Wednesday, February 26, 2014

मिथुन उर्फ मिट्या

चाळीवर सगळ्याच पोरांचे आईबाप आपापल्या लेकरांना दुसऱ्याच्या लेकारांबरोबर फिरू  नकोस असे सांगायचे, कारण आपले लेकरू लय गरीबाय पण दुसऱ्याच्या लेकरामुळेच बिघडतंय ह्या नियमावर तिथल्या आम जनतेचा दांडगा विश्वास होता. तरी पण समाजात प्रस्थापित असणाऱ्या "बिघडणे" ह्या संकल्पनेला खरा न्याय दिला तो आमच्या दोन मित्र कम आदर्श कम लीडर यांनीच. एकाने खूप कष्टाने चावट हे बिरुद कमावले होते तर दुसऱ्याला आम्ही लाडाने मिथुन म्हणायचो. आणि ते दोघेपन आपल्या करणीधरणीतून मिळालेल्या टोपण नाव कम पदव्याना न्याय देण्याचा अतोनात प्रयत्न करायचे आणि त्यात यशस्वीपणे यशस्वी पण व्हायचे. ह्यांचा वट हा फक्त आमच्या चाळीपुरताच मर्यादित नव्हता तर शहरातून  कुल्पी, गारेगार बर्फ गोळा, आईस कांडी, भंगार घेवून येणारे पण यांच्या जवळचे दोस्त होते. ह्यांच्याकडून ते पैसे पण नाही घ्यायचे.

"मिथुनचा पिक्चर आलाय, राम अवतार पण चांगलाय, जिते है शानसे तर एक नम्बराय, मंदाकीनीची पांढरी साडी बघितली का?, सगळे बघितले दोस्ता आपुन काय सोडत असतो का?  काल शंभर रुपये धंदा झालता,  भागवतला एक आन प्रभातला एक बघून आलो." ह्यांच्या चर्चा पण नेहमीच अस्याच असायच्या. आमच्यासारखे घरच्यांच्या अन्यायाने पिचून - गांजून गेलेले त्यांच्या ह्या चर्चेकडे आणि प्रत्येक भावमुद्रेकडे कौतुक मिश्रित लालसेने पाहायचे. नाहीतर अश्या सिनेमाचे फक्त पोस्टरच आम्हाला बघायला मिळायचे, ते पण पेपरातच.

मिथुन हा खरच मिथुन होता. पांढरीफेक ब्यागि प्यांट, दोन्हीकडे व्यवस्थित इस्त्री करून बसविलेल्या चार चार प्लेटा, पाठीमागच्या खिश्यात लोकांना दिसेल असा पांढराच कंगवा, लाल - हिरवा - निळा किंवा पिवळा पण चमकणारा इन शर्ट, भोकं मोठी झालेला आणि मोठं बक्कल असलेला बेल्ट, पायात मोठा पांढराफेक शूज आणि त्याच्या इकडून तिकडे झोका घेणाऱ्या लांब दोऱ्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिथुन कट हेअर स्टाईल. केसांच्या बाबतीत कसलीही तडजोड नाही. कानाच्या वरती असलेला कट,  दर चार मिनिटाला केसाला मधून भांग पाडून व्यवस्थित बसविणे आणि मागचे केस हाताने कॉलर वरती टेकवून ते बिघडू नयेत म्हणून अवघडलेल्या मानेने चालणे. त्या काळी त्याच्याकडे वाकमन आणि डेक टेप होता. बापाने दिलेल्या पैस्याने तो फक्त मिथूनादाची क्यसेटच आणायचा. नाहीतर सलामे इश्क, महुवा, बेवफा सनम, सनम बेवफा, तुम तो ठहरे परदेशी अश्या काही गाण्यांचे नशीब कधीतरी उजळायचे. अस्या गाण्यांचे नसीब उजळले कि समजायचे ह्याला कुठेतरी अजून एक धोका बसलाय. आमच्या चाळीतील बऱ्याच पोरांच्या महात्वाकांक्ष्या ह्या मिथूनसराख्या दिसण्याच्या आणि वागण्याच्या होत्या.  मिथूनसारखा हेअर कट मारायचा आणि पांढरा फेक बूट घ्यायचा हि माझी महात्वाकांक्ष्या आमच्या पिताश्रिने पूर्ण होवू दिली नाही त्यामुळे माझ्या मनात बापाविषयी विषयी अजूनही आढी आहे.

