Saturday, November 29, 2014

"जातीसंस्थेचा इतिहास आणि काही जातींचा इतिहास प्रकाशन वर्णन

काल संजय सोनवणी यांच्या  "जातीसंस्थेचा इतिहास आणि काही जातींचा इतिहास" ह्या पुस्तक प्रकाशना वेळी प्रा. हरी नरके, मा.प्रसन्न जोशी, मा. डॉ.सदानंद मोरे,व डॉ. श्रीपाल सबनीस ह्या मान्यवरांची मते आणि भूमिका ऐकायची संधी मिळाली. संजय सोनवणी यांच्या प्रस्तावनेनंतर प्रसन्न जोशी यांनी आपल्या वोघवत्या शैलीत मराठा समाज्याच्या दुटप्पी भूमिकेवर खरा खरा वोरखडे वोढले. मराठा समाजातील बुद्धिवाद्यांनी मराठा समाजाच्या प्रबोधनासाठी काही केले नाही, जे काय केले ते समाज सुधारण्यासाठी केले असे मत मांडले. मराठा समाज क्षत्रियत्व मिळावे म्हणून लढला आणि आता शुद्रत्वासाठी भांडत आहे हि मराठ्यांची दुटप्पी भूमिका त्यांनी चव्हाट्यावर आणून समाज सुधारणेच्या दिशेने योग्य पाऊल टाकले. म्हणजे मराठ्यांनी दोन डोंगरावर पाय न ठेवता एकाच डोंगरावर पाय ठेऊन जातीर्निर्मुलनासाठी काम करावे असा सल्ला दिला.  प्रसन्न जोशी यांनी अ ह साळुंके यांचा उल्लेख कश्यासाठी केला ते आता आठवत नाही. पण त्यांनी जाता जाता नेमाडे ह्या विषयाला मधेच हात घातल्यामुळे सभाग्रहात जरासे चैतन्य निर्माण झाले. "जवखेडा घटनेचा निषेध नेमाडेंनी का केला नाही?" ह्या प्रश्नाने तिथे उपस्थित असलेल्या नेमाडपंथीयांचे आणि विचारपिठावर उपस्थित हरी नरके यांचे कान टवकारले गेले असावेत. तसेच प्रसन्न जोशीं यांनी संजय सोनवणीनि मांडलेल्या मतासाठी आणि जुन्या अभ्यासकांच्या खोडलेल्या मतासाठी मार खायला तयार राहण्याची प्रेमळ सूचना पण केली. नंतर हरी नरकेनी या सूचनेला अनुमोदन देऊन "रात्रंदिनी त्यांना युद्धाचा प्रसंग" असे नमूद करून ते तुकाराम महाराजांचे खरे अनुयायी असल्याचे दाखवून दिले. मार खाणे हे प्रसिद्धी साठी जरुरीच असते.पण तो मार त्यांना कुणाकडून अपेक्षित आहे ते दहा वर्षापूर्वी झालेला भांडारकर संस्थेवरील हल्ल्याच्या आठवणीने श्रोत्यांच्या लक्षात आलेच. एक दिवस अगोदरच नेमाडेना महात्मा फुले यांच्या नावाचा पुरस्कार दिलेला असल्याने हरी नरके,  नेमाडे यांचे समर्थन करताना म्हणाले कि एका घटनेवरून त्यांचा निषेध व जयजयकार करू नये पण आयुष्यभराच्या कामाकडे बघून त्यांना तोलावे. हे ऐकल्या नंतर माझ्या सारख्या नेमाडपंथ्याचा जीव भांड्यात पडला. संजय सोनवणी यांना पण त्यांच्या एका पुस्तकावरून तोलू मोलू नका संपूर्ण आयुष्याचे काम बघूनच त्यांच्या विषयी मत बनवा अशी सूचना वजा विनंती त्यांनी श्रोत्यांना केली.  विद्रोह करणे म्हणजे फक्त ब्राह्मणांना शिव्या देणे नाही. पण आता खरे अन्याय करणारे कोण आहे त्यां जातीचे नाव घेऊन त्यांना ठोकण्याची गरज पण हरी नरके यांनी नमूद केली. त्यांना अपेक्षित असलेली ती जात "मराठा" असावी असा माझा अंदाज आहे. मधेच मला एक अर्जंट फोन आल्यामुळे पुढचे प्रबोधन करून घ्यायची संधी मला गमवावी लागली. त्यामुळे डॉ मोरे आणि डॉ सबनीस यांना ऐकण्यासाठी पुढच्या कार्यक्रमाची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.
संजय सोनवणी यांच्या या अगोदरच्या पुस्तक प्रकाशना वेळी डॉ सबनिसांना खेडेकरांचा उल्लेख का करावा लागला हे समजले नव्हते. यावेळी खेपेला  पण प्रकाशनावर भांडारकर संस्था, अ ह साळुंके, खरे दुश्मण, मराठा राखीव जागा याचेच सावट होते.

