Sunday, April 27, 2014

तू

तुझ्याशिवाय जगण्याचा कधी विचार केला नव्हता. किंबहुना तुझ्याशिवाय जगू शकेल कि नाही हि शंकाच होती. नाही काहीतरी चुकतंय. तुझ्या शिवाय जगू शकणार नाही हि खात्रीच होती. अश्या खात्र्या म्हणजे भ्रम असतात बहुतेक. नाही, मी सगळ्या विषयी का बोलू ? तो फक्त माझा भ्रम असावा. मला जास्त काळजी तुझी वाटायची. तुला माझ्याशिवाय जगणे होते कि नाही याची. म्हणून मी तुला आयुष्यात कधी एकटे पडू द्यायचं  नाही असा निर्णय घेतला आणि जगासाठी लग्न पण केले. मला याची जरुरत नव्हती कारण ते सामाजिक बंधन आहे.  आपल्या प्रेमाचे बंधन पुरेशे होते आपल्या एकत्र राहण्यासाठी, पण नात्याला नाव पाहिजे म्हणून  देवा ब्राह्मणाच्या साक्षीने अक्षता अंगावर टाकून घेतल्या. पश्चाताप काश्याचाच नाही. तू खूप दिलं. अपेक्षेपेक्षा जास्त दिले म्हणनार नाही, तश्या माझ्या अपेक्षा पण अश्या काही अचाट वैगरे नव्हत्या. जे दिले नाही ते ओरबाडून घ्यायचा कधी प्रयत्न नाही केला.

आज आपल्या पहिल्या भेटीच्या आठ वर्षानंतर हे लिहायला दुःख होतंय कि नाही माहित नाही, होत असेल तर किती होतंय ते पण कळत नाही. गेल्या चार वर्षात बहुतेक सवय झाली असावी दुखात राहायची. आता आनंदाचीच भीती वाटते. माफ कर सुखाची भीती वाटते. आनंद तर मला कश्यात पण मिळतो. मी सहज मिळवतो.  

प्रयत्न करून कुणी एकत्र राहावे या विचाराचा मी नाही. प्रेम हे उस्फूर्त असते याच्यावर तुझा पण विश्वास असेल. असणारच. प्रेमाच्या कथा आणि चारोळ्या तूच वाचून दाखवायची मला. ती कवितेतली प्रेमं, कथामधील प्रेमं, तुझं ते मला चारोळ्या वाचनाच्या कार्यक्रमाला घेवून जाणं , मला प्रेम काय असते ते समजावे म्हणून. माझ्या प्रेमासाठी मला अश्या खाद्याची गरज नाही पडायची पण तुला आवडते म्हनुन मी शोधून काढायचो पुस्तके आणि असे कार्यक्रम, खास तुझ्यासाठी. अर्थात ती मला भंकसच वाटायची. तुझ्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी अश्या किती भंकशी सहन केल्या. आज माझ्या आयुष्यात  सर्वात किमती काय असेल तर माझ्या बालपणीच्या आठवणी आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या भंकशी. यापेक्षा जगात दुसरे काहीच किमती असू शकत नाही. जेव्हा तू म्हणाली कि आपण भेटू आणि मिटवून घेवू तेव्हाच माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. आपल्यात मिट्वायचे ते काय होते? नवरा बायकोची सकाळची भांडणे संध्याकाळी गादीवर मिटतात असे मी ऐकले होते आणि त्यावर विश्वास पण होता. आज तीन वर्ष तुझ्यापासून दूर राहतोय एकदा जरी म्हटली असतीस कि सोन्या ये आता बस झालं नाटक तर विजय तुझाच झाला असता. तुझ्या विजयातच माझा आनंद आहे. हे तूला माहित होतं पण आता विसरलीस बहुतेक. पण आता महिनो न महिने तुझा होणारा पराभव मला मान्य नाही. माफ कर तुझ्या विजयाच्या आणि पराभवाच्या संकल्पना बदलल्या असतील बहुतेक.

