Wednesday, April 2, 2014

गुडीपाडवा

तिसरी पर्यंत गावातच होतो. गावात कोणत्याच सणाचे कौतुक नसायचे. अगदी दिवाळीला सुद्धा सकाळपर्यंतच सगळं उरकून दुपारी भाकरी बांधून रानात जाणारेच बहुतेक लोक. अभ्यंग स्नान वैगेरे मध्यमवर्गीय गोष्टी त्यावेळी फक्त ब्राह्मण लोकांना किंवा मोठ्या जमीनदार लोकांनाच परवडायच्या किंवा त्याचे कौतुक असायचे. बाकीच्यांच्या दिवाळीची उडी प्रकाशच्या माक्याच्या तेलापर्यंत पोचली तरी मोठी गोष्ट. 

आज टीव्हीवर डोंबिवलीत, गोरेगावला निघालेल्या मिरवणुका पाहिल्या आणि ह्या सणासुदीचे कौतुक फक्त शहरी मध्यम वर्गीयानाच असते याची तीवृ जाणीव झाली. चौथीपासून मी पण स्वताला मध्यमवर्गीय वैगेरे समजू लागलो होतो. कारण वडील सहकारी साखर कारखान्यात का हुना पण नोकरीला लागले होते. त्यामुळे महिन्याला काही पैसे हमखास मिळणारे लोक म्हणजे मध्यम वर्गीय या संज्ञेत मी आमच्या कुटुंबाला बसवायला चालू केले होते. गुडी पाडव्याची सकाळची लगबग चालू व्हायची आणि माझा वडिलांच्या मागे तगादा असायचा कि आपलीच गुडी सर्वात उंच पाहिजे. झालं मग चांगलिचुंगली कापडं घालून गुडी उभारली कि कडुलिंबाच्या दोनचार बिया गुळाबरोबर खायच्या आणि साखरेचे हार वाटायला चालू व्हायचे. आपल्या सलगीतल्या लोकांच्या घरी जावून त्याना हार देणे. ज्यांच्याकडून आपले काही तरी काम आहे किंवा स्वार्थ असेल तर त्यांच्या घरी खोबऱ्याचा हार द्यायचा. दुपारी येळवण्याची आमटी, पुरण पोळी आणि भात वर्पून हाणायचा. तोंडी लावायला वेगवेगळ्या धान्याच्या पिठापासून केलेल्या भातुड्या, पापड्या कुरवड्या इत्यादी. संध्याकाळी संपला सन. हे का करतोय, कश्यामुळे करतोय याच्याशी कुणाला देणेघेणे असलेले मला दिसले नाही. पण आनंद उत्सव साजरा तेव्हा पण होत होता आणि आज पण होतोय. थोडेफार स्वरूप बदलले असेल.

थोडंसं मोठं झाल्यावर कळले कि गुडीपाडवा हा सण का साजरा करतोय याच्यासाठी प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या थेऱ्या आहेत. कोणत्या थेरीला खरे मानावे किंवा नाकारावे आपला तेवढा अभ्यास नाही. पण मित्रानो कालच्याच दिवशी संभाजी महाराजांची क्रूर पणे हत्या करण्यात आली होती ते दुःख तो राग मनात असतान तुमच्या शुभेछ्या कोणत्या भावनेने स्वीकारू ? किंवा कोणत्या भावनेने तुमच्या आनंदात सहभागी होवू ?

No comments:

Post a Comment