Monday, November 24, 2014

Intersteller

शहरातील प्रकाशप्रदूषणापासून दूर पौर्णिमेच्या रात्री शेतात उताणे पडुन आपण आकाशातील चांदण्यात विहार करत असतो त्यावेळी तो नयनरम्य नजारा आणि शांतता आपल्याला वेगळीच अनुभूती देत असते. कुणाला त्या चांदण्या रात्रीकडे बघून प्रेयसीची आठवण येते तर कुणाला ते मानवाला देवाने दिलेले सुंदर छत वैगेरे वाटते तर कुणी आकाशात सप्तर्षी वैगेरे शोधून आपली अध्यात्मिक भुक भागवून घेतो. Intersteller हा चित्रपट त्या चांदण्यांचे निरीक्षण करताना आपण पाहत आहोत ते दृश्य हजारो वर्षापूर्वीचे आहे, म्हणजेच आपण त्या चांदण्यांचा आणि आकाशगंगांचा भूतकाळ पाहत आहोत हा विचार ज्याच्या डोक्यात येतो त्यांच्यासाठी चित्रपट पर्वणी आहे

स्वताचे अस्तित्व विसरायला लावणारे खूप कमी सिनेमे असतात, त्यापैकी हा नक्कीच एक आहे Intersteller. नोलानचा अगोदरचा सिनेमा "Inception" डोक्यावरून गेलेला असल्याने हा सिनेमा कळेल कि नाही हि शंका होती. १००% कळला कि नाही हे सांगता येणार नाही पण पावणेतीन तास मी स्वतःला विसरून गेलो होतो. . कुपर (Matthew McConaughey)  च्या जागी मीच आहे आणि आता पुढे काय वाढून ठेवलंय ह्या भीतीत तीन तास त्या Spaceship मधून फिरत होतो. पृथ्वीच्या वातावरनातून बाहेर पडताना दिसणारी पृथ्वी अनेक चित्रपटातून पाहिली आहे पण हा खेळ तिथून सुरु होऊन आपल्याला सुर्यामालेतून बाहेर पडताना दिसणारी सूर्यमाला, "Worm Hole" 'Black Hole" "Horizon" "Gravity" अश्या अनेक संकल्पनाना अस्तित्वात आणलेल्या जगातून घेऊन जातो. श्वास रोखून धरायला भाग पाडणारे Hans Zimmer यांचे संगीत चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन गेले आहे. प्रकाश्याच्या वेगाने चालणारे वायुयान आणि त्याच वेगाने चालणारे संगीत एकदम थांबते आणि हॉल मध्ये Pin Drop Silence होतो. एक भीतीयुक्त श्वास रोखून धरायला लावणारी शांतता. आणि काहीच क्षणात तोच वेग पकडणारे संगीत आणि सिनेमा.

पृथ्वी वर राहण्यासाठी मानवाला योग्य वातावरण राहिले नसल्याने सूर्यमालेच्या बाहेर दुसऱ्या ग्रहावर कुठे वस्ती तयार करता येते का ते पाहण्यासाठी Astronauts जात असतात. जिथे योग्य ग्रह सापडेल तिथे मानवी वस्ती करण्याची कल्पना असते.  नोलानने आणि त्याच्या टिमने हा प्रवास अतिशय रोमांचकारी बनवला आहे. त्याने आपल्याला माहित असलेल्या वैज्ञानिक थेर्यांचा वापर कुशलतेने आणि जरासे स्वातंत्र्य घेऊन केला आहे. ग्रुत्वआकर्षनाच्या अभावी यानामध्ये तरंगणारी मंडळी यानाला एका विशिष्ट वेगामध्ये गोल फिरवून गृत्वाकर्षण तयार करतात आणि यानात सुद्धा चालू लागतात इथून धक्के बसायला चालू होतात. यानाला एके ठिकाणी थांबवून जेव्हा "कुपर आणि ब्र्यांड" 'Worm Hole" मधून जाउन दोन तासामध्ये दोन ग्रहावर जाउन येतात तेव्हा यांनामध्ये थांबलेला त्यांचा सहकारी म्हणतो " २३ वर्ष वाट बघितली मी " आणि तो २३ वर्षांनी म्हातारा झालेला असतो. पृथ्वीवरून येणारे २३ वर्ष साठलेले संदेश जेव्हा "कुपर" पाहू लागतो तेव्हाचा त्याचा  अभिनय Matthew McConaughey ला जगातील सर्वोत्तम अभिनेत्यामध्ये स्थान मिळवुन द्यायला पुरेसा आहे. एकही शब्द न उच्चारता केलेला पाच मिनिटाचा अभिनय आणि हिंदी चित्रपटातील शब्द बंबाळ अभिनय याची तुलना होऊ शकत नाही. आपण कितीही विज्ञान, अवकाश्याचा शोध घेतला तरी त्यामागील प्रेरणा हि आपले प्रेमच असते. आपल्या कुटुंबावरील प्रेम, मानवजातीवरील प्रेम. हा संदेश द्यायला पण नोलान विसरत नाही.

