Tuesday, April 22, 2014

निवडणूक एक सन

आंव ~~~~ काय मनतोय मी, उद्या तू आन परसातला लंगडा राजा दोघं एक नंबर भूतावर एजंट व्हा, तिथं उगंच कुरुळी निघून भांडणं होत्यात. आन तुमी पण घुसळांग काडू नका पण त्यांनी चालू केलं तर म्हागं नाय सरायचं. आपुनबी मराट्याचा हाव. पण दादा तीपण मराटयाचीच हायती कि. येड्झव्या ती हालकीयती. उद्या तरी निट आयघाला आंगुळी बिंगुळी करून या न्हायतर पारुसंच येचाल. संत्या तू आदि आंगुळ करून नाव नोंदवून घी अन् पुना येवून धारा फिरा काड. सकाळ सकाळ मत पेट्यचि पूजा करायला पाच पाच सवासन्या बी बघा, तुमा दोघाच्याबी मालकिणीला सांगा पेटी आपलं मिशनी पुजायला. आन पहिलं मतदान आपलंच हुद्या, सवास्नीच्या हातानं नाहीतर तुमीच करचाल. नाय पण दादा पहिलं मतदान तीच करत्याल त्यांच्या वळकी हायत्या सायबाच्या. आरं तुमी जरा लवकर जा. व्हय व्हय. येवू का ? बाकीच्या भूतावरचं पण बघायचं हाय. आज झोपलाकी कि मेलाव लय पैसे आल्यात त्यांचं. कळलं का?

हे गावातलं मतदानाच्या पूर्वसंध्येचं वातावरण. दोन्ही कळपात काहीच फरक नाही, चर्चा तीच. ग्रामीण भागात दिवाळी पेक्षा मोठा सण म्हणून निवडणुकांना मान्यता द्यावी हि मागणी मी लवकरच करणार आहे. पण कुणाकडे करावी हे कळत नसल्याने राहिली आहे. दुसरा दिवस म्हणजे दिवाळीचाच. काही लोकांची लगबग, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची लगबग, आंघोळी करून देवळात जावून कोण अगोदर मतदान केंद्रावर जातोय हि स्पर्धा. गावातल्या बायकांना पण रान सोडून आज कधीतरी गावात नटुन थटून फिरायला मिळतं. प्रेत्येक पक्षांच्या बायकांचा ग्रुप वेगळा वेगळा मतदानाला जातो. म्हणजे बाहेरच्या माणसाला लगेच कळते कि कुणाला किती मतदान झाले. फक्त तोंडं बघून. तरणी पोरं कधी बाहेर न पडणार्या पोरींची वाट बघत असतात. लांबून बघूनच भागवायचं, न्हायतर लय घोटाळा होतो. ह्या मतदानाच्या सणातून स्वताला अलिप्त ठेवणारे खूपच कमी लोक.

मतदान करून वातावरन बघावं म्हणावं म्हणून चावडीत येवून उभा राहिलो. ग्रामपंचायत मध्ये सत्तधारी मंडळी हातात मतदार याद्या घेवून जाणारा येणाराच हिशोब ठेवत होती. काही कार्यकर्ते कडेने उभे राहून उगीच भाम्बावल्यासारखे इकडे तिकडे बघत होते आणि आपल्याला पण गावातल्या राजकारणात लय किंमत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. ह्यांच्या नेमक्या विरुद्ध बाजूला एक हॉटेल मध्ये विरोधी पक्ष्याचे लोक. वातावरण तेच. फक्त काही लोक कधी हिकडचा चहा प्यायचे तर कधी तिकडचा चिवडा खायचे.

एवढ्यात माझे एकट्याचेच लक्ष एका मोठ्या आणि जबरदस्त आवाजाने वेधून घेतले. कारण बाकीच्यांना त्याची सवय झालेली असावी
"येईईईईईईईई ~~~~~~ एक नंबर घड्याळ हां ~~~~~~ नाद नाय करायचा, अय बापू काय हाणलं घड्याळ, हाय का नाय? सगळ्या गावाच्या आयला घोडा लावीन हा पठ्या हां नाद नाय करायचा" तर हा पठ्या म्हणजे भैरू आप्पा, वय पस्तीस आसपास, एका पायात निळी स्लीपर एका पायात पिवळी स्लीपर, सदऱ्याच्या एक अडून एक गुंड्या तुटलेल्या, कर्दुड्याने प्यांटी संगट इज्जत पण टिकवलेली, कपाळाच्या दोन्ही बाजूनी टक्कल, कुठेतरी पडल्यामुळे एका गालाला माती लागलेली आणि हातात बीअरची बाटली. कलंडत, कलंडत येणाऱ्या जाणार्यांना धरायचा प्रयत्न करत होता, पण लोक चुकवून जात होते.
मला बघताच सावरत सावरत पळत येवून माझ्या गळ्यालाच मिटी. सायेब कवा आलाव, एन नंबर माणूस, चला नाइण्टि सांगा न्हायतर माज्याकडून प्या. 

आरं नाय भैरूआपा मी नाय घेत. पण ड्राय डे हाय कि आज आन तू उघड्यावर पेतोय? वो सायेब, पुलीसाच्यात ताकताय का आपल्याला हात लावायची ?आन तुमी पेत नाय, कुणाला **वायला शिकीवता? अहं तिकडे पुण्याला काय करता ती कळत न्हाय का आमाला ?
भैरू अप्पा नकु राव तू पी, तुला देतो पैसे मला जाऊदे.
तसं नगं. पण साये~~~~~`ब एक नंबर बाणच येणार, बाण सोडायचा नाही यंदाबी. त्याला माहित होतं मी बाणाचा माणूस आहे.
मी अंदाज घेत घेत पुढे निघालो आणि तो अजून गावाला घोडा लावायला रिकामा झाला.


No comments:

Post a Comment