Friday, January 9, 2015

जगण्यात काही अर्थ नसतो, तसा मरण्यात पण काही अर्थ वैगेरे नसावा

जगण्यात काही अर्थ नसतो, तसा मरण्यात पण काही अर्थ वैगेरे नसावा. पण जगण्यासाठी आपलं जनगोत सोडुन परमुलखात दिवस काढायचं. हे एक भयाण दु:ख. आपला मुलुख आपल्याला दोन वेळचे अन्न पुरवायला असमर्थ आहे कि आपल्यालाच काहीतरी जास्त करून दाखवायची खाज हेच अजून तुला समजलेले नाही. नाहीतर दोन वेळच्या भाकरीसाठी तू स्वत:चा देश, संस्कृती, मानसं सोडुन इथं बारा-बारा तास काम करत खितपत पडला नसता. रात्री झोपताना पोराची आठवण आली कि त्याचा फोटो काढून बघत बसायचं आणि बायकोची आठवण आली कि तिचा फोटो बघत तळमळायचं. आपला रूम पार्टनर तरी काय आणि आपण तरी काय, एकंच. वेळी अवेळी बाथरुमला जातो. ह्या संध्याकाळला आपल्या गावात असतो तर रम्य वैगेरे संध्याकाळ म्हणालो असतो का? छे! संध्याकाळ येउन गेलेली पण कळली नसती. इथला सूर्यास्त मात्र रम्य न वाटता उदास वाटत आहे. ह्या डोंगराच्या माथ्यावर बसून सारे शहर तुझ्या नजरेच्या टप्प्यात आहे. शहरातून, ट्राफिक, लोकांची गर्दी, बागेत खेळणारी पोरे आणि ह्या सगळ्यांचा मिळुन तयार झालेला गोंगाट. पण ह्या गोंगाटातील तुझ्या हक्काचा असा एक पण आवाज नाही.  ह्या शहरातील लोक आनंदी असतील, दु:ख्खी असतील पण त्यांचा आनंद आणि दु:ख एकटे नाही ह्याचे किती समाधान असेल त्यांना. समाधान असेल कि त्या समाधानाची त्यांना जाणीवच नसेल? कारण एकटेपणा आल्याशिवाय त्याची जाणीव होत नाही. आणि हा तर परमुलखातील एकटेपणा ! ह्या लाखो श्रीमंत/गरीब लोकांच्या शहरावरती सुर्य मावळताना कुणी घरी निघालंय, कुणी मुलांना घेऊन बागेत चाललंय, कुणी ओफ़िस मधून कंटाळून घरी पोहचून सुद्धा आपल्या मुलाला, बायकोला घेऊन हॉटेल मध्ये, बागेत फिरायला घेऊन जात आहेत. आणि ह्या लाखोच्या गर्दीत आपले काहीच नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. आपण  घेतोय ती हवा सुद्धा परकीच वाटतेय. उसनीच घेतोय आपण,  हि हवा सुद्धा. ह्यांचे देव, ह्यांची भाषा, ह्यांचे खेळ, ह्यांचे जेवण सगळे सगळे परके आहे. आणि आपण इथं जगण्यासाठी आलो आहोत. जगण्यासाठी कि जगवण्यासाठी ? बहुतेक जगवण्यासाठी म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. तेवढ्यात एकटीच जळत असलेली सिगारेट जळून त्याच्या बोटाला चटका बसला आणि तो भानावर आला. .................................................. .................................................. …………………….









Friday, January 2, 2015

धर्म आणि राजकारण

धर्म आणि राजकारण ह्यात मी जास्त नाही तर काहीच फरक करत नाही. तर प्रश्न उरतो, तालिबान्यांचा धर्म आणि पाकिस्तानी लोकांचा धर्म वेगळा आहे का ? तर उत्तर आहे "हो वेगळा आहे " . आमचाच धर्म खरा चे पुढचे पाऊल असते आम्ही म्हणतो तोच धर्म खरा. आणि ह्यामध्ये लपलेली असते सत्ता. कारण कोणताही धर्म हि वैयक्तिक गोष्ट कधीच नसते. ती सामुहिक गोष्ट असते. आणि जिथे समूह येतो तिथे राजकारण आणि सत्ताकारण आलेच पाहिजे. मानवी इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण युद्धाशिवाय शक्य झालेले नाही.
कमजोर शत्रू जास्त धोकादायक असतो. एकदा युद्ध म्हटल्यानंतर त्यामध्ये कायदे, विधिनिषेध, दया, माया ह्याची अपेक्षा ठेवू नये.

आमच्या कुटुंबाना पाकिस्तान सरकार नाहक त्रास देत असल्याने आम्हाला ते पाउल उचलावे लागले हा तालिबान्यांचा युक्तिवाद. त्यांना हा युक्तिवाद करण्याची गरज पडली कारण पाकिस्तानी कट्टर मुस्लिम जनतेच्या पाठिंब्याची गरज त्यांना पण आहे. कोणतेही युद्ध फक्त देशाचे किंवा अतिरेक्यांचे नसते तर ते जनतेचे असते. अतिरेक्यांच्या बाबतीत त्यांना छुपा वा उघड पाठींबा असणाऱ्या जनतेचे असते. तसे नसते तर तालिबान्यांना युक्तिवाद करण्याची गरज पण पडली नसती. खलीस्तानचा लढा अयशस्वी करण्यात तत्कालीन भारत सरकार (इंदिरा गांधी ) ह्यांची एक उपाय योजना खूप कामी आली होती. जे कुणी अतिरेकी झाले आहेत किंवा गायब झाले आहेत त्यांच्या कुटुंबाना अटक केले जायचे किंवा त्रास दिला जायचा. जेणेकरून अतिरेकी कौटुंबिक आघाडीवर हारून हत्यार टाकून पुन्हा "देशप्रेमी" बनतील . हा उपाय कामी पण आला होता. पण खलिस्तानी आणि तालीबाण्यात मुलभूत फरक असावा. उद्या तालिबानी "अल्लाच्या मर्जीनेच मानवी जातीच्या कल्याणासाठी आम्हाला ते काम करावे लागले" असे सुद्धा म्हणतील. मी असल्या गोष्टीचा निषेध वैगेरे करत नाही. कारण त्यामुळे काहीच फारक पडत नसतो. ह्या गोष्टी घडत आल्या आहेत आणि पुढे पण घडत राहतील. आपण फक्त कामी आलेल्या मुलासाठी अन त्यांच्या पलकासांठी हळहळ व्यक्त करू शकतो. शेवटी प्रत्येक जीवाने न्यायाची अपेक्षा करायला ह्या जगाची उत्पत्ती काय न्याय तत्वावर झालेली नाही.