Wednesday, June 8, 2016

नाणेघाट



माझं ना आता, आमच्या गावच्या वरच्या आळीच्या पारीसारखं झालंय, म्हणजे नाही म्हणून कुणाला म्हणायचंच नाही, मग आपल्या जीवाला कितीबी त्रास होऊद्या. ह्या असल्या भिडगस्त स्वभावाचा मला इतका त्रास होतोय तर त्या बिच्यार्या पारीला किती त्रास होत असंल याचा विचार सुद्धा करू नये. आपल्या गडी मानसाचं काय कसबी चालतं, पण बायामानसाला किती सोसावं लागंत आसल याचा कुणी विचार करंल कि नाही!. पण तिने एकदा सामासेवेचे व्रत अंगावर घेतलं कि घेतलं, ती घेतला वसा तसा टाकणार नाही याची मला आणि गावाला ग्यारंटी आहे. गावाला जास्त आहे. तर ह्या नाही, नाही म्हणण्याच्या स्वभावामुळे मला पारीसाराख्याच भयंकर अडचणी येतात. बरं तिच्या मदतीला तिने हाक मारली कि सगळा गाव धाऊन येतो, आपल्याकडे तसले विशेष काहीच नसल्याने, आपली कामे आपल्यालाच करावी लागतात. असो.

म्हणजे, शनिवार दिनांक ४ जुन २०१६ रोजी हरिश्चंद्रगडाची स्वारी आणि संतोष डुकरे यांच्या घरी दुध-भाकरी-लसणाची चटणी यांना कुस्करून खाण्याचे योजिले असताना मी शनिवारी सकाळी अकरा वाजता उठलो. उठून बघतो तर , संतोष डुकरे यांचे १३ मिस कॉल , अभिजीत कुपटे यांचे आमच्या घराबाहेर उभे राहून ९ मिस कॉल आणि व्हात्स मध्ये अनंत मेसेज. त्यात अशोकआण्णा पवार यांचा एक मेसेज अवार्ड विनिंग ठरला.

“रात्री इकासरावचे दोन-तीन वाजेपर्यंत फेसबुकवर स्टेटस पडून, डिलीट होत होते, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, ते सकाळी आकरा वाजता उठतील”

आणि ते खरेच ठरले, मी त्या शेवटच्या दोन DDR साहेबांनी केलेल्या लार्जच्या प्रेमळ आवाहनाला नाही म्हणायला पाहिजे होते असे वाटले. पण पुन्हा आपल्याला नाही तर म्हणताच येत नाही हा स्वभाव आडवा आला. मी तंतोतंत आकराला उठून आकरा वाजून सात मिनिटांनी अभिजित आण्णाच्या कोर्पियो मध्ये बसलो होतो. त्यामुळे गडावर स्वारी करायला उशीर झालेला असताना आमचा उत्साह अजिबात कमी झाला नव्हता. अभिजित अन्नाचा आणि शंकर अन्नाचा रेबनचा गोगल, ती पांढरीफेक कोर्पियो आणि मी कडेला बसलेला सामान्य इसम. अशी तिघांची सवारी निघाली. टोल नाक्यावर समोरच्या सगळ्या कार गाड्यांना टोल घेतला आणि आमची कोर्पियो आली कि लागबघीने गेट वरती घेतले. आयला म्हणालो वट्ट आहे. पण नेमका कुणाचा ते कळलं नाही. कोर्पियोचा, रेबनचा कि दोन अण्णांचा? आपला वट्ट वगैरे असण्याची शक्यता सुतराम कि काय म्हणतात तशी सुद्धा नव्हती. शंकर अण्णांनी सांगितले, “अहो इथे कोर्पिओ आणि रेबनचा गोगल घातला कि टोल घेत नाहीती” मग मी अभिजित आण्णाला सल्ला दिला, “अभी तू अख्ख्या कोर्पियोला रेबनचा काच बसवून घे समोर, तुला च्यामालाया कोण डीझेलचे पैसे सुद्धा मागणार नाहीत ह्या पिंपरी चिंचवडात” पण त्याला हा उपाय पटला नाही.

