Monday, March 16, 2015

सौदा

तुटक वाहतूक असलेल्या डांबरी सडकंच्या कडेला एका रोगट वडाच्या झाडाखाली चहाचे हॉटेल म्हणावे अशी टपरी.  ह्या टपरी समोर ज्याला बाकडा म्हणू शकू अशी एक फळी एका बाजूने दगडावर आणि दुसऱ्या बाजूने वाकड्या तिकड्या लाकडावर टेकवली आहे.  त्या टपरीच्या मागेच चार पत्रे टाकून केलेली अजून एक टपरी आहे.  त्यात एक टोपीवाला माणूस कुणाला तरी उधार मिळणार नाही म्हणून शिव्या देतोय. त्या टपरीला लटकवलेले पोतं कवाडाचे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. जरा वेळाने आतला आवाज बंद झाला. सौदा बाहेर येउन त्या बाकड्यावर बसला. त्याने नळी सारखी झालेली प्यांट घातली आहे आणि त्याच्या एकावर एक पडलेल्या मांड्या लाकडासारख्या दिसत आहेत. त्याच्या तोंडावर अपमानाची कसलीही छटा नाहीये. थोडक्यात त्याच्या तोंडावर कसलेच भाव नाहीत. थोडेसे पांढरे केस, सुकलेला चेहरा आणि दाढीचे पांढरे काळे खुंट. त्याच्या कानावर बसलेली माशी उठवायची त्याला गरज वाटत नाही. त्याला आज दारू उधार मिळालेली नाही. तो तिथल्या चहा पिणाऱ्या लोकांकडे आणि रस्त्यावरून तुरळक जाणाऱ्या सायकली आणि वाहनाकडे बघत बसला आहे. काही तासने तो कंटाळून घराकडे चालू लागतो. त्याच्या त्या चाळीतील दोन खोल्यांच्या घरात त्याची बायको त्याची वाट बघत बसलेली आहे. तो जाऊन तिच्या मागे उभा राहतो. ती काहीच बोलत नाही. सौदा आशाळभूत पणे तिच्या खांद्यावर हात टाकतो.  ती लगेच हात झटकून म्हणते, "पुन्हा जर अंगावर हात टाकला तर चपलंच हानीन तोंडावर" सौदा लांब जाऊन लोखंडी पलंगावर बसतो.

"आरं आयघाल्या पोरगं तापानं फणफनलंय आणि तू कुठं गु खात फिरतोय रं ?" त्यांचा दहा वर्षाचा मुलगा झोपला आहे. त्याच्या अंगात भयंकर ताप आहे.
"चल कि त्याला घेऊन सरकारी दवाखान्यात, सायकल वर न्हेतो मी !"
"रयवारी तुझ्या बापाने सरकारी दवाखाना उघडा ठिवला होता का ?"

आता सौदा गप बसतो. त्याच्याकडे इलाज नसतो. तो साखर कामगार आहे आणि त्याच्या कारखान्याने गेले दहा महिने कामगारांची पगार दिलेली नाही. तेवढ्यात बाहेर TVS सुझुकीचा आवाज येतो. आण्णा आत येतात. त्यांना आत यायला सौदा जागा देतो.  भारदस्त व्यक्तीमत्वाचे आण्णा सौदाला तुछ पणे  ऑर्डर देतात, "बघतो काय सौद्या, उचल पोराला, आन बस माझ्या मागे गाडीवर" असे बोलताना अन्नाची नजर सौदाच्या बायकोवर असते. सौदा पोराला उचलून बाहेर निघतो. त्याच्या पाठीमागे आण्णा निघतात आणि निघताना वळुन सौदाच्या बायकोकडे एक नजर टाकतात. ती त्यांच्याकडेच बघत असते. सौदा त्यांच्या मागे बसून गुपचूप दवाखान्यात जातो.  ते मुलाला दवाखान्यात दाखवून येतात. सौदा मुलाला त्या लोखंडी पलंगावर झोपवतो आणि कडेला गुपचूप उभा राहतो. काही क्षण शांत जातात. सौदा, सौदाची बायको आणि आण्णा. वैतागलेले आण्णा सौदाला विसची नोट त्याच्याकडे देतात. सौदा तडक घराबाहेर पडतो. त्याची बायको आतून दरवाजा लावून घेते. आता सौदा त्या वीस रुपयाची भरपूर दारू पिवून पुन्हा त्याच बाकड्यावर बसून काय विचार करत असेल त्यालाच ठाऊक.
















No comments:

Post a Comment