मनाला मान्य नव्हतं तुझ्याबरोबर प्रेमाच्या देवाणघेवाणीचा सौदा करायला यायचे. एकमेकाच्या अटी मांडायच्या आणि कॉर्पोरेट जगतातील डील केल्यासारखी आपल्या प्रेमाची, आपल्या छकुलीची आणि नात्याची डील करून पुन्हा एकत्र सुखाने नांदायचे नाटक करायचे. कश्यासाठी तर समाजासाठी, लेकरासाठी. पण त्या निमित्ताने तुला भेटण्याची संधी मिळेल, तुला माझ्या डोळ्यातील भावना न बोलता समजतील आणि आपण तिथून सरळ आपल्या घरी जावू या अपेक्षेने आलो होतो. कसली चर्चा न होता सरळ "आपल्या " घरी जाण्याच्या! पण भेटताच तू माझे तुमच्या कॉर्पोरेट क्लायंटचे करतात तसे केलेले स्वागत केले. आणि काय घेणार म्हणून माझ्यासाठी मागवलेलि थम्सअप आणि तुझ्यासाठी मागवलेले रेडबुल वरूनच पुढच्या संवादाचा अंदाज आला.

कासायास, कुठे जेवतो, फक्त विकेंडलाच पितो कि संध्याकाळी घरी आले कि घेवून बसतो असले काही न विचारता तू आणलेली अटींची यादी वाचून दाखवायला चालू केलीस. अट छोटी असो कि मोठी ती अट असल्याने ती मान्य करण्याचा प्रश्नच नव्हता पण दगडा सारखे ऐकत होतो.

आगं ज्या आई बापानी मला एकट्याला लहानाचा मोठा केला, खस्ता खाल्ल्या खेडेगावातून बाहेर पडून शहरात नाव कमवेल हि ताकत दिली आणि त्यांना मी वृद्धा श्रमात ठेविन असा तू विचार तरी कसा करू शकतेस?  या जन्मी तरी शक्य होईल का ते? अर्थात याअटीने मला आश्चर्य वैगेरे अजिबात वाटले नाही. तुला गेले काही वर्ष बदलताना मी पाहत होतो. मी वृद्धश्रमाचा खर्च करून घरात पण पैसा खर्च करायचा आणि मी जेवढा खर्च करीन तेवढाच तू पण खर्च करणार हा व्यवहार तू कधी शिकलीस ? अगं दहा वर्ष होस्टेलला होतो मी रूम पार्टनर बरोबर सुद्धा कधी हिशोब ठेवला नाही. आणि आता घरात पैश्याचा हिशोब ठेवून तुझ्या राहिलेल्या पैश्यावर मी हक्क सांगायचा नाही असे सांगतेस तेव्हा मला खूपच भंकस वाटणाऱ्या आणि तुला आवडणार्या कुटंब व्यवस्थेचाच तू अपमान करत असतेस! ज्यावेळी प्रेमात आणि घरात असे हिशोब होवू लागतत तेव्हा ते घर घर राहिलेले नसते आणि अश्या अभाशी घरातून स्वतंत्र होणे दोघांना पण सुखकारक ठरते.

आता आपण खूप दूर आलो आहोत. परतण्याच्या सर्व वाटा मला वाटतं आपण स्वताच बंद केल्या आहेत. बंद करून किल्ल्या कुठेतरी समुद्रात टाकून दिल्यात. त्या शोधणे व्यर्थ आहे कारण मिळणारच नाहीत. तशी आतून दोघांची पण इछ्या नसावी. पण आयुष्य थांबत नाही. ना तुझ्यासाठी ना माझ्यासाठी. आपण वेगळे तर झालोच आहोत, कायद्याने व्हायचे कि नाही ते तू ठरव.