सुमारे चार वाजता संतोष अण्णांच्या मळ्यातल्या घरी पोचलो. वांगी, टरबूज, शहाळी वगैरे वानवळा गोळा केला तोपर्यंत संतोष अण्णांनी म्हशीची धार काढून ठेवली होती. रानातल्या घरात मस्त दुधात कुस्करून बाजरीची भाकरी लसणाची चटणी खाल्ली. त्यात कोल्हापुरच्या आमच्या अभिजित पैलवानाला भाकरी कुस्करता येत नव्हती म्हणून त्याला आम्ही अभिजन असे घोषित करून टाकले आणि संतोष अण्णांनी त्याला भाकरी कुस्करून दिली.


आता येवढं जेवल्यावर हरिश्चंद्रगड चढायचा का? अशा प्रश्नार्थक नजरेने अभीने माझ्याकडे बघितले आणि सर्वजन सहमत झाले. मला हरिश्चंद्र गडाला जायचे असताना, संतोष, आभी आणि शंकर आण्णा घाबरल्यामुळे आम्ही नानेघाटात जायचे ठरवले. अभी तर म्हणाला इथेच झोपू, पण लगेच अर्नाव म्हणाला , ओय इकडे वाघरू येतंय आणि ते खाऊन टाकतंय, बाहीर झोपायचं नाही, तवा नाही का म्हातारी खाल्ली वाघराने. मग छोट्या अर्नावने वाघराणे म्हातारी कशी खाल्ली ते अगदी हातवारे करून सांगितले. आणि हा एकूण पश्चिम जुन्नर तालुका बिबट्याने हैराण करून टाकल्याचे समजले. काही घरांना आणि गोठ्यांना मोठ मोठी कुंपणे पाहून त्याची दाहकता समजून आली.
ह्या सगळ्या गडबडीत एका अवलियाची भेट झाली, सागर चव्हाण उर्फ बकरी उत्पादक. ह्यांच्या विषयी स्वतंत्र लेख आहे, आतापुरते माहित करून घ्या कि फॉक्सव्यगन मधील नोकरी सोडून आता १०० शेळ्या पाळत आहे आणि लवकरच १००० शेळ्या करणार आहे.



रात्री ९ वाजता शनी अमावाषेचा आमचा प्रवास चालू झाला. शिवनेरीच्या पायथ्याला वळसा घालून पुढे निघालो, शिवनेरीकडे बघून आभार मानले आणि पुढे निघालो. अंधारात नेमके कुठून कुठे चाललो आहोत हे समजत नव्हते. डोंगर रांगा, पठारे, आजून डोंगर रांगा आणि कच्चे पक्के रस्ते पार करत एकदाचे नाणे घाटात पोचलो. आम्हाला रस्ता असा एकदम संपले याची जाणीव नसल्याने आमची आभ्याची कोर्पिओ घाटात जाता जाता वाचली. म्हणजे डांबरी सडक आणि अचानक रस्ता संपणे. हे थोर वाटले.

पूर्वेकडील पठारावरून असंख्य किलोमीटर वरून येणारा रस्ता आणि पश्चिमेला जोडणारा तो नाणे घाट. ज्यांनी कुणी बनविला असेल तो सातवाहन राजा आणि त्याची संस्कृती थोर असली पाहिजे. एखाद्या संस्कृतीची चिन्हे अडीच हजार वर्ष टिकतात म्हणजे तिचे मानवी इतिहासातील योगदान वादादीतच असते. नाणेघाटाच्या अस्तित्वाची आणि तिथून होणाऱ्या व्यापाराची साक्ष देत उभा असलेला तो दगडी अजस्त्र रांजण मला खुणावत होता.