गेली दोन हजार वर्षे पृथ्वीच्या रहस्याचा शोध घेणारा माणूस अवकाष्याचा शोध तेवढ्याच ताकदीने घेऊ शकतो हेच ह्या चित्रपटातून सांगायचे असेल बहुतेक नोलानला. अर्थात चित्रपटातील काही गोष्टी प्रत्याक्ष्यात शक्य आहेत का ? असा  प्रश्न काही लोक उपस्थित करतील पण आज आपण उपलब्ध ज्ञानानुसार प्रश्न विचारू पण अजून १०० वर्षांनी या प्रश्नांना काही अर्थ राहिल का हा प्रश्न पण उपस्थित होतोच.

अवकाश्याचा प्रवास करून मानवजातीला वाचवण्यात यशस्वी झालेला "कुपर" कुपरला आपली दहा वर्षाची मुलगी हि म्हातारी होवून मृत्यूशय्येवर दिसते पण तो तेवढाच तरुण असतो.

आजून जास्त काय लिहित नाही. हा प्रवास स्वतःने प्रत्यक्षात करण्यातच मजा आहे.

तरी पण मला पडलेले काही प्रश्न -
१. लहानपणी कुपाराच्या मुलीला भुताची जाणीव होत असते , ते बूट नसते तर भविष्यातील कुपारच असतो , असे दाखवले आहे ? तर कुपर तिथेच असताना भविष्यातून कसा बोलू शकेल ?
२. कृष्ण विवरातून गेल्या नंतर तो कुठे जातो आणि दुसर्या क्रूला कसा सापडतो ?
३. तो ब्र्यांड ला भेटायला जाइल तेव्हा त्याच्या वयामध्ये फरक पडणार नाही का ?











