Sunday, March 22, 2015

गरुड घुबड

उंचच उंच लिंबाऱ्यांच्या झाडांनी व्यापलेलि एक जुनाट दगडी चिरेबंदी विहिर आहे.  त्या विहिरीच्या कडेला लिंबाऱ्यातून  उंच वरती निघून आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवणारा पिंपळ आहे. त्या पिंपळाची आणि लिंबाऱ्यांची पाने पडून विहिरीतील पाणी झाकून गेले आहे. कधी कधी एखादी धामीन किंवा इरुळा तोंड वरती काढून आपले अस्तित्व दाखवतात. बाकी पाणी शांत असते.  विहिरीच्या पायऱ्याच्या कपारीत खालच्या बाजूने घुबड आणि घुबडिनीचे घर आहे. विहिरीच्या कडेच्या त्या उंच पिंपळावर बसून रात्रीच्या चंद्र ताऱ्यांचा आस्वाद घेण्याचे काम गेले कित्तेक दिवस घुबड आणि घुबडिन करत आहेत.  कधीतरी चांदणे दाखवायला म्हणून आपल्या पिल्लांना पण ते पिंपळाच्या झाडावर घेऊन येत असत. रात्री दोन नंतर आणि पहाटे घुबड बाहेर पडुन अन्न जमा करून घेऊन येते. पिल्लांना पण त्यांचे आई बाबा खूप आवडतात. थोडक्यात घुबड घुबडीनींचा सुखाचा संसार चालू आहे. पण गेले काही दिवस उच्चवर्णीय गरुडाच्या चकरा विहिरीच्या दिशेने वाढलेल्या आहेत हे चाणाक्ष घुबडाच्या नजरेतून सुटलेले नाही. तो जरासा अस्वस्थ आहे, पण शांत आहे.  त्याला आपल्या पिलांची पण काळजी वाटतेय. गरुडाच्या वेळी अवेळी चकरा घुबडीनिच्या पण नजरेतून सुटलेल्या नाहीत. एके दिवशी घुबड घुबडिनीला सावध करते. "सखे तो गरुड जो वेळी अवेळी चकरा मारत आहे त्यापासून सावध रहा". त्यावर घुबडिन घुबडाला  अश्वस्त  करते. "काळजी नसावी सख्याहरी, अश्या लोकांना कसे वठणीवर आणायचे हे मला चांगले ठाऊक आहे" एके दिवशी घूबड अन्न जमा करण्यासाठी गेले असता गरुड येउन पिंपळावर बसून घुबडिनीच्या घरट्याकडे बघत बसतो. घुबडिन घाबरून आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन बसते. तिची नजर वारंवार गरुडाकडे जात असते. तो जात पण नाही लवकर. काही वेळाने घुबड येत असलेले पाहून गरुड उडुन जातो. घाबरलेला गरुड येउन पाहतो सगळे व्यवस्थित असते. घुबड घुबडिनीची स्तुती करतो आणि तिच्या धैर्याची तारीफ करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा घुबड अन्न गोळा करायला जाते. आता घुबडिनीच्या मनात गरुडाच्या रूपाविषयी विचार येत आहेत. त्याची ती अनुकुचीदार आणि शाही बाक असलेली चोच, त्याची ती लकबदार मान आणि आकाशाचा वेध घेणारे डोळे, त्याची उंची, त्याचा चालतानाचा रुबाब, उडतानाचा रुबाब, खरच गरुड हा देवकुळातील असला पाहिजे. घुबडीनीच्या मनात गरुडाविषयी भावना तयार होत होती. आपली पिल्ली गरुडा सारखीच व्हावी अशी भावना घुबडिनीच्या मनात येते. काही वेळाने आजून गरुड येउन पिपळाच्या झाडावर बसतो. आता तो घुबडिनीकडे बघतोय. घुबडिन घाबरते पण पहिल्या दिवसा इतकी नाही. आज गरुड घुबड येण्याच्या अगोदरच जाते. गरुड येतो, त्याला वाटते आज पण गरुड दिसेल म्हणून त्याच्या काळजात धस्स झालेले असते. पण गरुड दिसत नाही. आनंदाने घुबड जाते, घुबडीनीला आणि पिलाला खाऊ घालते. आसे काही दिवस चालते. घुबडाला गरुड दिसत नसल्याने त्याची चिंता मिटते. नेहमीप्रमाणे गरुड येतो, आज घुबडिन त्याला घाबरत नाही. गरुडावर घुबडिनीचा विश्वास बसलेला असतो. आणि घुबडिन गरुडाची स्वप्ने पण बघू लागलेली असते. आता तिला गरुडसारखीच पिल्ले हवी असतात. ती पिलांना सोडून दरवाजात उभी राहते. गरुड तिला उद्या नदीच्या पलीकडे असलेल्या एक देवळाच्या गाभाऱ्यात यायला सांगतो. शेवटी तो असतोच देवाचे वाहन. घुबडीन खुश होते. दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागते. घुबड जेवण घेऊन येते पण तिची भूक मेलेली असते. ती उद्याच्या गरुडाबरोबरच्या भेटीची स्वप्ने बघण्यात दंग असते. दुसऱ्या दिवशी घुबड नेहमी प्रमाणे अन्न शोधण्या जाते. घाई झालेली घुबडिन अगोदरच देवळाकडे पळते. नदी वोलांडून, डोंगराच्या माथ्यावर असलेले ते पडीक आणि एकाकी देवूळ पौर्णिमेच्या चांदण्यात सुंदर दिसत असते. घुबडिन वाट बघत बसते. चंद्र उतरणीला लागतो तरी गरुड येत नाही. देवळाच्या त्या पडक्या पण सुंदर भिंतीवर बसून वाट बघून व्याकूळ झालेली घुबडिन निराश होऊन घराकडे निघते. घरी जाउन बघते तर एकही पिल्लू नसते. काही पिल्लांची पिसे आणि थोडेसे रक्त पडलेले असते. ते पाहून निराश झालेली घुबडिन तशीच बसून राहते. आता घुबडाला काय सांगावे म्हणून ती घाबरून तर गेलेलीच असते पण तिची पिल्ले पण गेली म्हणून दु;खी पण असते. घुबड येते. घरट्यात पाहते, त्याला कळते काय झालेय. घुबड म्हणतो, जाऊदे सखे, तू त्या गरुडाचा मुकाबला करू शकणार नव्हतीस, ह्यात तुझा काही दोष नाही, आपण आजून पिल्लांची निर्मिती करू. पण आता आपण घर बदलायला पाहिजे. आपल्याला पुनर्निर्मिती गरुडासाठी नाही करायची. घे दोन घास खाउन घे.