ह्या मिट्याचा एक धोका तर मी याची देही याची डोळा पहिला होता. आमची शनिवारची सकाळची शाळा दुपारी सुटली असताना आम्ही लोक पोरींच्या मागे मागे चालत घराकडे चाललो होतो. चौकात गोंधळ दिसला. गर्दी दिसली कि अगोदर आत घुसून सर्वांच्या पुढे जावून पहाणे हा आमचा लहानपणीपासूनचा धर्म असल्याने हातातल्या पिशव्या सांभाळत आम्ही गर्दीत घुसून सर्वांच्या पुढे जावून उभा. पाहताक्षणी मला घाम फुटलेला अजून आठवत आहे. एका पोरीचे आईबाप आणि चाळीवरच्या आयाभैनीच्या रक्षणासाठी वाहून घेतलेले काही समाजसेवक लोक मिथुनला बदडत होते. आणि विचारात होते "सांग तूच लिहिली का हि चिट्टी, कुणी लिहिली हाय न्हायतर तुझा पायच तोडतो" कि लगेचच एक जोरात कानाखाली जाळ! एवढं मार खात असताना व  आणीबाणीचा प्रसंग उद्भवला असताना सुद्धा त्याचा हात डोक्याला आपला भांग तर मोडत नाय ना, त्याच्याकडे होता. फारच धाडशी वाटला मला तो, शेवटपर्यंत नाहीच म्हणत होता आणि कबुलच केले नाही. त्याने हि चिट्टी अशीच एका बाहेरच्या गारेगार वाल्याकडून लिहून घेवून, त्याच्या भावी प्रेमिकेला द्यायच्या आदी मला दाखवली होती. मला काही क्षण मिथुनच्या जागी मी दिसलो आणि एक झटक्यात गर्दीतून बाहेर पडून घरी जावून पांघरून घेवून झोपलो. पुढचे पंधरा दिवस माझे भीतीच्या सावटाखाली गेले. अश्या अनेक प्रसंगातून तो वाचला होता तरी आपली जिद्द सोडत नव्हता. हि नाही म्हणाली तर दुसरी, पण प्रेम हे केलेच पाहिजे ह्या ठाम मताचा असावा तो.

कधी कधी मिथुनच्या घरी पाव्हणे यायचे. ते सोलापूरचे असल्याने आम्ही चाळीतली पोरं त्यांचा अतोनात आदर करीत असू. ते आपापसात कन्नड बोलत असत. आम्हाला वाटायचे हे आपल्यालाच नावे ठेवत आहेत. आपण म्हणजे एकदम गावाकडलेच कसे काय झालो मायला, याचे दुक्ख व्हायचे. ते पण डिट्टो मिथुन सारखेच दिसायचे फक्त दोन पावले आमच्या मिथुनच्या पुढे होते. त्यांनी मिशा काढलेला होत्या आणि डोक्यावर निळा किंवा पांढरा रुमाल बांधल्यामुळे डोक्यावरचे केस छत तयार करत आणि त्यामुळे ते स्वताला  आमच्या चाळीतील मिथुन पेक्ष्या जास्त मिथुन समजत. ह्या सगळ्या मित्रांना गुटका खाणे म्हणजे आपण खूप ऐष वैगरे करतो आसे वाटायचे. आम्हाला कधी कधी दोन चार दाणे द्यायचे म्हणायचे "ऐष कराबे, ऐष". कधी कधी यांच्याकडे पैसे नसले कि ते तंबाकू खात.  यांच्याकडे चुना कधीच नसे किंवा फक्त चुना असेल तर तंबाकू नसे.  येणाऱ्या जाणाऱ्याला ते मागायचे,  लोक पण सायकल वरचे उतरून यांना तंबाकू किंवा  चुना द्यायचे. मग तंबाकू मळताना ते म्हणायचे "तम्बाकुला लावा चुना मानव जन्म नाही पुना पूना"

ते सोलापूरचे पाव्हणे आम्हाला बोलत "का बे~~~ , काय करता बे हितं~~~~ ? टॉकीज नाही काय नाही बे, कसं करमतं बे तुमाला हितं~~~~ ? ये मिट्या, घेवून ये बे ह्यांन्ला एकदा सोलापूरला, भागवत प्रभात टॉकीज दाखवू, काय हाय बे हितं,  शिटीतलं  लाईफ बघा बे एकदा" मग तर आमचा त्यांच्या विषयीचा आदर दुप्पटच होत असे.

मी या मिथुन पोरामधे  फिरत असल्यामुळे  शाळेत माझा वट वाढला होता. वर्गातील कुणीही माझ्या नादि लागत नव्हते. म्हणजे त्यावेळी मी थोडक्यात भारी वैगेरे झालो होतो. विकास दहावीतच गुटका, १२०/३०० खायला लागला आहे अशी अफवा पण पसरलेली असावी.

मिथुनला लाडाने पुन्हा आम्ही मिट्या बोलवायला चालू केले होते. आता त्याचे खरे नाव फक्त आईवडिलांना आठवत असेल.  बस. अजून काही दिवसांनी कळले कि मिट्याला आता खरंखुरं प्रेम झालंय आणि तो खरंच लय सिरियस आहे. चावटचं झेंगाट अगोदरच चालू होतं त्यासाठी त्याला खूप प्रयत्न पण करावे लागले नव्हते, पाखरू अलगद जाळ्यात अडकलं होतं. चावटचे झेंगट आहे आणि तो दररोज जुगतो हे काय मिट्याला सहन नाही व्हायचे आणि तो दुप्पट जोमाने कामाला लागायचा.

