Wednesday, April 2, 2014

रानात जाणार मी आणि साथीला गळ्यातला रेडिओ

उगीच फिलीप्सचा लांबक्या वादिचा रेडीवो गळ्यात अड्कावून गावापासून लांब असलेल्या शेतात जाऊ वाटतंय. 
दुपारची दोनची वेळ, वरून कडक उन पडलेलं, चौफेर वाळलेल्या पिवळसर तांबूस गवतातून काळ्या सापासारखी इस्कट्लेलि बारीक पायवाट, दूरदूर पर्यंत माणसाचा मागमूस नाही, कुठेतरी दोन तीन जनावरे चरल्याचे नाटक करत आहेत आणि रस्त्यापासून फर्लांगभर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली दोन चार म्हशी स्वताला उनापासून वाचवून ल्हाकत ल्हाकत रवंथ करत बसल्या आहेत. सुगी संपून गेल्यामुळे नजरे समोर आबाळा पर्यंत पसरलेले ओसाड रान आणि त्याला नजर लागून नये म्हणून कुठेतरी बागायताचा हिरवा ठिपका. उनाच्या झळयाने बारीक झालेली नजर, छोट्याश्या वाऱ्याच्या झुळुकीने अंगावर उडणारा फुफुटा आणि डोक्यावर उन लागून नये म्हणून बांधलेली टापर . सावकाश चालत चालत आपल्या रानातल्या लिंबाच्या झाडाखाली लोळायची आतुरतेने झपाझप पडणारी पाउले. रेडीवोवरच्या भुले बिसरे गीत मध्ये लागलेले "कभी कभी मेरे दिल में खयाल आता है' हे गाणे त्या रानातल्या शांततेचा भंग करून आपलाल्या स्वप्नात घेवून जात आहे. होय डोक्यात ते स्वप्न आणि रानातल्या चवाळ्यावर पडण्याची झालेली घाई. बाकी जगात काय घडत आहे त्याच्याशी कसलं आलंय देणंघेणं.

No comments:

Post a Comment