मला माझे माहित नाही. पण लक्ष्यात घे तुला खूप लांब जायचे आहे. आपल्या छकुलीचे भविष्य घडवायचे आहे. त्यासाठी तू समर्थ आहेस असे वाटते. तिला सुख पैश्यात मोजायला शिकवू नकोस. आपल्या समाजात बापाचे नाव लागतेच, तुझी इछ्या असेल तर दे नसेल तर राहू दे. कधीतरी तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल, तिला त्या प्रश्नांची खंबीरपणे उत्तरे देता येतील अशी बनव. शाळेमध्ये इतर मुलांना सोडायला येणारे आई बाबा बघून ती विचारेल आई आपले बाबा कुठे आहेत तेव्हा सांग खूप दूरच्या गावी गेले आहेत तिला खूप खेळणी आणायला.

तुझे बाबा खूप चांगले आहेत आणि तुझ्यावर खूप प्रेम करतात हे सांगायला तू विसरणार नाहीस याच खात्री आहे.

अगोदर फक्त तुझाच असणारा आणि आता फक्त माझाच.







Tuesday, April 22, 2014

निवडणूक एक सन

आंव ~~~~ काय मनतोय मी, उद्या तू आन परसातला लंगडा राजा दोघं एक नंबर भूतावर एजंट व्हा, तिथं उगंच कुरुळी निघून भांडणं होत्यात. आन तुमी पण घुसळांग काडू नका पण त्यांनी चालू केलं तर म्हागं नाय सरायचं. आपुनबी मराट्याचा हाव. पण दादा तीपण मराटयाचीच हायती कि. येड्झव्या ती हालकीयती. उद्या तरी निट आयघाला आंगुळी बिंगुळी करून या न्हायतर पारुसंच येचाल. संत्या तू आदि आंगुळ करून नाव नोंदवून घी अन् पुना येवून धारा फिरा काड. सकाळ सकाळ मत पेट्यचि पूजा करायला पाच पाच सवासन्या बी बघा, तुमा दोघाच्याबी मालकिणीला सांगा पेटी आपलं मिशनी पुजायला. आन पहिलं मतदान आपलंच हुद्या, सवास्नीच्या हातानं नाहीतर तुमीच करचाल. नाय पण दादा पहिलं मतदान तीच करत्याल त्यांच्या वळकी हायत्या सायबाच्या. आरं तुमी जरा लवकर जा. व्हय व्हय. येवू का ? बाकीच्या भूतावरचं पण बघायचं हाय. आज झोपलाकी कि मेलाव लय पैसे आल्यात त्यांचं. कळलं का?

हे गावातलं मतदानाच्या पूर्वसंध्येचं वातावरण. दोन्ही कळपात काहीच फरक नाही, चर्चा तीच. ग्रामीण भागात दिवाळी पेक्षा मोठा सण म्हणून निवडणुकांना मान्यता द्यावी हि मागणी मी लवकरच करणार आहे. पण कुणाकडे करावी हे कळत नसल्याने राहिली आहे. दुसरा दिवस म्हणजे दिवाळीचाच. काही लोकांची लगबग, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची लगबग, आंघोळी करून देवळात जावून कोण अगोदर मतदान केंद्रावर जातोय हि स्पर्धा. गावातल्या बायकांना पण रान सोडून आज कधीतरी गावात नटुन थटून फिरायला मिळतं. प्रेत्येक पक्षांच्या बायकांचा ग्रुप वेगळा वेगळा मतदानाला जातो. म्हणजे बाहेरच्या माणसाला लगेच कळते कि कुणाला किती मतदान झाले. फक्त तोंडं बघून. तरणी पोरं कधी बाहेर न पडणार्या पोरींची वाट बघत असतात. लांबून बघूनच भागवायचं, न्हायतर लय घोटाळा होतो. ह्या मतदानाच्या सणातून स्वताला अलिप्त ठेवणारे खूपच कमी लोक.