भर दुपारी चाळीत कुणीही नव्हते, आमच्या घरचे पण गावी गेले होते. मिट्या त्याचे क्यासेट घेवून आला. क्यसेटच्य दोन्ही बाजूनी बारा वेळा एकच गाणं रेकॉर्ड केलं होतं. "कोई जब तुम्हारा हृदय तोड दे तडपता हुआ कोई छोड दे तभी तुम मेरे पास आणा प्रिये" गाणं लावलं आणि आम्ही तयारीला लागलो. त्याला आता प्रेमपत्र लिहायचे होते. त्याने लिहिले "प्रिय कला ' आणि मी जोरजोराने हसू लागलो. च्यायला हिच्याबरोबर कुणाला कसकाय प्रेम होवू शकते. चावटणे मला रपका मारून गप बसविले आणि मिट्याने  प्रेमपत्र पूर्ण केले तोपर्यंत त्याच्या आवडीचे गाणे बारा वेळा वाजून झाले होते. नंतर मला कळले कि ते गाणे तिला ऐकवण्यासाठी मोठ्या आवाजात लावले होते. चाळीतल्या एका बारक्या पोराला बोलाविले. त्याने चिट्टी पोहचवण्याचे काम केले. मिट्या आणि चावट उत्तराची वाट वघत बसले होते आणि मी घाबरून आतमध्ये. कला बाहेर आली आणि तिने ती चिट्टी मिट्या समोर फाडून कागद मोरीत घातले. खूप मोठा धोका झाला होता मिट्याला अजून एकदा. माझ्या आंगाला संधी मिळेल तेव्हा झटणाऱ्या पोरीने मिट्याला होय म्हणावे असे मला मनापासून वाटायचे.

कली नाही म्हणाली म्हणून काय तरी उतारा पाहिजे होता. टेन्शन घालवायचे म्हणून चावटणे पिक्चरची पुंगळी सोडली. मी वडिलांना चार रुपये मागितले तीन रुपये तिकीट आणि एक रुपया खारमुरे वैगरे. वडिलांनी विचारले कोणता पिक्चर तर मी म्हणालो "आराधना " पटकन पैसे काढले आणि दिले आणि म्हणाले "आमच्या काळातला पिक्चर आहे मी आठ वेळा बघितला होता"

संध्याकाळी सायकल वर आम्ही तिघे सिनेमाला. मी टॉकिज कडे वळलो तर मिट्या म्हणाला "तिकडं न्हाय हिकडं, आपुन भक्त प्रल्हाद बघायला चाललो आहोत" ह्याच्यावर मी भलताच नाराज झालो. देवाचा सिनेमा बघण्यात कसली आलीय मजा? टीव्हीवर येइलच कि. "आ तू चलरे तुला आवडेल भक्त प्रल्हाद" इति मिट्या.
"दिलफेक व्हीडीवो" जवळ सायकली थांबविल्या, त्या दोघांनी बाहेरून भजी आणि पापड घेतले आणि आम्ही आता घुसलो. आतलं वातावरण भायानच होतं. टीव्हीचा आवाज बंद, सगळी लोक शांत आणि टीव्हीकड ध्यान मग्न. आम्ही मध्ये जागा करून बसलो. माझे बारीक लक्ष टीव्हीत. एकूण नकाशा कसा असतो हे मला मन लावून बघायचे होते. तेवढ्यात चावटणे पापडाचा कडकडा आवाज केला आणि भजी काढून खायला चालू केले. सगळ्या लोकांचे लक्ष ह्या दोघाकडे. हे आपले भजी खात लोकांचे चेहरे बघत. तेव्हड्यात चावटने शेजारच्या माणसाला विचारले "किती शॉट झाले ?"दहा सेकंद शांतता आणि मिट्या आणि चावट उठून दरवाज्याकडे पळाले, मला काहीच कळले नाही पण बाहेर येवून बघतोय तर मिट्या जोरजोरात हसतोय आणि चावट शांत आहे.

"च्यायला चावटाच्या म्हाताऱ्याला बी नेमकं आजच यायचं होतं भक्त प्रल्हाद बघायला"
"आईच घातली कि, आता चावटच्या बापानं आपल्या वडिलांना सांगितले तर ?"

दुसर्या दिवशी सकाळी चावटाचे वडील मला म्हणाले
"तू शाळा शिकतोस, हुशार हायस, आमच्या गाबड्याच्या नादि लागू नकोस"

ह्या बापाला अजून हि मी सलाम करतो. स्वताच्या पोराच्या नादाला लागू नको असे म्हणणारा बाप वेगळाच.

