Wednesday, July 9, 2014

विसापूर



ठरवून प्रवास, भटकंती आणि सहली, सहसा होत नाहीत. डोक्यात शॉट बसल्यागत एकदम आहे तसे निघायचे. कश्या-कश्याचा विचार नाही करायचा.  मग बघा सगळं कसं जमून येतं आणि आयुष्यभर लक्ष्यात राहण्याजोग्या प्रवासाचा किंवा भटकंतीचा आनंद मिळतो. मी आदल्या रात्री बारा वाजता ठरवून केलेल्या भटकंतीला जाताना सहसा १५ - २० चपात्या त्यावर ठेचा, तांबडी चटणी आणि त्यावर बदा बदा तेल. फडक्यात बांधलेला चपात्या/भाकरीच्या कडेला चार पाच कांदे आणि पसाभर शेंगदाणे. बस्स येवढे असले कि मला माहिताय कश्याची गरज पडत नाही. बायको पण बिचारी पहाटे उठुन बनवून देते.  आमची ड्राय फ्रुट्स, ग्लुकोस, रेड्बुल घेवून येणारी दोस्त नंतर म्हणतात 'आयला विक्या १०-१२ चपात्या/भाकरी अजून खपल्या असत्या राव मग राहिलेला कांदा पण नुसताच खातात. पण असे प्ल्यान शंभरातून दोन वेळाच यशस्वी होतात.

नेहमीच्या शनिवार प्रमाणे अमोल देशपांडे नामक इसमाचा पहाटे साडेपाचला आलेला फोन दोन सेकंदात संपला.

"हनुमान टेकडी" , इति अमोल
"हम्म दहा मिनिट" , मी झोपेत

घरातून बाहेर पडुन जरा पुढे आलो, आमल्या म्हणाला , घालू आय चल विसापुरला?
मी, " आरे पण ब्याग नाही , काहीच नाही , माझ्या खिशात तर शंभरच  रुपये आहेत?
अमल्या , पैस्याला काय करायचे , माझ्याकडे दिडशे आहेत, चल . भागतय तेवढ्यात.

मी, ' आरे पण अजून लागतील , कार्ड तरी घेवून येवू म्हनेस्तोर गाडी  मुंबई हायवेच्या दिशेने भुर्रकन शंभरने पळू लागली. नवीन घेतलीय त्याने.

पाचच मिनिटात लक्ष्यात आले कि आम्ही एक्प्रेस हायवेवरून तंगाट पळत आहोत. हे कळताच बनेलच्या  आतून अमोलला आलेला घाम मला जाणवला. मग हा इसम कधी त्या हायवेवरून बाहेर पडतोयच्या नादात जोरातच गाडी दामटू लागला. आता मला पण घाम आला, दोन चार दिस आत राहिलेले परवडले पण मरण नको म्हणून, अमोलला तीन चार वेळा बोललो, हळू घे, तर तो म्हणाला शंभर वर तर आहे. मग मी पण सोडून दिले.

दहाच मिनिटात टोल नाका आणि पुढून येणारे साहेब दिसले. आम्ल्याने वेग कमी केला आणि साहेबाच्या दिशेने गाडी वळवू लागला.

मी, "काय करतोय"?
आमल्या , ' पोलिसाकडे "?
मी, "आयला येडझवा आहेस का?, त्याने शिट्टी वाजवली नाय, हात केला नाय, तो आपला चाललाय सकाळी सकाळी , उरकायला , तर तू जा त्याच्याकडे , साहेब आम्ही चुकलो म्हणून. घे सरळ अन पिळ कान, म्हणताच आमल्याने कान पिळला  कि पुन्हा आम्ही एकशे दहाने बुंगाट.

मळवली स्टेशनपासून तोडलेल्या कठड्यातून लोहगड विसापूर कडे वळलो. एक छानसे गाव आणि कोरडाच धबधबा वोलांडून पुढे डोंगर रांगात प्रवेश केला. वळणे घेत घेत वरती चढत असताना एक मोठ्या वळणावर दोन मुली मागे बघत बघत पुढे चालताना दिसल्या. अश्या वेळी अमोलच्या गाडीचा वेग आपोआप कमी होतो.
घोट्याच्या खालपर्यंत बुट, घोट्याच्या जरा वरपर्यंत सॉक्स, पिवळं धमुक पाय आणि मांडीपर्यंतच येवून थांबलेली आणि खालून फाटल्या सारखी दिसणारी जीनची हाफ चड्डी. कमरेच्या खालपर्यंत शोभून दिसावा असा टी शर्ट, रेखीव चेहरा, आणि कमरेपर्यंतचे केस डोक्यावर मस्त दाबून ठेवलेली छानशी उलटी टोपी. खुपवेळ चालल्यामुळे चेहऱ्यावर आलेल्या घामाच्या धारा त्यांना जास्तच आकर्षक बनवत असाव्यात.