Monday, March 16, 2015

सौदा

तुटक वाहतूक असलेल्या डांबरी सडकंच्या कडेला एका रोगट वडाच्या झाडाखाली चहाचे हॉटेल म्हणावे अशी टपरी.  ह्या टपरी समोर ज्याला बाकडा म्हणू शकू अशी एक फळी एका बाजूने दगडावर आणि दुसऱ्या बाजूने वाकड्या तिकड्या लाकडावर टेकवली आहे.  त्या टपरीच्या मागेच चार पत्रे टाकून केलेली अजून एक टपरी आहे.  त्यात एक टोपीवाला माणूस कुणाला तरी उधार मिळणार नाही म्हणून शिव्या देतोय. त्या टपरीला लटकवलेले पोतं कवाडाचे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. जरा वेळाने आतला आवाज बंद झाला. सौदा बाहेर येउन त्या बाकड्यावर बसला. त्याने नळी सारखी झालेली प्यांट घातली आहे आणि त्याच्या एकावर एक पडलेल्या मांड्या लाकडासारख्या दिसत आहेत. त्याच्या तोंडावर अपमानाची कसलीही छटा नाहीये. थोडक्यात त्याच्या तोंडावर कसलेच भाव नाहीत. थोडेसे पांढरे केस, सुकलेला चेहरा आणि दाढीचे पांढरे काळे खुंट. त्याच्या कानावर बसलेली माशी उठवायची त्याला गरज वाटत नाही. त्याला आज दारू उधार मिळालेली नाही. तो तिथल्या चहा पिणाऱ्या लोकांकडे आणि रस्त्यावरून तुरळक जाणाऱ्या सायकली आणि वाहनाकडे बघत बसला आहे. काही तासने तो कंटाळून घराकडे चालू लागतो. त्याच्या त्या चाळीतील दोन खोल्यांच्या घरात त्याची बायको त्याची वाट बघत बसलेली आहे. तो जाऊन तिच्या मागे उभा राहतो. ती काहीच बोलत नाही. सौदा आशाळभूत पणे तिच्या खांद्यावर हात टाकतो.  ती लगेच हात झटकून म्हणते, "पुन्हा जर अंगावर हात टाकला तर चपलंच हानीन तोंडावर" सौदा लांब जाऊन लोखंडी पलंगावर बसतो.