मीट्याने अजून हार मानली नव्हती. आता आम्ही चिट्टी लिहायला रानात गेलो. मिट्याने सुई, चाकू आणला होता. त्याने खरच रक्ताने चिट्टी लिहिली. एक पोरगी पोराला इतकं वेड लावू शकते हे पहिल्यांदाच बघत होतो. भर दुपारची वेळ म्हणजे आमची वेळ. चावट आपल्या झेंगाटला भेटायला अश्याच दुपारी जातो. कारण बघायला कुणीच नसते. दुपारी ती चिट्टी घेवून एका लहान पोराला पाठवले आणि वाट बघता बसलो. ती बाहेर आली आणि चिट्टीला त्याच्यासमोर डबडं लावलं. त्यात मिटयाचे रक्त खरोखरच जळत होते. त्याच्या चेहरा बघून मला खूप वाईट वाटले. पण समाधान वाटले कि कमीत कमीत हि बापाला तरी नाही सांगणार. दुसऱ्या दिवशी कलीने मला बोलाविले आणि म्हणाली , "तू कश्याला फिरत असतो त्या मिट्या बरोबर, मला नाही आवडत तो, तु कायबी माग तुला देते" तरी पण मी म्हणालोच त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. मग ती म्हणाली तू जा आत्ता. आता कधीतरी वाटतं आपण त्यावेळी खूप मोठी गोष्ट मिस केली असावी.


तरी त्याचं तिच्यावरचे प्रेम् कमी झाले नव्हते. तिच्या घरासमोरून मारलेल्या चकरा मुळे मिट्याने फक्त अजून एकदा मार खावू नये अशीच इछ्या असायची माझी. नको तो दिवस उगवला, तिचा साखरपुडा झाला. तो दिवस मिट्याने दोन देशी पेवून साजरा केला. मला तो शेवटचा आठवतो तो तिच्या लग्नात "वो मामा जरा भात वाढा कि अजून म्हणून वाढप्याला बोलावणारा "

मला माहित नाही आज तो कुठे आहे पण आज जेवढा मी त्याला मिस करतोय तेवढा त्याच्या जवळचा होतो कि नाय कुणास ठावूक.





Tuesday, February 18, 2014

शिवराय


आमचं शिवरायांवरचे प्रेम वयाच्या नवव्या वर्षी, चौथीच्या पुस्तकातील अफ़झल खानाच्या चित्रावर पेनाने गिचमिड कालवा करून सुरु झालं. त्याचवेळी चौथीत पहिल्यांदाच कळलं कि वर्गातला नौशाद् शेख आपल्यातला नाही. हे म्हणजे अफाटच होतं, आजपर्यंत आमच्या घोळक्यात तुमच्या-आमच्यासारखाच असणारा, मिसळणारा आणि आरेला कारे करणारा नौशाद एकदमच परका झाला होता. आम्ही काही गोष्टी फक्त तो नसतानाच बोलायला लागलो. त्याच्या समोर शिवाजी महाराजा विषयी प्रेम व्यक्त करायला कचरू लागलो. हे त्याने पण लगेच समजून घेतले असावे. कारण त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप बदल झाला होता. जरा मोठे झालो कि कळते कि आपला धर्म आणि जात आपल्या रक्तातच आहे, लहानपणी ते रक्त वेगळे असते का कुणास ठावूक ?  पण मोठेपणी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या रक्ताचा, रक्तात भिनलेल्या संस्कृतीचा, आपल्या रक्ताशी मिळतेजुळते रक्त असणाऱ्या (जातभाई ) नेत्यालाच आदर्श मानायला चालू करतो. आणि ह्याच वेळी चालू होते दुसर्या जाती - धर्माच्या नेत्यांचा त्या-त्या लोकांच्या समोर अतोनात आदर करणे.  मग अश्या तर्हेने परतफेड चालू होते, कुणी आंबेडकरांचे गोडवे गातो, कुणी शिवाजी महाराजांचे, कुणी मौलाना आझाद, टिपू सुलतान किंवा भगवानबाबा. दहावी पर्यंत येस्तोवर कळले कि आपण समाजात असताना सर्वधर्म समभाव असतो आणि सजातीय लोकामध्ये असताना आपली जात आणि धर्म संकटात आलेला असतो. बहुतेक लोक हे अश्या तर्हेचे सोंग घेवून समाजात वावरत असतात आणि वरून मी जातीभेद धर्मभेद मानत नाही असे सांगताना "त्या" लोकानी एवढे माजल्यावणी करायला नाही पाहिजे असे सल्ले पण देत असतो.