त्यांनी हात केला. अमोल अश्या वेळी नर्वस होत नाही. अनुभव हीच शिदोरी. मी इंग्रजीत बोलायचे कि हिंदीत हे ठरवत होतो.

दादा आजून किती लांब आहे लोहगड? ह्या त्यांच्या प्रश्नाने मी गाडीच्या मागच्या मागेच उडालो. म्हणजे अश्या मुली मराठी एवढं छान बोलत असतील यावर विश्वास बसत नव्हता.

तर विशेष काही नाही प्रवासात अश्या गोष्टी तिथेच सोडायच्या असतात.

मळवलिपासुन साधारण ७-८ किलोमीटरवर डावीकडे विसापूर किल्ला येतो आणि उजवीकडे लोहगड. लोहगड्च्या पुढे दुर्लक्षित राहिलेला हा विसापूर किल्ला. सकाळी कुठेतरी एखादा माणूस दिसत होता. आम्हाला रस्ता माहित नसताना आम्ही डावीकडे वळलो आणि दोन तासाने कळले कि आम्ही किल्याला फेर्या मारत आहोत, रस्ताच सापडत नाही. अमोलचा धीर सुटणार तोपर्यंत एक छोटेसे गाव दिसले आणि दोन चार गुरे चारणारा छोटुसा गुराखी. त्या लहान मुलाने बोलवून घेवून आम्हाला रस्ता सांगितला. त्या गुराख्याशेजारीच एक नटुन थटुन कुठेतरी चाललेली त्याची लहान बहिण असावी. अमोलने विचारले, आरे ती कुठे चाललीय रे सकाळी सकाळी तर तो म्हणाला बैठकीला. "बैठकीला" या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले, नाहीतर असे आपण कुणाकडे लक्ष देत नाही.

बैठकीला म्हणताच अमोलच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे हे मला कळले.

अमोल "समर्थांच्या का ?'
गुराखी . " हो "

मग त्यांच्यात एक प्रकारचा अनोखा नातेसंबंध तयार जाहला. अश्या खेडेपाड्यात सुद्धा "जय जय रघुवीर समर्थांचे"  संस्कार अगदी संघटीत पणे होत आहेत याचे मला कौतुक वाटले. शिवाजी महाराजांना समोर ठेवून "जय जय रघुवीर समर्थांच्या " घोषण  ऐकू येणार बहुतेक.

रस्ता चुकलो ते बरेच झाले. पाठीमागून एक खडतर रस्ता मिळाला त्यामळे आनंदच झाला. वरती चढताना दोन तीन बुद्धिस्ट गुहा आढळल्या. किल्ल्याच्या खूप अगोदर तिथे भिक्खूंची  तपस्चर्या चालत असणार.

किल्ल्यावर विस्तीर्ण असे पठार आहे जे तुम्हाला हवी असलेली शांती देते. हजारोंच्या संखेने असलेले खेकडे एक वेगळाच नजारा देतात. किल्ल्यावरून पवना ड्याम, आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये स्वताला विसरून जा.  कुणाला काही न बोलता शांत पडुन रहा. आणि परतीच्या प्रवासाला निघा नाहीतर पुढेच असलेला लोह्गड पण पाहून घ्या.

एकूणच १ वाजेपर्यंत घरी चिंचवडला.













Tuesday, July 8, 2014

असेही आत्मचरित्र असेल का ?

मला बारक्या पणी कसलापण त्रास झाला नाही. आई बापांनी जे पाहिजे ते दिले. मी पण चारचौघां सारखा कधी पास कधी नापास कधी ATKT या समाजमान्य न्यायाने वय वाढेल तसा वाढत गेलो. माझा बाप चांगला पण नव्हता किंवा वाईट पण नव्हता, आईवर पण त्याने म्हणावा असा अन्याय नाही केला ना आईने त्याच्यावर. चाकोरीने चालणे भाकर खाणे आणि जगणे एवढंच केलं. खानदानात काम करण्याची परंपरा अशी नव्हती. शेतातील उत्पन्न यायचे त्यावर भागायचे. मला पण स्वप्ने वैगरे बघायचा असा नाद नव्हता. बाकीची पोरं शिकतात आणि कॉलेजात जातात म्हणून मी पण गेलो. बाकीचे नाद करत करत अभ्यास झाला. मी आज तुमच्या पुढे ह्या ठिकाणी उभा आहे म्हणजे फक्त नशीब. यासाठी मी काही विशेष प्रयत्न केलेले नाहीत. काम करणारेच यशस्वी होतात आणि आळशी किंवा उनाडक्या करणारे यशस्वी होत नाही हे सारासार खोटे तत्वज्ञान आहे.

आसलं साधे सुधे आत्मचरित्र वाचायला मिळेल का  ? मराठी साहित्य क्षेत्रात ?