Monday, September 1, 2014

आमचा वाचनाचा इतिहास

म्हणजे बघा, स्वताःला मध्यमवर्गीय समजणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचा वाचनाचा इतिहास जसा अतिसर्वसामान्यच असावा,  अस्मादिकांचा पण तंतोतंत तसाच अतिसर्वसामान्यच आहे. आमची वाचायची सुरुवात झाली दोस्ताच्या दुकानात फुकट वाचायला मिळणाऱ्या वर्तमानपत्रापासून, तिथेच चांदोबा हे अतिशय क्लासिक म्हणावे असे साहित्य हातात पडले. तिथे पण एक गोम होती, साला क्रमशः असलेलं पुन्हा कधी वाचायला मिळालेले आठवत नाही. शाळेची पुस्तके फुकट घेवून शाळा शिकणाऱ्याला चांदोबाची ऐश परवडणारी नव्हती. पण एकदा वाही लागली कि आम्ही ज्यांच्या घरी अशी पुस्तके असतात त्यांच्याशी दोस्त्या केल्या. अकरावी बारावीत विज्ञान घेतल्याने मराठी वाचणे म्हणजे मागास हा समज दृढ झाला. पण आपलं बेणं विज्ञान शाखेत उगवणारे नसून आपण खूपच कलात्मक इसम आहोत याचा साक्षात्कार आम्हाला दिडच वर्षात झाला. तेव्हा आम्ही या वर्षी मेडिकलला नंबर लागंत नसल्याने ड्रॊप घेत आहोत असे घरी सांगून आई बापाला खुश केले. आणि सहा महिन्यातच गावातील अशीच अडली नडलेलि पोरं येत असलेल्या शाळा कम कॉलेज मध्ये  कला शाखेला प्रवेश घेऊन मातापित्यांना जास्त दिवस स्वप्नात ठेवण्याचे पातक केले नाही.
इथून खरा वाचनाच्या इतिहासाला सुरुवात होते ती पण अतिसर्वसामान्य लोकासाराखीच. पु. लं. सुहास शिरवळकर, बाबा कदम. बाबा कदमाच्या आणि शिरवळकरांच्या तिरंगी प्रेम कहाण्याचा आम्ही एका रात्रीत फडश्या पाडू लागलो. वकिली डावपेच, पोलिस स्टेशन हे आम्हाला खूपच समजू लागले. कादंबरीतील हिरो आणि हिरोनि यांनी उसात केलेले प्रेमाचे डाव डोक्यातून जाता जात नव्हते. तेच डोके घेऊन कॉलेज मध्ये तसे डाव टाकण्याकरता कुणी मिळते का हे अतिशय गुप्त पणे शोधू लागलो. पण ते आमच्या नशीबातच नव्हते. त्यात पुन्हा हिंदी ठोकळे वाचायचा नाद एका कॉलेज सोडुन दिलेल्या "टनक" नावाच्या पोराने लावला. हे म्हणजे भलतंच होतं. हि पुस्तके म्हणजे महान साहित्य आहे, एकदा घुसले कि तुम्ही आनपानी सोडून देऊ शकता. तेव्हढ्यात तिसरे वर्ष आल्याने शेक्सपियर, वर्ड्सवर्थ यांना बळेचच वाचावे लागले आणि इंग्रजी साहित्य हे मराठी साहित्या पेक्षा कसे श्रेष्ठ आहे हे तावातावाने बोंबलून सांगू लागलो. सेकंड क्लासने पास झाल्यावर, मराठ्यांच्या पोरांना विद्यापिटात फर्स्ट क्लास दिला जात नाही या बातम्यावर आमचा तंतोतंत विश्वास बसला.
पुनः व्यवस्थापन शिक्षण मराठी वाचन बंद! विद्यार्थी दशेत फडश्या पडायचे "कोसला" आम्हाला नोकरीला लागल्यावर सापडले आणि आम्ही पांडुरंग संगाविकाराच्या प्रेमात पडलो. कुठे कुठे मिळते जुळतो आहोत असे वाटायचे आम्हाला. तो घरी पळुन गेला आम्ही नाही जायचे ठरवले हाच तो काय तो फरक.

तर मित्रानो आमचे वाचन सध्यातरी नेमाडे काका जवळ इश्टोप झाले आहे. बघू आता पुढे सरकू हळु हळु.