हळू हळू दहावी पर्यंत नौशादचा ग्रुप वेगळा झाला व आमचा वेगळा. तरी पण क्रिकेट खेळायला, गणपतीची वर्गणी मागायला तो आमच्यात असायचाच. पण आमच्या लक्ष्यात येवू लागले कि प्रत्येक वेळी याला आपण देशाशी कसे इमानदार आहोत, हिंदू धर्माचे शत्रू नाही आहोत हे सिद्ध करावे लागत आहे किंवा तोच स्वताहून सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सईद अन्वरला आमच्या पेक्ष्या एक शिवी तो जास्तच द्यायचा. डोक्याला नेमाटी वोढून शिवजयंतीची वर्गणी मागताना शिवाजी महाराजा बद्दलचा त्याचा आदर आम्हाला नेहमी जास्तच वाटायचा. चुकून आम्ही कधी "शिवाजी" बोललो तरी तो फक्त "महाराजाच"  म्हणायचा. अर्थात त्याच्या आदरा विषयी अजिबात शंका नाही पण आमच्या इतर मित्रापेक्ष्या त्याचे योगदान नेहमीच जास्त असायला पाहिजे असा त्याचाच दंडक होता. असा दंडक त्याने का करून घेतला असेल याचे उत्तर आजच्या अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याक ह्या दोन सज्ञे मध्ये आढळेल.
 त्यांनी इथे राहावे पण आम्ही सांगेन तसेच दुय्यम नागरिकत्व पत्करून राहावे हि आपली सुप्त पण कधी कधी उतू येणारी भावना. एकुणातच हे राज्य आमचे आहे हि भावना जणते मध्ये निर्माण करणे हे म्हणजे धोरणात्मक रित्या शिवाजी महाराजांच्या विचारणा मूठमाती देण्यासारखे आहे.

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे बघताना सर्वसामान्य मराठी माणूस हा अफजलखानाचा वध, आग्ऱ्याहून
सुटका, पुरंदरचा तह, आणि भवानी तलवार ह्या पुढे जाताना दिसत नाही तर अमराठी माणूस हा मराठ्यांचे राज्य, लुटारूंचे राज्य अश्या कुत्सित नजरेनेच बघताना दिसतो. ह्याला मूळता आपली शिक्षण पद्धती आणि राजकारणच कारणीभूत असले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे स्वतंत्र रित्या पाहता येवू शकणार नाही. हिंदुस्थानमध्ये दक्षिण उत्तर आणि पशिच्म पूर्व पसरलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वराज्य निर्मिती करणारा, हे राज्य राजाचे नाही तर रयतेचे आहे असे देशप्रेम रयतेच्या मनात निर्माण करणारा तो एकमेव राजा होवून गेला. शिवाजी महाराजांनी स्वतासाठी फक्त कार्यकर्ते नाहीत तर आपल्या पाठीमागे राज्य सांभाळतील असे नेते तयार करून एक स्वराज्याचा विचार दिला होता म्हणूनच सह्याद्रीच्या कुशीत तयार झालेले ह्या छोट्याश्या स्वराज्याने पुढे जावून आपली सीमा उत्तरेकडे अफघानिस्तान पर्यंत तर दक्षिणेला तामिळनाडू पर्यंत पोहचवली. 


शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीनंतर नंतर जवळ जवळ पावणे चारशे वर्षांनी जर आजच्या समाजाकडे आणि राज्यव्यवस्थेकडे पाहिले तर ढोबळ  मानाने आपण असे म्हणू शकतो कि आपण शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या, समानतेच्या, न्यायाच्या, कायद्याच्या राज्याच्या आणि स्वराज्याच्या संकल्पनेला तिलांजली दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मागणारे महाराजांचा नेमका कोणता विचार रुजवू पाहत आहेत हेच कळत नाही. आजचा काळ मला शिवपूर्व काळाची आठवण करुण देत आहे. मुघलांनी आणि इतर दक्षिणेतल्या शाह्यांनी जसे सरंजामशाहीला प्रोत्साहन देवून हिन्दुस्थानवरचि आपली पकड मजबूत केली होती तशीच पकड लोकशाही मार्गाने दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी खानदानी सरंजाम निर्माण करून आपले राज्य चिरायू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या  वतणासाठी झालेल्या लढाया आपण कधी कधी पाहतो पण त्यामुळे वरच्या सल्तनतीला काहीच फरक पडत नाही. 


प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांना वापरले आहे, त्यामुळे कुणासाठी शिवाजी महाराज हिंदुत्ववादी असतात, कुणासाठी मराठी, कुणासाठी मराठा तर एखाद्याला राजपूत आहे म्हणून मिरवून घेण्यात कौतुक वाटते. आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर अगोदर शिवाजि महाराजाविषयीचे लोकामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. ते देवाचा अवतार नव्हते तर ते एक तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचा माणूस होते व स्वकष्टातून आणि जिजाऊ-शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली होती. त्यांचे राज्य हे कुणा धर्माच्या विरोधात नाही तर ते स्वकीयांचे राज्य होते, अफझल खानाला मारणे हा त्यांचा धर्म होता कारण तो स्वराज्यावरचे संकट होता पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणे हा सुद्धा महाराजांचा धर्म त्यांनी पाळला होता. सतराव्या शतकामध्ये जातीपातीची उतरंड असताना त्यांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात आणि प्रशासनात स्थान देवून समतेच्या राज्याची स्थापना करताना आपण धोरणी आणि दूरदृष्टी असलेले राजे आहोत हे दाखवून दिले होते.