हो, “मीच तो रांजण, मी अनेक लोकांच्या तहान भागवल्या, श्रीमंत व्यापारी, त्यांचे गुलाम  नोकर, त्यांच्या सुंदर बायका, त्यांनी विकायला आणलेल्या दासी, आणि हो पश्चिमेकडील व्यापारी आणि त्यांनी पाशिमेकडून विकायला आणलेले पदार्थ सगळे पाहिले आहे. पाप पाहिले आहे पुण्य पाहिले आहे, पाप पुण्याची देवाणघेवाण पाहिली. यातल्या कुणाचीही तहान भागवताना मी कधीही दुजाभाव केला नाही, सैनिक असो, राजा असो, राणी असो, दासी असो, परदेशातून विकायला आणलेली गोरी गणिका असो, सगळ्यांची तहान भागवली. आज त्या क्षणांचा मी एकटाच साक्षीदार आहे. होय मी रांजन आहे. माझ्यासारखे खूप होते, पण सगळे काळाच्या पडद्याआड गेले, मला अजून किती वर्ष इथून माणसांना जाताना बघायचे आहे काय ठाऊक. पण आता यांना कळत नाही माझा वापर कसा करायचा. कुणी येतं माझ्यात पैसे टाकतं, कुणी येऊन माझी मापं काढतं, कुणाला काहीच कळत नाही आणि विचारतं ह्यात काय विशेष आमच्या गावात पण हाय असला रांजण पण जरा बारका आहे. ह्या अडीच हजार वर्षात करोडो तर्हेचे लोक दाखवलेत भगवंता अजून किती बघायचे बाकी आहेत कुणास ठाऊक.

जराच थांब विकास, जरासं ऐकून घे, खुप दडलंय माझ्या पोटात, ह्या हजारो वर्षाच्या कालखंडात शेकडो संस्कृत्या लुप्त पावल्या, प्रत्येकाचे पाप पुण्याचे हिशोब वेगळे होते, प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना वेगळ्या होत्या ह्या प्रत्येक कालखंडातील लाखो करोडो स्त्रि पुरुषांच्या करोडो घटना पाहून पाहून आता मी ह्या घटनाकडे तटस्थपणे पाहायला शिकलो आहे. समजले आहे मला पाप, पुण्य, राजा, चोर, भिकारी, राणी, दासी, गणिका, सैनिक, गुलाम, भाऊ, बहिण, बायको, मुलगा, मुलगी, सून, सासू  आणि ह्या भोवती घुट माळणाऱ्या ह्या संस्कृत्या म्हणजे सगळी माया आहे. मानवाने निर्माण केलेल्या संस्कृती नावाच्या एका चक्रव्युव्हात आडकून माणूस प्राणी त्याच स्वताच्या चाक्रव्ह्युवातून बाहेर पडायचा मार्ग शोधतोय आणि अजूनच गुरफटून जातोय. माझी संस्कृती चांगली कि तुझी चांगली ह्या तद्दन खोट्या संकल्पेनेसाठी रक्ताचे पाट ह्याच घाटातून वाहताना पहिले आहेत. आता नको वाटतं पुढे पण मागचीच पाने उलटत बसल्यासारखे बसायला.चेहरे बदलतील, प्रकार बदलातील माणसं तीच असतील खूप कंटाळा आलं आहे मला. विकास जरा पुढे, हो त्या घाटाच्या उजव्या बाजूला जरा खोदून बघ, हो तिथेच खोदून बघ, तुला सातवाहन कालीन हत्यारांची पेटी सापडेल. ती उघड, त्यातील अजस्त्र असं ते हत्यार घे. मोठ्या पोलादी गोळ्याला साखळी जोडलेली असेल. ते घेऊन बाहेर ये आणि उधवस्त करून टाक मला ह्या  अमरत्वाच्या शापातून. नाको वाटतं आता तीच तीच माणसं वेगवेगळ्या वेषात पाहायला. उठतोयस ना ?





रांजनाचा आवाज ऐकून दचकून जाग आली तर घाटाच्या खालच्या बाजूने, मुलांचा आणि सुंदर मुलींचा एक कळप वरती चढून आला होता आणि घाटातल्या गुहेत आम्ही बाटलीत उजेड कसा घालून ठेवला असेल आणि यांना आता उठवावे कि नाही याच्या विचारात होता. मला स्त्रीदाक्षिन्य आठवले आणि त्या गुहेचा गजांचा दरवाजा उघडला. पण दुर्दैव कोणतीही मुलगी आता वार्वासाला आली नाही. मी  वाईट वाटून घेतले नाही.माझ्या शेजारी भयंकर अक्राळ विक्राळ लोकांना झोपलेले पाहून त्या आल्या नसतील अशी स्वतःची समजूत काढून घेऊन सगळ्यांना उठवले आणि पहाटे पाच वाजता नानाच्या अंगठ्यावर चढून घटाची भव्यता पाहण्यात गुंग होऊन गेलो. उडी मारली कि डायरेक्ट मुंबईला पोचलो असतो. तिथन बऱ्याच वानराचे लिंग दिसत होती. मोठी मोठी पर्वतावरून सुळक्या सारखी एकदम टोक करून वरती आलेली. माणसाच्या कल्पना शक्तीची पण दाद द्यावी. नाव काय दिले त्तर वानरलिंग. थोर माणसं.




