Monday, October 12, 2015

दीपिका पादुकोने आणि गावाचा दुष्काळ निवारण

तिन्ही सांजला रानातून आलेली, गावातच दिवसभर कुत्री मारीत बसलेली, देवळात अंग खाजवत बसलेली कामाची, बिनकामाची सगळी मंडळी पंचायतीत जमली होती. एक दोन मेंबरं कुठं तरी पिउन पडली असतील नाही तर सगळी हजर होती. ज्या बाया मेंबर होत्या त्यांची मालकं हजर होती. यंदा ओबीसीचा सरपंच असल्याने लव्हाराचा दाद्या भाता तसाच जळता ठेवून मिटिंगिला आला होता आणि कोपऱ्यात आपला गुपचूप आन्द्याधारकपणे बसला होता. 

"बत्ती वाढवकिरं जरा , मायला राकेल काय घरचं आणायचं हाय व्हय!" भिबिषण आप्पांनी  पंचायतीच्या शिपायावर रुबाब मारला आणि सगळ्यांनी  भिबिषण आप्पाला अनुमोदन दिले.

"व्हय व्हय व्हय बत्ती मोठी करा, ह्याच्यायला शिपाई माजलाच हाय जरा" गर्दीतून एकमताचा आवाज.

बत्ती वाढविली. कुठून तरी आवाज आला, "मायला अच्छे दिन तर कधी यायचं कुणास ठाऊक, गावात लाईट तर कवाच नस्तिय"

कुणीतरी ते स्वतःच्या अंगावर घेऊन म्हणालं,  "तुम्ही तर काय केलं साठ वर्षात, फक्त बारामतीचाच इकास केला कि! "

"अय साहेबाला काय म्हणशील तर पाय तोडून हातात दिल", पाटलाचा राजा उठून त्या माणसाच्या अंगावर जात म्हणाला. 

कल्ला होणार भांडण लांबणार तेवढ्यात भैरा बिब्या म्हणाला, "तुम्ही आशीच आयघालणार असाल तर मी जातो आपला" मग सगळी शांत बसली.

भैऱ्या बिब्याने लव्हारच्या दाद्याला खुणावले आणि पुढे यायला सांगितले. दाद्या सरपंच होता. पुढे आला आणि गुपचूप बिब्याकडे,  आता काय करू ह्या नजरेने बघत बसला.

"हं मांडा ठराव सरपंच साहेब." बिब्या

दाद्याला काय करायचे नाही समजून हिकडं तिकडं बघू लागला.

आहो दादाराव, मी लिहून दिलेला कागुद काढा आणि वाचून दाखवा ठराव पंचायतीला. मग मंजूर करून पुढची कारवाही करायला सगळी रिकामी व्हत्याल.

"आज ह्या ठिकाणी ग्रामपंचायत मौजे खड्कलगाव हा ठराव एकमताने मंजूर करत आहे कि मा.  मुख्यमंत्री महोदय  श्री फडणवीस नाना यांनी कुमारी दीपिका पादुकोने  यांची आमच्याच आणि फकस्त आमच्याच  गावातील दुष्काळ निवारण आणि शेतकरी संगोपन ह्या कामावर निवड करावी. कुमारी दीपिका पादुकोने यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा मौजे खडकलगावातील शेतकऱ्याना आणि त्यांच्या पोरासोरांना व्हायलाच पाहिजे असे गावातील समस्त मंडळींचे मागणे आहे.  आणि ह्या मागणीसाठी उद्या सकाळी तहसीलदाराला एक निवेदन गावातील सगळी मंडळी मोर्चाने जाउन देतील. तसेच नाना पाटेकर, आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याची गरज आम्हाला नसून शेजारच्या गावाला जास्त आहे असा एक सल्ला पण मुख्य मंत्र्यांना देण्यात येईल.कुमारी दीपिका पादुकोने ऐवजी मुख्यमंत्र्यांनी जर श्रीमती मेधाताई भाटकर वैगेरे नवाची शिफारस केली तर सरकारला खडकलगावातील जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. 