Tuesday, November 18, 2014

भारतातील बदलती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती

लोकशाही मध्ये एखादाच पक्ष किंवा घराणे दीर्घकाळ सत्तेवर राहणे हे अपरिपक्व लोकशाहीचे द्योतक असते. २०१४ भारतामध्ये खऱ्या अर्थाने बिगर काँग्रेसशी सरकार आले. जे कधीना कधी व्हायचेच होते. मनमोहन सिंग सरकारने लोकांना चंद्र जरी आणून दिला असता तरी ते पडलेच असते. त्याला कारणीभूत आहे भारतातील बदलत्या, सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक जानिवाकडे काँग्रेसने केलेले दुर्लक्ष. काँग्रेस पक्ष हा १९६०, १९८० च्या दशकात बनवलेल्या चष्म्यातूनच २०१४ मधील भारताकडे बघत राहिला. भारताला २०१४ मध्ये आणून ठेवण्यात काँग्रेस पक्षाच्या धोरणाचेच कर्तुत्व होते. पण आपण स्वत:च आणलेल्या अमुलाग्र बदलाचा परिणाम म्हणून भारतामधेच एक स्वतंत्र भारत तयार झाला आहे हे ओळखण्यात काँग्रेस पक्ष कमी पडत होता. आणि ह्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक महत्वाकांक्षेला कुरवाळनारा कुणीच भेटत नव्हता. तो मसीहा मोदींच्या रूपाने भेटला. हा स्वतंत्र भारत म्हणजेच उच्च मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय तसेच भारताबाहेर राहून भारतावर अतोनात प्रेम करणारा आणि अमेरिकेत आहे तसेच भारतात का होऊ शकत नाही असे प्रश्न तिथेच राहून उपस्थीत करणारा समाज. ह्या समाजाचा जन्म मनमोहन सिंगाच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे. भारतात राहून शिकलेला, नोकरीची संधी मिळालेला, आपल्या बापाला जेवढा फंडाचा पहिला हप्ता मिळाला होता तेवढा मासिक पगार घेणारा, आपल्या बापाने वर्षभर घाम गाळून पिके आडतिला घालून वर्षात येणार्या पट्टी एवढाच मासिक पगार घेणारा समाज आहे. जुन्या आणि उच्च मध्यमवर्गीयात नवमध्यम वर्गीय समाविष्ट होताना नवमध्यमवर्गीयांना आमची प्रगती झाली आणि आम्ही तुमच्यातीलंच आहोत हे सिद्ध करण्यासाठी जुन्या गोष्टीना शिव्या द्याव्या लागतात. त्यातील एक होती काँग्रेस. वर्षानुवर्षे निर्णयप्रक्रियेत आम्हाला स्थान नाही हि अढी मनात बाळगून असलेला शहरी मध्यमवर्गीय, व्यापारी वर्ग हा एकवटून मोदींच्या मागे उभा राहिला आणि राजकारणात आणि निर्णयप्रक्रियेत स्वताचे स्थान शोधू लागला. ह्या समाजाला त्यांचे प्रतिनिधित्व मोदी करत आहेत ह्याची खात्री पटली होती. त्यामुळे काधीनव्हे तो हा समाज या निवड्णुकित सक्रीय होता. राजकारणाविषयी ब्र न काढणारा गुजराती, मारवाडी समाज देशभर मोदीचा प्रचार करताना दिसला.

अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया पर्यंत झालेल्या मोदींच्या सभेतून आपल्याल एक गोष्ट सहज लक्षात येईल ती म्हणजे मोदींनी या भारताच्या तीस कोटी मतदारावर केलेली जादू. सत्ता प्राप्ती नंतर दोनच महिन्यात मोदी ह्या सभांमध्ये म्हणतात "मैने ये करके दिखाया " आणि समोर बसलेलि उच्चविद्या विभूषित मेंढरे चेकाळून चीरकू लागतात, उठून नाचू लागतात आणि जिंदाबाद जिंदाबाद म्हणून ओरडू लागतात. पण त्यावेळी ते विसरलेली असतात कि त्यांना तिथे पोहोचवण्यात कॉंग्रेसच्या धोरणाचा किती मोठ वाटा आहे. उदारीकरण आणि खुले आर्थिक धोरण स्वीकारताना तत्कालीन भाजपची भूमिका काय होती हे त्यांना माहीतच नसते.   पण एकदा जादू झाली कि तिथे सुशिक्षित, अशिक्षित, शहाणे, वेडे असा काही फरक राहत नाही. ती सगळी जनता पिपाणिवाल्याच्या मागे जाऊ लागते. 

"हिंदुस्थान में दुनिया का नेतृत्व करनेकी क्षमता है" ह्या वाक्या नंतर होणाऱ्या टाळ्यांच्या कडकडात भारतातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा, दलितांचा आक्रोश दबून गेलेला असतो. पंतप्रधानांच्या  ह्या अश्या घोषणावरून सरकारच्या प्राथमिकता दिसून येतात. भारताच्या खऱ्या गरजा  झाकून ठेवून लोकांना स्वप्ने दाखवणे काही विशिष्ट लोकांची स्वप्ने पूर्ण झाली कि त्यांचा वापर करून घेणे. "Dream Merchant" "स्वप्नांचा व्यापारी: हि संज्ञा मोदींना तंतोतंत लागू पडते. आजच्या शरद पवारांच्या भाषणात मध्यम वर्गीयावर लक्ष द्या आणि त्यांचा विश्वास जिंकायचा प्रयत्न करा हा संदेश आहे.  हा धोरणात्मक निर्णय घ्यायला ह्या समाजाने सर्वच पक्षांना मजबूर केले आहे. ह्या निवडणुकीत ह्याच व्हाइट कॉलर समाजाच्या पाठीमागे बाकी समाज फरफटत गेला होता पण पुढची लढाई हि काँग्रेस विरुद्ध भाजप असेल कि ते सांगता येत नाही पण मध्यमवर्ग विरुद्ध मागास, शेतकरी वर्ग अशी नक्कीच असणार आहे.