तिथून कांटाळलेल्या अवस्थेत कुकेडेश्वराचे देऊळ बघितले, गावकर्यांनी त्या नदीचे पत्र बदलून गाव्साठी केलेली जागा बघून वाईट वाटले आणि पुढे चावंडगड बघायला निघालो. रस्त्यावर पाद लागलेल्या आंब्यांचे आंबे खात खात. चावंडगडाच्या पायथ्याशी पोचलो. गडाच्या पायथ्याशी असलेले महितर पाट्या आता ह्या सरकारने बदलेल्या वाटल्या. अगोदर सारखे त्या पत्यावर जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचे फोटो नव्हते आणि लिखाणात उल्लेख करताना “मराठा सरदार” ऐवजी “मराठी सरदार” असं उल्लेख केला होता. चला चालायचंच म्हणून गड चढू लागलो. गड मोठा आहे, थेट आहे.
आम्ही दमणार तेवढ्यात वरून एक नाजूकसा आवाज कानी पडला आणि पोरांचा वेग वाढला. वरती मोटिवेशन आहे याची कल्पना सर्वांना आली होती. सागर चव्हाण हा तरुण चुणचुणीत मुलगा सगळ्यांच्या पुढे होता.  अगदी पाय घसरला कि मरूच अशा टोकावर चढून आम्ही दाराजाच्या जरा खाली पोचलो तर तिथे एक बारा असलेला तरुण आणि एक सुंदरी तिथल्या कठड्यावरील लावलेल्या संरक्षक गजांना वार्निश रंग देत होते. शेजारी भिगे होट तेरे गाणे हे आयफोनवर चालू होते.

सागर धावत जाऊन म्हणाला,” काय गुतं घेतलय काय? “
‘काय म्हणालात, आम्हाला नाही समजले?’ तो साधारण मुलगा आणि सुंदरी
“न्हाय म्हणलं रंग द्यायचं contract घेतलंय काय, आमच्या गोट फार्मचे पण घ्या कि conract, काय तुमचा भाव काय असेल ते सांगा?” पुन्हा सागर चव्हाण
“नाही हो, आम्ही एका संस्थेचे आहोत, आम्ही पुण्याहून आलो आहोत आम्ही हे प्रेमाने करत आहोत हे काम” ती सुंदरी.

“मग आम्हीबी प्रेमानेच इचारतो कि, आमचंबी प्रेमानेच कराकी, काम” सागर चव्हाण मिटी न सोडता.
मग मी म्हणालो, “चला सागर शेट पुढे, तुमचा गोट फार्म रंगवायला कुणी म्हातारं भेटतो का बघू”
एकूण रागरंग ओळखून संतोष आन्ना मला म्हणालेच, “विकीदा एखादी पोरगी बघा आपल्या सागरला, वेटरनरी डॉक्टर असलं तर सोन्यावाहून पिवळे. म्हणजे शेळ्या मेंढ्यांना घरचा डॉक्टर मिळेल आणि सागर ट्रेकिंग गेल्यावर गोट फर्मची काळजी पण करायची गरज नाही,  नाहीतर कसली बी  बघा पण बघा नाहीतर पोरगं कायतरी बालामत आणील"

वरती अपेक्षा भंग झाला. काहीच नसेल वाटले होते पण जुन्या काळातील अनेक अवशेष भेटले.म्हणजे हा किल्ला उगीच किल्ला म्हणून नव्हता तर याचा सामरिक उपयोग झालेला असावा आणि बऱ्या पैकी वस्ती पण असावी. दगडा पासून बनवलेली संडासाची भांडी खूप मजेदार वाटली आणि संडासच्या खोल्या पण . ह्या संडासच्या खोल्यांचा काळ किती मागे जातो हे ठाऊक करून घ्यायला पाहिजे. म्हणजे संडासची अशी भांडी दगडाची का असेना कधीपासून वापरत आली ते समजेल.

येताना सागरला त्या सुंदरीने फोन नंबर दिला आणि आम्ही डोक्यावर हात मारून घेतला.