आज शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे एवढे गुण जरी आपण रुजवू शकलो तरी पुढे शिवाजी महाराजांचा वापर कुणी जातीय, धार्मिक व राजकारणातील दंगली साठी करायचा प्रयत्न करताना हजार वेळा विचार करील. आणि नौशाद पुढे त्याच्या मित्रांना महाराजा विषयी बोलताना अडखळण्याची गरज पडणार नाही किंवा किंवा नौशादाला त्याची इमानदारी सिद्ध करण्यासाठी सईद अन्वरला एक शिवी मुद्दामहून जास्त द्यावी लागणार नाही.




Saturday, February 15, 2014

फ्यांड्री

करमणुकीला वास्तवतेची जोड दिली तर कलाकृती अतिशय सुंदर तर बनूच शकते पण जो संदेश आहे तो सुद्धा अतिशय भेदकपणे लोकापर्यंत पोहचवू शकते. आजपर्यंत  ह्याच गोष्टी अवती भोवती होत असताना आपण त्याकडे त्रयस्थ नजरेने पाहत आलो आहोत किंवा त्याचाच एक भाग बनून मजा घेत आलोय, तीच गोष्ट दुसर्या बाजूने पहिली तरी किती अन्यायी आणि अत्याचारी असते ते हलगीच्या कांठाळ्या बसणाऱ्या आवाजात सांगितले आणि दाखविले आहे नागराज मंजुळे याने. चित्रपटामध्ये कुणीही हिरो नाही व्हिलन सुद्धा नाही. आहे तो प्रोटोगोनीस्ट जांबुवंतराव कचरु माने उर्फ जाम्ब्या. व्हिलनचि भूमिका अतिशय चपखल पणे पार पाडलीय आपल्या ह्या समाजव्यवस्थेने, जिच्या सनातनतेचा आणि  परंपरेचा अभिमान आपण नेहमीच कधी उघडपणे तर कधी झाकून झाकून बाळगत आलो आहोत. 

चित्रपट तुम्हाला तुम्ही तरुण आणि वृद्ध असाल तर तुमच्या बालपणात घेवून जातो आणि षोडशवर्षीय असाल तर तुमचेच जगणे तुमच्यासमोर मांडतो. फरक एकच आहे कि तुम्हाला जो लाईन मारण्याचा नैर्सर्गिक अधिकार आहे तो जाम्ब्याला नाही. त्याला त्याचं दलितत्वाचे ओझं घेवूनच जगावं लागणार आहे हे त्याच्या बापाला कळलेलं वास्तव त्याला कळलेलं नाही. त्यामुळे तो प्रेम करतोय बंड करतोय, ते ओझं झुगारून टाकून त्याच्या दुसर्या वर्गमिमित्रासारखंच स्वातंत्र्यातील आयुष्य जगायचं प्रयत्न करतोय. पण ते एवढे सोपं नाही, कारण ते ओझं तो एकटा झुगारून देवूही शकेल पण त्याच्याबरोबर एक कुटुंब पण आहे आणि त्या कुटुंबाच्या सुखदुखापासुन तो वेगळा होवू शकत नाही. शतकानुशताकाच्या गरिबीशी आणि तिच्या उपशाखांशी लढण्यातच सारी ताकत खर्च झालेली असल्यामुळे ह्या गुलामगिरीविरुद्ध लढण्यासाठी आता ताकताच शिल्लक राहिली नाही आणि त्यातच गुरफटत आपला संसार करायचा आहे, पोरीची लग्न करायची आहेत लेकराची पोटं भरायची आहेत. अश्या अतिशय सर्वसामान्य दलित बापांचे प्रतिनिधित्व उत्तमपणे केले आहे किशोर कदमने. किशोर कदम कुठेच कलाकार वाटत नाही. वाटतो तो मध्यमवयातच थकलेला पिचलेला दलित जो आपल्या प्रत्येक गावात आणि आपल्या आसपास असतो. ज्याच्याशी आपण दररोजचा व्यवहार करत आसतो आणि त्याच्याकडून जोहाराची पण अपेक्श्या करत असतो. 