"आरं आयघाल्या पोरगं तापानं फणफनलंय आणि तू कुठं गु खात फिरतोय रं ?" त्यांचा दहा वर्षाचा मुलगा झोपला आहे. त्याच्या अंगात भयंकर ताप आहे.
"चल कि त्याला घेऊन सरकारी दवाखान्यात, सायकल वर न्हेतो मी !"
"रयवारी तुझ्या बापाने सरकारी दवाखाना उघडा ठिवला होता का ?"

आता सौदा गप बसतो. त्याच्याकडे इलाज नसतो. तो साखर कामगार आहे आणि त्याच्या कारखान्याने गेले दहा महिने कामगारांची पगार दिलेली नाही. तेवढ्यात बाहेर TVS सुझुकीचा आवाज येतो. आण्णा आत येतात. त्यांना आत यायला सौदा जागा देतो.  भारदस्त व्यक्तीमत्वाचे आण्णा सौदाला तुछ पणे  ऑर्डर देतात, "बघतो काय सौद्या, उचल पोराला, आन बस माझ्या मागे गाडीवर" असे बोलताना अन्नाची नजर सौदाच्या बायकोवर असते. सौदा पोराला उचलून बाहेर निघतो. त्याच्या पाठीमागे आण्णा निघतात आणि निघताना वळुन सौदाच्या बायकोकडे एक नजर टाकतात. ती त्यांच्याकडेच बघत असते. सौदा त्यांच्या मागे बसून गुपचूप दवाखान्यात जातो.  ते मुलाला दवाखान्यात दाखवून येतात. सौदा मुलाला त्या लोखंडी पलंगावर झोपवतो आणि कडेला गुपचूप उभा राहतो. काही क्षण शांत जातात. सौदा, सौदाची बायको आणि आण्णा. वैतागलेले आण्णा सौदाला विसची नोट त्याच्याकडे देतात. सौदा तडक घराबाहेर पडतो. त्याची बायको आतून दरवाजा लावून घेते. आता सौदा त्या वीस रुपयाची भरपूर दारू पिवून पुन्हा त्याच बाकड्यावर बसून काय विचार करत असेल त्यालाच ठाऊक.
















