Friday, January 8, 2016

Football and Amazon nonsense

३० तारखेच्या रम्य संध्याकाळी सुमेध म्हणाला "बाबा तुला रोनाल्डो आवडतो कि बेकह्याम ?" आता हि काय भानगड आहे म्हणून मी त्याला विचारले तर तो म्हणाला, 'तुला तर काहीच माहित नसते बाबा, ते फुटबॉल बेस्ट खेळतात, रोनाल्डोने मारलेला बॉल हवेतून वाकडा तिकडा पळत जाऊन जाळीत पडतो वैगेरे वैगेरे' हे ऐकल्यावर भौतिकशास्त्राच्या नियमाची आयभैन एक करणारा हा कोण खेळाडू आहे म्हणून माझी पण उस्तुकता अर्धा मिनिट ताणली गेली होती पण ती लगेच सोडून दिली. उस्तुकतेला काय कोणत्याच गोष्टीला जास्त तानने आपल्या कोष्टकात बसत नाही.
सबब आपल्या बापजन्मी आपल्याला फुटबॉल काय साधे ब्याडमिंटनचं फुल सुद्धा मिळाले नसल्याने आमची दौड फकस्त क्रिकेट आणि विटी दांडू पर्यंतच मर्यादित राहिली होती. त्यातल्या त्यात स्टेफी ग्राफ आणि सोळा वर्षाची मार्टिना हिंगीस टेनिस खेळताना अफाट दिसायच्या म्हणून आमचा आणि लेडीज टेनिसचा तेवढा संबध यायचा. तो पण फक्त टीव्ही पुरताच. बाकी काही नाही. पोरगं फुटबॉल खेळायला लागलं म्हणजे कुणाला येऊ अगर ना येऊ आपल्याला अछे दिन आले असे समजून मी पण खुश झालो. पण नियतीला ते मान्यच नव्हते.
सुमेधच्या चांगल्या हट्टाचा आनद होऊन मी पण लगेच Amazon.com ह्या सांकेतिक स्थळावरील दुकानात फुटबॉलची ओर्डेर दिली आणि ते लोक आठशे रुपये घेऊन ताबडतोप म्हणजे चार दिवसात नाही तर आठ दिवसात फुटबॉल पाठवतील म्हणून वाट बघत बसलो.
जरासे खट्ट वाजलं कि पोरगं दरवाज्याकडे पळत जाऊन बघायचे आणि Amazon Indiaने फुटबॉल नाही पाठविला म्हणून नाराज होऊन पुन्हा डोरेमोन बघत बसायचे. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, सात दिवस गेले तरी फुटबॉल यायचे नाव घेईना. आठशे रुपयाला नामा गडदु लागला कि काय म्हणून माझी रात्रीची झोप आणि दिनाची चैन निघून गेली. आपला बाप खोटं बोलत आहे, त्याने काही मागविलेच नव्हते म्हणून पोरगं बापावर फसवणुकीच्या संशयाने बघून लागले. तुला तर काही कलळतच नाही यावर बायकोने शिक्कामोर्तब केले. आणि मी आपल्याच घरात तोंड लपवून वावरू लागलो.
ह्या परिस्थितून बाहेर निघण्यासाठी मी Amazon.in ह्यांच्या दूरध्वनीवर फोन केला तर फार भयानक परिस्थिती समजली. ते म्हणाले तुमचा पत्ता न सापडल्याने तुमचा फुटबॉल परत दिल्लीला गेला. मी म्हणालो फोन कसाकाय लागला नाही, तुम्ही इमेल का केला नाही तर ती ललना म्हणाली आम्ही काही करू शकत नाही ती गोष्ट दुकानदाराची आणि कुरीयरशी संबंधित आहे.पण मी तर पैसे अमेझोनला दिलेत त्यांच्याशी माझे काय देणे घेणे तर ती ललना पुन्हा म्हणाली.
"आता तुम्ही तक्रार करा, मी रीसेलरशी बोलते त्याला दोन दिवस लागतील आणि बॉल परत यायला आठ दिवस. कुरीयरची खात्री आम्ही देऊ शकत नाही" हे ऐकून मला दडे माय धरणीच झालं. आणि माझ्या तोंडातून डायलॉग बाहेर पडला, "हे परमेश्वरा ह्या धेहाची लक्तरे अमेझोनच्या दरवाज्यावर बांधल्यावरच टू माझ्याकडे लक्ष देणार आहेस का ?"
आणि मी पुन्हा सावध होऊन तिला विचारले, "आणि त्यांना परत माझे घर नाही सापडले तर काय करायचे?"
यावर ती ललना पुन्हा वदली," आम्ही काही करू शकत नाही".
मी असा संकटात असताना आपल्या आठशे रुपयाला नामा गडदु लागू दे पण मानसिक त्रास किती झाला हे तिला समजून सांगताना ती ललना पुन्हा, "तुम्ही अजून एक फुटबॉल आमच्याकडून मागवा तो लवकर येईल." असे म्हणायचे धाडस करते. यावर तिला कोणता तरी भूषण पुरस्कार का देऊ नये असा विचार माझ्या मनात शून्य मिंटासाठी तारंगळून गेला.
सगळे होऊन गोष्ट आहे तिथेच राहिली आणि थोड्या वेळाने मेल आला आपण आमच्या ललने बरोबर केलेल्या चर्चेने समाधानी आहात का? यावर उत्तर काय द्यावे याचा मी अजून विचार करत आहे.
सुमेध रडून रडून गप्प बसला आहे. फुटबॉल कधी येतोय त्याची आशा मी सोडून दिली आहे. जे झाले चांगलेच झाले म्हणून मी खुश आहे , कारण मी तीस चाळीस हजाराचा टीव्ही @https://www.facebook.com/AmazonIN अमेझोन हुन घ्यायचा ठरवले होते. आता कोण जाईन आजून हात पोळून घ्यायला.
मित्रो आम्ही शिकलो तुम्ही पण शिका. अमेझोन पासून दूर रहा. आपल्या आणि आपल्या नातेवाईकांना कळवा. पैसे देऊन मानसिक त्रास करून घ्यायचा नसेल तर अमेझोन पासून दूर रहा.