चित्रपटाची सुरुवात थोडीशी हळू होते पण नंतर हवा तेवढा वेग पकडतो. चित्रपटात लहान सहान गोष्टी अश्या पकडल्या आहेत कि तिथे वास्तवतेशी तडजोडच नाही. चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करणारा जाम्ब्या, दररोज लोकांच्या शेतातून निरगुडीचे फोक आणून झाप विकणारे त्याचे कुटुंब. जाम्ब्याच्या बहिणीला बघायला जीपमध्ये येणारे आणि मराठीत बोलणारे पाव्हणे. पाव्ह्न्यांचे मराठीत बोलणे आणि हुंड्याच्या वाटाघाटी ह्या आपल्या परंपरेपासून आणि संस्कुर्तीपासून अलग असून बाकी मराठी समाजापासून कश्या वेगळ्या आहेत, पण ते उच्चवर्णीयांच्या असल्यामुळे त्यांचे अंधानुकरण होत आहे आणि त्यातच आपली भाषा आणि खरी संकृती मरत असून आपण एका वाईट संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत हेच दाखवायचे असावे नागराज मंजुळेला. 

विरोधाभासाचा उच्चांक म्हणजे हागायला बाहेर हागणदारीत जाणाऱ्या माणसाचे आपल्या स्मार्ट फोन मधून फेसबुकवर फोटो अपलोड करणे. अश्या एक न अनेक प्रसंग जाणिवपूर्वक घातले आहेत कि आले आहेत हे दिग्दर्शकालाच माहित पण अश्या लहान लहान पण अर्थपूर्ण घटनांनी चित्रपट अर्थपूर्ण बनला आहे. 

चित्रपटातील सर्वोत्तम  सीन, म्हणजेच राष्ट्रगीताशी संबधित परंपरा पाळण्याच्या नादात आपल्या कुटुंबाचे दिवसभराचे कष्ट वाया जाणार म्हणून खाटकाच्या खाटिक खाण्यातील शंभर बोकडाच्या चेहऱ्यावरची व्याकुळता घेवून फक्त असहाय उभेच राहणारा कचरु. पण हे करूण दृश्य पाहताना सुद्धा चित्रपट ग्रहात अनेक कोपर्यातून हास्याचे फवारे येत होते. हे पाहून असे वाटले हे लोक दुखात आनंद पाहणारे आहेत कि जगातील संवेदनशीलता कमी होत चालली आहे? 

शेवटी ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आपला जाम्ब्या बंड करतो पण ती बंडाची भूमिका आयुष्यभर बरोबर घेवून जावून तो ते यशस्वी करू शकेल कि त्याच्या बापासारखंच पराभव स्वीकारून आपले जगणे चालू ठेवीन हाच खरा प्रश्न आहे. अचानक होणारा शेवट आपल्याला अवाक करून जातो. 

चित्रपटगृहातील  खुर्चीवरून उठताना डोक्याला हात लावा, जर रक्त येत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही आहात. 

 


Saturday, February 1, 2014

शिवनेरी ट्रेक



पहाटे चारच्या थंडीत "ये विक्या राहूदे बे शिवनेरी, हनुमान टेकडीवर जावून मस्त "Good Luck"  चा बनमस्का खाऊ, सकाळी सकाळी  "FC"  चा  Crowd  बघू आणि येवू, आता चार वाजल्यात, सूर्योदय शिवनेरिवरुन नाही पाहू शकणार आपण"  ह्या आम्ल्याला  Crowd  चा  लय नाद. एक क्षण मी पण गाडी थांबविली आणि वाटलं चला हनुमान टेकडीवरच. पण लगेच स्पीड वाढवला आणि म्हटले "नाही आज शिवजन्मस्थानाचे दर्शन घेवूनच अन्न पाणी घ्यायचे" सकाळच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत  केजरीवालसारखं मुंडक्याला मफलर गुंडाळून वरून हेल्मेट घातले व ९०च्या स्पीडने सुसाट सुटलो. अम्ल्या अश्या वेळी मागे बसतो. खाली नुकताच घेतलेला ट्रेकिंग चा बर्मुडा घातला होता त्यामुळे पायाला भयंकर थंडी वाजत होती पण दीड हजार रुपयाला घेतलेला खाकी बरमुडा घालून पैसे फेडायचे होते, थंडी वाजली तरी चालेल पण दीड हजार फिटले पाहिजेत हि आपली कनिष्ठ मध्यमवर्गीय भावना जास्तच त्रास देत होती.

चाकणच्या पुढे चहा प्यायला थांबलो, आसपासाच्याच गावातले एक जोडपे पण चहा प्यायला थांबले होते. त्यातला पुरुष उठला आणि हॉटेल मालक कम वेटर कडे जावून म्हणाला

उटी/उसी काय हाय का? डॉक्टर बी चालंल!
नाही दारू ठीवीत न्हाय आपण.
बघा कि पान्नासिक रुपय जास्त देतो.
आहो नाहिवो.
मग द्या दोन चहा.

चहा घेतल्यावर तो पुरुष -
किती झालं ?
दोन चहाचं इस रुपय.
लय महागय राव, दहा रुपयाला चहा असतो का ?

आणि हाच माणूस दारूसाठी पन्नास रुपये सहजच जास्त मोजायला तयार होता.