Friday, March 13, 2015

भांडवलाला जात नसते,धर्म नसतो, भाषा नसते आणि सीमा सुद्धा नसते. भांडवल फक्त भांडवल असतेभांडवलदारांचा उद्देश हा फक्त नफा कमावणेच असतो . त्यासाठी कोणतीही  साधन सुचीता पाळली जात नाही. कुणी भांडवलदार किंवा भांडवलदाराचा दलाल जर म्हणत असेल कि मी ह्या देशाचा, इथल्या जनतेचा विकास व्हावा म्हणून गुंतवणुक करत आहे तर तो लोकांना मुर्खात काढत आहे. कारण गुंतवणूक फक्त भांडवलाची होत असते आणि कमावलेला नफा त्या गुंतवणुकीच्या फक्त बोटावर मोजण्या एवढ्या भांडवलदारांच्या खिशात जात असतो. म्हणजे कामगार आणि सरकार हे दिवसरात्र भांडवलादारांना अजून जास्त आणि अजून जास्त श्रीमंत होण्यासाठी काम करत असतात. जेव्हा आपण पाहतो कि गुजरातला एकदमच काही कंपन्यांनी आपले चंबू गबाळ हलवले आहे, तेव्हा त्यांना गुजरातचा विकास करायचा नसतो तर तिथल्या सरकारकडून जास्तीत जास्त सवलती घेऊन आपल्या नफ्यात प्रचंड वाढ करून घ्यायची असते. त्यामुळे मग राज्या राज्या मध्ये स्पर्धा लागते आणि कोण जास्त सवलती देतंय याची वाट बघत हे भांडवलदार बसतात. नुकसान होते सामान्य लोकांचे कारण सामान्य लोकाकडून प्रचंड कर घेणारे सरकार ह्या भांडवलादारांना फक्त करच माफ करत नाही तर वीज, शेतजमीन कवडीमोल भावात देते.  हे लोक इतके ताकतवर असतात कि सरकार कडून कामगारांचे शोषण कसे करता येईल असे कायदे करून घेतात. जनतेला वाटत असते सरकारची धोरणे हि विधिमनडळात ठरतात. पण ते खोटे असते. आज जगामध्ये बहुत करून सर्व राष्ट्रात सरकारची धोरणे हे भांडवलदारांच्या बोर्ड रुम मध्ये ठरतात. आपल्या हातातील, माध्यमांचा वापर लोकांची मते बनवण्यासाठी किंवा आपल्याला हवी तशी बदलवण्यासाठी करत असतात. ज्यांचा ब्यांकावर ताबा ते सर्वसत्ताधीश. हे समजून घेतले कि मग खरे सत्ताधीश कोण असतील यावर वादविवाद होणार नाही. सरकार फक्त राष्ट्रपतींचे काम करते. शिक्का मारते.  तर मग एक सरकार बदलून दुसरे सरकार आणण्यासाठी हे भांडवलदार का प्रयत्न करतात? सरकार जेव्हा आपली ताकत दाखवायला लागते तेव्हा तसे होते. त्यामुळे जेव्हा भांडवलदार एकत्र येउन एखाद्या नेत्याला सर्वोच्च देशाच्या सर्वोच्च पदावर बसवतात तेव्हा त्यांना त्याच्याकडून हवा तो परतावा मिळवण्याची सोय केलेली असते. भारत हे अजून पूर्ण भांडवलशाही राष्ट्र झालेले नाही. घटनेत तर किमान अजून "समजवादी" शब्द टिकून आहे. तो अजून किती दिवस राहील सांगता येत नाही. पण भारतात मोदीला सत्तेवर अनन्यासाठी जेवढे कष्ट ह्या भांडवलदार वर्गाने घेतले आहेत ते बघता समाजवादी शब्द घटनेतुन कधी गपकन गळून पडेल समजणार पण नाही. जनतेच्या मनात भांडवलशाही विषयी प्रेम आणि "विकास" ह्या शब्दाचे संमोहन तयार करायला त्यांच्याच हातात असलेली प्रसारमाध्यमे आहेतंच. मग आज "पुरोगामी " ह्या शब्दाला बदनाम करण्यासाठी यशस्वी ठरलेले हे लोक "समजवादी, साम्यवादी" ह्या शब्दांना पण बदनाम करण्यात यशस्वी ठरतात.   भांडवलशाहीचे आवडते अपत्य असलेल्या दहाईक कोटि उच्च मध्यामवर्गीयांच्या जीवनाचे मृगजळ दाखवून बाकी शंभर कोटि लोकांना आर्थिक गुलाम बनवणे हेच ह्या भांडवदरांचे ध्येय असते. लोकांना वाटत आहे मोदी सरकार हे Pro Industry आहे पण त्यांना हळु हळु कळून चुकेल कि मोदी सरकार Pro Industrialist सरकार आहे. निवडून येताच कंपन्यावरिल कर कमी करणे, जमीन अधिग्रहण कायदा आणणे. हे म्हणजे असे आहे कि वाटच बघत होते निवडणूक निकालाची. निवडुन आले कि आगोदर आपल्या धन्याचे भले करणारे कायदे आणले.  शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उचावाले गेले पाहिजे हि घोषणा मोदी सरकारकडून लवकरच होईल अशी अपेक्षा करतो. मग हळु हळु शेतकऱ्यांना शेती परवडत नाही त्यांनी शेती मोठ्या मोठ्या उद्योजकांना देऊन ती अधुकीन पद्धतीने करावी व त्या शेतात नोकरी करावी. म्हणजे शेतकर्यांना नोकरी पण मिळेल आणि भारत जगातील सर्वात जास्त अन्नधान्य उत्पन्न करणारे राष्ट्र होईल. हा प्रस्ताव आज किंवा उद्या येणारंच आहे. शेतकऱ्यांनी फक्त वाट बघावी त्या अछ्या दिनाची. त्याच्या समर्थनार्थ वृत्तपत्रातून वैचारिक संपादकीय पदावण्यासाठी आहेतंच आपले संपादक घोड्यावर बसून. रिलायंस, टाटा, बाटा, विप्रो, कोका कोला किंवा तत्सम कंपन्या भारतासारख्या १३० कोटि जनतेला विकासीत आणि श्रीमंत करू शकतील यावर भरोसा ठेवून एका खांद्यावर विकासाची आणि दुसऱ्या खांद्यावर भगवी पताका अंगावर घेऊन फिरणाऱ्या तरुण पिढीला जेव्हा खरा हिसका बसेन तेव्हा उशीर झालेला असेल. 




