Wednesday, May 7, 2014

भूतकाळाच्या मागे पळताना

दिवस मावळायला चीर घोडी, आट्यापाट्या, ब्याट बॉल, इटी दांडू जो कोणता खेळ खेळत असु तो बंद करून घाम्याघूम होवून घरी जायचं. ब्याट बॉल इटी दांडू काय असेल ते खाटाखाली टाकायचं आणि तडक जेवायला. हात धुणे वैगेरे चाळे कधीतरी बापाने एखादी शिवी देवून आठवण करून दिली तरच. नाहीतर पहिले एकदोन घास जास्तच चांगले लागत असावेत. धूळ, घाम वैगेरे. जेवण झाले कि हात्रून पाघ्रून घेवून तडक देवळात, आपल्या आपल्या जागी कापडं टाकून लगेच  देवळामागच्य रहदारी नसलेल्या रस्त्यावर अड्डा मांडायचा. घरी थांबणे म्हणजे अपमान वैगरे वाटत असावा. आपण कितीहि  फास्ट उरकून आलो तरी आपल्या अगोदर तिथं पर्मनंट मेंबरं असायचीच. त्यात चावट, मिट्या, शऱ्या, शांबूळं, पप्या, उम्या इत्यादी इत्यादी हि अनुभवी गाबडी. ह्यांच्या तोंडात गुटका, तंबाकू वैगेरे आणि रस्ता सगळा घान केलेला. अर्र तिथं नकु बसू, तिथं थुक्लोय, अर्र तितंबी…तुमच्या आयला लावला नामा गडदु, जरा लांब थुकायला येत नाही कारं ?

बरं दि तंबाकू........

तू काय जावई लागतो का बे इकत घेत जा कि, म्हनं दि तंबाकू, मिळत नसती!

आबे दिकी आमची म्हतारं म्हातारी खीसं तपास्त्यात म्हणून मागतोय, तुम्हाला काय आई बापानी सुडून दिलंय, बापाकडून तंबाकू मागून खायची टाप हाय तुमची.

घालाय आता तर देतंच नसतो.

बरं धररं, च्यायला इक्याला नाही म्हणायचं मजी अवगडय, आयघाला उद्याच्या म्याचला बोलिंग करणार नाही मग,

इकास उद्या आयघाल्या ह्याट्रिक पाहिजे, नाहीतर पहिली बोलिंग मिळणार नाही……

अश्या तर्हेने चालू व्हायचा चांडाळ चौकडीचा कार्यक्रम. ह्यात कुणी शिकत असलेली, कुणी शिकण्याची याक्टिग करत असलेली तर कुणी शिक्षणात काय राम नाय म्हणून मागं पुढं बघणारी मंडळी. कार्यक्रमाची रूपरेषा तीच असे उद्याच्या क्रिकेट म्याचचे प्ल्यानिंग आणि चाळीवरील लफडी.

तेवढ्यात इट्ठल समोरून येताना थोड्याश्या अंधारात सुद्धा वोळखू यायचा. हा कारखान्यातील हमाल. पायात पुरातन काळी शिवून घेतलेली चप्पल, कधी काळी पांढरी असावी अश्या इजारीची एक बाही गुडग्या पर्यंत आणि एक बाही पाया पर्यंत, हातातल्या रुमालात बांधलेली सहा अंडी, अंगात तीन गुंड्याचा अंगरखा, डोक्यावर तिरकी आणि पडतेय अशी वाटणारी पण कधीच न पडणारी टोपी, आणि रिकाम्या रस्त्यावर दक्षिण उत्तोर जीगज्याग करीत चालणे. एकदा पळत पळत तोल सावरत रस्त्याच्या दक्षिणेला तर लगेच तिकडे जास्त झाले म्हणून तिरकं पळत पळत उत्तरेला, पण रस्ता सोडून खाली गेलेला आणि पिवून पडलेला हा मला कधीच दिसला नाही. हा लांबून येताना दिसला कि आम्ही मंडळी सावरून बसत असू. किमान पंधरा मिनिटे टाईम पास.

