Monday, October 26, 2015

एकटेपणा आणि म्हातारी

आजपण ती नेहमीप्रमाणे तिन्ही सांजंला कुणाच्या तरी रानातून कामाहून आली. कधीकाळी पक्क्या घराची आता फक्त दगडंच उरलेली भिंत आणि वरती चार लोखंडी पत्रे असलेल्या खोलीच कवाड ढकलंलं आणि तशीच दारात बसली. दरवाजातंच बांधलेल्या शेळीने, मालकीण आल्याने आपल्याला पाणी पाजील म्हणून हालचाल केली पण तिने त्या शेळिकडे दुर्लक्षच केले. त्या कातरवेळेतिल संधीप्रकाशात तिने काड्याची पेटी शोधण्याचा प्रयत्न केला. तिथंच चुलीवर होती हे माहित असलेल्या तीने झटकन काडी पेटवली आणि तिच्या त्या एकदम झालेल्या प्रकाशात म्हातारीचा चेहरा काही सेकंद उजळून निघाला. तिच्या सृरकटलेल्या कपाळाच्या त्वचेवर मोठे निळे गोंदवन आणि पांढऱ्या केसाचा बुचका काही सेकंदापुरते उठून दिसला आणि पुन्हा त्याच भुरकट धुरकट वातावरणाने त्या घराचा ताबा घेतला. चुलीवरच्या चिमणीने आपल्याला अंधुक वाटणारा पण म्हातारीला पुरेसा प्रकाश द्यायला चालू केला. तिनं तिथल्याच दोन तुराट्या चुलीत घालून चूल पेटवली. चुलीच्या प्रकाशात आता त्या धुरकट खोलीतील वस्तू जरा स्पष्ट दिसू लागल्या. भिंतीच्या वरल्या बाजूला काळ्या भंगार झालेल्या लाकडी फळीवरील काही पितळेचे हांडे आणि भांडी हि तिच्या जुन्या भरल्या घराची साक्ष देत होती आणि खालीच पडलेली एक सगळीकडे आणि फाटून जीर्ण झालेली वळकटी तिचे वर्तमान सांगत होती. चुलीवर जर्मनची तवली ठेवून त्यात घोटभर पाणी टाकलं आणि घरातील उजेड कमी होऊन पुन्हा भुरकट वातावरण तयार झालं

ती तसंच बसल्या अवस्थेत जरासं दरवाज्यात आली आणि शेळीला पिळू लागली. तिचा संध्याकाळचा चहा हा संध्याकाळ इतकाच नियमित होता. रात्री ती शेळीला जवळच घेऊन झोपायची.

पंधरा वर्षापूर्वी पोरगी नांदायला गेली. वाटणीचा हिस्सा घेऊन गेली. लगेच काही वर्षांनी पोरगं पण अपघातात गेलं. सुनबाई जमीन विकून तिच्या लहान पोराला घेऊन माहेरी गेली.  आता ती निवांत जगतेय. जगण्यासाठी कुटुंबाची गरज असते ह्या समजुतीवर तिने मात केलीय.




No comments:

Post a Comment