Friday, January 9, 2015

जगण्यात काही अर्थ नसतो, तसा मरण्यात पण काही अर्थ वैगेरे नसावा

जगण्यात काही अर्थ नसतो, तसा मरण्यात पण काही अर्थ वैगेरे नसावा. पण जगण्यासाठी आपलं जनगोत सोडुन परमुलखात दिवस काढायचं. हे एक भयाण दु:ख. आपला मुलुख आपल्याला दोन वेळचे अन्न पुरवायला असमर्थ आहे कि आपल्यालाच काहीतरी जास्त करून दाखवायची खाज हेच अजून तुला समजलेले नाही. नाहीतर दोन वेळच्या भाकरीसाठी तू स्वत:चा देश, संस्कृती, मानसं सोडुन इथं बारा-बारा तास काम करत खितपत पडला नसता. रात्री झोपताना पोराची आठवण आली कि त्याचा फोटो काढून बघत बसायचं आणि बायकोची आठवण आली कि तिचा फोटो बघत तळमळायचं. आपला रूम पार्टनर तरी काय आणि आपण तरी काय, एकंच. वेळी अवेळी बाथरुमला जातो. ह्या संध्याकाळला आपल्या गावात असतो तर रम्य वैगेरे संध्याकाळ म्हणालो असतो का? छे! संध्याकाळ येउन गेलेली पण कळली नसती. इथला सूर्यास्त मात्र रम्य न वाटता उदास वाटत आहे. ह्या डोंगराच्या माथ्यावर बसून सारे शहर तुझ्या नजरेच्या टप्प्यात आहे. शहरातून, ट्राफिक, लोकांची गर्दी, बागेत खेळणारी पोरे आणि ह्या सगळ्यांचा मिळुन तयार झालेला गोंगाट. पण ह्या गोंगाटातील तुझ्या हक्काचा असा एक पण आवाज नाही.  ह्या शहरातील लोक आनंदी असतील, दु:ख्खी असतील पण त्यांचा आनंद आणि दु:ख एकटे नाही ह्याचे किती समाधान असेल त्यांना. समाधान असेल कि त्या समाधानाची त्यांना जाणीवच नसेल? कारण एकटेपणा आल्याशिवाय त्याची जाणीव होत नाही. आणि हा तर परमुलखातील एकटेपणा ! ह्या लाखो श्रीमंत/गरीब लोकांच्या शहरावरती सुर्य मावळताना कुणी घरी निघालंय, कुणी मुलांना घेऊन बागेत चाललंय, कुणी ओफ़िस मधून कंटाळून घरी पोहचून सुद्धा आपल्या मुलाला, बायकोला घेऊन हॉटेल मध्ये, बागेत फिरायला घेऊन जात आहेत. आणि ह्या लाखोच्या गर्दीत आपले काहीच नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. आपण  घेतोय ती हवा सुद्धा परकीच वाटतेय. उसनीच घेतोय आपण,  हि हवा सुद्धा. ह्यांचे देव, ह्यांची भाषा, ह्यांचे खेळ, ह्यांचे जेवण सगळे सगळे परके आहे. आणि आपण इथं जगण्यासाठी आलो आहोत. जगण्यासाठी कि जगवण्यासाठी ? बहुतेक जगवण्यासाठी म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. तेवढ्यात एकटीच जळत असलेली सिगारेट जळून त्याच्या बोटाला चटका बसला आणि तो भानावर आला. .................................................. .................................................. …………………….









No comments:

Post a Comment