Sunday, March 8, 2015

चिंतनीय येडझवेपण

हळु हळु मी येडझवा आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे.  मग आजपर्यंत लोक मला येडझवा समजत नव्हते का? तर समजत होते, पण समोर बोलून दाखवत नव्हते. कारण येडझवा असणे आणि त्यावर शिक्कामोर्तब होणे यामध्ये एक विंडो पिरीयड असतो तो संपला नव्हता. अधिकृत येडझवा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी तुम्हाला काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात.  काही वर्षापूर्वीच येडझवा असण्याची काही लक्षणे मला जवळचा  समजत असलेल्या लोकांना माझ्यात दिसायला चालू झाली असावीत. जेव्हा मी आणि माझे मित्र गावातील देवाच्या जत्रेत दिवसभर फिरलो, नायकीनीवर पैसे उधळले, पाळण्यात बसलो, बर्फाचे गोळे घेऊन एकमेकांच्या डोक्यात फोडले आणि बाकी मित्र देवाच्या दर्शनाला देवळात गेले तेव्हा मी बाहेरच्या मटणाच्या खानावळीत गेलो. मटणाच्या खानावळीत जाणे विशेष नव्हते पण जत्रेला जाउन देवाचे दर्शन न करणे आणि वरून मटन चोपणे हे म्हणजे पाप होते. आता माझ्या सात पिढ्या नरकात जाणार ह्या नजरेने अगोदर दोस्तांनी आणि नंतर गाववाल्यांनी भविष्य वर्तवायला चालू केले. तसे माझ्याविषयी भविष्य वर्तविणे हा माझ्या जवळच्या आणि लांबून जवळच्या लोकांचा आवडता उद्योग होता आणि आहे. तर आपल्याविषयी चर्चा चालू होणे हे एक महत्वाचे येड्झवेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यानंतर हळु हळु सिजनड येड्झवा बनण्याच्या मार्गाने आपला प्रवास चालू झाला असावा. तर हे येड्झवेपणा किंवा येड्झवे आसने म्हणजे काय ? तर यावर अजून एकमत झालेले नाही. उदाहरणार्थ जेव्हा पहिल्यांदा जत्रेला जाउन देवळात गेलो नाही म्हणून माझ्या लोकांनी मला येड्झव्यात काढले तेव्हा ते जाउन दगडाच्या पाया पडणार आणि खुशहाल राहूदे अशी दगडाला मागणी करून   समाधाणाने घरी परतणार म्हणून मी पण त्यांना येड्झव्यात काढल्याचे आठवते. पण मीच खरा येडझवा आहे हे त्यांनी बहुमताने सिद्ध केले. तर बहुमत हे मूर्खपणाचे लक्षण आहे असा तेव्हापासून झालेला समज आजून कायम आहे. सामाजिक आणि जैवीन नियमाप्रमाणे हा येड्झवेपणाचा रोग बळाउ लागला आहे. रोगाच्या ह्या पायरीवर बाकी समाज आपल्याला येडझवा वाटू लागतो आणि समाजाला आपण येड्झवे असल्याची खात्री पटलेली असते. तर थोडक्यात माझ्या येडझवेपणाचा विंडो पिरियड संपून आता मी संपूर्ण येडझवा झालो आहे  असे प्रमाणपत्र परवा वडिलांनीच दिले. मी आपल्या नवीन घराची वास्तू शांती करणार नाही असे ठामपणे सांगितले आणि वडिलांनी ते प्रमाणपत्र बहाल केले. तर आता वडिलांनी बहाल केलेल्या प्रमाणपत्रावर बाकीचे नातेवाईक आनंदाने सही वैगेरे करतील यावर माझा तंतोतंत विश्वास आहे. पण मला अजून येडझवेपणाच्या अत्युच्च पातळीवर पोचण्यात यश आलेले नसल्याने वडील पण त्याच समाजाचा भाग असले तरी माझ्यात त्यांना येडझवा म्हणण्याची ताकत आलेली नाही.  कारण बाकी सगळी सांस्कृतिक, धार्मिक, पारंपारिक बंधणे झुगारली असली तरी आपले नातेवाईक, आई, वडील, भावंडे सोडून बाकी सगळा समाज मूर्ख असतो हा संस्कार झुगारण्याच्या अत्युच्च पातळीचा य़ेडझवेपणा अजून आत्मसात करणे बाकी आहे.