कायरे जोक्त्यानो, काम धामं कराकी, आयबापाच्या पोटाला धोंडं झालं असतं तरी परवडलं असतं…

अजून थोडी मजा करायच्या आतच त्याची अतिशय गरीब बायको यायची आणि त्याला हाताला धरून न्यायची. किती जरी प्याला असला तरी बायको समोर एक शब्द नाही, ना बायकोचा त्याला शब्द. थोडा वेळ शांतता.

पण हाच जर इट्टल दुसर्या दिवशी सकाळी कामाला जाताना दिसला तर वोळख पण नाय दाखवणार.

आमच्या समोरच्याच बाजूला मोठ्या माणसांचा मेळा असायचा. कामावरून सुटून जेवण  उरकून उन्हाळ्यातील मस्त पाशिमेकडील वारे खात गप्पा.  त्यात राजकारण हाच मुख्य विषय आणि मुख्य पात्र पण एकंच "पवार साहेब". तारीफ तरी किंवा शिव्या तरी.

कारखान्यावर भरणारे क्रिकेटचे सामने म्हणजे आकर्षण असायचे.  off season  असल्याने कामगारांची सामने पाहायला गर्दी, त्यांचीच पोरं खेळतात म्हटल्यावर बक्षिसे लावणार आणि देणार पण. लहान मुले शाळा, शिकवण्या बुडवून सामने बघायला.  बायका सुद्धा किती रणा झाल्या आणि कोण जिंकले म्हणून विचारायच्या.  कारखान्याचा संघ परगावच्या संघा विरुद्ध हरणे म्हणजे दोन दिवस सुतकच असायचे कारखान्याच्या चारी चाळीवर

अश्या एकदम स्वर्गीय आणि जिंदादिल कारखान्यावरच्या वातावरणात बालपनाच आणि तरुणपणाचा आनंद लुटण्याचे भाग्य लाभले. आज फक्त दहाच वर्षा नंतर गेलो होतो. थोडी आशा होती कि सगळेच नाही पण भूतकाळातील काही क्षण तरी पुन्हा अनुभवू शकेल. मान्यय आजवर कुणालाच भूतकाळ पुन्हा जावून पकडायला जमले नाही पण तो उध्वस्त होताना आणि झालेला पाहण्याचे दुर्भाग्य पण खूप कमी लोकांच्या नशिबात आले असेल.

तो ओस पडलेला कारखाना, ज्या मैदानावर आम्ही अनेक सामने गाजवले त्या मैदानाचे आणि स्टेजचे रुपांतर एखाद्या भीषण उजाड स्थळात झालेले,
ते कायम भरलेले असलेले देवूळ रिकामे पाहूनच हृदयात धस्स झाले. एखाद्या गावावर गाढवाचा नांगर फिरवणे म्हणजे काय असते त्याची जाणीव झाली.

चावट भेटला. जिथे जिथे आम्ही टवाळक्या करत फिरायचो, अभ्यासाला जायचो,  तिथं जावून तोच आनंद मिळवायचा प्रयत्न करत होतो आणि चावटला कंटाळा येत होता. संध्याकाळी बसलो दोन चार पेग झाले आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी येवू लागले.

च्यायला, ये आयघाल्या रडायला काय झालं, च्यामायला, देवाच्या दयेने चांगलं झालंय, एक नंबर पगाराय, बायको लेकरं मस्त हायती, आई बाप खुश हायती आणि तुला काय बोक आलाय रडायला. का काय अडचनाय का घरी? च्यायला तू लका एक नंबर दादा माणूस रड्तुस काय बाया सारखं.

त्याचं लेक्चर होवू दिलं आणि म्हणालो काय न्हाय झालं तू वड ती राहिलेली आपल्याला अजून मागवयाचीय.





2 comments:

  1. ज्या माणसाला विचाराची सोबत आहे त्याला कोणतेही अन्तर लांब वाटत नाही ...आणि भूतकाळात फिरताना तर मज्जाच , माणसाला भविष्य खुणावत असते , आणि वर्तमान तुडवायचा असतो तरी मन सारखे भूतकाळात घुटमळत असते .

    ReplyDelete
    Replies
    1. होय योगेश विचारांची साथ असली कि काही लागत नाही भूतकाळ तर कायम मिसच करतो आपण.

      Delete