मतदान करून वातावरन बघावं म्हणावं म्हणून चावडीत येवून उभा राहिलो. ग्रामपंचायत मध्ये सत्तधारी मंडळी हातात मतदार याद्या घेवून जाणारा येणाराच हिशोब ठेवत होती. काही कार्यकर्ते कडेने उभे राहून उगीच भाम्बावल्यासारखे इकडे तिकडे बघत होते आणि आपल्याला पण गावातल्या राजकारणात लय किंमत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. ह्यांच्या नेमक्या विरुद्ध बाजूला एक हॉटेल मध्ये विरोधी पक्ष्याचे लोक. वातावरण तेच. फक्त काही लोक कधी हिकडचा चहा प्यायचे तर कधी तिकडचा चिवडा खायचे.

एवढ्यात माझे एकट्याचेच लक्ष एका मोठ्या आणि जबरदस्त आवाजाने वेधून घेतले. कारण बाकीच्यांना त्याची सवय झालेली असावी
"येईईईईईईईई ~~~~~~ एक नंबर घड्याळ हां ~~~~~~ नाद नाय करायचा, अय बापू काय हाणलं घड्याळ, हाय का नाय? सगळ्या गावाच्या आयला घोडा लावीन हा पठ्या हां नाद नाय करायचा" तर हा पठ्या म्हणजे भैरू आप्पा, वय पस्तीस आसपास, एका पायात निळी स्लीपर एका पायात पिवळी स्लीपर, सदऱ्याच्या एक अडून एक गुंड्या तुटलेल्या, कर्दुड्याने प्यांटी संगट इज्जत पण टिकवलेली, कपाळाच्या दोन्ही बाजूनी टक्कल, कुठेतरी पडल्यामुळे एका गालाला माती लागलेली आणि हातात बीअरची बाटली. कलंडत, कलंडत येणाऱ्या जाणार्यांना धरायचा प्रयत्न करत होता, पण लोक चुकवून जात होते.
मला बघताच सावरत सावरत पळत येवून माझ्या गळ्यालाच मिटी. सायेब कवा आलाव, एन नंबर माणूस, चला नाइण्टि सांगा न्हायतर माज्याकडून प्या. 

आरं नाय भैरूआपा मी नाय घेत. पण ड्राय डे हाय कि आज आन तू उघड्यावर पेतोय? वो सायेब, पुलीसाच्यात ताकताय का आपल्याला हात लावायची ?आन तुमी पेत नाय, कुणाला **वायला शिकीवता? अहं तिकडे पुण्याला काय करता ती कळत न्हाय का आमाला ?
भैरू अप्पा नकु राव तू पी, तुला देतो पैसे मला जाऊदे.
तसं नगं. पण साये~~~~~`ब एक नंबर बाणच येणार, बाण सोडायचा नाही यंदाबी. त्याला माहित होतं मी बाणाचा माणूस आहे.
मी अंदाज घेत घेत पुढे निघालो आणि तो अजून गावाला घोडा लावायला रिकामा झाला.


Wednesday, April 2, 2014

रानात जाणार मी आणि साथीला गळ्यातला रेडिओ

उगीच फिलीप्सचा लांबक्या वादिचा रेडीवो गळ्यात अड्कावून गावापासून लांब असलेल्या शेतात जाऊ वाटतंय. 
दुपारची दोनची वेळ, वरून कडक उन पडलेलं, चौफेर वाळलेल्या पिवळसर तांबूस गवतातून काळ्या सापासारखी इस्कट्लेलि बारीक पायवाट, दूरदूर पर्यंत माणसाचा मागमूस नाही, कुठेतरी दोन तीन जनावरे चरल्याचे नाटक करत आहेत आणि रस्त्यापासून फर्लांगभर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली दोन चार म्हशी स्वताला उनापासून वाचवून ल्हाकत ल्हाकत रवंथ करत बसल्या आहेत. सुगी संपून गेल्यामुळे नजरे समोर आबाळा पर्यंत पसरलेले ओसाड रान आणि त्याला नजर लागून नये म्हणून कुठेतरी बागायताचा हिरवा ठिपका. उनाच्या झळयाने बारीक झालेली नजर, छोट्याश्या वाऱ्याच्या झुळुकीने अंगावर उडणारा फुफुटा आणि डोक्यावर उन लागून नये म्हणून बांधलेली टापर . सावकाश चालत चालत आपल्या रानातल्या लिंबाच्या झाडाखाली लोळायची आतुरतेने झपाझप पडणारी पाउले. रेडीवोवरच्या भुले बिसरे गीत मध्ये लागलेले "कभी कभी मेरे दिल में खयाल आता है' हे गाणे त्या रानातल्या शांततेचा भंग करून आपलाल्या स्वप्नात घेवून जात आहे. होय डोक्यात ते स्वप्न आणि रानातल्या चवाळ्यावर पडण्याची झालेली घाई. बाकी जगात काय घडत आहे त्याच्याशी कसलं आलंय देणंघेणं.