शिवनेरीच्या पायथ्याला पोचलो. पूर्वेकडून येणाऱ्या पिवळ्या आणि  सोनेरी प्रकाशात न्हाहून निघालेला अर्धा शिवनेरी आणि त्याच डोंगराच्या कपारीत कोरलेली बुद्ध लेणी आम्हाला खुणावत होती. दोन तासाच्या भयंकर थंडीत केलेल्या प्रवासाचा शिन गळून पडला. अर्धा थंड आणि अर्धा शिवनेरी गरम असावा असा भास . किती स्थित्यंतरे पाहिली असतील ह्या किल्ल्यांनी? लेण्यांनी तर अफाटच. तिथली ती तपश्चर्या घरे अजूनही कुणाची तरी वाट बघत असतील का? आपल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या भूतकाळाप्रमाणे कुणीतरी यावे आणि केशरी वस्त्रे धारण करून आपल्या शांततेचा फायदा घेत स्वताला मुक्त करून घ्यायचा प्रयत्न करावा. अगोदरच निरव शांततेसाठी कोरलेल्या गुहांना आजची शांतता भयानकच शांत वाटत असेल. हजारो नसतील तर व्यवस्थित कोरलेल्या शेकडो गुहा नक्कीच असतील शिवनेरीच्या दोन्ही बाजूंनी. आज आपण फक्त विचारच करू शकतो, किती लोकांनी बुद्धाने दाखविलेल्या मार्गांने जावून दुखःवर आणि भीतीवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला असेल. इतिहासात जाण्याची मजा पण काही औरच असते.

सिंहगडाची सवय असलेल्या आम्हाला शिवनेरी छोटा वाटला, पण खूप शांत, कसलीही दुकानदारी येथे नाही, आमचे दही घ्या, गरम पिटले घ्या, चटई टाकते बसा हे अजिबात नाही. प्रवेश कर नाही, गडाचे पावित्र्य राखा असे सांगणारे पुणेरी बोर्ड नसून सुद्धा पावित्र्य राखले जातेय. आणि महत्वाचे म्हणजे कसलाही प्रवेश कर नसून सुद्धा संपूर्ण गडावर सुंदर बाग आणि फुले आहेत आणि त्यांची निगा पण राखली जातेय. गडावर कुठेही कचरा आणि पाण्याच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या नाहीत.

गडाच्या सुरुवातीलाच थोडाफार पडलेल्या अवस्थेत अंबार खाना आहे. पुरातत्व खात्याने त्याचा विकास करण्याच्या नादात सिमेंटने बांधू नये एवढीच अपेक्श्या आपण करू शकतो. गडावरून उत्तरेकडे चालत गेल्यानंतर शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. देवळाच्या पायरीला कधी न जाणारा हात त्या पायरीवर आपोआप गेला आणि डोक्याला लागला. तोच अंगात शिरशिरी येवून संपूर्ण अंग शहारून आले. इथेच जिजाऊने महाराष्ट्राच्या दैवताला जन्म दिला होता. तो वाडा आपल्याला अगदी सतराव्या शतकात घेवून जातो. फक्त तिथे असलेली पिवळी शिवमूर्ती शोभत नव्हती. काळ्या पाषाणाची मूर्ती खूप शोभून दिसली असती. तिथून थोडा पुढे गेले कि एक टकमक टोक इथे पण आहे. त्याला पाहून आम्ल्या म्हणाला "आयला विक्या या टकमक टोकाचा वापर माझ्या आयुष्यातील काही सभ्य ग्रहस्थ आणि कुलीन स्त्रियांसाठी करण्याची खूप इच्छया आहे" मग मी त्याला "All The Best"  दिले.

जेवढी शक्य आहेत तेवढी लेणी पाहून घेतली आणि पोटात कावळे वोराडू लागले म्हणून ताबडतोप खाली निघालो. निघताना पाच सहा वेगवेगळय शाळेतील सहली आल्या होत्या. वाशीम, खुलताबाद, संगमनेर, बुलढाणा भागातील खेड्यातील सहली. ती लहान मुले बघून खूप मज आली आणि आम्हाला आमच्या बालपणीच्या सहली आठवल्या. सगळ्यात चांगली कपडे घालण्याचा केलेला प्रयत्न, घरून आईने करून दिलेला चिवडा, शंकरपाळ्या आणि बुंदीचे लाडू. कधी नहितेच खिशात असलेले पैसे. पोरांच्या चेहऱ्यावर अफाट आनंद दिसत होता. आणि आमच्यासारख्या हाफ चड्डी वाल्याकडे ती मुले कौतुकाने बघत होती. त्यांना काय माहित आम्ही पण त्यांच्यातलेच आहोत. आज उगिच चंगाळ्या घालून गळ्यात क्यामेरा अडकविला असल्यामुळे वेगळे दिसत आहोत.