सरपंच मौजे खडकलगाव 
दादासाहेब लोहार 


"आता हा ठराव गावाच्या चावडीवर लावा आणि सगळ्यांना सांगा उद्या भाकरी बांधून तालुक्याला तहशील दाराला निवेदन द्यायला हजर राव्हा. " भैऱ्या बिब्याने शिपायाला आदेश दिला. 

निवेदन चावडीवर लागले आणि गावात एकंच चर्चा. दीपिका पादुकोणे गावात येणार आणि आपल्या गावाला दुष्काळातून मुक्त करणार. आता दुष्काळातून मुक्त करणार त्यापेक्षा ती येणार म्हणून लोकांनी केस कापायला वारकाच्या  दुकानात गर्दी केली. लोकं कपडे भट्टीला देऊ लागली. आज नाही आली तर उद्या येइलच यावर लोकांचा इश्वास होता. भैरा बिब्याने ह्यात पुढाकार घेतलाय म्हणल्यावर हे काय फेल जाणार नाही ह्याची लोकांना खात्री होती. बघता बघता बातमी गावात पसरली आणि गावातील बायकांना काय करावे आणि काय नाही तेच समजेना. 

सांच्याला चांदणी वरी आली, घरातील गडी  माणसं भाकरी खाउन गप्पा मारायला देवळात, चावडीवर गेली. आजतर काय दीपिका शिवाय विषयच नव्हता. 

गांधारी मावशीच्या कानावर हि गोष्ट गेली आणि तिने गावातील काही बायकांची मिटिंग बोलवून धोका सांगितला. 

"आगं बायानो, पोरीनो, हि दीपिका का कोण हाय बाजार बसवी ती जर गावात आली तर आपली माणसं कामातून गेलीच समजा, याड लागून जाइल सगळ्यांना. तर आपुन बी ह्या दीपिकाच्या विरोधात उद्या तालुक्याला तहसिलदाराच्या अंगावर मोर्चा न्यायाचा हाय, आपली मागणी एकंच असंल, आम्हाला नाना पाटेकर, मकरंद का फिकरंद कोण हाय त्यो चालंल पण ती दीपिका नकु. कुणीच नाही जमलं तर ती श्रीमती मेधाताई भाटकर पण चालंल तसबी तिला आता कायबी काम नसलंच." तर गांधारी मावशीच्या पंच्यायतीत हा ठराव पण एकमताने मंजूर झाला. 

सकाळी उठून बायांनी आपाप्ल्यासाठी भाकरी केल्या आणि बांधून घेऊन तालुक्याला जायला शाळेपाशी जमा झाल्या. गडी माणसाना भाकरी नाही दिल्याने घराघरातून भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यामुळे गडी माणसं हारुन तशीच चावडीत जमा झाली. भाकरी नाही मिळाल्याची तक्रार बिब्या पर्यंत गेली आणि बिब्याने घोषणा केली "सगळ्या लोकांना तालुक्याच्या गावाला गेल्यावर पंचायती तर्फे झुणका भाकर मिळेल" लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 


तर दुसऱ्या दिवशी खडकलगावातून दोन मोर्चे तहसील कार्यालावर गेले.एक बाया माणसांचा आणि दुसरा गाडी माणसांचा. जेव्हा हे दोन मोर्चे तहसील कार्यालयावर गेले तेव्हा यांना समजले कि अशा अनेक गावातून पुरुष मंडळींचे मोर्चे आले होते आणि सगळ्यांची मागणी फकस्त आणि फकस्त "दीपिका पादुकोने" हीच होती. श्री श्री नाना फडणवीस ह्या मुख्यमंत्र्यांच्या जयघोषात लोक दीपिकाला मागणी घालत होते. शेवटी तहसीलदाराला  पोलिसांना पाचारण करून "सौम्य लाठीमार " करावा लागला. अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. लोक दीपिका दीपिका करत रस्त्याने बोम्बलत आणि लंगडत फिरू लागले.भैरा बिब्या आपला तिथली ओळखीच्या दारूच्या दुकानात शिप शिप घेत बसला होता. आणि आमदार साहेबाना फोन करून तहसीलदाराची बादलीच करतो म्हणून दारू दुकानाच्या मालकाला सांगत होता.   












No comments:

Post a Comment