होळी

आमच्या इमारतीत पेटलेल्या होळीकडे त्रयस्थासारखे पंधरा मिनिटे बघताना बालपणात गेलो. 
दोन दिवस अगोदर आम्ही दोन्ही मोठ्या चाळीमध्ये गवऱ्या आणि लाकडे मागत फिरत होतो. होळीला पैसे नाही तर गवऱ्यांचाच मान असतो. प्रत्येक घरासमोर जावून "होळीच्या गवऱ्या पा ~~~~ च चलगं म्हातारे ना ~~~~~ च " म्हणत असू आणि मग पाच गवर्यांची अपेक्षा असे. कुणीही आढेवेढे न घेता देत. सगळी घरे संपली आणि जमलेल्या गवऱ्याकडे आणि लाकडाकडे पहिले तर समजले कि निलगिरीच्या झाडापेक्ष्या उंच जाळ न्यायची आपली महात्वाकांक्षी होळी नाही होणार हि. मग आम्ही चील्यापिल्यानी गावाच्या कडेने बायकांनी मोठ्या मेहनतीने स्वतःच्या गायी म्हशीच्या नाहीतर रानातून शेण आणून लावलेल्या सगळ्या गवऱ्या चोरून आणल्या. लावलेला गवर्यांचा ढीग बघून आमचा छाती भरून आली आणि मोठी लढाई जिंकल्याचा भास होवू लागला. हा आनंद खूप वेळ टिकला नाही, आम्हा सर्वांच्या घरासमोर अनेक बायकांची गर्दी झाली आणि आमच्या सगळ्यांच्या आयांनी सगळ्या पोरांना बदड बदड बदडलं. थोड्याच वेळात आम्ही अगोदर जमा केलेल्या गवऱ्या पण गायब झाल्या. आपापल्या गवऱ्या घेवून जाण्याच्या नादात आम्ही इमानदारीने मागून आणलेल्या गवऱ्या पण बायका घेवून गेल्या होत्या. येवढा मार खाल्ल्याचे दुख नव्हते तर होळी होणार नाही याचे भयंकर दुख होते. संध्याकाळी सहाच्या आसपास लोक आपोआप गवऱ्या - लाकडे आणून आमच्या होळीच्या ठिकाणी आणून टाकू लागली आणि त्यात ज्यांच्या गवऱ्या आम्ही चोरल्या होत्या त्यांचा सहभाग जास्त होता. बघता बघता खूपच मोठी होळी झाली आणि मोठ्या माणसांनी - आणि बायकांनी आम्हा पोरांच्या हस्ते होळीला दहन देवून आमचा मान तर ठेवलाच पण तुम्ही चोर नाही आहात हे पण सांगितले.

त्या काळी आमच्या स्वकष्टाच्या होळीच्या कडेने बोम्बलत आणि अफाट आनंदात शिव्या देत फेऱ्या घालणारे मी आणि माझे मित्र. आणि आज त्रयस्थपणे सोसायटीतील लोकांचा मान ठेवायचा म्हणून १००रुपये वर्गणी देवून होळीच्या कडेने मोबाईल मध्ये बघत यांत्रिक पणे बसलेला मी. missing all my कारखान्यावरचे चावट, टणक, येटान, मिथुन, जोक्त्या आणि इतर दोस्त अगदी आकाडे बाबा आणि उंबरे मामा सहित.

