ्या चाळीमध्ये गवऱ्या आणि लाकडे मागत फिरत होतो. होळीला पैसे नाही तर गवऱ्यांचाच मान असतो. प्रत्येक घरासमोर जावून "होळीच्या गवऱ्या पा ~~~~ च चलगं म्हातारे ना ~~~~~ च " म्हणत असू आणि मग पाच गवर्यांची अपेक्षा असे. कुणीही आढेवेढे न घेता देत. सगळी घरे संपली आणि जमलेल्या गवऱ्याकडे आणि लाकडाकडे पहिले तर समजले कि निलगिरीच्या झाडापेक्ष्या उंच जाळ न्यायची आपली महात्वाकांक्षी होळी नाही होणार हि. मग आम्ही चील्यापिल्यानी गावाच्या कडेने बायकांनी मोठ्या मेहनतीने स्वतःच्या गायी म्हशीच्या नाहीतर रानातून शेण आणून लावलेल्या सगळ्या गवऱ्या चोरून आणल्या. लावलेला गवर्यांचा ढीग बघून आमचा छाती भरून आली आणि मोठी लढाई जिंकल्याचा भास होवू लागला. हा आनंद खूप वेळ टिकला नाही, आम्हा सर्वांच्या घरासमोर अनेक बायकांची गर्दी झाली आणि आमच्या सगळ्यांच्या आयांनी सगळ्या पोरांना बदड बदड बदडलं. थोड्याच वेळात आम्ही अगोदर जमा केलेल्या गवऱ्या पण गायब झाल्या. आपापल्या गवऱ्या घेवून जाण्याच्या नादात आम्ही इमानदारीने मागून आणलेल्या गवऱ्या पण बायका घेवून गेल्या होत्या. येवढा मार खाल्ल्याचे दुख नव्हते तर होळी होणार नाही याचे भयंकर दुख होते. संध्याकाळी सहाच्या आसपास लोक आपोआप गवऱ्या - लाकडे आणून आमच्या होळीच्या ठिकाणी आणून टाकू लागली आणि त्यात ज्यांच्या गवऱ्या आम्ही चोरल्या होत्या त्यांचा सहभाग जास्त होता. बघता बघता खूपच मोठी होळी झाली आणि मोठ्या माणसांनी - आणि बायकांनी आम्हा पोरांच्या हस्ते होळीला दहन देवून आमचा मान तर ठेवलाच पण तुम्ही चोर नाही आहात हे पण सांगितले.

त्या काळी आमच्या स्वकष्टाच्या होळीच्या कडेने बोम्बलत आणि अफाट आनंदात शिव्या देत फेऱ्या घालणारे मी आणि माझे मित्र. आणि आज त्रयस्थपणे सोसायटीतील लोकांचा मान ठेवायचा म्हणून १००रुपये वर्गणी देवून होळीच्या कडेने मोबाईल मध्ये बघत यांत्रिक पणे बसलेला मी. missing all my कारखान्यावरचे चावट, टणक, येटान, मिथुन, जोक्त्या आणि इतर दोस्त अगदी आकाडे बाबा आणि उंबरे मामा सहित.

आता कारखान्यावर ते दोस्त पण राहिले नाहीत, ती चाळ तर उदासच झालीय आणि तो हजारो कामगारांचे आणि शेतकर्यांचे पोट भरणारा कारखाना आज एकटाच चार पाच वाचमनच्या राखनादारीत कुणी तरी गिर्हाईक येईल आणि आपले उरले सुरले नावाचे अस्तित्व पण संपून जाण्याची वाट बघत असेल.

No comments:

Post a Comment