Tuesday, February 24, 2015

माझ्या डायरीतील भाग

दिनांक : १३/०१/१९६२
काल सुर्षा कुठल्यातरी पेठेतल्या वाड्यात कसल्या तरी पुस्तकाच्या प्रकाशनाला घेऊन गेला. ह्या सुर्शाला असले लोक कुठे सापडतात कुणास ठाऊक. पुस्तक प्रकाशने, चित्र प्रदर्शने, फोटो प्रदर्शने बघत रिकामा खिसा घेऊन गावभर हिंडत असतो. आणि रात्री येउन माझ्या सिगारेटी संपवतो. हे म्हणजे उदाहरणार्थ थोरंच. आज त्याला मीपण सापडलो. दोन तास त्या बाकड्यावर बसून मी वाड्याच्या भिंतीवर टांगलेल्या लोकांचे फोटो बघून त्यांची नावे वाचत होतो. हे सगळे थोर महामहीम होते म्हणे आणि त्यांनी पुण्याच्या संस्कृतीचा भार खांद्यावर घेऊन त्यात आजून भर घालण्याचे काम केल्याचे पण कळले. आता तिथे त्या टेबलामागे बसलेल्या लोकांनी तो भार स्वताच्या खांद्यावर घेतला असावा. तिथे गोळा झालेले सगळेच लोक गोरे होते. बायका सुद्धा आल्या होत्या. बायका सुद्धा गोऱ्याच होत्या. त्या खूप नटुन वैगेरे आल्या होत्या आणि त्यांचे केस मोकळेच होते. तिथल्या बायका आणि पुरुषांचे पण व्होट येवढे लाल कसे कुणास ठाऊक. आपल्या गावातील बायकांचे व्होट लाल कसे काय नसावेत. हे म्हणजे भलतेच. पण ते खूप शुद्ध मराठी म्हणजे आपल्या शाळेतील पुस्तकातील धड्यात आसते तशी मराठी बोलत होते. "प्रचंड" वैगेरे शब्द बोलताना सुद्धा वापरणे म्हणजे थोरंच. टेबलामागे बसलेले लोक एकोड एकोड करून भाषण देत होते. ते सगळे लोकांना माहित असलेलंच बोलत असावेत तरी पण लोक शांतपणे ऐकत होते. अधून मधून इंग्रजी बोलून इंग्रजी लोकांची उदाहरणे दिल्यावर बाकी लोक टाळ्या वाजवत. बायका सुद्धा टाळ्या वाजवत. वरती टेबला मागे बसलेल्या चार लोकामध्ये एक काळा सावळा माणूस पण होता. ते पण महामहीम असावेत. पण ते बाकीच्या महामहीम सारखे दिसत नव्हते. त्यांना यंदाच्या अखिल ब्रह्मांड मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले आहे म्हणे. ते पण बोलले. आता पुण्याच्या संस्कृतीचा झेंडा त्यांचा खांद्यावर दिल्याने ती संस्कृती पुण्याबाहेर जाउन गावोगाव पसरेल अशी ह्या गोऱ्या लोकांना अपेक्षा असावी. गोरे लोक थोर असले पाहिजेत. त्यांना कळते कधी काय करावे. पण मला उगीच मधेच सिगारेटची तलप झाली. बाहेर उठुन जावे म्हटलं तर माझ्या उजवीकडे बसलेल्या बायकांनी माझ्याकडे तुछ नजरेने बघितले, मी तसाच वाट बघत बसलो.

सुर्शा त्यांच्यात शोभून दिसतो. कार्यक्रम झाल्यावर लोक त्याला पण बोलत होते. तो त्यांना वोळख असल्याचे दाखवत होता, लोक त्याला वोळख असल्याचे दाखवत होते.  एका विदुषीने त्याला "आणि तुझे ते आकाशवानितले काका कसे आहेत?"  असे पण विचारले . सुर्षा मोठ असला पाहिजे. काही इतर बायकांनी पण त्याच्याशी हात मिळविला.  पण माझ्याकडे कुणीच बघितले नाही. आपण म्हणजे पुण्यात शोभत नाही. चला  आता झोपून घ्यावे, नाहीतर सुर्षा येइलच सिगारेट मागायला.

दिनांक : १४/०१/१९६२
झोपेतून उठलो. पुन्हा झोपलो.

दिनांक : १५/०१/१९६२
कॉलेजमधल्या मुली सगळ्या मूर्ख आहेत.
दिनांक : १५/०१/१९६२
आज रविवार होता.