आता कारखान्यावर ते दोस्त पण राहिले नाहीत, ती चाळ तर उदासच झालीय आणि तो हजारो कामगारांचे आणि शेतकर्यांचे पोट भरणारा कारखाना आज एकटाच चार पाच वाचमनच्या राखनादारीत कुणी तरी गिर्हाईक येईल आणि आपले उरले सुरले नावाचे अस्तित्व पण संपून जाण्याची वाट बघत असेल.

गुडीपाडवा

तिसरी पर्यंत गावातच होतो. गावात कोणत्याच सणाचे कौतुक नसायचे. अगदी दिवाळीला सुद्धा सकाळपर्यंतच सगळं उरकून दुपारी भाकरी बांधून रानात जाणारेच बहुतेक लोक. अभ्यंग स्नान वैगेरे मध्यमवर्गीय गोष्टी त्यावेळी फक्त ब्राह्मण लोकांना किंवा मोठ्या जमीनदार लोकांनाच परवडायच्या किंवा त्याचे कौतुक असायचे. बाकीच्यांच्या दिवाळीची उडी प्रकाशच्या माक्याच्या तेलापर्यंत पोचली तरी मोठी गोष्ट. 

आज टीव्हीवर डोंबिवलीत, गोरेगावला निघालेल्या मिरवणुका पाहिल्या आणि ह्या सणासुदीचे कौतुक फक्त शहरी मध्यम वर्गीयानाच असते याची तीवृ जाणीव झाली. चौथीपासून मी पण स्वताला मध्यमवर्गीय वैगेरे समजू लागलो होतो. कारण वडील सहकारी साखर कारखान्यात का हुना पण नोकरीला लागले होते. त्यामुळे महिन्याला काही पैसे हमखास मिळणारे लोक म्हणजे मध्यम वर्गीय या संज्ञेत मी आमच्या कुटुंबाला बसवायला चालू केले होते. गुडी पाडव्याची सकाळची लगबग चालू व्हायची आणि माझा वडिलांच्या मागे तगादा असायचा कि आपलीच गुडी सर्वात उंच पाहिजे. झालं मग चांगलिचुंगली कापडं घालून गुडी उभारली कि कडुलिंबाच्या दोनचार बिया गुळाबरोबर खायच्या आणि साखरेचे हार वाटायला चालू व्हायचे. आपल्या सलगीतल्या लोकांच्या घरी जावून त्याना हार देणे. ज्यांच्याकडून आपले काही तरी काम आहे किंवा स्वार्थ असेल तर त्यांच्या घरी खोबऱ्याचा हार द्यायचा. दुपारी येळवण्याची आमटी, पुरण पोळी आणि भात वर्पून हाणायचा. तोंडी लावायला वेगवेगळ्या धान्याच्या पिठापासून केलेल्या भातुड्या, पापड्या कुरवड्या इत्यादी. संध्याकाळी संपला सन. हे का करतोय, कश्यामुळे करतोय याच्याशी कुणाला देणेघेणे असलेले मला दिसले नाही. पण आनंद उत्सव साजरा तेव्हा पण होत होता आणि आज पण होतोय. थोडेफार स्वरूप बदलले असेल.

थोडंसं मोठं झाल्यावर कळले कि गुडीपाडवा हा सण का साजरा करतोय याच्यासाठी प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या थेऱ्या आहेत. कोणत्या थेरीला खरे मानावे किंवा नाकारावे आपला तेवढा अभ्यास नाही. पण मित्रानो कालच्याच दिवशी संभाजी महाराजांची क्रूर पणे हत्या करण्यात आली होती ते दुःख तो राग मनात असतान तुमच्या शुभेछ्या कोणत्या भावनेने स्वीकारू ? किंवा कोणत्या भावनेने तुमच्या आनंदात सहभागी होवू ?