तर आता मला शहाणं म्हणून घ्यायचं असेल तर त्यांच्यात मिसळायला हवे. ते काय चांगले काय वाईट ठरवतील ते निमुटपणे सहन करून "होयबा" व्हायला हवं. पण मला यांच्याकडून शहाणे म्हणून घ्यायची इछ्या अजिबात नाही. कारण चिंतनाने मिळवलेले हे एडझवे पण घालवणे आता माझ्या पण हातात नाही. कारण खरी गोष्ट फक्त मलाच माहित आहे. म्हणजे लोक भित्रे असतात, त्यांच्याकडे एकटे उभा राहण्याची ताकत नसते हे अंतिम सत्य आहे. ह्या भीतीतून मग धर्म, पक्ष, वेगवेगळ्या संघटना, मित्रमंडळे, ग्रुप किंवा टोळकी स्थापन होतात. मग कधी आपण जन्मताच एखाद्या टोळक्याचा भाग असतो  किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी अश्या टोळक्यात सामिल होतो. एकदा का अश्या टोळक्यात सामील झालो कि मग आपले स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत नष्ट होते. थोडक्यात आपली किमत शुन्य होते. आणि मग मेंढराप्रमाणे त्या टोळक्याचे जे विचार असतील ते आपल्याला मान्यच करावे लागतात, नाहीतर आपली येड्झवे म्हणून टोळक्यातून हकालपट्टी होऊ शकते. अश्या वेळी टोळक्याला आणि टोळक्याच्या म्होरक्याला पण माहित नसते कि ते सगळेच गुलाम आहेत. तर एकूणच मला अश्या गुलामांच्या टोळक्यात सामील व्हायचे नसल्याने माझ्या येड्झवेपनाला काहीच ईलाज नाही या मतावर मी येउन पोचलो आहे.   त्यामुळे मी या शहाण्या माणसापासून दूर राहण्याचे ठरवले आहे.   आता मी येडझवेपनाच्या अशा पायरीवर येउन पोहचलो असल्याने येड्झवेपणावरच्या माझ्या चिंतनातून पुढे आलेले येडझवेपणाचे खालील दोन प्रकार आढळतात -

१. अकस्मात येडझवेपण  - या प्रकारे आपल्याला एकदमच सगळे येडझवे वाटू लागतात. "त्यांच्या" प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला हसू येते. तुम्हाला  दया येते. आणि तुम्ही 'त्या" येडझवयांच्या नादी लागायचे नाही म्हणून सगळ्या अस्तित्वातील कळपातून एकदमच बाहेर पडुन एकटेच आयुष्च्याचा आनंद लुटू लागता.
२. चिंतनीय येडझवेपण - या प्रकारे आपल्याला हळु हळु गोष्टी उमजू लागतात, उमगू लागतात. मग सावकाश तुम्ही कुणाला नाराज न करता मूर्खांच्या गर्दीतून बाहेर निघू लागता. त्यावेळी बाकी लोक म्हणतात, "तो बराय, पण कधी कधी येडझव्यासारखा वागतो"  हा तुमचा विंडो पिरियड असतो. मग हळु हळु एकदिवस तुम्ही संपूर्ण येड्झवे पण प्राप्त करता. यावेळी आपले आई, वडिल, बायका, पोरं पण आपल्याला येडझवा म्हणू लागतात. त्यावेळी आपण मानवी बुद्धिमत्तेच्या आणि चिंतनाच्या अत्युच्य पातळीवर तरंगत असता. तेच आयुष्याचे यश असते. सगळ्यांना ती अवस्था प्राप्त करणे महाकठीण.