एंगेजमेन्ट

महाराष्ट्रात "एंगेजमेन्ट" हा प्रकार कधीपासून चालू झाला हा प्रश्न भारतात आर्य कधी आले वा खरेच आले कि नाहीत या प्रश्ना इतकाच कठीण आहे. काही दिवसापूर्वी सुपारी फोडणे, साखर पुढा, टिळा ह्या गोष्टी प्रचलित होत्या. त्याची जागा आता अंगठी ह्या दागिन्याच्या खदलाबदलीने घेतली आहे. जुन्या काळी किंवा अजूनही गावाकडे, बैठकीतला जाणता माणूस नाहीतर मुलीचा मामा एकावर एक पाच किंवा आकरा सुपाऱ्या ठेवून हाताच्या एका दणक्यात फोडायचा आणि लग्न ठरायचे. मंग लोकाच्या अंगावर गुलाबी रंग टाकून लग्न जमले हे घोषित करायचे आणि साखर वाटायचे. जेवायला बेत मस्त वांग्या बटाट्याची इसूर घालून केलेई कडक सरबरीत भाजी, फोडणीचा वटाणे वैगेरे टाकून केलेला चमचमीत भात आणि चपाती वर ताव मारून आपापल्या गावाला मंडळी रवाना. बुंदी लग्नात असते. बैठकीला गेलेल्या माणसाच्या अंगावर गुलाबी रंग दिसला कि जमलं म्हणायचे लग्न.

परवा एका कोर्पोरेट मराठी मित्राच्या "एंगेजमेंट" ला जाण्याचा योग आला. स्टार वजा हॉटेल मध्ये वोळिने ठेवलेल्या खुर्च्यावर आपली इज्जत जावू नये म्हणून शांत बसलेली किंवा हळु बोलत असलेली गडी आणि बाया माणसं. वातानुकुलीत यंत्रणा छ्यान चालू. कुणाला काय बोलावे ते समजत नाही. समोरील स्टेजवर आदिवासी भागातून आलेला आणि पुणेरी टोपी घालून बसलेला गोरा गोमटा कॉर्पोरेट दोस्त. आणि त्याच्याकडेने गोळा झालेले त्याचे दोस्त. आपली पण इज्जत जावू नये म्हणून मी पण आवाज न करताच घुसलो आणि म्हणालो "hi dear" तर त्याने मला वोढून घेतले आणि वोळख करून दिली

"hey guys, this is my friend Vikas, he is writer"
सभ्य घोळक्यातून आवाज " oh really , how many books have you published? "
मी अभिमानाने, " मी फेसबुक्या आहे "
हे माझे उत्तर एवढे काम करीन वाटले नव्हते पण बऱ्याच लोकांनी इज्जतीला न घाबरता मराठीती बोलायला चालू केले.

तेवढ्यात गुरुजी आले, पुण्यात गुरुजी म्हणतात. आणि वागदत्त वधु आणि वराने एकमेकांना अंगठी घातली आणि साखरपुडा आपलं एंगेजमेंट संपली.
माझ्या मित्रासाठी ती अंगठी मंगळ सूत्राचं काम करणार म्हणे. तेवढ्यात माझं पोरगं "बाबा जेवायला कधीय, जेवायला कधीय हे सगळ्या समोर मोठ्याने बोंबलत होतं, त्याला घेवून डायनिंग हॉल मध्ये गेलो. फार अपेक्षा नाव्हती पण जेवावे तर लागणारच होते. सपकसूळ पनीरची आमटी, तसाच सेम कोप्ता, पातळ वरण (दाल तडका) आणि भगुण्यात ठेवलेल्या जाडजूड पंजाबी रोट्या. गावाकडल्या पतरवाळीवर घेतलेल्या चमचमीत भाताची आणि भाजीची आठवण काढीत जीरा राईस आणि कोप्त्याची आमटी खावून निघालो.

कुणाच्याच अंगावर गुलाबी रंग दिसत नव्हता.